Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९

विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला झोडपले
चंद्रपूर, २३ मार्च / प्रतिनिधी

शहराच्या मध्यवर्ती भागातील एका शाळेत विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून विद्यार्थी व वॉर्डातील नागरिकांनी शिक्षकाला बेदम मारहाण केल्याची घटना आज येथे घडली. शहरातील महात्मा गांधी मार्गावर चित्रपटगृहाच्या बाजूला असलेल्या शाळेतील गणित विषयाच्या शिक्षकाने रविवारी सातवीतील विद्यार्थ्यांचा अतिरिक्त तास घेतला. सकाळी नऊ वाजताच्या या तासिकेला दोन विद्यार्थिनी हजर झाल्या. नेमकी हीच संधी साधून शिक्षकाने यातील एका विद्यार्थिनीला वर्गाबाहेर पाठवले आणि दुसऱ्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केले, असा आरोप आहे.

मधुकरराव जवंजाळ यांचा सत्कार
अमरावती, २३ मार्च / प्रतिनिधी

अमृत महोत्सव गौरव समितीच्यावतीने सहकार नेते मधुकरराव जवंजाळ यांचा रविवारी येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात सपत्नीक सत्कार करण्यात आला. या सोहोळ्याला अमरावतीकरांनी गर्दी केली होती. सहकार चळवळीत काम करीत असताना मधुकरराव जवंजाळ यांनी माणसे जोडण्याचे काम केले. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांना कोणी विरोधकही राहिला नाही, अशा शब्दामध्ये उपस्थित नेत्यांनी त्यांचा गौरव केला.

कलातपस्वी राम जाधवांचा अमृतमहोत्सवी सत्कार
अकोला, २३ मार्च / प्रतिनिधी

ज्येष्ठ रंगकर्मी, कलातपस्वी राम जाधव यांचा अमृतमहोत्सवी सत्कार सोहोळा रविवारी प्रमिलाताई ओक सभागृहात थाटात पार पडला. नाटय़ क लेकरिता वाहून घेतलेल्या राम जाधवांच्या कलागुणांचा गौरव या वेळी मान्यवरांनी केला. राम जाधवांमुळे अकोल्याचे नाव नाटय़कलेच्या वर्तुळात सर्वदूर ठळकपणे चमकले, असे उद्गार ज्येष्ठ शल्यचिकित्सक नानासाहेब चौधरी यांनी काढले. राम जाधवांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. रसिकाश्रय, अखिल भारतीय नाटय़ परिषद आणि स्थानिक कलावंतांच्या वतीने या सत्कार सोहोळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

राजे सत्यवान आत्राम बंडखोरीच्या पवित्र्यात
चंद्रपूर, २३ मार्च / प्रतिनिधी

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाटय़ाला आल्याने राष्ट्रवादीचे स्थानिक नेते संतापले असून, या मतदारसंघावर सुरुवातीपासून दावा सांगणारे अहेरीचे राजे सत्यवान आत्राम बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीने हा मतदारसंघ रिपाइंचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्यासाठी सोडला होता.

बुलढाण्यात ‘साहेब’ विरुद्ध ‘मालक’
बुलढाणा, २३ मार्च / प्रतिनिधी

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपाचा सव्वीस-बावीसचा ‘अंतिम फैसला’ झाला असून अपेक्षेप्रमाणे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे नाव घोषित झाले आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटेल व पक्षाचे उमेदवार विद्यमान आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हेच राहतील, असे भाकीत ‘लोकसत्ता’ने सुरुवातीपासूनच केले होते ते तंतोतंत खरे ठरले.

आघाडीची बिघाडी!
विदर्भातील लोकसभेच्या सहा मतदारसंघांचे जागावाटप सर्वात अगोदर जाहीर केले ते भाजप शिवसेना युतीने! एखाद- दोन मतदारसंघ वगळता युतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. उमेदवार व कार्यकर्ते प्रचाराचे ढोलताशे देखील वाजवू लागले आहेत. दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपाचा घोळात घोळ सुटल्याने उमेदवारांची नावे जाहीर करण्याचा ‘घोळ’ सुरूच आहे. ‘आघाडी’च्या या नेहमीच्याच ‘स्टाईल’मुळे नमनालाच बिघाडी होऊ लागली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार घोषणा होण्यापूर्वीच युतीचे उमेदवार पंचवीस टक्क्याहून अधिक प्रचारकार्य आटोपून घेणारे आहे. मतदारांची ‘फर्स्ट कम फर्स्ट सव्‍‌र्ह’ अशी मानसिकता असते. काँग्रेस राष्ट्रवादीची दप्तर दिरंगाई त्यामुळेच उमेदवार व कार्यकर्त्यांना अडचणीत आणत असल्याची भावना वाढू लागल्याने आघाडीच्या बिघाडीवर उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

मतदार ओळखपत्रावरील फोटो : चर्चेचा विषय
ब्रह्मपुरी, २३ मार्च / वार्ताहर

पंधराव्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाच्यावतीने देण्यात आलेल्या ओळखपत्रांवरील छायाचित्र त्याच मतदाराचे आहे किंवा नाही, हा येथे एक चर्चेचा विषय झाला आहे. निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून मतदारांना आयोगाकडून ओळखपत्राचे वितरण करण्यात येत आहे. ब्रह्मपुरी मतदारसंघातदेखील त्याची जोरदार तयारी सुरू आहे. पण ज्या यंत्रणेकडे फोटो काढण्याचे कंत्राट देण्यात आले आहे, ती यंत्रणा केवळ यांत्रिकपणे त्यांचे काम करीत आहे. फोटो योग्य की अयोग्य, याची काळजी घेण्याची तयारी नसल्याचे एकूण चित्र आहे. त्यामुळे मतदारांमध्ये नाराजी पसरली आहे.अधिकृत सूत्रानुसार येथील फोटोचे कंत्राट जिल्हा सेतू विभागाच्यावतीने नागपूर येथील चौरसिया नावाच्या कंत्राटदाराला देण्यात आले आहे. मात्र फोटो काढणाऱ्या यंत्रणेतच बिघाड असल्याने फोटो कसे चांगले निघणार असा प्रश्न चर्चिला जात आहे. या संदर्भात ब्रह्मपुरी मतदारसंघातील निवडणूक अधिकारी बोरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. छायाचित्राबाबत शंका घेऊन मतदान अधिकारी मतदानाचा हक्क नाकारतील की काय, अशी शंका मतदारांना वाटत आहे.

अपघातातील जखमी प्रवासी आर्थिक मदतीपासून वंचित
भंडारा, २३ मार्च / वार्ताहर

मागील नऊ महिन्यांपूर्वी साकोली तालुक्यातील वांगी येथील रेल्वे फाटकावर रेल्वेगाडी आणि एस.टी. बसची धडक झाल्याने १३ प्रवासी जखमी झाले होते. त्यावेळी आमदार नाना पटोले, एस.टी. महामंडळाचे अधिकारी यांनी जखमींना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही त्यांना आर्थिक मदत मिळालेली नाही. साकोली तालुक्यातील वांगी येथे रेल्वेफाटकावर २३ जून २००८ ला एस.टी. बस व गोंदियाकडे जाणाऱ्या रेल्वेगाडीची धडक झाल्याने बसचा मागील भाग रेल्वेखाली येऊन चेंदामेंदा झाला होता. यात बसचालक तुलाराम भुते, वाहक कला मडावी, प्रवासी चामना मोटघरे, विश्वनाथ शहारे, फुलचंद मेश्राम, नीलेश अंबादे, सरिता बोंगोनिवार, महेश बोंगोनिवार, रोजा बोंगोनिवार वांगी व होजीराम पर्वते, बाबुराव राऊत, सुनील लाडे, अजित पर्वते, बोळदे हे जखमी झाले होते. त्यात गंभीर जखमी झालेले विश्वनाथ शहारे व चामना मोटघरे यांना नागपूर शासकीय रुग्णालयात तर इतर जखमींवर भंडारा व साकोलीच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.

कृषी विकास योजनेतून शेततळ्यांना मंजुरी
दर्यापूर, २३ मार्च / वार्ताहर

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत तालुक्यातील दर्यापूर, शिंगणापूर व येवदा या तीन कृषी मंडळ विभागात ७५० शेततळ्यांना मंजुरी मिळाली आहे. दर्यापूर विभागात १०५, शिंगणापूर व येवदा मंडळात ९५ तळे तयार झाले आहेत. यामध्ये ७० टक्के अनुदानावर ९५ तळ्यावर ५४ लाख तर १०५ लहान तळ्यावर २२ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. शेततळे मंजुरीकरिता अनेक शेतकऱ्यांचे अर्ज मंडळ कृषी अधिकाऱ्याकडे येत असून शेवटची यादी पाठविल्याच्या कारणास्तव अनेक शेतकरी शेततळ्यापासून वंचित राहिले आहेत. शेततळ्याच्या मंजुरीची नवीन यादी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.शेततळे करण्याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यास अतुल मेहता, राजाभाऊ तराळ व श्रीकिसन हून यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.

ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात
वडनेर, २३ मार्च / वार्ताहर

येत्या बुधवारी होणाऱ्या ग्रामपंचायतीचा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी गावात सर्रास दारूचे वाटप केले जात असल्याची चर्चा आहे. गेल्या काही महिन्याआधी दारूबंदीसाठी सक्रिय असलेले पोलीस अधिकारी, तंटामुक्त समिती अध्यक्ष आणि नेते अचानक निष्क्रिय झाल्याचे दिसत आहे.

गोल्डन जेसीजचे भाषण कौशल्यावर प्रशिक्षण शिबीर
खामगाव, २३ मार्च / वार्ताहर

खामगाव जेसीआय गोल्डनच्या वतीने विविध विषयांवर प्रशिक्षण आयोजित केले जाते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरता गो.से. महाविद्यालयामध्ये भाषण कौशल्यावर प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणाचे संचालन गोल्डन जेसीजच्या युथविंगने केले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जेसी आस्था पठण करण्यात आले. तद्नंतर गोल्डन जेसीजचे अध्यक्ष जेसी डॉ. धनंजय तळवणकर त्यांचे स्वागतपर भाषण झाले. प्रमुख पाहुणे विभागप्रमुख प्रा. अशोक पडघन होते. प्रमुख पाहुण्यांनी भाषणामध्ये जेसीजकडून राबवल्या जाणाऱ्या प्रशिक्षण शिबिराची प्रशंसा केली. त्या शिबिराला शुभेच्छा दिल्या. या शिबिराचे विभाजन चार सत्रामध्ये करण्यात आले. जेसीजचे प्रशिक्षक जेसी एच.जी.एफ. हितेश सोनी, जेसी प्रा. देवीदास जाधव व जेसी डॉ.धनंजय तळवणकर यांनी समर्पक उदाहरणे देऊन भाषण टिप्स दिल्या. त्यानंतर शिबिरार्थ्यांकडून प्रत्येकी पाच मिनिटे भाषण करवून घेण्यात आले. शेवटी आभार ज्युनियर जेसी चेअर पर्सन स्नेहा तांबट हिने मानले. यावेळी राहुल राऊत, अभिजीत अग्रवाल, संकेत शेळके, विवेकी तिजारे, ज्योती राठी, रचना सोनी, नेहा खत्री, प्राजक्ता मिरकुटे, संदीप सपकाळ विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

सतीश वखरे यांना ‘हिंगणघाट भूषण’
हिंगणघाट, २३ मार्च / वार्ताहर

साप्ताहिक ‘पार्थसारथी’च्या पुन: प्रकाशन सोहोळ्यात ज्येष्ठ पत्रकार सतीश वखरे यांना हिंगणघाट भूषण सन्मानाने गौरवण्यात आले. धनराज जैन हे संस्थापक संपादक असलेले साप्ताहिक ‘पार्थसारथी’ मधल्या काळात बंद पडले होते. येथील समाजसेवक प्रा. सोभागमल डूंगरवाल यांच्या संपादकत्वासाठी या साप्ताहिकाचे पुन: प्रकाशन नुकतेच करण्यात आले. या पुन: प्रकाशन सोहोळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सुरुची मसाल्याचे संचालक संतोष जैन, आमदार राजू तिमांडे, पत्रकार हरिभाऊ वझूरकर, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी व मुख्य संपादक रवी डूंगरवाल उपस्थित होते. या कार्यक्रमात सतीश वखरे यांचा स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सन्मानपत्राचे वाचन दीपक माडे यांनी केले.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मतमोजणी केंद्र हटवण्याची मागणी
भंडारा, २३ मार्च / वार्ताहर

निवडणूक व्यवस्थेमुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या ८०० विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आणू नये, अशी मागणी एनएसयूआय ने केली आहे. भंडारा जिल्हा एनएसयूआय चे अध्यक्ष महेश रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी प्रतिनिधींनी निवासी उपजिल्हाधिकारी चौबळ यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत मतमोजणी केंद्र म्हणून देऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर झाला नाही तर एनएसयूआय रस्त्यावर येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी मुख्यमंत्री, निवडणूक आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांना देण्यात आल्या आहेत.