Leading International Marathi News Daily
मंगळवार, २४ मार्च २००९
विविध

भाजपच्या दुसऱ्या यादीत तीन विद्यमान खासदार; जावळे, पाटील यांना वगळले
पूनम महाजन, किरीट सोमय्या यांच्यात रस्सीखेच सुरूच

नवी दिल्ली, २३ मार्च/ खास प्रतिनिधी

 

राज्यातील लोकसभा निवडणुकांसाठी आज दुसरी यादी जाहीर करताना भाजपने आणखी नऊ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. पण ईशान्य मुंबई मतदारसंघातील उमेदवारीवर निर्णय प्रलंबित ठेवला. या मतदारसंघातून पूनम महाजन राव आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यात रस्सीखेच सुरु आहे.भाजपने पुणे मतदारसंघातून अनिल शिरोळे यांना उमेदवारी दिली असून वर्धेतून सुरेश वाघमारे, चंद्रपूरमधून हंसराज अहीर, भंडारा-गोंदियातून शिशुपाल पटले यांची उमेदवारी कायम राखली आहे, तर डी. बी. पाटील (नांदेड) आणि हरीभाऊ जावळे (जळगाव) या खासदारांची तिकीटे कापली आहेत. अहमदनगरमधून भाजपने पुन्हा दिलीप गांधी यांची निवड केली आहे. यापूर्वी भाजपने पहिल्या यादीत ११ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. ईशान्य मुंबईमधून पूनम महाजन राव यांना उमेदवारी मिळावी म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी प्रतिष्ठेचा प्रश्न केला असून त्यावर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत निर्णय घेणे आजही शक्य झाले नाही. भाजपश्रेष्ठींचा कल किरीट सोमय्या यांच्याकडे असला तरी मुंडे यांच्यामुळे या जागेविषयी श्रेष्ठींना निर्णय घेणे अवघड झाले आहे. ईशान्य मुंबईव्यतिरिक्त भाजपने उत्तर मध्य मुंबई, भिवंडी, लातूर, बारामती आणि सांगली या सहा मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली नाही. भाजपने आज जाहीर केलेल्या उमेदवारांची यादी याप्रमाणे आहे. डॉ. सुहास नातवडकर (नंदूरबार, अ. ज. राखीव), प्रतापराव सोनवणे (धुळे), ए. टी. पाटील (जळगाव), सुरेश वाघमारे (वर्धा), शिशुपाल पटले (भंडारा-गोंदिया), हंसराज अहीर (चंद्रपूर), संभाजीराव पवार (नांदेड), अनिल शिरोळे (पुणे), दिलीप गांधी (अहमदनगर).