Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ मार्च २००९
अग्रलेख

‘गुड आफ्टरनून ममता!’

 

‘नॅनो’ प्रत्यक्षात आली, स्वप्नवत वाटणारी एक गोष्ट प्रत्यक्षात उतरली. एखाद्या सुंदर परीसाठी आणखी किती काळ वाट पाहायला लावायची, हा ‘नॅनो’च्या वास्तवाचे जनक खुद्द रतन टाटा यांचाच प्रश्न. ‘नॅनो’ रस्त्यांवर कधी धावणार, ती धावणार की नाही, अशा शंका तसेच एका आडमुठय़ा राजकारण्यामुळे झालेला खेळखंडोबा आणि हजार कोटीच्या घरात झालेले नुकसान लक्षात घेता ‘नॅनो’ला द्यावी लागणारी किंमत नक्कीच जास्त असणार, ही आपली कल्पना. या प्रश्नांचा रतन टाटांनी अतिशय मार्मिक शब्दात समाचार घेऊन जिगरबाज धडाडीचे नाव ‘टाटा’ या दोन अक्षरांमध्ये कसे सामावले आहे, हे दाखवून दिले. तेही मुंबईच्या ‘ताज’मध्ये. दहशतवादी हल्ल्यानंतर जेमतेम चार महिने होतात न होतात, तोच त्यांनी मारलेली ही भरारी थक्क करून सोडणारी आहे. तसे ‘सिंगूर’चे प्रकरणही ताजेच. तिथून बाहेर पडावे लागले हे वेदनादायी, पण त्यासही पाठीशी घालून ते ठाम उभे राहिले. ‘आजच्या या दिवशी ममता बॅनर्जीना तुम्ही कोणता संदेश देऊ इच्छिता,’ या प्रश्नावर रतन टाटा यांनी, ‘आपण त्यांना फक्त ‘गुड आफ्टरनून’ म्हणून शुभेच्छा देऊ इच्छितो,’ असे म्हटले. त्यांच्या या दोन शब्दातच टाटा घराण्याची सुसंस्कृतता दडलेली आहे. जगातली अतिशय स्वस्त मोटार पश्चिम बंगालच्या सिंगूरमधून बाहेर पडू शकली नाही, याबद्दल ममता बॅनर्जीना पश्चात्ताप व्हायचा प्रश्नच नाही. त्या मुरलेल्या आणि अर्थातच खारावलेल्या राजकारणी आहेत, हे त्यांनी याच प्रश्नावर दाखवून दिले. पश्चात्तापाविषयी विचारताच त्यांनी त्या पत्रकाराला विचारले, ‘तुला काय पैसे मिळाले, की जाहिरात?’ असा मस्तवालपणा त्यांनी करायचा नाही तर मग करायचा कोणी? राजकारण्यांनी काय करावे, काय करू नये, हे त्यांना कुणीच सांगू शकत नाही. मतदार त्याविषयी त्यांना धडा देऊ शकतो, पण मतदारालाही मनातल्या सगळ्याच गोष्टी आपल्या मर्यादेत अमलात आणता येतात असे नाही. जे राजकारणी सध्या ‘आयपीएल’च्या मागे लागले आहेत, त्यांची खेळपट्टी क्रिकेटची नाही, असे परवा केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम म्हणाले, तरी बऱ्याच राजकारण्यांचा जीव अजूनही ‘आयपीएल’मध्येच अडकला आहे. सिंगूरमधून ‘नॅनो’च्या प्रकल्पाला बाहेर पडावे लागले आणि पश्चिम बंगालमधल्या हजारो तरुणांचा रोजगार बुडाला. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी परत मिळवण्यासाठी थयथयाट केला, असे ममता बॅनर्जी सातत्याने सांगत होत्या, त्या शेतकऱ्यांनीच ‘नॅनो’ सिंगूरमधून जाऊ नये, यासाठी शेवटच्या टप्प्यात जीवाचा आटापिटा केला होता. त्यावेळी डावे वगळता भाजपसह सर्वानी ममता बॅनर्जींच्या पाठिशी उभे राहणेच पसंत केले होते. आता तर काँग्रेसने ममतांच्या पक्षाशीच आघाडी करून विकासाबद्दलचा आपला दृढनिश्चय हा फक्त कागदोपत्रीच असल्याचे स्पष्ट केले आहे. टाटा उद्योगसमूह हे एक असे औद्योगिक घराणे आहे की, जे कधीही, कोणत्याही कारणासाठी लाच द्यायला तयार होत नाही. अनेकांनी त्यांना त्रास द्यायचे असंख्य मार्ग शोधले. पण टाटांनी मोडेन पण वाकणार नाही, हा आपला बाणा कायम ठेवला. ‘जेआरडीं’ नंतर काय, हा सुमारे एक तपापूर्वी विचारला गेलेला प्रश्न आता बाजूला पडला आहे. ‘जग्वार’सारखी कंपनी टाटांनी घेतली आणि त्यानंतर पोलाद उद्योगात आघाडीवर असणाऱ्या ‘कोरस’लाही त्यांनी आत्मसात केले. इंग्लंडमधल्या ‘जग्वार रोव्हर’ मध्ये १६ हजारांहून अधिक कामगार आहेत. परदेशातही भारतीय कंपन्या मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करू शकतात, हे त्यांनी आपल्या कृतीने सिद्ध केले. टाटा या शब्दाची औद्योगिक उपक्रमशीलतेवर मोहोर उठली ती याच काळात. रतन टाटांनी आपल्या उद्योगसमूहात तरुणांची शक्ती उभी केली. त्यांच्या नवनव्या कल्पनांना त्यांनी उभारी दिली. आज ‘नॅनो’त त्यांच्या परिश्रमाचा उद्गार सामावलेला आहे. जमशेदपूरच्या व्यवस्थापनात काही वर्षांपूर्वी दिसणारी सरंजामी वृत्ती संपवून त्यांनी तिथल्या सगळ्या उपक्रमांचे लोकशाहीकरण केले. यापैकी कोणतीही गोष्ट त्यांनी वृत्तपत्रांमध्ये वा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे जाहीर केली नाही. अशा बाबींपासून ते नेहमीच दूर राहात आले आहेत. एकदा अशाच एका पेचप्रसंगात रतन टाटांनी आपला संपूर्ण वर्षांचा पगार हा आपल्या अधिकाऱ्यांना बोनस म्हणून जाहीर करून टाकला होता. स्वत:च्या उद्योगसमूहाची एक स्वतंत्र शिस्त त्यांनी निर्माण केली आणि त्या लक्ष्मणरेषेपलीकडे कुणी जाणार नाही, हे पाहिले. रतन टाटांनी घालून दिलेल्या या चौकटीचा ‘नॅनो’ने खुबीदार वापर करून घेतला आहे. चांगल्या शक्तीचे रूपांतर चांगल्या गोष्टींमध्ये करायचे, ही तर त्यांची खासियत आहे. सिंगूरमधून ‘नॅनो’ला हटविले गेले, गुजरातमध्ये साणंदला अजून कंपनी सुरू व्हायची आहे, अशा स्थितीत ‘नॅनो’ भारतीय रस्त्यांवर धावणार तरी कशी, ही काळजी अनेक चिंतातुर जंतूंना होती. उत्तरांचलातील पंतनगरमध्ये टाटांचा जो प्रकल्प आहे, त्यात ‘नॅनो’ तयार होते आहे. पुण्यात ‘टाटा मोटर्स’मध्येही ‘नॅनो’चे उत्पादन सुरू आहे आणि आता रतन टाटांनी दिलेल्या शब्दानुसार दोन महिन्यात लाखभर ‘नॅनो’ ग्राहकांच्या सेवेला हजर राहतील, तेव्हा सामान्य माणसासाठी छोटी मोटार द्यायचे त्यांचे ध्येय साकार होईल. डॉलरमध्ये तिची किंमत होते दोन हजार डॉलर. ती युरोपातल्या रस्त्यांवरही दिसणार आहे. ‘इंडिका’ने बऱ्याच देशांची बाजारपेठ आधीच व्यापलेली आहे. सध्याच्या मंदीच्या काळात टाटांच्या ‘नॅनो’ने उद्योगविश्वाची उमेद जागवली आहे. मंदीच्या तडाख्यातून अजून बाकीचे जग सावरू शकलेले नाही, अशाच वेळी ‘नॅनो’ भारतीय उद्योगाचे चित्र बदलायला येणार आहे. ‘नॅनो’ विश्वासाचे प्रतीक म्हणूनही ओळखली जाणार आहे. ‘प्रत्येक हातात कारची चावी असेल, असं कधी वाटलं होतं का,’ हे त्यांच्या जाहिरातीतले जणू घोषवाक्यच आहे. ‘आता हे होऊ शकेल,’ असा आश्वस्त करणारा आवाज त्या मागे आहे. ‘नॅनो’ तुम्ही कुणाला विकत देणार, असा प्रश्न रतन टाटांना विचारला गेला, पण या प्रश्नाचा झोपडपट्टीवाल्यालाही ती देणार का, असा रोख होता. रतन टाटांनी तेव्हा सांगून टाकले की जो कुणी या मोटारीची किंमत द्यायला तयार असेल, असा कुणीही संभाव्य मालक आपल्याला चालेल. त्याच्या दारासमोर मोटार ठेवायची जागा असली म्हणजे झाले! सामान्य माणसाची म्हणजे तर चैनच झाली, असे म्हटले गेले नसले तरी चैन ही श्रीमंत, अतिश्रीमंत माणसांनीच करावी, असा काही अलिखित नियम नाही. एखाद्या दिवशी पोटभर जेवण करणे, हीदेखील त्याच्या लेखी चैनीचीच बाब असू शकते. काहींचा जीव अजूनही मुंबई-पुण्याच्या रस्त्यांवरून ‘नॅनो’ धावणार, या कल्पनेने कसानुसा होऊन गेला आहे. आणखी मोटारी रस्त्यांवर म्हणजे प्रदूषण आलेच, अशी शंका घेणाऱ्यांचे निरसन रतन टाटांनी केले आहे. या मोटारीतून वातावरणात शिरणारा कार्बन डाय ऑक्साईड हा अन्य मोटारींच्या तुलनेत सगळ्यात कमी आहे; म्हणजे जवळपास नाहीच, हेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईच्या रस्त्यांवर आपण ‘भरधाव’ वेगाने जात असताना ‘नॅनो’ मात्र तिच्याच (ताशी सरासरी शंभर किलोमीटर) वेगाने जाणार, म्हणजे भलामोठा अडथळा की हो, अशाही शंका काहींनी खासगीत बोलून दाखवायला सुरुवात केली आहे. मुंबईत फक्त रात्री बारा ते पहाटे पाच या वेळातच एवढय़ा वेगाने मोटारी धावू शकतात, याची बहुधा त्यांना जाण नसावी. ‘नॅनो’ रस्त्यावर धावू लागल्यानंतर आपली एक विलक्षण जिद्द उभी राहणार आहे. मंदीच्या काळातही अशी संधी घेता येऊ शकते, या विषयीचा आदर्श ‘नॅनो’ घालून देणार आहे. गुजरातच्या साणंद प्रकल्पातून पुढल्या वर्षांपासून दरवर्षी साडेतीन लाख ‘नॅनो’ बाहेर पडतील. याच महिन्याच्या प्रारंभी जीनिव्हात भरलेल्या ७९ व्या मोटार प्रदर्शनात ‘टाटा नॅनो युरोपा’ने भल्याभल्यांचे डोळे उघडले. युरोपसाठी विजेवर चालणाऱ्या ‘टाटा इंडिका व्हिस्टा’ला त्यांनी तिथे सादर केले. भारतीय उद्योगविश्वाचे नाव युरोपातच काय, संपूर्ण जगात टाटांमुळे पोहोचले आहे. आगामी निवडणुकीपेक्षाही सध्या तरी खरी धमाल या ‘नॅनो’चीच दिसते आहे, कारण ती सामान्य माणसाच्या स्वप्नाला सत्याचा बाज देणार आहे. टाटांमध्ये साहसी वृत्तीचे ब्रीद दडले आहे, असे महात्मा गांधी म्हणत असत, रतन टाटांनी त्या विचारांना सोनेरी किनारच जोडली आहे.