Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ मार्च २००९

सौंदर्योपासक ‘रंग’कर्मी
डोक्यावर पांढरेशुभ्र केस.. सडसडीत देहयष्टी.. सदा हसतमुख चेहरा.. मितभाषीपणा.. असं ज्येष्ठ रंगभूषाकार कृष्णा बोरकर यांचं व्यक्तिमत्त्व गेली कित्येक वर्षे मनावर ठसलंय. कधीही भेटले तरी ‘काय कसं काय? बरंय ना?’ हा प्रश्न आवर्जून विचारणार. परंतु यापलीकडे स्वत:हून पत्रकारांशी फारसं न बोलणारे बोरकर लक्षात राहतात ते याचमुळे! प्रसार माध्यमांतल्या मंडळींशी मुद्दाम परिचय वाढविणारे अनेक असतात. पण बोरकरांना अशी गरज कधीच वाटली नाही. म्हणूनच कदाचित त्यांच्या कामाकडे प्रसिद्धी माध्यमांचं आजवर दुर्लक्ष झालं असावं. रंगमंचामागे काम करणाऱ्या कलाक्षेत्रातील मंडळींची तशीही नेहमी उपेक्षाच होते. ज्या क्षेत्रात ते काम करतात, त्या क्षेत्राकडूनही या कलावंतांची उपेक्षा होताना दिसते! कारण ही मंडळी कधीच प्रकाशझोतात नसतात. (नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी पडद्यामागच्या कलावंतांचा साधा विचारही झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं वा वाचलंय का?) असो. ..तर बोरकरांच्या गेल्या ६० वर्षांहून अधिक वर्षांच्या नाटय़-चित्रपट क्षेत्रातील रंगभूषेच्या कामाची पोचपावती म्हणून गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येला- २६ मार्चला कलावंतांच्या ‘चिरायू’ स्नेहमेळाव्यात त्यांना ५१ हजारांची थैली देऊन त्यांचा खास गौरव करण्यात येणार आहे. हा गौरव त्यांचा कार्याचा तर आहेच, पण त्याचबरोबर त्यांच्या अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाचाही आहे. रत्नागिरीतील चिंचखरी गावात जन्मलेल्या कृष्णा बोरकर यांच्या वडिलांचं अकाली निधन झाल्यानं नकळत्या वयातच त्यांच्या वाटय़ाला अभावग्रस्तांचं जगणं आलं. त्यामुळे मुलांचं संगोपन व शिक्षणासाठी त्यांच्या आईनं मुंबईची वाट धरली. गिरणीत ३० रु. पगारात आपल्या मुलांचं लालनपालन करण्याचा त्या माऊलीनं कसोशीनं प्रयत्न केला. कृष्णा बोरकर तेव्हा अवघे पाच-सहा वर्षांचे होते. अभ्यासात फारशी रुची नसल्यानं आजूबाजूच्या मुलांमध्ये खेळणं-बागडण्यातच त्यांचा दिवस जाई. याच दिवसांत त्यांचा कामगार रंगभूमीवरील नाटकांना पडदे, मेकअप, कपडेपट पुरविणाऱ्या पांडुरंग भुले यांच्याशी परिचय झाला. त्यांनी बोरकरांना ‘नाटकाला येतोस का?’ म्हणून एकदा विचारलं. नाटकाची नवलाई वाटत असल्यानं बोरकर त्यांच्याबरोबर गेले. हे नाटक होतं- ‘आग्य्राहून सुटका’. लहानग्या कृष्णा बोरकरांनी भुलेंना त्यांच्या कामात थोडीफार मदत केली. विंगेतून नाटक बघायला मिळाल्यानं ते ज्याम खूश झाले. वर भुलेंनी त्यांना आठ आणेही हातावर टेकवले. त्यामुळे तर त्यांना खूपच आनंद झाला. नंतर हा शिरस्ताच झाला. ते भुलेंसोबत बॅकस्टेजला पडेल ती कामं करायला लागले. इथंच ते पात्रांना रंगभूषा कशी करायची, याचं तंत्र बघून बघून शिकले. हळूहळू त्यात एक्स्पर्ट झाले. ही १९४२ सालची गोष्ट. त्याकाळी कामगार रंगभूमीवरील नाटकांची पुस्तकं निघत. त्यात छापण्यासाठी पात्रांचे रंगभूषेसह फोटो काढले जात. तेव्हा ‘सूडाची प्रतिज्ञा’ नाटकाच्या पुस्तकाकरिता पात्रांच्या रंगभूषेचं काम बोरकर यांनी करावं, असा आग्रह लेखकानं धरला. त्याप्रमाणे ते काम त्यांनी केलं. नाटकाच्या पुस्तकात ‘रंगभूषा- कु. कृष्णा बोरकर’ असा उल्लेखही त्यांनी आवर्जून केला. अवघ्या दहा-अकरा वर्षांच्या कृष्णाच्या रंगभूषेला मिळालेली ही एक प्रकारे दादच होती.

पर्याय ‘सोलर रिक्षा’चा
दिवसेंदिवस महाग होत जाणारे पेट्रोलियम पदार्थ अणि त्यांचा कमी होत असलेला साठा याचा विचार करता अपारंपरिक स्रोतांचा सर्वत्र विचार होऊ लागला. कोणत्याही ऊर्जेला सर्वोत्तम पर्याय सौर ऊर्जेचा आहे. ऊर्जेचा स्रोत हा अखंडित असून त्याचा योग्य वापर होणे गरजेचे आहे. याची जाणीव आज समाजातील सर्व स्तरांना होऊ लागली आहे. या ऊर्जेच्या वापराचे विविध स्तरांवर वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. हे प्रयोग अगदी १९७० पासून सुरू आहेत. घरात लागणाऱ्या विद्युत ऊर्जेला सौर ऊर्जेचा पर्याय देण्याचा पहिला प्रयोग अमेरिकेच्या लहान शहरातील एका व्यक्तीने केला. त्याचा यशस्वी प्रयोग पाहून आज त्या शहरातील ९० टक्के घरं सौर ऊर्जेवर चालत आहेत.
सौर ऊर्जेचे महत्त्व लक्षात घेता त्याचे प्रयोग आज अगदी वाहनांवरही होऊ लागले आहेत, आणि याचे पहिले यश ऑक्टोबरमध्ये दिल्लीत सुरु झालेल्या ‘सोलर रिक्षा’ या प्रयोगाला मिळाले आहे. या प्रयोगाची सुरुवात दिल्ली रेल्वे स्थानक ते चांदनी चौक येथे झाली. याचे उद्घाटन चांदनी चौकचे खासदार व केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री कपिल सिब्बल आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या हस्ते झाले. ही रिक्षा १५ ते २० किमी प्रती तास या वेगाने धावत असून ही सोलर बॅटरीवर चालते. एकदा चार्जिग केल्यानंतर रिक्षा अंदाजे ७० किमी प्रवास करू शकते. बॅटरी चार्जिगसाठी सुमारे पाच तासांचा अवधी लागतो. यासाठी लागणारे सोलर पॅनल खरेदी करणे सर्वाना परवडणारे नसल्याने दिल्लीत विविध ठिकाणी सोलर चार्जिग केंद्रे उभारण्यात आली आहेत. या प्रदूषण विरहित रिक्षाचे दिल्लीत चांगले स्वागत झाले. आता देशातील विविध भागांमध्ये हे प्रयोग सुरू झाले आहेत. पहिली ‘सोलर सिटी’ म्हणून ख्याती असलेल्या चंदीगढमध्येही या रिक्षांचा प्रयोग करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. यासाठी ‘सेंट्रल मॅकॅनिकल इंजिनिअरींग रीसोर्स इन्स्टिटय़ूट’ने पुढाकार घेतला आहे. शहरात प्रथम १० रिक्षा चालविण्यात येणार आहेत. त्यांना मिळणाऱ्या प्रतिसाद आणि यशानंतर पुढील निर्यण घेण्यात येईल असे शासनातर्फे सांगण्यात आले आहे. या १० रिक्षांमध्ये दिल्लीतील रिक्षांच्या मॉडेलमध्ये थोडाफार तांत्रिक बदल करून त्याची वेगमर्यादा २० ते २५ किमी प्रति तास करण्याचा प्रयत्न होत असल्याचे इन्स्टिटय़ूटने सांगितले आहे. या प्रयोगामुळे एका रिक्षामागे रोज सुमारे सहा टन कार्बन डायऑक्साइडची निर्मिती आपण नियंत्रणात आणू शकतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रिक्षाच्या या नव्या रुपाने सायकल रिक्षाचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या नव्या रिक्षामुळे आपल्या शरीरातील ऊर्जा पूर्णपणे वापरून सायकल ओढणाऱ्या या रिक्षाचालकांचे श्रम वाचले. शिवाय कालांतराने पेट्रोल अथवा डिझेल रिक्षांकडे वळणाऱ्या या रिक्षाचालकांना हा चांगला पर्याय मिळाला आहे. या पर्यायामुळे प्रदूषण नियंत्रणाचे मोठे काम होणार आहे. १९७७ मध्ये पार पडलेल्या ‘सायन्स काँग्रेस असोशिएशन’च्या अखेरच्या सत्रात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पूर्वीच्या बैलगाडय़ांची रचना बदलण्यात यावी असे वैज्ञानिकांना सांगितले होते. जेणेकरून बैलांना ओझे वाहून नेण्यास सोयीचे होईल. त्यानंतर बैलगाडीला बैलांच्या उंचीएवढे चाक लावण्यास सुरुवात झाली आणि सर्वाच्या लक्षात आले की त्यांच्या कामाची गतीदेखील वाढली. आजपर्यंत उत्तर भारतात चालविण्यात येणाऱ्या सायकल रिक्षांमध्येही वैज्ञानिक सिद्धांतानुसार बदल करण्यात आले होते. मात्र तरीदेखील मानवी ऊर्जेचा वापर मोठय़ा प्रमाणावर झाल्याशिवाय ती रिक्षा पुढे सरकणे शक्य होत नाही. यामुळे नव्याने तयार झालेली ही ‘सोलर रिक्षा’ म्हणजे प्रदूषणविरहीत, केवळ सौर ऊर्जेवर चालणारी अशी आहे. जेणेकरून रिक्षाचालकांच्या कामाची गती वाढेल आणि त्यांना कमी श्रमात अधिक पैसे कमाविता येऊ शकतील अशी आशा काही सामाजिक संस्थांनी व्यक्त केली आहे. उत्तर भारताप्रमाणे देशभरात या पर्यायाचा विचार व्हावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. ही सायकल म्हणजे ‘विज्ञान हे मानवाच्या विकासासाठी आहे’ हे सर्वार्थाने पटवून देणारे उदाहरण आहे.
नीरज पंडित
nirajpandit@in.com