Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ मार्च २००९

गोविंदा गोत्यात!
मुंबई, २४ मार्च / प्रतिनिधी

मुंबई, २४ मार्च / प्रतिनिधी
रंगपंचमीनिमित्त पाठिराखे आणि चाहत्यांवर पैशांची उधळण करून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप असलेला अभिनेता आणि खासदार गोविंदा याच्या ‘कॅश ऑन होली’ प्रकरणाची पुढील चौकशी उपनगरीय जिल्हाधिकाऱ्यांनी आज जुहू पोलिसांकडे वर्ग केली. तसेच चौकशीनंतर गोविंदावर योग्य ती कारवाई करावी, असे आदेशही दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशाच्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत. रंगपंचमीच्या दिवशी घराबाहेर जमलेल्या पाठिराख्यांवर आणि चाहत्यांवर गोविंदाने पैशांचा वर्षांव केला होता.

‘सायलन्स झोन’च्या विरोधात राज यांनी थोपटले दंड
मुंबई, २४ मार्च/ खास प्रतिनिधी

आपल्या पक्षाचे विचार आणि उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी जाहीर सभा तसेच मेळावे घेण्यात ‘सायलन्स झोन’मुळे सर्वच राजकीय पक्षांची पुरती गोची झाली असून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विरोधात दंड ठोपटले असून राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी देबाशिष चक्रवर्ती यांची भेट घेऊन लोकशाही सक्षम करण्यासाठी बंदी असलेल्या ठिकाणी राजकीय पक्षांना सभा घेण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे.

‘बद’ अच्छा; ‘बदनाम’ बुरा!
माणूस प्रत्यक्ष वाईट असणे एक वेळ ठीक; परंतु एखादा माणूस वाईट असल्याचा सततचा प्रचार, त्याची बदनामी ही गोष्ट अधिक हानिकारक असते. प्रत्यक्षात वाईट असलेली अनेक माणसे केवळ त्यांच्या वाईट गोष्टींचा डांगोरा पिटला न गेल्याने राजकारणात ‘तरून’ गेली; परंतु दोन-चार साध्या चुका किंवा नको त्यांच्या संगतीत सतत राहिल्याने ‘बदनाम’ होऊन त्याचे चटके बसलेली माणसे ‘संपल्याची’ उदाहरणेही भारतीय राजकारणात आहेत.मध्य प्रदेशच्या ज्या रायपूर लोकसभा मतदारसंघातून आचार्य कृपलानी यांच्यासारखे निस्पृह गांधीवादी लोक निवडणूक लढवायचे त्याच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व नंतरच्या काळात करणारे विद्याचरण शुक्ला ही अशीच केस म्हणावी लागेल.

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ‘तगडय़ा’ उमेदवारांपुढे पक्षांतर्गत गटबाजीचे आव्हान!
संतोष प्रधान
मुंबई, २४ मार्च

नाशिकमध्ये समीर भुजबळ, पुण्यात सुरेश कलमाडी, कोल्हापूरमध्ये संभाजीराजे, चंद्रपूरमध्ये नरेश पुंगलिया, यवतमाळात हरिभाऊ राठोड, वध्र्यात दत्ता मेघे, नागपूरमध्ये विलास मुत्तेमवार, रायगडमध्ये बॅ. ए. आर. अंतुले, धुळ्यात अमरिश पटेल, हिंगोलीत सूर्यकांता पाटील या काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या बलवान उमेदवारांना मतदारांसमोर जाण्यापूर्वी पक्षांतर्गत गटबाजी सतावणार आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांच्या विरोधात पक्षातील मराठा नेते संघटित झाले आहेत. यामुळेच नाशिकमध्ये स्वत: भुजबळांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

म्हाळगी ते चौगुले..
उतरणीचा प्रवास!
मुंबई, २४ मार्च/ खास प्रतिनिधी
ठाणे लोकसभा मतदारसंघावर एकेकाळी भाजपचे असलेले वर्चस्व शिवसेनेने आपली ताकद वाढल्याचा दावा करीत पद्धतशीरपणे संपुष्टात आणले असले तरी कल्याणचे ‘ठाणे’ भाजपकडून सर करण्याच्या नादात ठाणे लोकसभा मतदार संघात गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या विजय चौगुले यांना तिकीट दिल्यामुळे एकीकडे शिवसैनिकांमध्येच आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे तर भाजपात नाराजी निर्माण झाली आहे.

वरुण गांधींवर कारवाई; मुलायमसिंहांना मात्र सूट
भाजपचा निवडणूक आयोगावर पक्षपाताचा आरोप
नवी दिल्ली, २४ मार्च / पी.टी.आय.
प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल वरुण गांधींविरुद्ध आचारसंहिता भंगाची कारवाई करणारा निवडणूक आयोग मुलायम सिंह यांनी आचारसंहिता भंग केल्याचे दिसत असतानाही त्यांना मोकळे रान देत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. वरुण गांधी दोषी आणि सपा नेते मुलायम सिंह यादव मात्र निर्दोष अशी दुटप्पी भूमिका आयोगाने घेतली आहे. मुलायम सिंह यादव यांनी नुकतीच एका निवडणूक अधिकाऱ्याला धमकी दिल्याची तक्रार येऊनही आयोगाने त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही.

बसपाचे आणखी सात उमेदवार जाहीर
मुंबई, २४ मार्च/प्रतिनिधी

बहुजन समाज पार्टीने आणखी सात उमेदवारांची यादी आज जाहीर केली. यापूर्वी त्यांनी १४ उमेदवार जाहीर केले होते. राज्यातील उर्वरित २७ उमेदवारांची यादी येत्या दोन दिवसांमध्ये जाहीर केली जाणार असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. या सात उमेदवारांपैकी तीन ते चार उमेदवार त्या त्या मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवारांचा विजयाचा मार्ग सहज रोखू शकतील, असा दावा बसपने केला आहे.

कोकणचा विकास हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा!
रत्नागिरी, २४ मार्च/खास प्रतिनिधी

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये कोकणचा विकास हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे आणि खासदार सुरेश प्रभू यांच्या झंझावाती दौऱ्यामधून ही बाब अधोरेखित झाली आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये सुसंस्कृत विरुद्ध आक्रमक, असा सामना रंगणार असल्याचे प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातच स्पष्ट झाले आहे.

‘मधुशाला’
सुहास सरदेशमुख
उस्मानाबाद, २४ मार्च

लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत कशी ‘किक’ बसली, हे विचारू नका. तेव्हा गावोगावी ‘थेट’ मेंदूत घुसणारी ‘भरारी’ होती. आता बीअरची दुकाने वाढली आहेत. ‘परमिट रूम’ दुप्पट झाल्या आहेत. ‘अस्सल देशी माल’ही सरासरी १० टक्क्य़ांनी वाढला आहे. त्यामुळे मतदारांचा ‘तळीरामी आत्माराम’ थंड करण्यासाठी उमेदवारांना तरतूद वाढवावी लागणार आहे. जिल्ह्य़ात गेल्या निवडणुकीच्या वेळी देशी दारूंचे ७४ विक्रेते होते.

काँग्रेसच्या प्रचारासाठी उतरणार शाहरुख आणि प्रीती झिंटा
कानपूर, २४ मार्च/ पी.टी.आय.

बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकार आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रचारासाठी उतरणार असून, शाहरुख खान, प्रीती झिंटा यांच्यासोबत गोविंदा आणि नगमाही प्रचारात भाग घेणार असल्याचे आज काँग्रेसच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. शाहरुख खान, प्रीती झिंटा, गोविंदा आणि नगमा प्रचार सभांमध्ये तसेच ‘रोड शो’मधून पक्षाच्या प्रचारात भाग घेतील, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री श्रीप्रकाश जैसवाल यांनी सांगितले. गोविंदा हे काँग्रेसचे नेते आहेत, तर नगमा बऱ्याच कालावधीपासून काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्यां म्हणून ओळखल्या जातात. यापूर्वीही नगमा पक्षाच्या प्रचारासाठी उतरल्या होत्या. यंदा शाहरुख खान आणि प्रीती झिंटा काँग्रेसच्या प्रचारासाठी येणार आहेत. ‘आयपीएल’ क्रिकेटमुळे हे दोन्ही कलाकार व्यग्र असले, तरी प्रचारासाठी आवर्जून वेळ देणार असल्याचे जैसवाल पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना म्हणाले.

मी भिवंडीचा प्रबळ दावेदार - जगन्नाथ पाटील
मुंबई, २४ मार्च/प्रतिनिधी

भिवंडी लोकसभा मतदारसंघातून लढण्याची माझी तयारी नसल्याचे वृत्त खोडसाळ असून मी भिवंडीच्या जागेचा प्रबळ दावेदार आहे असा खुलासा भाजाप ठाणे विभागाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी केला आहे. पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांपैकी सुमारे ९५ टक्के पदाधिकाऱ्यांनी आपले नाव सुचविले असताना काही विरोधकांनी मी भिवंडी लढू नये या उद्देशाने अशा बातम्या पसरवल्या असाव्या असा माझा कयास आहे असे पाटील यांनी म्हटले आहे. भाजपा -शिवसेना कार्यकर्त्यांच्या जोरावर आपण भिवंडी लोकसभा जिंकू शकू, असा दावाही पाटील यांनी केला आहे.