Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ मार्च २००९

‘स्वाभिमान’ संघटनेच्या वतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्य़ातील युवक मेळावा सांगलीतील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात बुधवारी झाला. या वेळी बोलताना संघटनेचे नेते रितेश राणे. व्यासपीठावर आमदार हाफिज धत्तुरे, सम्राट पाटील आदी मान्यवर उपस्थि होते.

‘स्वाभिमान’ संघटनेच्या माध्यमातून सुसंस्कृत राज्य घडवणार- नितेश राणे
सांगली, २४ मार्च / प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षि शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र घडविण्याच्या उदात्त हेतूने ‘स्वाभिमान’ या राजकारणविरहीत संघटनेची स्थापना केली आहे. त्यासाठी विधायक वृत्ती व निस्वार्थी भावनेने काम करणाऱ्या तरुणांचे संघटन आवश्यक आहे. स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून प्रगत व सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचा असल्याने आगामी काळात तरुणांनी समाजकारणात पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन ‘स्वाभिमान’चे संस्थापक युवा नेते नितेश राणे यांनी केले.

‘एसएमएस’ युद्ध
‘रिअलिटी शो’च्या सध्याच्या युगामध्ये ‘एसएमएस’ला भलतीच मागणी आहे. अमूक-तमूकला ‘एसएमएस’ करा, अशा आशयाचे फलक शहरभर झळकताना दिसतात. निवडणुकीची धुमश्चक्रीही त्यामध्ये मागे नाही. आता हेच पाहा ना, उमेदवार निवडीपूर्वी ‘एसएमएस’, उमेदवारी जाहीर झाल्यावर ‘एसएमएस’ आणि प्रत्यक्ष प्रचारादरम्यानही ‘एसएमएस’चा मारा! त्यातच संगणकावरून ‘एसएमएस’ पाठविण्याची सोय उपलब्ध झाल्याने हे युद्ध आणखीनच भडकू लागले आहे.

कोल्हापुरात संभाजीराजेंच्या विरोधात
मंडलिक-महाडिक युतीचे प्रयत्न

कोल्हापूर, २४ मार्च / राजेंद्र जोशी

निवडणूक लढविण्याची क्षमता असलेल्या अनेक मातब्बरांना एकाचवेळी ‘कामाला लागण्याचे’ संदेश देऊन स्वत:च उमेदवारीचा गुंता निर्माण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने अखेरीस संभाजीराजेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. संभाजीराजेंच्या उमेदवारीने कोल्हापूरच्या नव्या राजवाडय़ावर जल्लोषी वातावरण असले तरी पक्षातून दुखावलेले खासदार मंडलिक आणि उमेदवारीवरून फसगत झालेले धनंजय महाडिक यांना एकत्रित आणण्यासाठी एक प्रवाह कोल्हापूरच्या राजकारणात सक्रिय झाला आहे.

काळवीट हत्येचा तपासच संशयास्पद?
सोलापूर, २४ मार्च/प्रतिनिधी

सोलापूरपासून वीस किलोमीटर अंतरावर हैदराबाद रस्त्यावर तांदुळवाडी गावच्या हद्दीत काळवीट आणि मोराची हत्या केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सहाजणांची पोलीस कोठडीची मुदत २७ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. अटकेतील आरोपी तपासकामात सहकार्य करीत नसल्याची तक्रार वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून करण्यात येत असली तरी तपासकार्यच संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

अपघातात पती-पत्नी ठार
सातारा, २४ मार्च/प्रतिनिधी

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील जोशी विहीर चौकात तवेरा, अल्टो व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात चंद्रपूरचे पती-पत्नी दोघेजण ठार झाले असून, ७ जण जखमी झाले आहेत. जखमींवर क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. उल्हासनगरहून कोल्हापूरकडे जाणारी तवेरा गाडी (एमएच-०५-जी-२७४२) व वाईकडून महामार्गावर जोशी विहीर चौकात येत असलेली अल्टो गाडी (एमएच-३४-आर-४५०६) यांची जोरदार टक्कर झाली. त्यामध्ये तवेरा गाडी उलटली. ती धैर्यशील नरसिंग पिसाळ (रा. ओझर्डे, ता. वाई) वय ४० यांच्या मोटरसायकल (एमएच-१२-डीएच-५४१०) वर आदळल्याने झालेल्या अपघातात अल्टो गाडीतील चंद्रपूरचे विजय महादेव निजारे (वय ५८) व कमल विजय निजारे (वय ५३) यांचे निधन जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना झाले, तर जखमीमध्ये अल्टोमधील मोरोपंत एकनाथ बोरकर (वय ५०), प्रवीण विजय निजारे (वय २२), राहुल सुरेश कायरकर (वय १४), उल्हासनगरचे नामदेव कृष्णा खोत (वय ४५), संजय गणपत विरजकर (वय २५), रामेश्वर गणपत आधाव (वय २३) यांच्यासह मोटारसायकलस्वार धैर्यशील पिसाळ यांचा समावेश आहे.

तुपे, काळे यांना ‘रयत माऊली’ पुरस्कार
सातारा, २४ मार्च/प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नी रयतमाउली लक्ष्मीबाई पाटील यांच्या नावाने कर्मवीरांच्या कुटुंबीयांच्या वतीने देण्यात येणारा रयतमाउली पुरस्कार रयतचे उपाध्यक्ष रामभाऊ तुपे (पुणे) व शंकरराव काळे (कोपरगाव-अहमदनगर) यांना जाहीर झाला असल्याची माहिती संस्थेचे उपकार्याध्यक्ष व कर्मवीरांचे नातू डॉ. अनिल आप्पासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. रयत शिक्षण संस्थेच्या विकासामध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींची निवड रयतमाउली पुरस्कारासाठी करण्यात येते. या पुरस्काराचे वितरण लक्ष्मीबाई पाटील ऊर्फ वहिनी यांच्या ७९ व्या पुण्यतिथीस गुरुवारी २६ मार्च रोजी सकाळी १० वाजता संस्थेच्या धनिणीच्या बागेतील छत्रपती शाहू बोर्डिग नं. १ येथे मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान पद्मभूषण स्वातंत्र्यवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी हे भूषविणार आहेत. संस्थेचे व्यवस्थापन समितीचे सदस्य व माजी कार्याध्यक्ष, ज्येष्ठ नेते, विचारवंत डॉ. एन. डी. पाटील या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. जनार्दन जाधव यांनी या वेळी केले.

‘शहीद भगतसिंग यांचा विचार आदर्शवत’
सातारा, २४ मार्च/प्रतिनिधी

शहीद भगतसिंग यांचा क्रांतिकारी विचार जीवनप्रवास आदर्शवत आहे. समाजवादी भारताचे त्यांचे स्वप्न साकार होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कॉम्रेड किरण माने यांनी केले. येथील छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये ‘पीपल फॉर इंडिया’ शहीद भगतसिंग समितीच्या वतीने शहीद भगतसिंग यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित समारंभात कॉम्रेड प्रभाकर महाबळेश्वरकर होते. शहीद भगतसिंग प्रतिष्ठानच्यावतीने घेण्यात आलेला चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना या प्रसंगी पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. चळवळीतील कार्यकर्ते या कार्यक्रमास मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

सोलापूर व माढा मतदारसंघात मतदार जागृती अभियान
सोलापूर, २४ मार्च/प्रतिनिधी

सोलापूर आणि माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघात २३ एप्रिल रोजी मतदान होत असून, मतदान करणाऱ्या मतदारांचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टिकोनातून मतदारजागृती अभियान हाती घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी दिली. या जागृती अभियानासाठी अराजकीय नेहरू युवा मंडळे व युवती मंडळांचा सहभाग अपेक्षित असून त्यांनी आपल्या गावात व परिसरात सर्व पात्र मतदारांचे मतदान निश्चित करण्याकामी पुढाकार घेऊन १०० टक्के मतदानासाठी प्रयत्न करावेत. मतदानासाठी प्रयत्न करताना निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित मंडळावर ठेवण्यात आली आहे. या राष्ट्रीय कार्यात युवाशक्तीने सहभागी होऊन भारतीय लोकशाही प्रक्रिया अधिक मजबूत करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.

तरडगावच्या सरपंचपदी कावेरी शिंदे
फलटण, २४ मार्च/वार्ताहर

तरडगाव (ता. फलटण) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तरडगाव विकास आघाडीच्या कावेरी पांडुरंग शिंदे आणि उपसरपंचपदी प्रकाश पांडुरंग अडसूळ हे विजयी झाले आहेत. या निवडणुकीत भैरवनाथ पॅनलच्या पार्वती मोहन खुडे व विजयकुमार महावीर शहा यांचा पराभव झाला आहे. नवनिर्वाचित सदस्यांची बैठक ग्रामपंचायत कार्यालयात झाली. या वेळी सर्वच्या सर्व १५ नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते. अध्यासी अधिकारी म्हणून पुरवठा विभागाचे उपलेखापाल पी. व्ही. मोहिते यांनी काम पाहिले. तरडगाव ग्रामपंचायतीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचायत समितीचे सदस्य व श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंतराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी भैरवनाथ पॅनल व तरडगाव विकास आघाडीला १५ पैकी प्रत्येकी ७ जागा मिळाल्या होत्या तर प्रकाश अडसूळ हे एकमेव अपक्ष उमदेवार विजयी झाले होते. सरपंच, उपसरपंच निवडणुकीत अपक्ष प्रकाश अडसूळ यांनी तरडगाव विकास आघाडीबरोबर राहण्याचा निर्णय घेतल्याने आघाडीच्या कावेरी शिंदे सरपंचपदी व प्रकाश अडसूळ उपसरपंचपदी ८ मते घेऊन निवडून आले. विरोधी पार्वती खुडे व विजयकुमार शहा यांना प्रत्येकी ७ मते मिळाली.

मुरुम, सुरवडीच्या कार्यकारी सोसायटय़ांची १०० टक्के वसुली
फलटण, २४ मार्च/वार्ताहर

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या साखरवाडी (ता. फलटण) शाखेशी संलग्न असलेल्या मुरुम व सुरवडी या दोन्ही गावातील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटय़ांची बँक पातळीवर हंगाम २००८-०९ मधील वसुली १०० टक्के पूर्ण झाल्याची माहिती विभागीय विकास अधिकारी गाढवे यांनी दिली आहे. या दोन्ही सोसायटय़ांमधील थकबाकीदारांना कर्जमाफी आणि कर्जसवलत योजनेचा लाभ मिळाल्याने मोठय़ा प्रमाणावर थकबाकी वसूल झाली. तथापि, कर्ज सवलत योजनेच्या रकमा खात्यावर जमा झाल्यानंतर राहिलेल्या कर्जाची रक्कम संबंधित खातेदारांनी स्वयंस्फूर्तीने जमा करून आपली संपूर्ण थकबाकी भरल्याने पुन्हा नव्याने कर्ज घेऊन, शेती सुधारणा व अधिक शेती उत्पन्नासाठीचा त्यांचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले.