Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ मार्च २००९

आयपीएलची ‘रन’भूमी दक्षिण आफ्रिका
जोहान्सबर्ग, २४ मार्च / पीटीआय

आयपीएलचे दुसरे पर्व इंग्लंडमध्ये रंगणार की दक्षिण आफ्रिकेत, ही तमाम क्रिकेट रसिकांची गेल्या ४८ तासांपासून सुरू असलेली प्रतीक्षा आज अखेर संपुष्टात आली. आता यंदाची आयपीएल दक्षिण आफ्रिकेत होणार हे निश्चित झाल्यामुळे फ्रँचायझींनी सुद्धा सुटकेचा निश्वास टाकला असून आता तयारीला सुरुवात करता येईल, असे म्हटले आहे. त्याआधी इंग्लंडच्या पोलिसांनी आयपीएल स्पर्धेच्या आयोजनासाठी सुरक्षा व्यवस्था पुरविण्यासाठी अवधी अपुरा असल्याचे मत व्यक्त केले होते. सार्वत्रिक निवडणुकींच्या काळात होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतात सुरक्षा व्यवस्था पुरवता येणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केल्यानंतर आयोजकांना ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवण्याचा निर्णय घ्यावा लागला.

काँग्रेसचा भर ‘आम आदमी’वरच
नवी दिल्ली, २४ मार्च/खास प्रतिनिधी

पाच वर्षांपूर्वी ‘आम आदमी’चे नाव घेऊन केंद्रातील सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेस पक्षाने आज प्रकाशित केलेल्या लोकसभा निवडणुकांच्या जाहीरनाम्यात सर्वसामान्यांवरच भर दिला आहे. दहशतवादाचे उच्चाटन, शेतकऱ्यांचे संरक्षण, धर्मनिरपेक्ष सरकार, शहरी व ग्रामीण भागातील दारीद्रय़रेषेखालील प्रत्येक कुटुंबाला प्रतिकिलो ३ रुपये दराने दरमहा प्रत्येकी २५ किलो गहू व तांदूळ, शेतकऱ्यांना बँकांकडून मिळणाऱ्या कर्जावरील व्याजात दिलासा, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत देशातील प्रत्येक व्यक्तीला प्रतिदिन १०० रुपये दराने किमान १०० दिवसांचा रोजगार, केंद्र सरकारच्या एकतृतीयांश नोकऱ्यांमध्ये महिलांना संधी, अशा ‘आम आदमी’ला केंद्रस्थानी ठेवून केंद्रातील सत्ताधारी युपीएचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेस पक्षाने आज आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात विविध घोषणा केल्या आहेत.

मनमोहन सिंग फ्रंटफूटवर
नवी दिल्ली, २४ मार्च/खास प्रतिनिधी

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बायपास सर्जरीनंतर लाभलेल्या पुरेशा विश्रांतीमुळे ताजेतवाने झालेले पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आज काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्याच्या विमोचन समारंभात अवरतले आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेस-युपीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून त्यांना देशापुढे सादर केले. सोनिया गांधी यांच्या घोषणेनंतर आत्मविश्वास दुणावलेल्या मनमोहन सिंग यांनी आपला सौम्य स्वभाव व मृदू भाषा बाजूला ठेवून काँग्रेस-युपीए सरकारला आव्हान देणाऱ्या डाव्या व उजव्यांचा आक्रमकपणे समाचार घेतला.

अटलांटिकमध्ये भरकटलेल्या साहसवीराला
भारतीय दर्यावर्दीकडून जीवनदान

रवींद्र पांचाळ
मुंबई, २४ मार्च

‘पॅपिलॉन’च्या थरारक समुद्रसफरींपासून कितीतरी धाडसी दर्यावर्दीच्या कथा जगाला परिचित आहेत. समुद्रावर स्वार होताना या साहसवीरांची मृत्यूशी गाठ पडते, झुंज घडते आणि त्यातून कितीतरी रोमांचक कहाण्या जन्माला येतात. अशाच एका वेगळ्या अनुभवविश्वाला भिडण्यासाठी अर्जेटिनाच्या ५३ वर्षीय धाडसवीराने अर्जेटिना ते ब्राझील अशा समुद्रसफरीची आखणी करून आपली नौका समुद्रात लोटली. मात्र अटलांटिक सागरातील वादळांनी त्याच्या मनोधैर्याची परीक्षा पाहिली. भर समुद्रात त्याच्या बोटीचे इंजिन बिघडले, शीड फाटले आणि बोट पार भरकटली. जगाशी संपर्क तूटला आणि बोटीवरचे खाण्यापिण्याचे पदार्थही संपले. या असहाय अवस्थेत असलेल्या या साहसवीरासाठी अखेर भारतीय खलाशांचा भरणा असलेले जहाज धावून आले आणि त्याला जीवनदान मिळाले !

ईशान्य मुंबईतून अखेर सोमय्या
नवी दिल्ली, २४ मार्च/खास प्रतिनिधी

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळविण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या रस्सीखेचीत अखेर माजी खासदार किरीट सोमय्या यांची सरशी झाली आहे. आज भाजपने जाहीर केलेल्या चार उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातून केवळ सोमय्या यांच्या नावाची घोषणा केली. ईशान्य मुंबईतून पूनम महाजन राव यांना उमेदवारी मिळावी म्हणून भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे भाजपश्रेष्ठींवर दडपण आल्यामुळे ईशान्य मुंबईच्या उमेदवाराचे नाव भाजपच्या दुसऱ्या यादीतही नव्हते. मात्र, आज सायंकाळी भाजपने जाहीर केलेल्या चार उमेदवारांच्या यादीत सोमय्या यांचे नाव झळकल्यामुळे या वादावर पडदा पडला.

काँग्रेसकडून आठवलेंना शिर्डीतून उमेदवारी निश्चित
नवी दिल्ली, २४ मार्च/खास प्रतिनिधी

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून रिपाइं नेते व विद्यमान खासदार रामदास आठवले यांना काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून संधी मिळण्याची चिन्हे आहेत. आठवले यांची लवकरच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी भेट होणार असून त्यानंतर त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. आज दिल्लीत आठवले यांनी सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांच्यासोबत चर्चा केली. काँग्रेसने आठवलेंना पंजावर निवडणूक लढण्याचा प्रस्ताव दिला असला तरी ते रिपाइंच्याच वतीने निवडणूक लढणार आहेत. मात्र, आठवले निवडून आल्यास त्यांची गणना काँग्रेसच्या कोटय़ातील खासदार म्हणून करण्यात येईल, हेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

पी. ए. संगमा यांचे उपोषण लांबणीवर
पवार यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा
शिलाँग, २४ मार्च /पीटीआय

मेघालयमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ बेमुदत उपोषणाला बसण्याचा आपला निर्णय राष्ट्रवादीचे नेते पी. ए. संगमा यांनी आज लांबणीवर टाकला. ईशान्य भारतातील बिगर काँग्रेसी नेत्यांनी गुवाहाटीमध्ये झालेल्या भेटीत उपोषण लांबणीवर टाकण्याची आपल्याला विनंती केली. ही वेळ लढा देण्याची असून काँग्रेसविरोध अधिक संघटीत करण्याची असल्याने नागालॅण्ड, मणिपूर, आसाममधील बिगर काँग्रेस पक्षांच्या नेत्यांनी केलेली विनंती लक्षात घेऊन आपण उपोषण लांबणीवर टाकत असल्याचे संगमा यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पंतप्रधानपदावरील दाव्याला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगून ९ वेळा खासदार म्हणून निवड झालेले संगमा म्हणाले की, दिल्लीतील सर्व पक्षांच्या राजकीय नेत्यांना आपण चांगले ओळखतो. या सर्व नेत्यांत पवार हे एकमेव विकासाभिमुख दृष्टीकोन असणारे असणारे नेते असल्याने त्यांनी पंतप्रधानपदाची इच्छा बाळगण्यात काहीच गैर नाही.

‘नॅनो’च्या नोंदणी अर्जासाठी ‘एसबीआय’कडे लागली रीघ
मुंबई, २४ मार्च/पी.टी.आय.

जगातील सर्वात कमी किमतीत उपलब्ध झालेल्या ‘नॅनो’ गाडीच्या नोंदणी अर्जासाठी ‘स्टेट बँकऑफ इंडिया’ च्या देशभरातील शाखांमध्ये आज ग्राहकांची रिघ लागली होती. एक लाख नोंदणी अर्ज आज वितरित करण्यात आल्याचे ‘स्टेट बँकऑफ इंडिया’कडून स्पष्ट करण्यात आले. स्टेट बँकऑफ इंडिया व टाटा मोटर्स यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार देशातील ८५० शहरांमधून बँकेच्या १३५० शाखांमध्ये नॅनोचे बुकींग करता येणार आहे. नॅनो खरेदीदारांसाठी देशभरात ९ ते २५ एप्रिल या दरम्यान नोंदणी (बुकींग) करता येणार असून त्यासाठीचे अर्ज आज बँकेकडून उपलब्ध करून देण्यात आले. ‘नॅनो’ला प्रचंड प्रतिसाद लाभत असून आज एका दिवसांत देशभरातील बँकेच्या सर्व शाखांमधून एक लाखांहून अधिक नोंदणीअर्जाची विक्री झाल्याचे ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ चे अध्यक्ष ओ.पी. भट यांनी पत्रकारांना सांगितले. नॅनोसाठी २९९९ रुपये इतकी बुकींगची रक्कम आहे.जो ग्राहक टाटा मोटर्सशी करार झालेल्या १५ निवडक बँका व बिगर बँकींग वित्तीय संस्थांपैकी कुणाचेही अर्थसहाय्य घेणार असेल त्याच्याकडून स्टेट बॅक ऑफ इंडियाकडे थेट अर्ज नोंदणी केली जात आहे.

 


प्रत्येक शुक्रवारी