Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ मार्च २००९

पासष्ट लाखांच्या धान्याचा अपहार
नायब तहसीलदारासह आठ जणांविरुद्ध गुन्हा
उस्मानाबाद, २४ मार्च/वार्ताहर
संपूर्ण रोजगार हमी योजनेत तुळजापूर तालुक्यात मजुरांना द्यावयाच्या ६४ लाख ९१ हजार २४० रुपयांच्या धान्याचा अपहार झाला आहे. तुळजापूरचे तहसीलदार संपत येवलीकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार उज्ज्वला भोगे, व्ही. के. बोगंरगे, आर. एस. पठाण, के. एस. हलगुंम्डे या स्वस्त धान्य दुकानदार, नायब तहसीलदार डी. एस. काळे, व्ही. एस. महाजन, अभियंता एस. बी. पोपडे व के. के. गायकवाड यांच्यावर आज गुन्हा दाखल करण्यात आला.

अर्थसंकल्प आणि लोकसहभाग
महानगरपालिकेचा अर्थसंकल्प शहराच्या विकासाचा आराखडा आहे. अर्थ-संकल्पाच्या माध्यमातून नागरिकांच्या आणि शहराच्या समस्या सोडविणे अपेक्षित आहे. हा अर्थसंकल्प गोपनीय दस्ताऐवज नाही. मनपा कायद्यात अशा प्रकारची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेत नगरवासीयांना सहभागी करून घेण्यात कोणतीही कायदेशीर अडचण संभवत नाही. शहराच्या सर्व समस्या फक्त नगरसेवकांनाच माहीत असतात अशी वस्तुस्थिती नाही. उलट बऱ्याचदा असे दिसून येते की, वॉर्डातील लहानसहान समस्यांची पुरेशी माहिती नगरसेवकांना नसते.

सर्वागीण विकासासाठी प्रयत्न
विजय निलावार
हिंगोली, २४ मार्च

लोकसभेच्या मागच्या निवडणुकीत, १३ मे २००४ रोजी हिंगोली मतदारसंघातून सूर्यकांता पाटील यांची निवड झाली आणि २२ मे रोजी त्यांनी ग्रामविकास खात्याच्या राज्यमंत्री म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात जवळपास १५ अब्ज रुपये निधी आणून त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नातून सर्वागीण विकासाची कामे केली. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर विकासकामे होण्याची जिल्ह्य़ासाठी ही पहिलीच वेळ आहे. श्रीमती पाटील व जिल्ह्य़ाचे संपर्कमंत्री जयप्रकाश दांडेगावकर एकाच पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत.

अस्वस्थता संपुष्टात; प्रचाराची व्यूहरचना सुरू
नांदेड, २४ मार्च/वार्ताहर

लोकसभेच्या नांदेड मतदारसंघातील प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा झाल्यानंतर सर्वच पक्षांमधील कार्यकर्त्यांची अस्वस्थता संपुष्टात आली आहे. आता विजयासाठी व्यूहनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसतर्फे आमदार भास्करराव पाटील खतगावकर, भारतीय जनता पक्षातर्फे संभाजी पवार यांची उमेदवारी काल व बहुजन समाज पक्षातर्फे मकबुल सलीम यांची उमेदवारी आज जाहीर झाली. जनसुराज्य पक्षातर्फे प्रीती शिंदे यांची उमेदवारी उमेदवारी सुमारे दोन महिन्यांपूर्वीच जाहीर झाली. त्यांनी काल अर्जही भरला. भा. ज. प.चा उमेदवार निश्चित झाल्यानंतर काँग्रेस उमेदवार जाहीर होईल किंवा ऐन वेळी त्यात बदल होईल असे वाटत होते; परंतु वरिष्ठ नेत्यांनी आमदार खतगावकर यांना पुन्हा संधी दिली आहे.

आशा सुटेना.!
जालना, २४ मार्च/वार्ताहर

उस्मानाबादची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतकडे कायम ठेवूनही माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली नाही. त्यामुळे जालन्याची जागा आपल्याला मिळेल, अशी जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची आशा अजूनही कायम आहे. आता उस्मानाबादची जागा काँग्रेससाठी आणि त्या बदलात जालन्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल, असा आशावाद बळावला आहे.

चिंता पाण्याची..
औरंगाबाद, २४ मार्च/प्रतिनिधी

जायकवाडी प्रकल्पाची पाणीपातळी झपाटय़ाने घसरू लागल्याने औरंगाबादकरांची चिंता वाढली आहे. पातळी ४६० मीटपर्यंत घसरली असून दररोज एक टक्का या प्रमाणात पाण्यात घट होत आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत काठावरून पाणी उपसा करणे शक्य होणार नाही. त्यानंतर धरणात सुमारे अर्धा किलोमीटरवरील पंप सुरू करणे अनिवार्य ठरणार असून, परिणामी शहरात येणारे पाणीही कमी होणार आहे.

साजेद यांच्याविरुद्धची याचिका फेटाळली
स्थायी समिती सभापती निवडणूक
औरंगाबाद, २४ मार्च/खास प्रतिनिधी
गेल्या वर्षी ७ एप्रिलला झालेल्या औरंगाबाद महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपद निवडणुकीचा वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आला होता. सभापतिपदी निवडून आलेले काँग्रेसचे अब्दुल साजेद यांच्या निवडीला भारतीय जनता पक्षाचे पराभूत उमेदवार संजय जोशी यांनी आव्हान दिले होते. ही याचिका न्या. पी. व्ही. हरदास व न्या. ए. व्ही. पोतदार यांनी फेटाळून लावली आहे.

परीकथा आणि वास्तव (२)
व्यक्तिमत्त्व विकास

बालपणी ऐकलेल्या कथांचा कसा परिणाम होतो ते एका घटनेतून आपण पाहिलेच. या गोष्टींमध्ये अजूनही काही भाग सर्वसामान्यपणे मनावर ठसणारा असतो. तो कोणता? तर परीकथेतली मुलगी सुंदर असते. आणि मग एक श्रीमंत, वैभवशाली, अत्यंत शूर राजकुमार तिच्यावर भाळतो. तो तिला समुद्र, डोंगर पार करून अत्यंत भव्य राजवाडय़ात नेऊन तिच्याशी लग्न करतो आणि ते सुखाने नांदू लागतात.

आणखी दोन मुलींचा मृत्यू;
चौघांची मृत्यूशी झुंज
नांदेड, २४ मार्च/वार्ताहर

हिंगोली जिल्ह्य़ातील वसमत येथे लग्नाच्या मांडवाला आग लागून झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या आणखी दोन मुलींचे आज येथील रुग्णालयात निधन झाले. मृतांची संख्या आता पाच झाली असून. चार जखमी मृत्यूशी झुंज देत असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. जखमी झालेल्या १२ जणांवर नांदेडच्या गुरुगोविंदसिंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी स. कौसर स. अन्वर (८) व अंजुम सय्यद करीम (७) यांचे आज निधन झाले. मृतांची संख्या पाच झाली आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांपैकी चौघांची प्रकृती अजूनही गंभीरच आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. वसमतमधील हसन सय्यद मीर यांच्या मुलीचा विवाह रविवारी झाला. या मांडवाला मध्यरात्री आग लागली. यात मदिना सय्यद हसन हिचा मृत्यू झाला. स. अन्वर व आसिया बेगम यांचे काल रुग्णालयात निधन झाले.

दोन्ही काँग्रेसची उमरग्यात दिवसभर ‘फटाकेबाजी’!
उमरगा, २४ मार्च/वार्ताहर

शहरामध्ये काल दिवसभर फटाके उडत राहिले. सकाळी कुठून तरी अफवा आली की, उस्मानाबादची जागा काँग्रेसला मिळाली. मग झालेच. काही उत्साही काँग्रेस कार्यकर्त्यांनी लगेच फटाके उडविण्यास सुरुवात केली. या कार्यकर्त्यांचे फटाके उडविणे संपते ना संपते तोच दुपारी टीव्हीवरून बातम्या सुरू झाल्या की, उस्मानाबादची जागा अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात पडली. आता फटाके उडविण्याची पाळी राष्ट्रवादी काँग्रेसची होती. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पुढे सरसावले. गेले काही दिवस कोंडून राहिलेला त्यांच्या उत्साहाचा अक्षरश बांध फुटला. मग, शहरभर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी फटाके उडवून आनंद व्यक्त केला. दिवसभर उडणाऱ्या या फटाक्यांसोबत विविध चर्चेला उधाणच येत राहिले. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये प्रफुल्ल पटेल आणि आर. आर. पाटील यांची छबी दिसली. त्यांनी सांगितले, २६-२२ चा फॉम्र्युला तत्त्वत: मान्य झाला असला तरी, दोन जागांची अदलाबदल शक्य आहे. बातमी ऐकून उमरगा शहराचा नूर पालटला. सकाळी फटाके फोडून इकडे तिकडे पांगापांग झालेले काँग्रेस कार्यकर्ते पुन्हा जमले. उस्मानाबादची जागा आपल्याच साहेबांना मिळणार ही आशा बळावली. शांत झालेले शहर फटाक्याच्या आवाजाने पुन्हा दणाणले. दोन्ही पक्षांतील जागा वाटपाचे घोळ संपता संपत नाही. परंतु, त्यांच्यातील चुरस आणि पडसाद तळातल्या कार्यकर्त्यांत मात्र उमटत आहे.

परीक्षेच्या आदल्या दिवशी सातवीचा अभ्यासक्रम पूर्ण
चाकूर, २४ मार्च/वार्ताहर

वार्षिक परीक्षा सुरू होण्याच्या आदल्याच दिवशी इयत्ता सातवीचा अभ्यासक्रम शिक्षकांनी पूर्ण केल्याची धक्कादायक माहिती पालकांकडून मिळाली असून, जिल्हा परिषद शाळेतील या प्रकारामुळे शैक्षणिक प्रगतीबाबत चिंता व्यक्त होत आहे.पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील लातूर रोड येथील जिल्हा परिषद शाळेत सातवीचा अभ्यासक्रम परीक्षा आली तरीही पूर्ण झाला नव्हता. पालकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत गणिताचे चार व मराठीचे दोन पाठ एका दिवसात शिकवून वार्षिक अभ्यासक्रम शिक्षकांनी पूर्ण केला. वार्षिक परीक्षेला आज सुरुवात झाली आहे. गटशिक्षणाधिकारी बापुसाहेब पडवळ यांनी या प्रकाराची चौकशी करणार असल्याचे सांगितले. संबंधित शिक्षकांनी गणिताचा अभ्यासक्रम पूर्ण झाला असून एक उदाहरण सोमवारी शिकवले असे सांगितले.

तहसीलदारांची भेट दुरापास्त !
गंगाखेड, २३ मार्च/वार्ताहर

अनंत प्रयासानंतर येथे पूर्ण वेळ तहसीलदार मिळाले खरे; परंतु त्यांच्या कार्यशैलीने नागरिक हैराण झाले आहेत. तहसीलदार के. जी. कदम यांनी आचारसंहितेच्या कामानिमित्त काल स्वत:ला केबिनमध्ये तब्बल तीन तास कोंडून घेतले. या वेळात त्यांनी कोणाचीच भेट घेतली नाही. तहसीलदार म्हणून श्री. कदम रुजू झाले. त्यांच्या कार्यपद्धतीचा नागरिकांना नवनवीन अनुभव येत आहे. काल सकाळी साडेदहा वाजेपासून ते दीड वाजेपर्यंत श्री. कदम यांनी आचारसंहितेचे कामकाज करण्यासाठीच्या सबबीखाली स्वत:ला काही कर्मचाऱ्यांसोबत कोंडूनच घेतले. सेवकांसह कर्मचाऱ्यांना आतमध्ये कोणालाच सोडू नका असा तोंडी हुकूम देऊन ते काम करीत होते. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली .