Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

काँग्रेसचा भर ‘आम आदमी’वरच
नवी दिल्ली, २४ मार्च/खास प्रतिनिधी

 

पाच वर्षांपूर्वी ‘आम आदमी’चे नाव घेऊन केंद्रातील सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेस पक्षाने आज प्रकाशित केलेल्या लोकसभा निवडणुकांच्या जाहीरनाम्यात सर्वसामान्यांवरच भर दिला आहे. दहशतवादाचे उच्चाटन, शेतकऱ्यांचे संरक्षण, धर्मनिरपेक्ष सरकार, शहरी व ग्रामीण भागातील दारीद्रय़रेषेखालील प्रत्येक कुटुंबाला प्रतिकिलो ३ रुपये दराने दरमहा प्रत्येकी २५ किलो गहू व तांदूळ, शेतकऱ्यांना बँकांकडून मिळणाऱ्या कर्जावरील व्याजात दिलासा, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत देशातील प्रत्येक व्यक्तीला प्रतिदिन १०० रुपये दराने किमान १०० दिवसांचा रोजगार, केंद्र सरकारच्या एकतृतीयांश नोकऱ्यांमध्ये महिलांना संधी, अशा ‘आम आदमी’ला केंद्रस्थानी ठेवून केंद्रातील सत्ताधारी युपीएचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेस पक्षाने आज आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात विविध घोषणा केल्या आहेत.
आज काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या २४, अकबर रोड येथे कुठलाही गाजावाजा वा भपकेबाजी न करता एका साध्या समारंभात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग व पक्षाचे ज्येष्ठ नेते व परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत २००९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे विमोचन केले. या जाहीरनाम्यात काँग्रेसने देशातील मतदारांना २९ नव्या आश्वासन व हमींनी आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
पंधराव्या लोकसभेत बहुमतासह सत्तेत परतल्यास राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याच्या धर्तीवर राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायदा करून समाजातील कमकुवत घटकांना पुरेशा भोजनाची हमी देण्याचे आश्वासन काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे. शहर किंवा ग्रामीण भागात दारीद्रय़रेषेखालील प्रत्येक कुटुंबाला प्रतिकिलो ३ रुपये दराने २५ किलो गहू व तांदूळ उपलब्ध करून देणारा कायदा पारित करण्याचा संकल्प काँग्रेसने केला आहे.
आर्थिक विकासाचा उच्च दर कायम राखून व चलनवाढीला नियंत्रणाखाली ठेवून पुढच्या पाच वर्षांत देशाचा वेगवान विकास साधण्याचे स्वप्न काँग्रेसने जाहीरनाम्यात दाखविले आहे. प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या जाहीरनाम्याला मूर्त स्वरुप दिले आहे.
देशातील प्रत्येक नागरिकाला कमाल सुरक्षा प्रदान करण्याची हमी, संरक्षण सज्जतेला सर्वोच्च प्राधान्य आणि सैनिक व त्यांच्या कुटुंबियांचे कल्याण, पोलीस यंत्रणेत वेगाने सुधारणा, राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या प्रारंभिक यशातून बोध घेत प्रत्येक व्यक्तीला प्रतिदिन शंभर रुपये दराने शंभर दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देण्याची नवी हमी काँग्रेसने दिली आहे. सर्वांच्या आरोग्याची हमी, एकाकी महिला, बुजुर्ग व अपंग, शहरी बेघर, वेठबिगार, टोळ्यांनी राहणारे आदिवासी आणि दलितांमधील अत्यंत मागासांना सामाजिक सुरक्षेचे वचन काँग्रेसने दिले आहे.
सर्वांना चांगले शिक्षण, ३५ वर्षांखालील ७० टक्के लोकसंख्येच्या शक्तीचा उपयोग करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कौशल्यविकास कार्यक्रमाची अंमलबजावणी, अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्यांक, महिला, विणकर, मच्छीमार, चर्मकार, शेतमजूर, बांधकाम मजूर, खाण व विडी कामगार, अपंग, नेत्रहीन आदी कमजोर वर्गांचे वेगाने सक्षमीकरण करण्यावर काँग्रेसने भर दिला आहे. हरतऱ्हेच्या धार्मिक व जातीय अत्याचारांचा कठोरपणे मुकाबला, मुले व विशेषत मुलींच्या विकासाकडे विशेष लक्ष, निर्वाचित पंचायत संस्थांना वित्तीय ताकद प्रदान करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले.