Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

अटलांटिकमध्ये भरकटलेल्या साहसवीराला
भारतीय दर्यावर्दीकडून जीवनदान
रवींद्र पांचाळ
मुंबई, २४ मार्च

 

‘पॅपिलॉन’च्या थरारक समुद्रसफरींपासून कितीतरी धाडसी दर्यावर्दीच्या कथा जगाला परिचित आहेत. समुद्रावर स्वार होताना या साहसवीरांची मृत्यूशी गाठ पडते, झुंज घडते आणि त्यातून कितीतरी रोमांचक कहाण्या जन्माला येतात. अशाच एका वेगळ्या अनुभवविश्वाला भिडण्यासाठी अर्जेटिनाच्या ५३ वर्षीय धाडसवीराने अर्जेटिना ते ब्राझील अशा समुद्रसफरीची आखणी करून आपली नौका समुद्रात लोटली. मात्र अटलांटिक सागरातील वादळांनी त्याच्या मनोधैर्याची परीक्षा पाहिली. भर समुद्रात त्याच्या बोटीचे इंजिन बिघडले, शीड फाटले आणि बोट पार भरकटली. जगाशी संपर्क तूटला आणि बोटीवरचे खाण्यापिण्याचे पदार्थही संपले. या असहाय अवस्थेत असलेल्या या साहसवीरासाठी अखेर भारतीय खलाशांचा भरणा असलेले जहाज धावून आले आणि त्याला जीवनदान मिळाले !
अर्जेटिनाच्या ओमार प्रेडो यांनी आपल्या सुसज्ज बोटीतून ब्राझीलच्या किनाऱ्याला धडकण्याची मोहीम आखली. या मोहिमेचे वैशिष्टय़ म्हणजे प्रेडो एकटेच समुद्राला भिडणार होते आणि सागरी सफरींतला एक वेगळा अध्याय लिहिणार होते.
कायदेविषयात डॉक्टरेट मिळविलेल्या प्रेडो यांचे हे साहस जगावेगळेच ठरणार होते. याचे कारण हृदरोग असूनही समुद्राचे आव्हान पेलणारे दर्यावर्दी म्हणून त्यांची ओळख जगाला होणार होती. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. अर्जेटिनाचा किनारा सोडल्यानंतर तीन दिवसांनी प्रेडो यांच्या सफरीवर संकटेच संकटे कोसळली. खराब हवामान आणि सातत्याने झालेल्या वादळांमुळे त्यांच्या बोटीचे इंजिन पार नादुरुस्त झाले आणि त्याहीपुढे वादळवाऱ्याच्या तडाख्याने त्यांच्या बोटीचे शीडही फाटून गेले. संकटांच्या या मालिकेत प्रेडो यांचा जगाशी संपर्क ठेवण्याची संदेशवहन यंत्रणाही काम करेनाशी झाली आणि प्रेडो खऱ्याखुऱ्या अर्थाने असहाय झाले. वारा नेईल त्या दिशेने प्रेडो यांची बोट भरकटत चालली होती आणि काही चमत्कार झाला तरच आपण आता या संकटातून वाचू, असा आशेचा धूसर किरण प्रेडोंना आणखी एका नव्या दिवसासाठी सिद्ध करीत होता. एक दोन नव्हे तर तब्बल तेरा दिवस प्रेडो अटलांटिक समुद्रात कोणी साह्यकर्त्यांने यावे म्हणून देवाची करुणा भाकत होते आणि ४ मार्चला त्यांचा देव त्यांच्यासाठी भारतीय खलाशी काम करीत असलेल्या ‘चॅम्पियन एक्स्प्रेस’ या अजस्त्र तेलवाहू टँकरच्या रुपाने धावून आला.
‘जिनोवा मेरीटाईम’ या जगप्रसिद्ध अशा नॉर्वेच्या व्यापारी नौकानयन कंपनीचे ‘चॅम्पियन एक्स्प्रेस’ हे जहाज इटलीहून अर्जेटिनाला चालले होते. ४ मार्चच्या दुपारी दोनच्या सुमारास ‘चॅम्पियन’च्या नेव्हिगेटिंग ऑफिसरला दूरवर एक लहान बोट आणि त्यावर हात हलवत असलेला एक माणूस दिसला. ऑफिसरने ही बाब लागलीच जहाजाचे कॅ. अनिल नेसरी यांना कळविल्यानंतर ‘चॅम्पियन’ तातडीने बोटीच्या दिशेने वळविण्याचा आदेश कॅ. नेसरी यांनी दिला. जसजसे ‘चॅम्पियन’ हे छोटय़ा बोटीच्या जवळ गेले तसतसे बोटीवर एकच व्यक्ती असल्याचे स्पष्ट झाले. मात्र कॅ. नेसरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना प्रेडो यांना ‘चॅम्पियन’वर तातडीने आणणे शक्य नव्हते. प्रेडो हे अर्जेटिनाचेच नागरिक आहेत का ते त्यांच्या सागरमोहिमेपर्यंतची सारी माहिती कॅ. नेसरी यांच्या चमूने आपल्या संदेशवहन यंत्रणेद्वारे मिळविली आणि त्यानंतरच प्रेडो यांना शिडीच्या साह्याने ‘चॅम्पियन’वर घेण्यात आले. कॅ. नेसरी यांच्यापासून बहुतेक मराठी दर्यावर्दीचा भरणा असलेल्या चमूने एका कर्तव्यभावनेपोटी एका साहसवीराला जीवनदान दिले ! प्रेडो स्पॅनिश भाषा बोलत असल्याने ‘चॅम्पियन’वरील साऱ्याच दर्यावर्दीशी त्यांना संवाद साधणे शक्य नव्हते. पण ही उणीव मग परस्परांच्या गळामिठय़ांनी भरून निघाली !