Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

मनमोहन सिंग फ्रंटफूटवर
नवी दिल्ली, २४ मार्च/खास प्रतिनिधी

 

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बायपास सर्जरीनंतर लाभलेल्या पुरेशा विश्रांतीमुळे ताजेतवाने झालेले पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आज काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्याच्या विमोचन समारंभात अवरतले आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेस-युपीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून त्यांना देशापुढे सादर केले. सोनिया गांधी यांच्या घोषणेनंतर आत्मविश्वास दुणावलेल्या मनमोहन सिंग यांनी आपला सौम्य स्वभाव व मृदू भाषा बाजूला ठेवून काँग्रेस-युपीए सरकारला आव्हान देणाऱ्या डाव्या व उजव्यांचा आक्रमकपणे समाचार घेतला.
वेगवान आर्थिक प्रगती करून सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी अर्थव्यवस्था कशी काम करते याचा अभ्यास असणारे सरकार देशाला हवे, असे सांगून मनमोहन सिंग यांनी भाजप आणि डाव्यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या आघाडीत ती कुवत नसल्याचे स्पष्ट केले. भारत-अमेरिका अणुकरारावर फेरविचाराच्या गोष्टी करणारा भाजप आणि हा करार रद्द करण्याची जाहीरनाम्यात घोषणा करणाऱ्या माकप यांची मनोवृत्ती नकारात्मक आणि देशाची पीछेहाट करणारी असल्याची टीका त्यांनी केली.
कमकुवत पंतप्रधान अशी नेहमीच टीका करणाऱ्या अडवाणींच्या योग्यतेवरच त्यांनी प्रश्नचिन्ह लावले. देशाच्या कल्याणात अडवाणींनी कोणते योगदान दिले, असा त्यांनी सवाल केला. गृहमंत्री म्हणून अडवाणींनी बजावलेली कामगिरी लक्षात घेऊन ही व्यक्ती पंतप्रधान होण्यास पात्र आहे काय, याचा देशवासियांनी विचार करायला हवा, असे मनमोहन सिंग म्हणाले. अडवाणींनी बाबरी विद्ध्वंसात मुख्य भूमिका बजावली, ते गृहमंत्रीपदी असताना गुजरातमध्ये भीषण जातीय दंगली झाल्या. संसद आणि लाल किल्ल्यावरील हल्ले रोखण्यात ते अडवाणी असमर्थ ठरले. त्यांच्याच कार्यकाळात इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचे अपहरण होऊन कंदहार प्रकरण घडले, याचे स्मरण मनमोहन सिंग यांनी करून दिले. कराचीत जाऊन बॅरिस्टर जिना धर्मनिरपेक्ष असल्याचा शोध लावणाऱ्या अडवाणींच्या संधीसाधूपणावर टीका करायलाही ते विसरले नाहीत. भाजपचे उमेदवार वरुण गांधी यांनी मुस्लीम बांधवाविषयी काढलेले द्वेषपूर्ण उद्गार शरमेची गोष्ट असल्याची टीका मनमोहन सिंग यांनी केली. भाजपला देशात जातीयवादाच्या आधारावर फूट पाडायची आहे.