Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

आयपीएलची ‘रन’भूमी दक्षिण आफ्रिका
जोहान्सबर्ग, २४ मार्च / पीटीआय

 

आयपीएलचे दुसरे पर्व इंग्लंडमध्ये रंगणार की दक्षिण आफ्रिकेत, ही तमाम क्रिकेट रसिकांची गेल्या ४८ तासांपासून सुरू असलेली प्रतीक्षा आज अखेर संपुष्टात आली. आता यंदाची आयपीएल दक्षिण आफ्रिकेत होणार हे निश्चित झाल्यामुळे फ्रँचायझींनी सुद्धा सुटकेचा निश्वास टाकला असून आता तयारीला सुरुवात करता येईल, असे म्हटले आहे. त्याआधी इंग्लंडच्या पोलिसांनी आयपीएल स्पर्धेच्या आयोजनासाठी सुरक्षा व्यवस्था पुरविण्यासाठी अवधी अपुरा असल्याचे मत व्यक्त केले होते.
सार्वत्रिक निवडणुकींच्या काळात होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतात सुरक्षा व्यवस्था पुरवता येणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केल्यानंतर आयोजकांना ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवण्याचा निर्णय घ्यावा लागला.
आयपीएल कमिशनर ललित मोदी आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गेराल्ड मायोला यांच्यात आज अज्ञातस्थळी झालेल्या चर्चेनंतर पहिल्याच पर्वात लोकप्रियतेचे शिखर गाठणारी ही दुसरी ट्वेन्टी-२० स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्याचे निश्चित झाले. स्पर्धेबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी ही स्पर्धा आता १८ एप्रिल ते २४ मे या कालावधीत रंगणार आहे. निर्धारित कार्यक्रमानुसार तब्बल एक आठवडा उशिरा ही स्पर्धा सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दक्षिण आफ्रिकेतील देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम संपताच या स्पर्धेला सुरुवात होत असून उद्घाटन सोहोळा केप टाऊनला रंगणार आहे. जोहान्सबर्ग, दरबान, सेंच्युरियन, पोर्ट एलिझाबेथ, इस्ट लंडन आणि केप टाऊन या सहा शहरांमध्ये या स्पर्धेतील सामने होणार असल्याचेही आजच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. टी.व्ही. प्रक्षेपणाद्वारे बघणाऱ्या भारतीय क्रिकेट रसिकांच्या सोयीनेच या सामन्यांच्या वेळा आखण्यात आल्या आहेत. स्पर्धेतील पहिला सामना गेल्या वर्षीप्रमाणे सायंकाळी ४ वाजता तर दुसरा सामना रात्री ८ वाजता सुरू होणार असून दक्षिण आफ्रिकेतील सुपरस्पोर्ट्स या चॅनेलवरून त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. दरम्यान, या स्पर्धेबाबतचा पूर्ण तपशील आयपीएलचे कमिशनर ललित मोदी आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गेराल्ड मायलो यांनी आज संयुक्तरीत्या जाहीर केला. स्पर्धेदरम्यान इंग्लंडमधील हवामानाच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेचे हवामान अनुकूल असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला पसंती देण्यात आल्याचे मोदी यांनी सांगितले. येथील आयोजनात नेमका किती खर्च होईल, हे सांगणे कठीण असले तरी भारताच्या तुलनेत तो निश्चितच अधिक राहणार असल्याचे मोदींनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. खर्चातला जो फरक आहे तो आम्ही सोसू, असे आश्वास फ्रँचायझींना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. हे क्रिकेट होणे आमच्यासाठी महत्त्वाचे होते आणि सर्व संघमालक या निर्णयासोबतच असल्याचेही ते म्हणाले.
भारतातील सार्वत्रिक निवडणुकींच्या काळात होणाऱ्या या स्पर्धेसाठी सुरक्षा व्यवस्था देता येणार नाही, असे केंद्र सरकारने जाहीर केल्यानंतर ही स्पर्धा दक्षिण आफ्रिका किंवा इंग्लंडमध्ये आयोजित करण्याचे बीसीसीआयने रविवारी जाहीर केले होते. तेव्हापासून इंग्लंडलाच ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी प्राधान्यही देण्यात आले होते. परंतु, स्पर्धेदरम्यान तेथील हवामान योग्य राहणार नाही आणि त्याचा ७० टक्के सामन्यांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्यानंतर आयोजकांनी दक्षिण आफ्रिका या दुसऱ्या पर्यायाच्या दिशेने मोर्चा वळवला आणि त्याच स्थळावर शिक्कामोर्तब केले.