Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ मार्च २००९
प्रादेशिक

‘मातोश्री’ वायकरांवरच मेहेरबान का?
बंधुराज लोणे
मुंबई, २४ मार्च

सुमारे १९ हजार कोटींच्या खर्चाचे अधिकार असणाऱ्या महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याविषयी सध्या शिवसेनेत विविध तर्कांना उधाण आले आहे. रवींद्र वायकर चौथ्यांदा प्रयत्नशील असून त्यांची वर्णी लागल्यास हा एक विक्रम ठरेल. यापूर्वी तिसऱ्यांदा त्यांना उद्वव ठाकरे यांनी संधी दिली असून आताही त्यांच्यावर ‘मातोश्री’ची मर्जी राहणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. पालिकेतील विविध समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला आहे. सत्ताधारी सेना-भाजपमध्ये समित्यांचे वाटप झालेले आहे.

शिवसेनेच्या नगरसेवकाला खंडणी प्रकरणी अटक
मुंबई, २४ मार्च / प्रतिनिधी

घराची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीकडे १३ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकाला गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट दोनच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी नगरसेवकाच्यासह आणखी सहा जणांना अटक करण्यात आली असून पांडवपुत्र टोळीच्या नावाखाली ही खंडणी उकळण्यात येत होती, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

रेल्वे अपघातांतील जखमींना रुग्णालयात हलविण्यावरून रेल्वे व लोहमार्ग पोलिसांतील वाद विकोपाला
मुंबई, २४ मार्च / प्रतिनिधी
रेल्वेच्या हद्दीत होणाऱ्या अपघातांमध्ये जखमी होणाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयांत नेण्याची जबाबदारी नक्की कोणाची, या मुद्दय़ांवरून लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे प्रशासन यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. याप्रकरणी उद्या २६ मार्च रोजी उच्च न्यायालयासमोर होणाऱ्या सुनावणीच्या पाश्र्वभूमीवर उभयतांमधील मतभेद चव्हाटय़ावर आले आहेत. रेल्वे कायद्यातील कलम १२३ नुसार, रेल्वेच्या हद्दीतील कोणत्याही अपघाताची माहिती स्टेशन मास्तरने लिखित स्वरुपात लोहमार्ग पोलिसांना देणे बंधनकारक आहे.

संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात मंजूर
झालेल्या ठरावांना घटनात्मक वैधता नाही
शेखर जोशी
मुंबई, २४ मार्च

महाबळेश्वर येथे पार पडलेल्या ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी खुल्या अधिवेशनात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीसह विविध ठराव मंजूर करण्यात आले. मात्र महामंडळाच्या घटनेनुसार खुले अधिवेशन हे साहित्य संमेलनाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली होत असते. या संमेलनाला अध्यक्षच नसल्याने मंजूर झालेल्या ठरावांना घटनात्मक वैधता नसल्याचे अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशी एक उपचार म्हणून हे विविध ठराव दरवर्षी मंजूर केले जातात.

आचारसंहितेच्या मुद्दय़ावरून मुंबई विद्यापीठाची अधिसभा बैठक वादात
मुंबई, २४ मार्च / प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठामध्ये उद्या आयोजित करण्यात आलेली अधिसभेची बैठक आचारसंहितेच्या मुद्दय़ावरून चांगलीच गाजण्याची शक्यता आहे. इतर विद्यापीठांमध्ये अधिसभेच्या बैठका नियमितपणे आयोजित केल्या जात असताना मुंबई विद्यापीठाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून स्वत:हूनच आचारसंहिता ओढवून घेतल्याचे मत अधिसभा सदस्यांमध्ये व्यक्त केले जात आहे.

शिवसेनेच्या भूमिकेवर संघ, भाजप खवळला!
मुंबई, २४ मार्च/प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसला आठ दिवसांपर्यंत नव्या राजकीय समीकरणाकरिता डोळे मारणाऱ्या शिवसेनेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने संघ स्वयंसेवक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. रा. स्व. संघाच्या सरसंघचालकपदी मोहनराव भागवत यांच्या नियुक्तीच्या निमित्ताने शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखात ‘प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी संघ कुठे असतो हा प्रश्न आमच्याप्रमाणे अनेकांना पडतो’, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

मुंबई विद्यापीठातील डॉ. आंबेडकर केंद्राच्या संचालकांचा राजीनामा
मुंबई, २४ मार्च / प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार व्हावा तसेच त्यांच्या विचारांवर संशोधन व्हावे या उद्देशाने मुंबई विद्यापीठाने ‘डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय केंद्रा’ची स्थापना केली आहे. परंतु, विद्यापीठ प्रशासनाने या केंद्राकडे दुर्लक्ष केल्याने एकही उपक्रम व्यवस्थितपणे राबविणे अशक्य झाले आहे. विद्यापीठाचे कुलसचिव कृ. व्यंकटरमणी यांनी या केंद्राला सापत्न वागणूक दिल्याचा आरोप करीत केंद्राचे संचालक डॉ. सुरेंद्र जोंधळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

पाच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्यांना अटक
मुंबई, २४ मार्च / प्रतिनिधी

पानबिडीच्या शॉपसाठी ना हरकत प्रमाणपत्र जारी करण्याकरिता मागितलेल्या १० हजार रुपयांच्या लाचेच्या रकमेपैकी पाच हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात प्रतिनियुक्तीवर असलेल्या उपजिल्हाधिकारी सुनीता तुकाराम वाघमारे यांना आज रंगेहाथ अटक केली. वाघमारे या वांद्रे येथील सार्वजनिक बांधकाम विभागात मालमत्ता अधिकारी म्हणून प्रतियिुक्तीवर आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणातील फिर्यादीला वांद्रे येथे पानबिडीचे दुकान भाडेतत्त्वावर चालवायचे होते. त्यासाठी फिर्यादीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी वाघमारे यांची भेट घेतली. मात्र ना हरकत प्रमाणपत्र हवे असेल तर १० हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. पैसे दिल्याशिवाय वाघमारे या आपल्याला दुकानासाठी आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र देणार नाहीत हे लक्षात आल्यावर वाघमारे यांनी सांगितल्यानुसार फिर्यादीने त्यांना पहिला हफ्ता म्हणून पाच हजार रुपये दिले. परंतु त्यावरही समाधान न झाल्याने वाघमारे यांनी उर्वरित रक्कम लवकर देण्यासाठी फिर्यादीकडे घोषा लावला. पैसे देण्याची इच्छा नसल्याने फिर्यादीने वाघमारे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. त्यानुसार आज वाघमारे यांना फिर्यादीकडून उर्वरित लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.

चिमुरडीला टँकरने चिरडले
मुंबई, २४ मार्च / प्रतिनिधी

वडाळा पूर्व येथील हनुमान जंक्शन परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या आठ वर्षांच्या मुलीला केमिकलच्या रिकाम्या टँकरने चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर तिच्यासोबत असलेला आठ वर्षांचा मुलगाही या अपघातात जखमी झाला. ही घटना आज दुपारी घडली. या घटनेने संतप्त झालेल्या जमावाने टँकरच्या चालकाला मारहाण करण्याबरोबरच रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. बराचवेळ परिसरात तणावाचे वातावरण होते. मुस्कान निखिलेश सिंह (८) असे मुलीचे नाव असून ती रमामातावाडी, कोरबा मिठागर परिसरातील रहिवाशी आहे. आज दुपारी ती शेजारी राहणाऱ्या प्रीती व आयुष यादव या दोन मुलांसह ‘नॉलेज सेंटर’ या शाळेत जायला निघाली. प्रीती व आयुष यांचे आजोबा चाणक्य यादव त्यांना रोज शाळेत सोडायला जातात. आजही ते नेहमीप्रमाणे वडाळा स्थानकाबाहेरील हनुमान जंक्शन येथे रस्ता ओलांडत असताना बरकतअली नाक्याकडून गोदरेज जंक्शनच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या रिकाम्या केमिकल टँकरखाली मुस्कान सापडली. त्याचवेळेस टँकरच्या मागून येणाऱ्या वडाळा पोलिसांच्या गाडीने तिला आणि आयुषला के.ई.एम. रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या अपघातात आयुषच्या पायाला गंभीर जखम झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना घडल्यानंतर पादचारी आणि अन्य लोक संतापले आणि त्यांनी टँकरचालक मोहम्मद अन्सारी (३५) याला मारहाण केली. तसेच रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

‘कृतार्थ’मध्ये डॉ. श्रीखंडे यांची आज मुलाखत
मुंबई, २४ मार्च / प्रतिनिधी

ग्रंथाली वाचक चळवळीतर्फे आयोजित ‘कृतार्थ’ या कार्यक्रम मालिकेत उद्या २५ मार्च रोजी प्रसिद्ध शल्यविशारद डॉ. वि. ना. श्रीखंडे यांची प्रकट मुलाखत शिरीष वीरकर घेणार आहेत. हा कार्यक्रम सायंकाळी साडेसहा वाजता इंडियन एज्युकेशन सोसायटीची महात्मा फुले कन्याशाळा, बाबरेकर मार्ग, दादर-पश्चिम येथे होणार आहे. या कार्यक्रमात डॉ. श्रीखंडे लिखित ‘आणि दोन हात’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते होणार आहे.