Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

कसाबच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे परिसरातील रहिवासी त्रस्त
प्रतिनिधी

मुंबईवर हल्ला करणाऱ्यांपैकी जिवंत असलेला एकमेव अतिरेकी अजमल कसाब याला आर्थर रोड तुरुंगात अभूतपूर्व सुरक्षा देण्यात आली आहे; परंतु या परिसरातील नागरिकांना मात्र या सुरक्षा व्यवस्थेचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कसाबला अन्यत्र हलविण्यात यावे, अशी

 

मागणी या परिसरातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
कसाबच्या सुरक्षिततेच्या कारणावरून या परिसरातील नागरिकांची कधीही झडती घेण्याचे पोलिसांनी अवलंबिले आहे. तसेच आर्थर रोड परिसरातील वाहतुकीवर र्निबध घालण्यात आले आहेत. याचा फटका या भागातील सुमारे ३० हजार नागरिकांना बसत आहे. कसाब २१ फेब्रुवारीपासून आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात आहे. कारागृहात सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व व्यवस्था केली असताना कारागृहाबाहेरचा सुमारे पाच कि. मी. परिसर पोलिसांनी ‘हायजॅक’ केला आहे. बी. एम. सी. कर्मचारी कॉलनी, बालहनुमाननगर, विजयनगर, आदर्शनगर, सानेगुरुजीनगर यासह वीसवर कॉलनी येथे आहेत. या परिसरात सुमारे ३० हजारांवर नागरिक राहतात, तसेच या परिसरात पालिकेचे कस्तुरबा रुग्णालय असून, तेथे नेहमी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची वर्दळ असते. सध्या या परिसरात ३५० च्या वर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या परिसरातील जवळजवळ प्रत्येक घरात जाऊन पोलीस नागरिकांची चौकशी करीत आहेत. ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कसाबला येथून अन्य कारागृहात ठेवावे, अशी मागणी येथील रहिवासी करीत आहेत. येथील स्थानिक आमदार सचिन अहिर यांनी हा प्रश्न विधानसभेत मांडला आहे, तसेच या संदर्भात स्थानिक नगरसेवक चंद्रकांत पुगावकर यांनीही कसाबला येथून अन्यत्र हलविण्याची मागणी केली आहे.
कसाबला आर्थर रोड कारागृहात ठेवायचे असेल तर या परिसरातील रहिवाशांची झडती घेणे बंद करावे. आवश्यकता असेल त्यावेळी नागरिक स्वत:हून पोलिसांना सहकार्य करतील अन्यथा कसाबला येथून हलवून कमी वस्ती असलेल्या भागातील कारागृहात ठेवावे, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे.