Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ मार्च २००९

नॅनो : छोटय़ा मोटारीत किफायतशीर जागा
रवींद्र बिवलकर

साऱ्या जगाचे लक्ष लागलेली टाटा मोटर्सची नॅनो अखेर अवतीर्ण झाली. नॅनोच्या नावातील लहानपण मात्र लोकांच्या नजरेतून आता दूर पळाले आहे. नॅनोच्या उद्घाटनाच्या वेळी छोटेखानी गाडीचे दर्शन घेताच उपस्थितांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले. किमान नॅनोच्य अंतर्गत सजावटीचा आणि छोटेखानी आकारातही मोठय़ा जागेची अनुभूती देणारा प्रत्यक्षानुभव तात्पुरता का होईना बसून पाहताच एकाने तर आपण आपल्या मोठय़ा कुटुंबासाठी २२ नॅनो खरेदी करणार असल्याचे एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या बाईट्समध्ये सांगितले.

स्कायवॉकसाठी झटपट जनमत मिळविण्याचा प्रयत्न
कैलास कोरडे

शहरात अनेक ठिकाणी अनावश्यक किंवा आवश्यकतेपेक्षा अधिक लांबीचे स्कायवॉक उभारण्यात येत असल्याने स्थानिकांकडून त्यांना प्रचंड विरोध होत आहे. त्यावर उतारा म्हणून स्थानिकांच्या कळत-नकळत झटपट जनमत घेण्यात येत आहे. अंमलबजावणी एजन्सी आणि लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने होणारे हे जनमत म्हणजे केवळ एक फार्स आहे, अशी टीका नागरिकांकडून करण्यात येत आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशात कोटय़वधी रुपये खर्चून सुमारे ६४ स्कायवॉकची कामे हाती घेण्यात आली आहेत.

८० वर्षांचे तरुण नर्तक श्रीधर पारकर यांना वसई नृत्यभूषण पुरस्कार
राणी देसाई

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत कला क्षेत्रात आपले एक आगळेवेगळे स्थान निर्माण करूनही प्रसिद्धीपासून कोसो हात दूर राहिलेल्या नृत्यसम्राट श्रीधर पारकर यांच्या गुणांची दखल घेत, वसईकरांनी नुकताच त्यांचा व त्यांची पत्नी आशालता यांना ‘वसई नृत्यभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले. नृत्यसम्राट श्रीधर पारकर सध्या ८० वर्षांचे आहेत. पण कथ्थक, बॅले, लोकनृत्यावर आजही त्यांचे वर्चस्व तरुणांना लाजवेल असे आहे. मूळचे रत्नागिरी काळबादेवी येथील श्रीधर पारकर यांचा ओढा नृत्याकडे. वडील भजनी तसेच स्वत:चा उपाहारगृहाचा व्यवसाय. आई लहानपणी वारली.

कसाबच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे परिसरातील रहिवासी त्रस्त
प्रतिनिधी

मुंबईवर हल्ला करणाऱ्यांपैकी जिवंत असलेला एकमेव अतिरेकी अजमल कसाब याला आर्थर रोड तुरुंगात अभूतपूर्व सुरक्षा देण्यात आली आहे; परंतु या परिसरातील नागरिकांना मात्र या सुरक्षा व्यवस्थेचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कसाबला अन्यत्र हलविण्यात यावे, अशी मागणी या परिसरातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे. कसाबच्या सुरक्षिततेच्या कारणावरून या परिसरातील नागरिकांची कधीही झडती घेण्याचे पोलिसांनी अवलंबिले आहे. तसेच आर्थर रोड परिसरातील वाहतुकीवर र्निबध घालण्यात आले आहेत. याचा फटका या भागातील सुमारे ३० हजार नागरिकांना बसत आहे.

कोकण महोत्सवाच्या रंगात अभ्यासाचा बेरंग
प्रतिनिधी

शाळा-महाविद्यालयांतील परीक्षा सुरू झाल्या असतानाच कोकण महोत्सव-मालवणी जत्रा आणि आनंदमेळा यामुळे माझगाव ताडवाडी परिसरातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विरजण पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परीक्षेचा काळ संपल्यावर कोकण महोत्सवाचे आयोजन करावे अशी विनंती या परिसरातील रहिवाशांनी आयोजकांना केली होती. परंतु त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावत हा महोत्सव दणक्यात आयोजित करण्याचा निर्णय काही मंडळींनी घेतल्यामुळे या परिसरातील रहिवाशी प्रचंड संतप्त झाले आहेत.

बीएमएमच्या मराठीकरणाचा मुद्दा अधिसभेत उपस्थित होणार?
प्रतिनिधी

‘बॅचलर इन मास मिडीया’ (बीएमएम) या अभ्यासक्रमाच्या मराठीकरणाला विद्वत परिषदेमध्ये मान्यता मिळाली असतानाही त्याची अंमलबजावणी करण्यास काही अमराठी व्यक्तींकडून आडकाठी आणली जात असल्याने हा मुद्दा उद्याच्या अधिसभेत उपस्थित होण्याची शक्यता आहे. विद्यापीठाच्या कारभारात अमराठी व्यक्तींची ढवळाढवळ वाढली असून त्यांच्याकडून मराठीची गळचेपी केली जात असल्याची भावना विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांमध्ये झाली आहे. त्यामुळे ‘बीएमएम’चा मुद्दा अधिसभेत उपस्थित करणार असल्याची माहिती काही सदस्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

वेसाव्यातील मासे घातक;
अहवालाला आव्हान देणार
प्रतिनिधी

वेसाव्याच्या किनाऱ्यावर सापडणाऱ्या माशांमध्ये पाऱ्याचे प्रमाण जास्त असल्याबाबत एका संस्थेने दिलेल्या अहवालामुळे मासेविक्रीवर परिणाम झाला असून या अहवालाला आव्हान देण्यात येणार असल्याचे वेसावा मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष प्रदीप टपके आणि वेसावा मच्छिमार कोळी नाखवा मंडळाचे अध्यक्ष पृथ्वीराज चंदी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. ‘इंडियन इंन्स्टिटय़ूट ऑफ एन्व्हायरोमेंटल सायन्सेस’ने दिलेल्या या अहवालासंदर्भात या दोन्ही संघटनांच्या शिष्टमंडळाने सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरीज् यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित संस्थेने ज्या माशांचा उल्लेख केला आहे ते मासे वेसाव्याच्या किनाऱ्यावर मिळत नसल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय या ठिकाणी येणाऱ्या पापलेट, सुरमई, रावस या माशांमध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेनने घालून दिलेले प्रमाण असते, असे स्पष्ट केले आहे. फिशरीज्चे संचालक एस. जी. मुखर्जी व ज्येष्ठ शास्त्रज्ञ विनय देशमुख, सिंग यांचा हवाला देऊन या शिष्टमंडळाने पत्रकात म्हटले आहे की, या संस्थेकडून दर तीन महिन्यांनी आढावा अहवाल सादर केला जातो. त्यांना वेसाव्यात येणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या माशांमध्ये पाऱ्याचे घातक प्रमाण आढळून आलेले नाही. उलटपक्षी माशांमध्ये उत्तम दर्जाचे प्रोटिन्स असून त्याचा आरोग्याला फायदाच होत असतो, असेही या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. २००७-२००८ सालचा अहवाल उशिराने प्रसिद्ध करून मासेप्रेमींमध्ये विनाकारण संभ्रम निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे या अहवालालाच न्यायालयात आव्हान देण्याचे आम्ही ठरविले आहे, असेही टपके आणि चंदी यांनी सांगितले. या चुकीच्या अहवालामुळे वेसाव्यातील मच्छिमारांचा धंदा पार उद्ध्वस्त झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

शालिनी हरि केतकर यांचे निधन
प्रतिनिधी

राष्ट्र सेविका ज्येष्ठ कार्यकर्त्यां शालिनी हरी केतकर यांचे नुकतेच दादर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिवंगत कार्यकर्ते हरिभाऊ केतकर यांच्या पत्नी होत्या. बालपणापासूनच त्या राष्ट्र सेविका समितीच्या सक्रिय सदस्या होत्या. कच्छचा सत्याग्रह, गोहत्या विदोध आंदोलन अशा विविध आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता. स्वा. सावरकरांच्या विचारांचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव होता. १९७५ च्या आणीबाणीच्या कालखंडात त्यांनी अडीच महिन्यांचा कारावासही भोगला होता. त्यांच्या पश्चात दोन मुलगे व सून असा परिवार आहे.