Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ मार्च २००९

‘प्रवेश’ निवडणुकीपर्यंतच स्थगित!
आबांचा काँग्रेसला गर्भित इशारा
नगर, २४ मार्च/प्रतिनिधी
काँग्रेसमधील नेत्यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देण्याची मोहीम लोकसभा निवडणुकीपुरतीच स्थगित ठेवली आहे, असा गर्भित इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांनी आज नेवासे येथील जाहीर सभेत बोलताना काँग्रेसला दिला. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख व त्यांचे चिरंजीव शंकरराव गडाख यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने जिल्ह्य़ाच्या राजकारणास कलाटणी मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

७५० कृषिपंपांची वीज तोडली
नगर, २४ मार्च/प्रतिनिधी

महावितरणच्या ‘बिल भरा, अन्यथा वीजजोड तोडा’ मोहिमेचा फटका नगर तालुक्यातील सुमारे ७५० कृषिपंप ग्राहकांना बसला. वीज न भरणाऱ्या ७० रोहित्रांचा वीजजोड तोडण्यात आला. या आठवडय़ात ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.
मार्च महिन्यात नगर विभागाला ४१ कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आजअखेर सुमारे २७ कोटींची वसुली झाली आहे.

तुकाराम गडाख, राजळे आता काय करणार?
नगर, २४ मार्च/प्रतिनिधी

राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून उमेदवारीची हुलकावणी मिळालेले खासदार तुकाराम गडाख आणि आमदार राजीव राजळे यांच्या पुढच्या भूमिकेबद्दल औत्सुक्य निर्माण झाले आहे. गडाख यांनी इतर पर्यायांची चाचपणी सुरू केल्याचे समजते, तर मुंबईहून आज नगरला परतलेले राजळे कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत.

कृषी विद्यापीठाची नोकरभरती; विशिष्ट उमेदवारावर मेहेरनजर?
नगर, २४ मार्च/प्रतिनिधी

उमेदवारांना अपात्र ठरविताना टंकलेखनाचे विहित ज्ञान नाही म्हणावयाचे आणि दुसरीकडे दहावी फायटर असलेल्या, टंकलेखनाचे ज्ञान नसणाऱ्या उमेदवाराची हेतूत निवड करायची. लेखी-तोंडी परीक्षेत गुण देतानाही घोटाळा! अशा अजब गमती-जमती महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या नोकरभरतीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवड समितीने केल्याच्या तक्रारी होऊ लागल्या आहेत.

राष्ट्रवादीची प्रचार यंत्रणा हलली, पदाधिकारी ‘आऊट ऑफ रेंज’!

नगर, २४ मार्च/वार्ताहर

लोकसभेसाठी आमदार शिवाजी कर्डिले यांची उमेदवारी जाहीर होताच तालुक्यात राष्ट्रवादीची यंत्रणा वेगाने हलली. तालुक्यातील बहुतांशी पदाधिकारी आज ‘आऊट ऑफ रेंज’ झाले!
कर्डिलेंना उमेदवारी मिळणार हे गृहीत धरून प्रचाराचे नियोजन करण्यात आले. तालुका पदाधिकारी, सहकारी संस्थांचे आजी-माजी संचालक व पदाधिकारी जिल्ह्य़ात रवाना झाले.

अखेर चार महिन्यांचे अंदाजपत्रक मंजूर
नगर, २४ मार्च/प्रतिनिधी

स्थायी समिती अजून अस्तित्वात आली नसल्यामुळे पेचात सापडलेले महापालिकेचे ४ महिन्यांचे अंदाजपत्रक आज आयुक्त कल्याण केळकर यांनी राज्य सरकारच्या आदेशानुसार मंजूर केले. एप्रिल ते जुलैसाठी ५ कोटी ४२ लाख ७४ हजार ४५४ रुपयांचे हे अंदाजपत्रक असून, त्यात कोणतीही करवाढ नाही. राजकीय सुंदोपसुंदीमुळे गेल्या ३ महिन्यांत स्थायी समिती अस्तित्वात येऊ शकलेली नाही.

२४६ गावांत पाणीटंचाई जाणवणार
भूजल सर्वेक्षणाचा अहवाल
नगर, २४ मार्च/प्रतिनिधी
जिल्ह्य़ातील १४पैकी १० तालुक्यांतील २४६ गावांना यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. टंचाई निवारण आराखडा भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेद्वारे जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांना नुकताच देण्यात आला.एप्रिल-मेच्या कडक उन्हात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणे जिल्ह्य़ासाठी नवे नाही.

नेत्यांची परीक्षा
‘टी. व्ही.’ अर्थात, विधानसभेसाठी थोरात आणि लोकसभेसाठी विखे, असे तालुक्यातील बहुतांश मतदारांचे समीकरण शिर्डी राखीव झाल्याने या वेळी विखेंबाबत तरी मोडणार आहे! प्रत्येक निवडणुकीत सातत्याने काँग्रेसची पाठराखण केलेला तालुका अशी संगमनेरची ओळख झाली आहे. मात्र, या वेळी आघाडीचा उमेदवार आतला की बाहेरचा यावरच बरीचशी गणिते अवलंबून आहेत. आठवलेंची उमेदवारी शिवसेनेच्या भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पथ्यावर पडू शकते, ही एक बाजू असली, तरी भविष्यासाठी काँग्रेसला अधिकाधिक आघाडी मिळावी यासाठी मंत्री बाळासाहेब थोरात कसोशीने प्रयत्न करतील.

अनेकांना ओढ आता दिल्लीची!
लोकसभेच्या निवडणुकीतील उमेदवारांची अनिश्चितता अखेर संपुष्टात आली. प्रत्येक पक्षात उमेदवारी मिळवणारा एकच आहे. ती न मिळाल्याने नाराज झालेल्यांची संख्या जिल्ह्य़ात अधिक आहे. एरवी लोकसभेसाठी बळेचच कोणाला तरी घोडय़ावर बसवावे लागे, तोही अनिच्छेनेच तयार होई. मात्र, मतदारसंघाच्या पुनर्रचनेमुळे राजकीय गणितंच बदलली. त्यामुळे लोकसभेलाही इच्छूकांची संख्या वाढली.

युतीचा गड भेदण्याचे आघाडीपुढे आव्हान!

पूर्वी वर्षांनुवर्षे काँग्रेसची पाठराखण आणि आता अलीकडच्या काळात युतीचा बालेकिल्ला ठरलेल्या कर्जत तालुक्यात या निवडणुकीतही हेच चित्र राहणार काय, याची राजकीय वर्तुळात, तसेच सामान्य जनतेला उत्सुकता आहे. भाजपची उमेदवारी दिलीप गांधींना जाहीर झाल्यानंतर युतीच्या कार्यकर्त्यांनी केलेला जल्लोष आणि जनतेतील प्रतिक्रिया पाहता हे चित्र पुढेही कायम राहणार, असेच सध्याचे चित्र आहे. या पाश्र्वभूमीवर ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार शिवाजी कर्डिले यांची वाटचाल या तालुक्यात खडतर दिसते.

एक दूधवाला, तर दुसरा ज्यूसवाला!
बरीच चर्चा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने नगर मतदारसंघातील उमेदवारी अखेर जाहीर केली. दोन्ही पक्षाने बाहेरील उमेदवारापेक्षा स्वतच्या पक्षातील नेत्यांनाच उमेदवारी दिली. ‘राष्ट्रवादी’ने आमदार शिवाजी कर्डिले यांना, तर भाजपने माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांना उमेदवारी दिली. दोन्ही उमेदवारांत काही बाबतींत साम्य आहे. कर्डिले यांनी दूध विक्रेत्याच्या व्यवसायातून राजकीय भरारी घेतली, तर गांधी यांनी ज्यूसच्या हातगाडीवरून राजकीय मजल मारली. आता दोघेही सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत. कर्डिले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे, तर गांधी नगर अर्बन बँकेचे अध्यक्ष आहेत.

राहुरीतून मताधिक्यासाठी कामाला लागावे - गांधी
राहुरी, २४ मार्च/वार्ताहर

नगर लोकसभा मतदारसंघात नव्याने समावेश झालेल्या राहुरीत भाजपसाठी वातावरण चांगले असून, मताधिक्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांनी केले. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गांधी आज शिर्डीला साईदर्शन घेऊन राहुरीत आले. ज्येष्ठ नेते मोरेश्वर उपाध्ये यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. श्री. गांधी म्हणाले की, आपल्या उमेदवारीबाबत संभ्रम होता. उमेदवारी जाहीर होताच खडर्य़ापासून सोनगावपर्यंत व पाडळीपासून चापडगावपर्यंत कार्यकर्ते व समर्थकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. अडवाणी पंतप्रधान होण्यासाठी लोकसभा निवडणुकीतील यश महत्त्वाचे आहे. एका दिवसात २० गावांशी संपर्क या प्रकारे मतदारांशी संपर्क साधण्याचा आपला प्रयत्न आहे. भाजप किसान आघाडीचे नेते आसाराम ढूस, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, तालुकाध्यक्ष विक्रम तांबे, सरचिटणीस उदय ठोंबरे, शहराध्यक्ष बापूसाहेब वराळे, प्रकाश पारख, प्रमोद सुराणा, नगरसेवक शिवाजी लोंढे, विजय बानकर, शेटे, देशमुख आदी उपस्थित होते.

जामखेडमध्ये सोमवारी शरद पवार यांची सभा
जामखेड, २४ मार्च/वार्ताहर

नगर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या प्रचारासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची सभा सोमवारी (दि. ३०) सकाळी १०.३० वाजता येथे होणार आहे. सभेच्या तयारीसाठी जिल्हाध्यक्ष दादा कळमकर व जि. प.चे माजी उपाध्यक्ष राजेंद्र फाळके यांची प्रदेश सदस्य राजेंद्र कोठारी, र्मचटस् बँकेचे अध्यक्ष दिलीप बाफना, तालुकाध्यक्ष सुरेश भोसले, तालुका दूध संघाचे अध्यक्ष तुषार पवार, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष जायभाय, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा लता पवार, भीमा गोलेकर यांच्यासमवेत बैठक झाली. जामखेडची सभा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन कळमकर यांनी केले.
----------------------------------------------------------------------------

‘आढळा’च्या कालव्यात भिंत बांधण्याचे काम सुरू
अकोले, २४ मार्च/वार्ताहर
आढळा धरणाच्या कालव्यामध्ये वेगाने येणारे डोंगर उतारावरील अतिवृष्टीचे पाणी रोखण्यासाठी भिंत बांधण्याचा प्रयोग पाटबंधारे विभागातर्फे करण्यात येणार आहे. वीरगाव शिवारातील घोडमाळ परिसरात अशा भिंतीसाठी उजव्या कालव्याच्या कडेने पाया खोदण्याचे काम यंत्राद्वारे सुरू करण्यात आले आहे.डोंगर उताराच्या बाजूने या कालव्याच्या काठावर सिमेंट काँक्रिटची सुमारे एक मीटर उंचीची पक्की भिंत बांधून पावसाळ्यात जमा होणारे पाणी सुरक्षित ठिकाणी काढून सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. डोंगररांग आणि कालव्यादरम्यानच्या क्षेत्रातील गाळमिश्रीत पावसाचे पाणी जोरदार वेगाने ठिकठिकाणी कालव्यात उतरून दर वर्षी नुकसान होण्याची भीती असते. कालव्यात गाळ साचून पाणी वहन क्षमताही घटते. मात्र, नियोजित भिंतीमुळे कालव्याचे नुकसान टळेल.

सासू-सासऱ्यावर वस्तऱ्याने वार; जावई फरार
राहाता, २४ मार्च/वार्ताहर
बायकोला नांदवायला न पाठविल्याचा राग आल्याने जावयाने सासू व सासऱ्यावर वस्ताऱ्याने वार करून त्यांना जखमी केले. ही घटना तालुक्यातील पुणतांबे येथे आज सकाळी सातच्या सुमारास घडली. जावई मात्र फरार झाला आहे.सुरेश रामभाऊ वायकर (राहणार पुणतांबे) यांनी जावई आरोपी रमेश खंडू गांगर्डे (राहणार हिंगणी, तालुका कोपरगाव) याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. आरोपी रमेश त्याची पत्नी व मुलांना मारहाण करून सातत्याने त्यास देत होता. त्यांचा सांभाळ करीत नव्हता. त्यामुळे त्याची पत्नी व मुले माहेरी पुणतांबे येथे राहात होते. माझ्या पत्नीला नांदवायला पाठवा, असा तगादा रमेश याने सासरा सुरेश यांच्याकडे लावला होता. आज सकाळी रमेश हा पुणतांबे येथे आला. त्याचा पुन्हा सासरा व सासूशी वाद झाला. पत्नीला नांदवायला पाठवित नसल्याचा राग येऊन आरोपी रमेश याने सासरा सुरेश व सासू तान्हूबाई यांच्यावर म्हशी भादरण्याच्या वस्ताऱ्याने वार करून त्यांना जखमी केले. तो फरार झाला. सुरेश वायकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी रमेश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नोकराचा मालकाला ठेंगा; सहा लाखाची रोकड लांबविली!
राहाता, २४ मार्च/वार्ताहर

येथील कांदा व्यापाऱ्याची रोख सहा लाख रुपये रक्कम शिर्डीच्या स्टेट बँकेतून घेऊन नोकराने पलायन केले! आज दुपारी बाराच्या सुमारास शिर्डीत हा प्रकार घडला. नोकराच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले. येथील बाजार समितीच्या आवारात विलास रोहोम कांदा खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे विलास श्रीरंग नलावडे (वय २५, पुणे) ८-९ महिन्यांपासून कामास होता. रोहोम यांनी नलावडे याला शिर्डीत स्टेट बँक शाखेतून ६ लाख रुपये आणण्यासाठी धनादेश दिला. नलावडेने बँकेतून ६ लाख रुपये काढले व साथीदारासमवेत बँकेबाहेर आला. ‘मोबाईल बँकेच्या काऊंटरवर राहिला, घेऊन ये’ असे नलावडेने साथीदाराला सांगितले. साथीदार बँकेत जाताच संधी साधून रोहोम यांच्या मालकीच्या मोटरसायकलवरून (एमएच १७ के ३१९५) ६ लाखांची रोकड घेऊन नलावडे पसार झाला. रोहोम यांना हा प्रकार समजताच त्यांनी शिर्डी पोलिसांना माहिती दिली. नोकर नलावडे पुणे येथे गेल्याच्या संशयावरून त्याच्या शोधासाठी शिर्डी पोलिसांचे पथक तिकडे रवाना झाले. शिर्डी पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

घामांच्या धारांवर पावसाचा उतारा!
नगर, २४ मार्च/प्रतिनिधी

कडाक्याच्या उन्हाने घामाच्या धारा वाहायला सुरुवात झाली असतानाच आज वरुणराजाने नगरकरांना न्हाऊ घातले. दुपारी ४च्या सुमारास सुमारे १५ मिनिटे पावसाने हजेरी लावत शहरातील रस्ते ओलेचिंब केले.गेल्या दोन दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढून कमालीचा उकाडा जाणवत होता. आजही दुपारी कडक ऊन होते. मात्र, दुपारी ३नंतर आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली. थोडय़ाच वेळात पावसाच्या सरी पडू लागल्या. उन्हाचा शीण घालविण्यासाठी अनेकांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला.पावसामुळे शहरातील रस्ते धुवून निघाले. शहराच्या मध्यभागात पाऊस पडत असताना सावेडी उपनगर मात्र कोरडे होते.

वकिलांचे बहिष्कार आंदोलन सुरूच
देवळाली प्रवरा, २४ मार्च/वार्ताहर

राहुरीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (कनिष्ठ स्तर) स. रं. ताठे यांच्या विरोधात राहुरी तालुका बार असोसिएशनने पुकारलेल्या बहिष्काराच्या दुसऱ्या दिवशी न्यायालयीन कामकाज होऊ शकले नाही. सहदिवाणी न्यायाधीश द. शं. खेडेकर यांच्या न्यायालयात कामकाज मात्र सुरू होते. स. रं. ताठे दि. ३० मार्चपर्यंत रजेवर गेल्याचे समजले. बार असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष, तसेच जिल्हा न्यायाधीश यांना फॅक्सद्वारे कळवून न्यायालयीन कामकाजावर रविवारी लोकन्यायालयापासून बहिष्कार टाकला. सोमवारी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लोकांना न्यायालयीन कामकाज न झाल्याने परतावे लागले. ताठे यांच्यासमोरील कामकाजावर बहिष्कार असल्याने न्यायालयात फारशी वर्दळ नव्हती. बार असोसिएशनच्या बहिष्काराला नेवासे व शेवगाव बार असोसिएशन, तसेच तालुका पत्रकार संघटनेने पाठिंबा दिला.

पत्नी भाजल्याने पतीची आत्महत्या
संगमनेर, २४ मार्च/वार्ताहर

स्टोव्हचा भडका उडून गंभीर भाजलेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकाराचा धक्का बसल्याने तिच्या पतीनेही नंतर विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.
येथील जेधे वसाहतीत राहणारे राम बागडे असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. बागडे यांची पत्नी स्टोव्हचा भडका उडाल्याने काल गंभीर भाजली. तिच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विमनस्क अवस्थेत तिच्या पतीने आज सकाळी माळीवाडय़ानजीक विषारी औषध घेतले. त्यांनाही तातडीने रुग्णालयात हलविले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.