Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ मार्च २००९

संजय धोत्रे यांच्यासह विदर्भातून १३ अर्ज
राणे समर्थक वाकुडकरांची नागपुरातून उमेदवारी

नागपूर,२४ मार्च/ प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी आज विदर्भातून भाजपचे अकोल्याचे उमेदवार संजय धोत्रे यांच्यासह एकूण १३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसचे नेते नारायण राणे यांचे कट्टर समर्थक ज्ञानेश वाकुडकर यांनीही आज नागपूर येथे उमेदवारी अर्ज सादर केला. लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरु झाली.

राजे सत्यवानराव आत्राम यांना बसपची उमेदवारी
विदर्भ-मराठवाडय़ातील ६ उमेदवार जाहीर

नागपूर, २४ मार्च / प्रतिनिधी

बहुजन समाज पक्षाने विदर्भ व मराठवाडय़ातील सहा उमेदवार मंगळवारी जाहीर केले. चिमूर-गडचिरोली मतदारसंघाचा उमेदवार बदलून त्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असलेले राजे सत्यवानराव आत्राम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार वीरसिंग यांनी आज उमेदवारांची घोषणा केली. राजे सत्यवानराव आत्राम यांच्याशिवाय यवतमाळ- अ‍ॅड. दिलीप ऐडतकर, चंद्रपूर- डॉ. अमोल पोतदार, उस्मानाबाद- दिवाकर नाकोडे, नांदेड- डॉ. मोहम्मद मकबुल सलीम आणि जालना राजपालसिंग राठोड यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.

शहाळ्याची लोकप्रियता कायम
नागपूर, २४ मार्च / प्रतिनिधी

उन्हाळा आणि शीतपेयांचे वेगळेच समीकरण आहे. उन्हाची काहिली वाढताच शीतपेयांची मागणी वाढत जाते. बाजारात शीतपेयांचे अनेक ब्रँड एकमेकांशी स्पर्धा करीत असतात. जाहिरीतींमुळे त्यांची विक्री मोठय़ा प्रमाणात होत असते. शीतपेयांशी स्पर्धा असते ती लिंबू पाण्याशी. त्यांच्याशी लढा असतो तो जलजिऱ्याचा आणि हव्या हव्याशा नारळाच्या पाण्याचा.. शहाळ्याचा..
आज स्पर्धेचे युग असले तरी देशी शीतपेयांना जाहिरातींची गरज भासत नाही. वर्षांनुवर्ष ही शितपेये गुणवत्तेच्या आधारावर बाजारात टिकून आहेत.

कुख्यात लुटारू धंतोली ठाण्यातून पळाला
नागपूर, २४ मार्च / प्रतिनिधी

कुख्यात लुटारू राजा कलसी मंगळवारी दुपारी धंतोली पोलीस ठाण्याच्या कोठडीतून राजरोसपणे पळून गेला. या घटनेने खळबळ उडाली असून आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत. राजा प्रीतपालसिंग जसपालसिंग कलसी हे पळून गेलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध वाटमारी व चेन स्नॅचिंगचे बाराहून अधिक गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास धंतोली पोलीस ठाण्याच्या कोठडीत तुषार युवराज काळे व राजा कलसी हे दोघेच आरोपी होते.

डॉक्टरांनी सामाजिक भान ठेवावे -डॉ. पंकज चांदे
नागपूर, २४ मार्च / प्रतिनिधी

डॉक्टरांनी रुग्णांवर औषधोपचार करताना सामाजिक बांधिलकीचे भान ठेवावे, असे प्रतिपादन महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांनी केले. खापरी येथील पाचलेगांवकर आश्रमात आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. खापरीच्या सरपंच रंजना लोखंडे प्रामुख्याने उपस्थित होत्या. याप्रसंगी डॉ. चांदे यांच्या हस्ते संजीवनी पुरस्कार प्राप्त डॉ. उर्मिला क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला.
पाचलेगांवकर महाराज आश्रमचे अध्यक्ष प्रा. के.जी. मिसर यांनी प्रास्ताविकातून आश्रमातर्फे राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. सचिव डॉ. विनोद वैद्य यांनी आभार मानले.
शिबिरात बालरोग तज्ज्ञ डॉ. रवींद्र क्षीरसागर, नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. भिडे, डॉ. वसंत परांजपे, डॉ. उर्मिला क्षीरसागर, डॉ. करुणा पटनाईक, डॉ. विनोद वैद्य यांनी रुग्णांची तपासणी करून योग्य सल्ला दिला. या शिबिराचा लाभ खापरी परिसरातील शेकडो नागरिकांनी घेतला.

भावसार समाजाचा होळी पारिवारिक मिलन कार्यक्रम
नागपूर, २४ मार्च / प्रतिनिधी

भावसार समाजाच्यावतीने हुडकेश्वरमधील अष्टविनायक वसाहतीत होळी पारिवारिक मिलन कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुकर भावसार होते. प्रमुख पाहुणे म्हणून राम लखपती, विष्णुपंत रितपूरकर, मोरेश्वर कटय़ारमल, प्रभाकर वास्कर उपस्थित होते. यावेळी एक मिनिट अ‍ॅक्टिंग स्पर्धा, म्युझिकल चेअर, आदी स्पर्धा घेण्यात आल्या. शहरातील जादुगार प्रशांत भावसार यांचा ‘सनराई पीस’ मिशनच्यावतीने व भावसार विकास मंडळाचे जिल्हाध्यक्ष मोरेश्वर कटय़ारमल यांच्या हस्ते ‘नवरत्न’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

लोहियांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर विभिन्न कार्यक्रम
नागपूर, २४ मार्च / प्रतिनिधी

समाजवादी चिंतनाचे अग्रदूत डॉ. राम मनोहर लोहिया यांची जन्मशताब्दी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून वर्षभर मोठय़ा प्रमाणात साजरी करण्याचा निर्णय लोहिया अध्ययन केंद्राच्या बैठकीत घेण्यात आला. लोहिया अध्ययन केंद्राद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सुरेश अग्रवाल होते. यावेळी दैनिक भास्करचे संपादक प्रकाश दुबे, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, एन.एम. दोराईजन उपस्थित होते. यावेळी गिरीश गांधी म्हणाले, ही जन्मशताब्दी सर्वाना सोबत घेऊन, विशाल स्वरुपात साजरी करण्याची गरज आहे. यासाठी सर्वसमावेशक आयोजन समिती स्थापन करण्याची सूचनाही त्यांनी केली. प्रकाश दुबे म्हणाले, आजची युवा पिढी लोहियांच्या विचारांपासून दूर गेली आहे. त्यामुळे प्रत्येक वस्तीत जाऊन कार्यक्रम आयोजित करण्यात यावे. श्रमिक नेते एन.एम. दोराईजन म्हणाले खूप अधिक पैसा खर्च करण्यापेक्षा कार्यक्रमाच्या वैचारिकतेकडे लक्ष द्यावे. यावेळी डॉ. ओमप्रकाश मिश्रा, अमर रामटेके, गोपाल नायडू यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला राजेंद्र गांधी, माधवराव दादीलवार, राधेश्याम पाटील, एकनाथ सोनारे, गोपाल नायडू, गंगाप्रसाद ग्वालबंशी, संगीता महाजन, सूर्यमणी भिवगडे, विनोद व्यास, विजय त्रिवेदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी हरीष अडय़ाळकर यांनी वर्षभर साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरोषा सांगितली. आभार नरेंद्र परिहार यांनी मानले.

मनुष्यापुढील आव्हाने परतवण्यात स्त्री शक्तीचे योगदान महत्त्वाचे -भिडे
नागपूर, २४ मार्च/ प्रतिनिधी

आज मनुष्यापुढे अनेक आव्हाने उभी आहेत, ती परतवून लावण्यात स्त्री शक्तीचे मोठे योगदान आहे, असे मत कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्ष निवेदिता भिडे यांनी व्यक्त केले.
सन्मित्र सभेतर्फे सायंटिफिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या दिवंगत शांतीदेवी मुंद्रा स्मृतीप्रीत्यर्थ व्याख्यानात ‘समाजापुढील आव्हाने व स्त्री शक्तीचे योगदान’ या विषयावर निवेदिता भिडे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखिका आशा बगे होत्या. व्यासपीठावर ओमप्रकाश मुंद्रा, सन्मित्र सभेचे अध्यक्ष डॉ. विजय तुंगार व संस्थेच्या सचिव प्राचार्य अर्चना अलोणी उपस्थित होत्या. प्रगतीच्या मार्गाने जात असताना मनुष्याच्या वाटय़ाला अनेक अडचणी येतात. त्याला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. या अडचणीच्या काळात त्याला स्त्री शक्तीच वाचवू शकते. स्त्रिया स्वतचा कधीच विचार करीत नाही. येणाऱ्या पिढीसाठी ती सर्व साठवून ठेवते. स्त्रियांमधील त्यागाची वृत्ती, स्मृती, वाक्चातुर्य हे गुण नेहमीच तिला विविध आव्हानांना तोंड देण्याची शक्ती देतात, असे भिडे म्हणाल्या. विजय तुंगार यांनी यावेळी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.

यशवंत स्टेडियमजवळ बेवारस बॅगमुळे खळबळ
नागपूर, २४ मार्च / प्रतिनिधी

यशवंत स्टेडियमच्या दक्षिणेकडे देशोन्नतीसमोरच्या रस्त्यावर मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास एका बेवारस बॅगने खळबळ उडवून दिली. बराचवेळ ही बॅग पडलेली पाहून कुणीतरी पोलीस नियंत्रण कक्षाला कळवले. नियंत्रण कक्षाने बॉम्बशोधक व नाशक पथक तसेच धंतोली पोलिसांना कळवले. धंतोली पोलीस ठाण्याच्या निरीक्षक माया बनकर सहकाऱ्यांसह तेथे पोहोचल्या. तोपर्यंत बॉम्बशोधक व नाशक पथक श्वानासह आले. या पथकाने बॅगची तपासणी केली. त्यात स्फोटके नसल्याचा निर्वाळा श्वान व यंत्राने दिला. पोलिसांनी ही बॅग उघडली असता त्यात काही कागदपत्रे व कपडे आढळले. पंडित ज्योतीसम्राट रामस्वरूप (मध्य प्रदेश) असा उल्लेख त्यावर होता. एखाद्या चोराने ही बॅग लांबवून त्यातील कामाच्या वस्तू काढून ती फेकून दिली असावी, असा पोलिसांचा कयास आहे.