Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ मार्च २००९
नवनीत

जी व न द र्श न
तैत्तिरीय उपनिषद- २

 

या उपनिषदाच्या दुसऱ्या भागाला ‘ब्रह्मानंदवल्ली’ असे म्हणतात. यात सहतत्त्वाचा संदेश दिला आहे. आपण नेहमी वापरात असलेल्या ‘ॐ सह ना ववतु। सह नौ भुनक्तु। सहर्वीय करवावहै।’ या ओळी यात आहेत. ‘संहति: कार्यसाधिका’ हा राष्ट्राचा महामंत्र ऋषींनी दिलाय. जड शरीरात हृदयाच्या ठिकाणी सूक्ष्म आत्मतत्त्व राहते, हे जो जाणतो त्याला ब्रह्माचे रूप कळते. आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी, पृथ्वीपासून वनस्पती, वनस्पतींपासून अन्न आणि अन्नापासून पुरुष उत्पन्न झाला. म्हणून हा पुरुष अन्नाच्या रसाने पूर्ण आहे. अशी माणसाची निर्मिती झाली असावी असे त्यांना वाटते. पंचमहाभूतात्मक देहाच्या घडणीतून सृष्टीचा अभ्यास करीत असलो तरी देह हे काही आपले खरे स्वरूप नव्हे, हे भान असले पाहिजे. हे बुद्धीने जाणावे. बुद्धी आत्म्याच्या शेजारी असते. चिंतन करणे हा बुद्धीचा प्रधान धर्म आहे. बुद्धीने आत्मस्वरूपाचे चिंतन केल्यास जाडय़ नाहीसे होते. हलकेपणाने आपण अंतरिक्षाचा वेध घेऊ शकतो. आकाशापलीकडल्या आणखी आकाशांचा शोध घेण्याची क्षमता येते. प्राण हे भूतमात्रांचे जीवन आहे हे कळते. जे लोक प्राणदृष्टीने ब्रह्माची उपासना करतात, त्यांची भूतमात्रांवर सत्ता चालते. प्राण हा अन्नरसमय शरीराचा आत्मा आहे. याच्याहून वेगळा असा मनोमय अंतरात्मा आहे. हा माणसासारखा आहे. यजुर्वेद हे त्याचे मस्तक आहे. ऋग्वेद उजवी बाजू- सामवेद डावी बाजू, विधी हे त्याचे शरीर आणि अथर्वागिरस त्याचे पाय आहेत. म्हणजे त्याचे एकूण व्यक्तिमत्त्व ज्ञानी-संशोधकी आहे. यातले विज्ञान म्हणजे बुद्धी आणि यज्ञ यांची उपासना. बुद्धी कर्माना दिशा देते. विज्ञानमय कोश समजून देते. विज्ञानातूनही आनंदमय कोशाची जाणीव निर्माण होते. यासाठी तपाची गरज आहे. तप ही आत्मा आणि सृष्टी यांना जोडणारी साखळी आहे. तप म्हणजे अति सूक्ष्म, खोल, एकाग्र चिंतन होय. तप ज्ञानरूप असते. ते शक्ती निर्माण करते. सृष्टी निर्माण करण्यासाठी आत्म्याने तप केले. यातून ज्ञान-विज्ञान जन्मले. विज्ञानाने भौतिक सृष्टीचे संशोधन केले. ज्ञानाने अंत:सृष्टीचे संशोधन केले. या दोन्हीतून मानवाला आनंद लाभला. ऋषींनी या दोन्ही दृष्टींची दिलेली चाहूल विलक्षण आहे.
यशवंत पाठक

कु तू ह ल
मंगळावरील जीवसृष्टी
मंगळावर सूक्ष्म स्वरूपातील जीवसृष्टी असण्याची शक्यता कोणत्या पुराव्यावर आधारलेली आहे?
ही जीवसृष्टी शोधण्याचे कोणते प्रयत्न केले जात आहेत?
मंगळाचे पूर्वी असलेले वसतियोग्य पट्टय़ातील स्थान, भूतकाळात पृष्ठभागावर व वर्तमानकाळात पृष्ठभागाखाली पाणी असल्याचे पुरावे, भूतकाळात दाट वातावरण असल्याचे पुरावे यामुळे कोणे एकेकाळी मंगळावर प्रगत नसली तरी सूक्ष्मजीवसृष्टी असावी. अजूनही ठोस पुरावा मिळालेला नसला तरी अतिशय गाजलेला व जीवसृष्टीच्या अस्तित्वाच्या दृष्टीने महत्त्वाचा पुरावा म्हणजे अंटाक्र्टिकामध्ये सापडलेला ‘एएलएच ८४००१’ नावाचा अशनी. सुमारे दोन किलोग्रॅम वजनाचा हा अशनी मंगळावरून आला हे सिद्ध झाले आहे. या अशनीमध्ये पृथ्वीवरील जिवाणूंमध्ये असतात तसे पॉलिसायक्लिक हायड्रोकार्बन आहेत व सूक्ष्मजीवाश्मांसारख्या दिसणाऱ्या रचना आहेत. या गोष्टी अशनीच्या आतल्या भागात असल्याने त्या पृथ्वीवरच्या जीवसृष्टीकडून अशनीत गेल्या असण्याची शक्यता फारच कमी आहे. अर्थात यामुळे मंगळावर सूक्ष्मजीव होते हे मात्र सिद्ध होत नाही. कारण असे स्फटिक व जीवाश्मांप्रमाणे दिसणाऱ्या रचना या अजैविकरीत्या खनिजीकरणामधील रासायनिक प्रक्रियांमध्येसुद्धा बनू शकतात. अशा प्रक्रियांचा सखोल अभ्यास केला जात आहे.
प्रत्यक्ष मंगळावर जाऊन जीवसृष्टीचा शोध घेणे याला अर्थात पर्याय नाही. मात्र जेथे पाणी, जीव असू शकतो, तेव्हा मंगळावर पाण्याचा मागोवा घेणे, कोणेकाळी मंगळाच्या पृष्ठभागावर तळी, गरम पाण्याचे झरे व हिमनद्या असल्याच्या खुणा जिथे दिसतात, त्या ठिकाणच्या अवशेषांचा व जैविक प्रक्रियांमधून तयार झालेल्या घटकांचा शोध घेणे, पृष्ठभागाखालील पाण्याच्या ठिकाणांचा शोध घेणे, मंगळावरील नमुने पृथ्वीवर आणून त्यांचा अभ्यास करणे आणि अखेरीस खुद्द मानवाला मंगळावर उतरवून जीवसृष्टीचा शोध घेणे.. असे अनेक पर्याय मंगळावरील जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी उपलब्ध आहेत. यातील काही पर्याय मंगळावर पाठवल्या जात असलेल्या यानांद्वारे तिथल्या जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी चोखाळले जात आहेत.
सुजाता देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
र. वा. दिघे
विसाव्या शतकाच्या मध्यास मराठी साहित्यातील कादंबरी क्षेत्रात अनेक नवलेखकांनी नव्या कल्पना मांडल्या. तथापि त्यावर हाताच्या बोटांवर मोजता येईल इतक्याच लेखकांचा ठसा उमटला. त्यापैकी एक रघुनाथ वामन दिघे. त्यांचा जन्म २५ मार्च १८९६ रोजी कल्याण येथे झाला. पुण्यातून वकिलीची पदवी संपादन करणाऱ्या दिघ्यांनी काही काळ पुणे तसेच पनवेल येथे वकिली केली. तथापि त्यांचा पिंड होता साहित्यिकाचा! त्यासाठी वकिली बंद करून रायगड जिल्हय़ातील खोपोली या गावी कायमचे वास्तव्याला आले. उपजीविकेसाठी माध्यम निवडले शेती. ग्रामीण परिसर निवडून तिथला निसर्ग, समाज जसाच्या तसा उभा करून दिघ्यांनी मराठी कादंबरीला एक नवी दिशा कशी दिली हे ‘पाणकळा’ ही कादंबरी वाचल्यानंतर लक्षात येते. त्यांच्या ‘सराई’ या कादंबरीतील ‘लाडी’ या व्यक्तिरेखेने वाचकांच्या मनावर भुरळ घातली. ‘गानलुब्धा मृगनयना’ या कादंबरीतून त्यांचे संगीताचे ज्ञानही दिसून येते. ‘पूर्तता’, ‘आई आहे शेतात’, ‘कार्तिकी’ या त्यांच्या आणखी काही गाजलेल्या कादंबऱ्या! कथालेखातून त्यांनी शेतकरी, कोळी, कातोडी, ठाकरं यांच्या पंक्तिजीवनाच्या विविध छटा दर्शविल्या. ‘घरकुल’पासून ‘लक्ष्मीपूजन’पर्यंतच्या दिघे यांच्या लघुकथासंग्रहांमधून त्यांच्या कथांमधील कल्पनारम्यता सुखावते. याशिवाय ‘माझा सबूत’ हे नाटक, ‘गातात, नाचतात घरातील लेकरं’ हा लोकगीतांचा त्यांचा संग्रह प्रसिद्ध आहे. ४ जुलै १९८० रोजी त्यांचे निधन झाले.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
दिसायला वेगवेगळी भावंडे
अनिरुद्ध आणि अस्मिता दोघे बहीण-भावंडे. मिळून खेळायचे, खिदळायचे. दोघांना एकमेकांशिवाय करमायचे नाही. दोघांचे प्रेम पाहून आई-बाबांना फार कौतुक वाटायचे. आई म्हणायची,‘‘अगदी दृष्ट लागण्याजोगं प्रेम आहे बहीण-भावंडांचं. जरा एकमेकांशिवाय राहात नाहीत दोघं.’’ अनिरुद्ध पाच वर्षांचा झाला. अस्मिता सात वर्षांची. एकाच आईच्या पोटी जन्माला येऊनही दोघं दिसायला अगदी वेगवेगळी होती. अनिरुद्ध पाणीदार डोळय़ांचा, रेखीव जिवणीचा, तरतरीत नाकाचा, कुरळय़ा केसांचा आणि तकतकीत गव्हाळ रंगाचा होता. अस्मिता मात्र नाकीडोळी बेताची आणि रूपाने सामान्य होती. वय वाढू लागले तशी हळूहळू दोघांनाही आपापल्या रूपाची जाणीव होऊ लागली. अनिरुद्ध खेळताना जरा मनाविरुद्ध झाले, हरायला लागला की अस्मिताला तिच्या रूपावरून काही तरी चिडवायचा. आपल्या मित्रांच्यात खेळायला जाताना अस्मिताला बरोबर न्यायला त्याला लाज वाटायला लागली. यात भर म्हणून बिचाऱ्या अस्मिताला चष्मा लागला. ‘ए ढापणे, तू घरी थांब. मी आज राजूकडे वाढदिवसाला जाणार आहे.’ अनिरुद्धचे हे बोलणे आईने ऐकले. ती म्हणाली, ‘‘का रे, राजू तुझा मित्र आहे तसा अस्मिताचाही आहे. तिलाही घेऊन जा बरोबर.’’ आईच्या आवाजात जरा दटावणी होती. तो आईपाशी जाऊन कुरकुरला,‘‘मला नाही आवडत तिच्या बरोबर जायला. माझे मित्र चिडवतात मला.’’ अस्मिताला हे ऐकून फार फार वाईट वाटले. तिचे डोळे भरून आले. ओठ थरथरू लागले. नाकपुडय़ा लाल झाल्या. घरापाठीमागच्या तुळशीवृंदावनापाशी बसून ओंजळीत चेहरा लपवून ती रडू लागली.आपला भाऊकिती सुंदर आहे. आपण त्याच्यासारख्या का नाही? या विचाराने ती फार खिन्न झाली. तेव्हापासून अस्मिता एकटी एकटी राहू लागली. शाळेतही ती कुणात मिसळेनाशी झाली. हसरी, अल्लड अस्मिता अबोल झाली. आपण बरे, आपला अभ्यास बरा असे तिला वाटे. तिचे खेळायला जाणे कमी झाले. एकटी असली की ती पुस्तके वाचायची किंवा उदासपणे दूर कुठे तरी बघत बसायची. अस्मितातला हा फरक बाबांच्या लक्षात आला. एकदा तिच्याबरोबर गप्पा मारत ते तुळशीवृंदावनाच्या कट्टय़ावर बसले होते. अनिरुद्धही खेळून परत आला होता. तोही येऊन कट्टय़ावर बसला. बोलता बोलता बाबा म्हणाले,‘‘बाळांनो, रूपाचा फार विचार करायचा नसतो. चांगलं दिसण्यापेक्षा चांगलं असणं जीवनात महत्त्वाचं असतं. अनी, तुझा चेहरा जेवढा चांगला आहे, तेवढेच चांगले वाग आणि अस्मिताताई, अगं रूपापेक्षा तुझे गुण तुला सुंदर करतात.’’
जे रूप घेऊन आपण जन्माला येतो ते बदलणे आपल्या हातात नसते. पण चांगले गुण अंगी बाणवणे प्रत्येकाच्या हातात असते. आजचा संकल्प : मी जसा आहे तसा स्वत:ला स्वीकारेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com