Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ मार्च २००९

रोडपालीत ग्रामस्थांचा सिडकोच्या पथकावर हल्ला
पनवेल/प्रतिनिधी

कळंबोलीच्या सेक्टर १६ मधील रोडपाली गावात अनधिकृत वीटभट्टय़ांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकावर आणि पोलिसांवर दोन-तीन हजारांच्या जमावाने आज हल्ला केल्याने ही मोहीम स्थगित करावी लागली. या परिसरात मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत वीटभट्टय़ा असून, त्या पूर्णपणे हटवाव्यात असा आदेश उच्च न्यायालयाने यापूर्वीच दिला आहे. या वीटभट्टय़ा स्वत:हून हटविण्याची लेखी तसेच तोंडी सूचना सिडकोने संबंधित व्यक्तींना दिली होती; परंतु त्यानंतरही हा व्यवसाय सुरू राहिल्याने सिडकोने आज पोलिसांच्या मदतीने त्या हटविण्याचा प्रयत्न केला. सिडकोचे जेसीबी तेथे दाखल होताच दोन-तीन हजारांचा जमाव या पथकाला सामोरा गेला. यात लहान मुले आणि महिलांचाही समावेश होता. या जमावाने जेसीबी तसेच अन्य गाडय़ांची तोडफोड केली. या हल्ल्यात सिडकोचे पाच-सहा कर्मचारी व काही पोलीसही जखमी झाले. अखेर पोलीस अधिकारी आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांनी चर्चा करून ही मोहीम स्थगित ठेवली; परंतु सध्या तयार असलेला माल विकल्यानंतर यापुढे वीटभट्टय़ा पूर्णपणे बंद करण्यात येतील, असे प्रतिज्ञापत्र संबंधित मंडळी पोलिसांमार्फत सिडकोला देणार आहेत, अशी माहिती सिडकोच्या अधिकाऱ्यांनी दिली.

‘संजीव नाईकांसाठी शरद पवारांचा माथाडय़ांकडे जोगवा’
नवी मुंबई/प्रतिनिधी :
नवी मुंबईसारख्या शहरात स्थानिक आणि बाहेरचा असा वाद होऊ देऊ नका.. या ठिकाणी कामासाठी आलेला माथाडी हा भूमिपुत्रच आहे.. तुम्हाला मतांसाठी भडकविले जाईल, परंतु गणेश नाईकांना मी सांगतो, माथाडींच्या सुरक्षिततेची जबाबदारी तुम्ही घ्या.’ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर नवी मुंबईतील हक्काच्या माथाडी मतदारांकडे संजीव नाईकांसाठी मागितलेला हा जोगवा नवी मुंबईतील मतदानाचे चित्र बरेचसे स्पष्ट करेल, असा येथील राजकीय निरीक्षकांचा होरा आहे. घणसोली दंगलीमुळे नाईकांपासून काहीसा दुरावल्या गेलेल्या माथाडी मतदाराला पुन्हा एकदा आकृष्ट करण्याची खेळी आता राष्ट्रवादीकडून खेळली जात आहे.

माहितीच्या अधिकाराला अधिकाऱ्यांचेच आव्हान!
पनवेल/प्रतिनिधी :
सरकारी कामकाजात पारदर्शकता येण्याच्या हेतूने नागरिकांना देण्यात आलेले माहितीच्या अधिकाराचे शस्त्र संबंधित अधिकाऱ्यांकडूनच बोथट करण्याचा प्रयत्न होत आहे.
पनवेलजवळील देवीचा पाडा गावातील रहिवासी रवींद्र म्हात्रे आणि मधुकर म्हात्रे यांनी पालेखुर्द ग्रुप ग्रामपंचायतीच्या कामकाजासंदर्भात तक्रार करणारा अर्ज रायगड जिल्ह्याच्या मुख्य अधिकाऱ्यांना २९ डिसेंबर २००८ ला सादर केला होता. या अर्जाला प्रतिसाद न मिळाल्याने या अर्जावर काय कारवाई झाली, याबाबत त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली विचारणा केली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या माहिती अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या उत्तराने म्हात्रे आश्चर्यचकित झाले. ‘आपला २९-१२-२००८ चा अर्ज या कार्यालयास अप्राप्त आहे. त्यामुळे उपरोक्त संदर्भ माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये आपणास पूर्ण माहिती देता येत नाही’, अशा शब्दांत या अधिकाऱ्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या.

क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम
बेलापूर/वार्ताहर :
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त नवी मुंबई महापालिकेतर्फे जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त नवी मुंबईतील क्षयरोगी रुग्णांचा मेळावा वाशीतील भावे नाटय़गृहात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज्याच्या (टीबी व लेप्रसि) आरोग्य खात्यातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. २५ व २६ मार्च रोजी अ‍ॅबोट हॉटेल येथे के.ई.एम. रुग्णालयाच्या डॉ. अमिता आठवले, नमुमनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. दीपक परोपकारी, राज्याचे सुरक्षा सल्लागार डॉ. ज्योती साळवे, मलिक परमार, जसलोक रुग्णालयाचे डॉ. वाय. के. आमडेकर व (टीबी व लेप्रसि) सहसंचालक डॉ. अशोक लड्डा हे क्षयरोगाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. भारतात दर साडेतीन मिनिटांनी एका व्यक्तीस क्षयरोगाची लागण होते, तर दर दीड मिनिटांनी एका व्यक्तीचा या आजाराने मृत्यू होतो, असे एका पाहणी अहवालाअंती स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या आजाराचे गांभीर्य ओळखून रुग्णांनी नियमित उपचारावर भर देणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी क्रांतिकारकांच्या विचारांची गरज
बेलापूर/वार्ताहर :
देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी प्राणांची आहुती दिली. त्याच क्रांतिकारकांच्या विचारांनी जनतेच्या समस्या सुटू शकतील, असा विश्वास शहीद नमन व जनजागृती समितीचे अध्यक्ष जसपाल सिंग यांनी येथे व्यक्त केला. २३ मार्च रोजी क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांनी देशातील लोकांच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केले. हा दिवस ‘शहीद दिन’ म्हणून देशभर साजरा केला जातो. यानिमित्ताने नवी मुंबईतील विविध संघटनांनी एकत्र येऊन कोपरखैरणे येथे जनसमस्येवर आधारित एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. झोपडपट्टी पुनर्वसन, माध्यमिक शिक्षण, सार्वजनिक रुग्णालयात रुग्णांशी होणारी गैरवर्तणूक, एनएमएमटीचे बसथांबे बीओटी तत्त्वावर बांधणे, बीओटी बसेसला विरोध, मलनि:सारण प्रक्रिया प्रभावी करणे, झोपडपट्टी भागात सार्वजनिक शौचालये उभारणे, उद्याने सुशोभित करणे आदी विषयांवर या कार्यक्रमात चर्चा करण्यात आली, तसेच यावेळी एका शिष्टमंडळाची स्थापना करून या समस्यांच्या उपाययोजनांची माहिती नवी मुंबई पालिका आयुक्तांना देऊन त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सिंग म्हणाले.