Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ मार्च २००९

नव्या सहकारी प्रकल्पांची वानवा तर जुन्यांची दुर्दशा
प्रश्न जिव्हाळ्याचे

वार्ताहर / अमळनेर

अमळनेर, पारोळा, धरणगाव या तिन्ही तालुक्यांत कापसाचे पीक मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. या शिवाय, अमळनेरमध्ये यापूर्वी उसाचे पिकही मोठय़ा प्रमाणावर घेतले जात असे. पण, पश्चिम महाराष्ट्रासारखा सहकारी तत्वाचा वापर करण्याची व शेतकऱ्यांच्या मालास भाव मिळवून देण्याबरोबर स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची बुद्धी स्थानिक लोकप्रतिनिधींना कधी झालीच नाही. जे काही सहकारी प्रकल्प होते, त्यांचीही दुर्दशा झाली. गेल्या १५ वर्षांच्या कार्यकाळात एकही नवा प्रकल्प उभा ठाकला नाही हे नागरिकांचे दुदैव म्हणावे लागेल.
कापसाचे प्रचंड पीक पाहता सहकारी सूतगिरणी व्हावी, यासाठी काहींनी प्रयत्न करून पाहीले. मात्र, कागदावर रेंगाळण्या पलिकडे ती प्रत्यक्षात उभी राहू शकली नाही.

खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत शहादा, नवापूरमध्ये काँग्रेसचे वर्चस्व
शहादा / वार्ताहर

नंदुरबार जिल्ह्य़ातील सर्वात मोठी उलाढाल असलेल्या शहादा तालुका खरेदी विक्री संघ निवडणुकीत पी. के. अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसप्रणित लोकशाही पॅनलला १७ जागांवर निर्विवाद यश लाभले, तर नवापूर खरेदी विक्री संघातही काँग्रेसच्या सुरूपसिंग नाईक प्रणित पॅनलला १७ पैकी १६ जागांवर यश प्राप्त झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. शहादा तालुका खरेदी विक्री संघाच्या १७ जागांसाठी रविवारी मतदान झाले. एकूण १३ हजार ५७७ मतदारांपैकी नऊ हजार मतदारांनी हक्क बजावला. सोमवारी येथील लोकमान्य टिळक सभागृहात सकाळी मतमोजणी सुरू करण्यात आली. शेवटचा निकाल जाहीर होईपर्यंत रात्रीचे १० वाजले होते. पी. के. अण्णा पाटील यांच्या लोकशाही पॅनलचे सर्व १७ उमेदवार सुमारे दोन ते अडीच हजाराच्या फरकाने विजयी झाले. कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाक्यांची अतिषबाजी करून एकच जल्लोष केला.

येवला तालुक्यातील दोन अपघातात दोन ठार
येवला / वार्ताहर

शहर परिसरात दोन वेगवेगळ्या अपघातात दोन मोटारसायकलस्वार ठार झाले. रविवारी रात्री दहाच्या सुमारास आश्फाक याकूब कुरेशी (२५) रा. संतोषीमाता नगर हा मोटारसायकलवर येवल्याहून सावरगाव येथील नातेवाईकांकडे जात असताना टेम्पोने त्याल धडक दिली. त्यात तो ठार झाला. दुसऱ्या घटनेत सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास संपत लक्ष्मण खिल्लोट (रा. पारेगाव) हा मोटारसायकलने जात असताना गोविंदनगर पारेगाव रोडवर दत्तमंदीरासमोर घसरली. संपतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

नांदगावमध्ये रेशन दुकानदारांकडून ग्राहकांची पिळवणूक
नांदगाव / वार्ताहर

तालुक्यातील स्वस्त धान्य रेशन दुकानदारांनी वाहतूक खर्चाच्या नावाखाली ग्राहकांची पिळवणूक चालविली असून त्यामुळे या दुकानांमधील स्वस्त धान्य महाग होत चालले आहे. या प्रश्नी पुरवठा विभागाने सर्वसामान्यांकडून असा कुठलाही खर्च वसूल करण्याचे आदेश दिले नसल्याचे स्पष्ट केले आहे. धान्य पुरवठा करण्यासाठी शासन कुठल्याही प्रकारचा प्रवास खर्च आकारत नाही. जर कुणी रेशन दुकानदार अशा प्रकारे खर्च वसूली करीत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पुरवठा विभागाने दिला आहे. तालुक्यात पांढऱ्या ६२०, अंत्योदय योजना ९०६६, पिवळ्या १५ हजार ९८७ तर केसरी ३० हजार ४२६ एवढय़ा शिधापत्रिका आहेत. एकूण शिधापत्रिकांची संख्या ५६ हजार ११२ आहे. घासलेटची एकूण मागणी ४०७ किलोलीटरची असून त्यात फक्त ३१२ किलो लिटर घासलेट मिळते. नियमानुसार ३१६ किलो लिटर मिळते, परंतू हॉकरच्या प्रमाणात फक्त १२ किलो लिटर मिळत असल्याने उर्वरीत ४ किलोलिटर प्रवास खर्चास महाग पडते, म्हणून आणले जात नाही. बी.पी.एल गव्हाची ३१५१ क्विंटलची मागणी असताना प्रत्यक्षात फक्त २३५० क्विंटल म्हणजेच ७५ टक्के गहू उपलब्ध होतो. गरीब कुटुंबासाठी आधार असलेले अंत्योदय योजनेंर्तगत गव्हाची १८१३ क्विंटलची मागणी आहे. त्यापैकी पूर्णपणे कोटा प्राप्त होतो. तर याच योजनेत तांदळाची १३६० क्विंटलची मागणी असतांना फक्त ११६० क्विंटल तांदूळ दिला जातो. शासनाने निर्धारीत केलेल्या दरानुसार बी. पी. एल. गहू ५ रूपये किलो तर तांदुळ ६ रूपये दराने दिला जातो. ग्रामीण भागात मात्र प्रवास खर्चाच्या नावाखाली एका शिधापत्रिकेमागे २० रुपयांची वसूली केली जात आहे. अंत्योदय लाभार्थ्यांसाठी २० किलो गहू व १५ किलो तांदूळ असे प्रमाण शासनाने ठरवून दिले आहे. या ३५ किलो धान्याचे शासकीय दराप्रमाणे अवघे ८५ रुपये होतात. परंतु, स्वस्त धान्य दुकानदार प्रवास खर्चाच्या नावाखाली २० रुपये जादा घेत आहेत, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. याकडे तालुका पुरवठा विभाग व तहसीलदारांनी लध द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तालुक्यातील ऊसतोडी व खडीच्या कामासाठी बाहेरगावी जाणाऱ्या दहा हजारांपैकी किमान तीन हजार शिधापत्रिकाधारक आहेत. असे मानले तरी या शिधापत्रिकाधारकांचे चार महिन्याचे धान्य जाते कुठे असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.

गुंगीचे औषध देवून प्रवाशांची लूट
मनमाड / वार्ताहर

बंगळुरूहून अहमदाबादकडे जाणाऱ्या रेल्वेगाडीत गुंगीचे औषध देऊन गुजरातच्या सहा प्रवाशांकडील सुमारे एक लाख नऊ हजाराचा ऐवज लुटून नेण्याची घटना अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये घडली. बेशुद्ध पडलेल्या प्रवाशांवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मनमाड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंध्रप्रदेशच्या मंत्रालय रेल्वे स्थानकावरून गाडी सुटल्यानंतर हा प्रकार घडला. वुलकीत प्रविणभाई पटेल, टी. ए. जोश, महेश राणा, किसन अग्रवाल, आर. रितेश, टी. ओरगीस हे हे सर्व प्रवाशी गुजरातच्या सूरत, अहमदाबाद व आणंद येथे जाण्यासाठी आरक्षित बोगीतून प्रवास करीत होते. एका अनोळखी इसमाने गप्पा मारत त्यांचा विश्वास संपादन केला आणि दूध पिण्यास दिले. काही वेळानंतर प्रवाशांना गुंगी आली. त्याचा फायदा घेऊन संबंधित इसमाने प्रवाशांकडील एक लॅपटॉप, १० ग्रॅम सोन्याची अंगठी, मोबाईल, सोन्याची चेन व रोख रक्कम असा सुमारे एक लाख नऊ हजाराचा ऐवज घेवून पोबारा केला. या घटनेची माहिती इतर प्रवाशांनी मनमाड स्थानक येण्यापूर्वीच रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून दिली. गाडी मनमाड स्थानकात आल्यानंतर बेशुद्ध प्रवाशांना उतरवून घेण्यात आले. गुजराथी व राजस्थानी भाषा सफाईदारपणे बोलणाऱ्या इसमाने हा प्रकार केल्याचे या प्रवाशांनी तक्रारीत नमूद केले आहे.