Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ मार्च २००९

भारतीय जनता पक्षाचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल शिरोळे यांचे मंगळवारी सकाळी लोहगाव विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठय़ा जल्लोषात त्यांचे स्वागत केले. पुण्यातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मंगळवारी शहर काँग्रेसतर्फे आयोजित मेळाव्यात खासदार सुरेश कलमाडी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

.तर, अजितदादा करतील
कलमाडींचा प्रचार !

राजकारणात कुणी कायमचा मित्र तसेच कायमचा शत्रू नसतो, असे म्हणतात. त्याचा प्रत्यय पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यकर्त्यांना निश्चतपणे येऊ लागला आहे. विलास लांडे आणि आझम पानसरे हे दोघेही स्थानिक नेते शहरातील राजकारणात एकमेकांचे कट्टर दुष्मन म्हणून ओळखले जात होते. मात्र, पानसरे यांच्या शिफारशीसाठी लांडे मोठय़ा साहेबांकडे आवर्जून गेले होते. एकवेळ मला उमेदवारी देऊ नका, मात्र, पानसरे यांना द्या, असा आग्रह त्यांनी धरला. भले, त्यांच्या मनात काहीही असो, मनाचा मोठेपणा तर लांडे यांनी दाखविला.

अधिकार मंडळांच्या ‘सहली’,जेवणावळींवर आक्षेप
वेध अधिसभेचा

पुणे, २४ मार्च/खास प्रतिनिधी

विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळासह इतर अधिकार मंडळांच्या बैठका पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसबाहेर इतरत्र आयोजित करू नयेत.. विद्यापीठ अधिकार मंडळाच्या बैठकीच्या दिवशी रात्री कुलगुरूंच्या निवासस्थानी भोजन व गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठ निधीतून करण्यात येऊ नये.. ..पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीदरम्यान सदस्यांच्या तीव्र भावनांना वाट करून देणाऱ्या अशा ठरावांसह एकूण ५४ ठराव मांडले जाणार आहेत.

‘पुणेकरांना हवा आहे तरुण व तडफदार खासदार..’
पुणे, २४ मार्च / विशेष प्रतिनिधी

‘‘मतपत्रिकेवर आणखी एका शिरोळेंचे नाव असो की बसपाने डीएसकेंना दिलेली उमेदवारी असो, आपल्या मतांवर कशाचाही परिणाम होणार नाही. आजवर केलेल्या कामांच्या आधारे मी व माझा पक्ष लोकांकडे मते मागणार आहोत. त्या आधारेच पुण्यातून नवा उमेदवार दिल्लीला जाईल. पुणेकरांना हवा आहे तरुण व तडफदार खासदार..’’ हे आहेत भारतीय जनता पार्टीकडून कालच लोकसभेची उमेदवारी मिळालेले उमेदवार अनिल शिरोळे आणि पक्षाचे शहराध्यक्ष गिरीश बापट यांचे उद्गार. आज सकाळी दिल्लीहून ते पुण्यात आले.

‘हातात ‘घडय़ाळ’ घालून ‘जय हो’ म्हणत पुढे चला..’
पुणे, २४ मार्च/प्रतिनिधी

येणाऱ्या निवडणुकीत हातात ‘घडय़ाळ’ घालून ‘जय हो’ म्हणत आपल्याला पुढे जायचे आहे, असा प्रोत्साहनपर संदेश कार्यकर्त्यांना देतानाच प्रचारात कोणीही गाफील राहू नका, ही निवडणूक सोपी आहे असे मी मानत नाही, युद्ध सुरू झाले आहे, असे सूचक उद्गार खासदार सुरेश कलमाडी यांनी आज काँग्रेस भवनातील मेळाव्यात काढले. कलमाडी यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज शहर काँग्रेसतर्फे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी काही वक्त्यांनी कलमाडी विजयी झाल्याच्या आविर्भावात भाषणे केली. या सर्वाना कलमाडी यांनी त्यांच्या भाषणातून जागेवर आणण्याचा प्रयत्न केला.

मोशी नाक्यावर टोलवसुलीसाठी गुंडांचा हैदोस;
खेडच्या माजी बार अध्यक्षांना मारहाण

पिंपरी, २४ मार्च/प्रतिनिधी

खेड अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष व त्यांच्या मुलाला आज सकाळी साडेनऊच्या सुमारास मोशी नाक्यावर टोल वसुली करणाऱ्या दहा ते बारा गुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशनने काळ्या फिती लावून निषेध नोंदविला आहे.

‘विकासकामांच्या मुद्दय़ावर निवडणूक लढवणार’
हडपसर, २४ मार्च/ वार्ताहर

खासदार निधीतून रस्ते, आंबेगाव घोडनदी, वाळद-सरकुंडी भीमानदीवरील पूल यासह गेल्या पाच वर्षांत केलेली विकास कामे आणि मतदारांशी थेट संपर्क या मुद्दय़ावर निवडणूक लढवित असल्याचे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी आज सांगितले.
शिरूर मतदारसंघातील महत्त्वाचा भाग मानल्या गेलेल्या मुंढवा, केशवनगर, कोंढवा, आदी परिसरातून प्रचार रॅली काढण्यात आली. त्यानंतर महंमदवाडी येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. या रॅलीमध्ये नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे, पोपट आंबेकर, राजेंद्र भानगिरे, विश्वास पोळ, विनोद आंबेकर, बाळासाहेब बिबवे, जयसिंग जगदाळे, दत्तात्रय घुले, दशरथ घुले, जनार्दन घुले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. वळसे-पाटील यांना आमदार होण्यासाठी मी मदत केली आहे. मी स्वत:च मोठा असल्याने मला कोणाचे बोट धरण्याची किंवा वरदहस्त असण्याची गरज नाही, असाही उपरोधिक टोला पवार व वळसे-पाटील यांना लगावला.

जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पुणे, २४ मार्च/ प्रतिनिधी

अनिरुद्ध उपासना केंद्रातील १३ कलमी योजनेतील ‘जुने ते सोने’ अंतर्गत शिरूर तालुक्यातील टाकळीभीमा येथे कपडय़ांचे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. अनिरुद्ध बापूंच्या प्रेरणेने प्रवीणसिंह वाघ (प्रमुख सेवक) यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रातील कार्यकर्ते टाकळी भीमा येथे गेले. त्यांनी गावाची पाहणी करून १०८ कुटुंबातील ५०९ व्यक्तींना कपडे, गोधडी, भांडी, खेळणी, मेणबत्ती आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. अनिरुद्ध उपासना केंद्रातर्फे दरमहा पुणे जिल्ह्य़ातील विविध तालुक्यांमध्ये गरजूंना जुने ते सोने अंतर्गत वाटप करण्यात येते.

शेतमजुरांना मिळाला किमान वेतनाचा फरक
पिंपरी, २४ मार्च/ प्रतिनिधी

मांजरी येथील द्राक्ष संशोधन केंद्रातील ४८ शेतमजुरांना तीन लाख रुपये किमान वेतनाचा फरक कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या हस्ते खराळवाडी, पिंपरी कार्यालयात वाटप करण्यात आला. मांजरी येथील द्राक्ष संशोधन केंद्रात अनेक वर्षांपासून शेतमजूर अल्प वेतनावर काम करत होते. कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने केंद्रीय श्रम आयोगाचे विभागीय आयुक्त एन. एच. अहमद यांच्याकडे किमान वेतनाची मागणी करण्यात आली होती. या वेळी आयुक्तांच्या कार्यालयात सुनावणी झाली. या शेतमजुरांना किमान वेतन दिले जात नसल्याचे आढळून आल्याने या ४८ मजुरांना समान वेतन कायद्यानुसार प्रत्येकी १२४ रुपये किमान वेतन देण्याचे प्रशासनाने जाहीर केले. या सुनावणीच्या वेळी कामगार प्रतिनिधी बाबा कांबळे, नितीन पवार, वंदना सोनावणे व साईनाथ लेबर ठेकेदारचे प्रतिनिधी नंदकुमार दाभाडे आदी उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने शेतमजुरांच्या किमान वेतनाच्या फरकाची तीन लाख रुपये रक्कम तीन टप्प्यांत कामगार संघटनेच्या कार्यालयात जमा करण्यात आली होती. या रकमेचे वाटप रोख स्वरूपात कामगारांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी झालेल्या फरक वितरण कार्यक्रमास आशा कांबळे, प्रल्हाद कांबळे, मदन धोत्रे, सदाशिव तळेकर, रशीद रहेमानी व शेतमजूर प्रतिनिधी मंदा घुले, संगीता कामठे, अनिल गांगुर्डे, अनिकेत मोरे आदी उपस्थित होते. या निर्णयावर शेतमजुरांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

निगडी व चिंचवडच्या चोरीप्रकरणातील आरोपी जेरबंद
पिंपरी, २४ मार्च / प्रतिनिधी

निगडी व चिंचवडमध्ये घडलेल्या दोन वेगवेळ्या चोरींच्या घटनांमध्ये निगडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण माल जप्त करण्यात आला आहे.
निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील दरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाकर ऊर्फ ढेप्या कमलाकर शिंदे (वय १९, रा. ओटास्कीम, निगडी), गणेश सुरेश खोब्रागडे आणि संतोष साहेबराव टकले (दोघे रा. मोरेवस्ती, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील आरोपी शिंदे याने निगडी ओटास्कीम येथील प्रतिभा कन्स्ट्रकशनच्या साईटवरून एक लाख ६७ हजार रुपयांचा अ‍ॅल्युमिलीयम धातूचा माल चोरून नेला होता. या प्रकरणी अविनाश मनोहर गुप्ते (रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. यावरून पोलिसांनी शिंदे याला २३ तारखेला रात्री साडेदहाच्या सुमारास अटक केली. त्याच्याकडून संपूर्ण माल जप्त करण्यात आला आहे. निगडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे विभागाचे फौजदार जालिंदर तांदळे, हवालदार गणपत ऊर्फ लोंढे, दत्तात्रय मुरकुटे, निवृत्ती रेंगडे, अ‍ॅगस्टीन डिमेलो, बिभीषण कन्हेरकर, विवेकानंद सपकाळे, मंगेश वालकोळी आदींच्या पथकाने आरोपींना अटक केली.

राष्ट्रवादीच्या ‘मावळ’च्या उमेदवाराचा ‘सस्पेन्स’ कायम
पिंपरी, २४ मार्च/ प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये मावळ लोकसभेतील उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले नाही. त्यामुळे प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या उमेदवाराचे नाव जाहीर होईपर्यंत आपल्याकडील नाव गुप्त ठेवण्याची खेळी राष्ट्रवादीकडून खेळली जात आहे.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवारांचे जागावाटप दुपारी जाहीर करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या बहुतांश मतदारसंघांतील नावे जाहीर करण्यात आली. त्यामध्ये शिरूरसाठी विलास लांडे यांचेही नाव आहे. मात्र मावळचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. भोसरी येथील मेळाव्यात पालकमंत्री अजित पवार यांनी लांडे यांच्या उमेदवारीची थेट घोषणा केली होती. मात्र मावळवाल्यांनी जरा धीर धरावा, असेही सांगितले होते. शहराचे राजकीय महत्त्व विशद करताना दोन खासदार आणि चार आमदार शहराला मिळणार आहेत, असे विधान पवार यांनी केल्याने लांडे यांच्यापाठोपाठ शहराध्यक्ष आझम पानसरे यांनाही उमेदवारी मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांना वाटतो आहे. दुसरीकडे ऐनवेळी काय होईल, अशी धास्तीही व्यक्त केली जात आहे.

महापौर निधीतून आर्थिक मदत देण्यास निवडणूक आयोगाची मनाई
पिंपरी, २४ मार्च / प्रतिनिधी

महापौर निधीतून गरजवंतांना आर्थिक मदत करण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली असून तशा सूचना िपपरी पालिकेस आज एका पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत. दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या गोरगरीब रुग्णांना तसेच नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना महापौर निधीच्या माध्यमातून करण्यात येणारी आर्थिक मदत आचारसंहितेमुळे करता येत नसल्याने अनेक
गरजवंतांची परवड होऊ लागली आहे. दर महिन्याला किमान २० ते २५ नागरिकांना प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे मदत केली जाते. त्यामुळे अशा नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून महापौर अपर्णा डोके यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे याबाबतचा अभिप्राय मागविला होता. यासंदर्भातील अट शिथिल करता येईल का, याविषयी विचारणाही केली होती. त्यास आयोगाकडून एका पत्राद्वारे उत्तर देण्यात आले आहे. त्यामध्ये आचारसंहितेमुळे अशाप्रकारे निधी देता येणार नाही, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.