Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ मार्च २००९
राज्य

चंद्रपूर जिल्ह्य़ातील भूजलपातळी खालावली
चंद्रपूर, २४ मार्च/ प्रतिनिधी

गेल्या वर्षी सरासरी पाऊस कमी पडल्याने यंदा उन्हाळय़ाची चाहूल लागताच भूगर्भातील पाण्याची पातळी झपाटय़ाने खाली गेली असून या जिल्हय़ातील सहा तालुक्यातील भूजल पातळी तीन ते पाच फुटाने खाली गेली आहे. ही स्थिती लक्षात घेतली तर मे महिन्यात लोकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.

आंध्रच्या पोलावरम धरणामुळे महाराष्ट्राला १४ टीएमसी पाणी मिळणार
धनंजय जाधव
पुणे, २४ मार्च

आंध्र प्रदेशमधील गेली सत्तेचाळीस वर्षे रखडलेल्या आंतरराज्यीय पोलावरम प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाने मंजुरी दिली असून या प्रकल्पाच्या मान्यतेमुळे कृष्णा खोऱ्यातील चौदा अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्यावर महाराष्ट्राचे शिक्कामोर्तब झाले आहे. कृष्णा तंटा लवादाच्या अटीनुसार या प्रकल्पाच्या उभारणीमुळे कर्नाटक राज्याच्या पदरातही एकवीस टीएमसी पाणी पडणार आहे.

विदर्भात पाऊस, वीज कोसळून दोघांचा मृत्यू
नागपूर, २४ मार्च / प्रतिनिधी/ वार्ताहर

सोमवारी रात्री आणि मंगळवारी दुपारी विदर्भात झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मोठय़ा प्रमाणात पिकांची हानी झाली. अकोला जिल्ह्य़ातील बाळापूर आणि मूर्तीजापूर तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तसेच गहू आणि आंबा या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.

विद्यापीठ अधिसभेत गाजणार ५४ ठराव
अधिकार मंडळांच्या ‘सहली’, जेवणावळींवर आक्षेप
पुणे, २४ मार्च/खास प्रतिनिधी
विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळासह इतर अधिकार मंडळांच्या बैठका पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसबाहेर इतरत्र आयोजित करू नयेत.. विद्यापीठ अधिकार मंडळाच्या बैठकीच्या दिवशी रात्री कुलगुरूंच्या निवासस्थानी भोजन व गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठ निधीतून करण्यात येऊ नये.. ..पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीदरम्यान सदस्यांच्या तीव्र भावनांना वाट करून देणाऱ्या अशा ठरावांसह एकूण ५४ ठराव मांडले जाणार आहेत.

मुंबई बोर्डातील सर्वाधिक अधिकारी कॉपीबहाद्दर!
दहावी-बारावीच्या परीक्षेत साडेसात हजार गैरप्रकार
पुणे, २४ मार्च/खास प्रतिनिधी
दहावी-बारावीच्या परीक्षेत साडेसात हजारांहून अधिक गैरप्रकार झाले असून, त्यामध्ये नागपूरने ‘आघाडी’ घेतली आहे. गैरप्रकारांना मदत केल्याबद्दल परीक्षेच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या ६१७ अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामध्ये मुंबई बोर्डातील सर्वाधिक ३०० अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

‘जी-मेल’ची नवी सुविधा!
पुणे, २४ मार्च / प्रतिनिधी

ईमेलला ‘अटॅचमेंट’म्हणून एखादी फाईल जोडायला आपण बऱ्याचदा विसरतो आणि मग तो ईमेल मागे घेण्याची इच्छा आपल्याला होते. परंतु हतबल होऊन पुन्हा नवे ईमेल पाठविण्याखेरीज आपल्यासमोर कोणताच पयार्य शिल्लक नसतो. ‘गुगल’ची ईमेल सेवा म्हणजेच ‘जीमेल’ वापरणाऱ्या लोकांना आता असा ईमेल ‘माघारी’ (undo किंवा unsend) घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे. ईमेल पाठविल्यानंतर पाच सेकेंदांसाठी हे बटन तुमच्या स्क्रीनवर दिसण्याची व्यवस्था ‘जीमेल’मध्ये करण्यात आली आहे. जीमेल नियमितपणे वापरणाऱ्यांकडून तसेच ‘गुगल’मध्ये काम करणाऱ्या अभियंत्यांना सुचलेल्या कल्पना मांडण्यासाठी व त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी ‘गुगल’ने सुरू केलेल्या ‘जीमेल लॅब’मध्ये प्रथम ही संकल्पना मांडण्यात आली. गुगलच्या जपानमधील टोकियो येथील कार्यालयात काम करणाऱ्या योको फुजिशिमा या अभियंत्याने ‘undo email’ ची ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. ‘जीमेल’वर लॉग-ईन झाल्यावर ‘सेटिंग्स’मध्ये जाऊन ही सुविधा वापरकर्त्यांनी सुरू करावी. त्यापुढे प्रत्येक वेळी तुम्ही कोणालाही ईमेल कराल तेव्हा ‘ईमेल सेन्ट’ या कन्फर्मेशन लिंकवर undo बटन दिसेल. या बटनावर क्लिक केल्यावर जीमेल पुन्हा तुम्हाला ‘कम्पोस ईमेल’मध्ये घेऊन जाईल, अशी माहिती जीमेलच्या अधिकृत ब्लॉगवर देण्यात आली आहे.

संजय किरतकार मृत्यूप्रकरणाचा तपास सीआयडीकडे
अकोला, २४ मार्च / प्रतिनिधी

पातूर तालुक्यातील द्वारकाबाई हुंडीवाले कृषी विद्यालयातील शिपाई संजय किरतकार याच्या मृत्यूप्रकरणाचा तपास गृहखात्याने सीआयडीकडे सोपवला आहे. विद्यालयाच्या इमारतीत गळफास घेतलेल्या अवस्थेत किरतकार आढळल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली होती.
पातूर तालुक्यातील शिर्ला येथे असलेल्या द्वारकाबाई हुंडीवाले कृषी विद्यालयतील शिपाई संजय किरतकारने आत्महत्या केली होती. २५ सप्टेंबर २००८ ला घडलेल्या या घटनेमुळे अकोला जिल्ह्य़ात खळबळ उडाली होती. किरतकारजवळ सापडलेल्या चिठ्ठीवरून नोकरीसाठी दिलेल्या पैशावरून संस्थेच्या संचालकांशी त्याचा वाद सुरू होता, असे निदर्शनास आले होते. त्यामुळे पातूर पोलिसांनी संस्थेचे संचालक कृष्णा अंधारे व रविकिरण भांगे, दिनकर जाधव यांना अटक केली होती. हस्ताक्षर तज्ज्ञांचे मत घेण्यासाठी पातूर परिसरातील वीसहून अधिक लोकांच्या हस्ताक्षराचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत; परंतु अद्यापही या प्रकरणाचा सुगावा लागलेला नाही. या प्रकरणातील वाढती गुंतागुंत पाहता, गृहखात्याने सीआयडीकडे हा तपास सोपवला आहे. संस्थेचे संचालक कृष्णा अंधारे यांची जामीनावर सुटका झाली आहे. त्यांना या प्रकरणात गोवण्याचा हा कट असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला आहे. यासंदर्भात सरकारकडे निवेदनेही पाठवण्यात आली आहेत.

महामार्गावर अपघातात चंद्रपूरचे पती-पत्नी ठार
सातारा, २४ मार्च/प्रतिनिधी

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील जोशी विहीर चौकात तवेरा, अल्टो व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात चंद्रपूरचे पती-पत्नी दोघेजण ठार झाले असून, ७ जण जखमी झाले आहेत. जखमींवर क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. त्यामध्ये उल्हासनगरचे ३, चंद्रपूरचे ३ व ओझर्डे (ता. वाई) येथील एकाचा समावेश आहे.
उल्हासनगरहून कोल्हापूरकडे जाणारी तवेरा गाडी (एमएच-०५-जी-२७४२) व वाईकडून महामार्गावर जोशी विहीर चौकात येत असलेली अल्टो गाडी (एमएच-३४-आर-४५०६) यांची जोरदार टक्कर झाली. त्यामध्ये तवेरा गाडी उलटली. ती धैर्यशील नरसिंग पिसाळ (रा. ओझर्डे, ता. वाई) वय ४० यांच्या मोटरसायकल (एमएच-१२-डीएच-५४१०) वर आदळल्याने झालेल्या अपघातात अल्टो गाडीतील चंद्रपूरचे विजय महादेव निजारे (वय ५८) व कमल विजय निजारे (वय ५३) यांचे निधन जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना झाले, तर जखमीमध्ये अल्टोमधील मोरोपंत एकनाथ बोरकर (वय ५०), प्रवीण विजय निजारे (वय २२), राहुल सुरेश कायरकर (वय १४) यांचा तर तवेरामधील उल्हासनगरचे नामदेव कृष्णा खोत (वय ४५), संजय गणपत विरजकर (वय २५), रामेश्वर गणपत आधाव (वय २३) यांच्यासह मोटारसायकलस्वार धैर्यशील पिसाळ यांचा समावेश आहे.

अमरावतीत कापसाच्या गंजीला आग
१५ लाखांची हानी
अमरावती, २४ मार्च / प्रतिनिधी

येथील विलासनगर भागातील मोसीकॉल जिनिंगमध्ये कापसाच्या गंजीला आग लागून सुमारे १५ लाख रुपयांची हानी झाली. सोमवारी रात्री उशिरा कापसाला आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला बरेच परिश्रम घ्यावे लागले. काल रात्री शहरात वादळी वारे वाहत असताना आगीची ही घटना घडली. मोसीकॉल जिनिंगमध्ये नाफेडमार्फत खरेदी करण्यात आलेला कापूस ठेवण्यात आला आहे. रात्री कापसाच्या एका गंजीमधून धूर निघत असल्याचे जिनिंगमधील चौकीदाराला दिसले. त्याने लगेच अग्निशामक दल तसेच मोसिकॉल जिनिंगच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले. अग्निशामक दलाचे बंब काही वेळातच घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत कापसाच्या तीन गंज्यांना आग लागली होती. जोरदार वाऱ्यांमुळे आग लवकर पसरली. याठिकाणी सुमारे आठ हजार क्विंटल कापूस ठेवण्यात आला होता. त्यातील बहुतांश कापूस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. या आगीमुळे सुमारे पंधरा लाख रुपयांची हानी झाल्याचा अंदाज आहे. मोसिकॉल जिनिंग परिसरातच लढ्ढा व एदलजी असे दोन जिनिंग आहेत. या ठिकाणीदेखील कापूस उघडय़ावर ठेवण्यात आला आहे. आगीवर लवकर नियंत्रण मिळविण्यात आल्याने या जिनिंगमधला कापूस सुरक्षित राहिला. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला सात बंबांमधील पाणी वापरावे लागले. तीन तासाच्या परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकलेले नाही.