Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ मार्च २००९
  किरकोळ नसलेले ‘रिटेल’ उद्योगातील करिअर
  हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील संधी
  विकी-स्पेसेस्
  चीन सरकारची शिष्यवृत्ती
  विदेशातील प्रवेश प्रक्रिया : अर्जासोबतची कागदपत्रे
  ऐतिहासिक संशोधन पद्धती
  सेक्शन ऑफिसर (कमर्शिअल ऑडिट) पदाची तयारी
  स्वउद्योगाच्या महत्त्वाकांक्षेसाठी..
  मराठी मिलिऑनर! जय हो!!
  १० ते १२ वी.. खडतर आणि पर्याय

 

वॉलमार्ट, पॅन्टालून, लाईफस्टाईल, शॉपर्स स्टॉप, बिग बझार ही नावं ऐकली-वाचली की आपल्या मनचक्षूंसमोर उभी राहते ती एखाद्या लखलखीत ‘मॉल’ची चकचकीत भव्य अशी आकर्षक वास्तू जी बऱ्याचदा मनाला भुरळ घालते आणि या मोहिनीच्या अधिपत्याखाली सर्वसाधारण जनता सहजपणे ‘गिऱ्हाईक’ बनत असते. एकाच छताखाली उपलब्ध होणाऱ्या अगदी एखाद्या छोटय़ा लहान पीनेपासून अगदी दैनंदिन जीवन भौतिक सुखांनी भरून टाकण्यासाठी आवश्यक असलेली अतिशय महागडी वस्तू देखील आपण तेथेच खरेदी करू शकतो. एखाद्या बिग बझारसारख्या ठिकाणी सहज फिरून जरी यायचं म्हटलं आणि तेथील प्रत्येक वस्तू, प्रत्येक विभाग बघायचं म्हटलं तरी सहजपणे तुमचा एक दिवस तेथे जाऊ शकतो. तेथील प्रत्येक विभागात असणारा एकूणच टापटिपपणा आपल्या नजरेत भरतो.
 

बाहेर एखाद्या स्टोअर्समध्ये मिळणाऱ्या वस्तूपेक्षा कमी पैशात म्हणजेच एम. आर. पी. किमतीपेक्षा कमी भावामध्ये आणि उत्कृष्ट दर्जाची वस्तू उपलब्ध होते तेव्हा साहजिकच स्वत:च्या नकळत गिऱ्हाईकाचा हात आपल्या खिशाकडे किंवा क्रेडिट किंवा डेबिट कार्डाकडे वळतोच. परंतु या सर्व व्यवस्थितपणामागे किंवा टापटीपपणामागे असते या मॉलमध्ये काम करत असणाऱ्या मनुष्यबळाची प्रचंड मेहनत. आणि या मेहनतीवरच उभा असलेला प्रचंड उद्योग म्हणजेच रिटेल उद्योग. खरं तर रिटेल उद्योग म्हणजे सामान्य जनतेला डायरेक्ट किंवा इलेक्ट्रॉनिकली उत्पादन विकणे. हा उद्योग भारतामध्ये अतिशय प्रचंड वेगाने वाढत आहे. रिटेल उद्योग हा सध्याच्या घडीला या संपूर्ण जगातील सर्वात मोठा उद्योग गणला जातो. जागतिक स्तरावर जवळजवळ ७.२ ट्रिलिअन डॉलरपेक्षाही अधिक किमतीची बाजारपेठ उपलब्ध आहे. भारतामध्ये १८० बिलिअन डॉलरपेक्षाही जास्त वार्षिक खप आहे. रिटेल उद्योगामध्ये प्रतिवर्षी १२-१५ टक्के वाढ होईल असा अंदाज आहे. भारतात कृषीक्षेत्र सोडल्यास रिटेल उद्योगामध्येच जास्तीत जास्त कर्मचारी संख्या येत्या काही वर्षांत असेल. जागतिक पातळीवर सर्वात आकर्षक अशी पाचव्या क्रमांकाची बाजारपेठ म्हणून भारताचे आकर्षण बऱ्याच मोठमोठय़ा कंपन्यांना आहे आणि म्हणूनच रिटेल उद्योगामध्ये प्रचंड मोठी संधी व सोनेरी भविष्य उपलब्ध आहे. येत्या ३ ते ४ वर्षांमध्ये वीस लाखापेक्षाही अधिक लोकांना या क्षेत्रात रोजगार उपलब्ध होईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या क्षेत्राचा विकास व्हावा म्हणून भारत सरकारतर्फे देखील ५१% परदेशी सरळ गुंतवणुकीस परवानगी देऊन जागतिकीकरणाच्या दिशेने पाऊल उचलण्यात आलेले आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अनेक मॉल्स, ब्रँडेड स्टोअर्स डिपार्टमेंटल स्टोअर्स आणि सुपर मार्केट्स यांच्या या क्षेत्रातील आगमनामुळे या क्षेत्रात एकूणच क्रांती घडून येत आहे. दशकभरापूर्वी केवळ पाश्चिमात्य देशांमध्ये असलेल्या या रिटेल स्टोअर्स उद्योगाचे जाळे आता भारतातील एखाद्या छोटय़ा शहरातील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचायला लागलेले आहे. भारतातदेखील कित्येक उद्योजकांनी या क्षेत्रात पाय रोवण्यास सुरुवात केलेली आहे. अशा रिटेल आऊटलेट्सना आता ‘कंझ्युमर स्टोअर्स’ म्हणून ख्याती प्राप्त झालेली आहे. ग्राहकाचा विश्वास संपादन करण्यासाठी येथे वस्तूची किंमत, मॉलची प्रतिमा, सेवा, वस्तूंची वर्गवार मांडणी इ. छोटय़ा मोठय़ा गोष्टींना लक्षात घेतले जाते. सध्या रिटेल उद्योगात होत असणाऱ्या क्रांतीला कित्येक घटक कारणीभूत आहेत. आकर्षकपणा, त्वरित उपलब्धता, परवडणारी किंमत या प्रमुख गोष्टी आहेत की ज्या रिटेल उद्योगाला पुढे नेत आहेत.
या क्षेत्रातील संधी ही केवळ मॉल किंवा एखाद्या फॅक्टरी आऊटलेटमध्ये काम करण्याइतपतच मर्यादित नाही. तर विविध स्वरूपाच्या संधी येथे उपलब्ध आहेत, जसे की विक्रीची योजना, आराखडा तयार करण्यापासून ते अगदी मॉल चालविण्यासाठी उत्तम जागेचा शोध घेणे. वास्तविक पाहता आता बऱ्याचशा कंपन्यांतर्फे ऑनलाईन रिटेलिंगसुद्धा सुरू करण्यात आलेले आहे. कुटुंबाचे वाढते आर्थिक उत्पन्न, अधिक खर्च करण्याची मानसिकता, नवनवीन उत्पादने, जाहिरातींचा भडीमार, जागतिकीकरण या सगळ्या गोष्टींमुळे या क्षेत्राला सोन्याचे दिवस आलेले आहेत. बिग बझार, लाईफस्टाईल, पॅन्टालून, वेस्टसाईड, विशाल मेगामार्ट, मॅकडोनाल्ड, पिझ्झा हट, डोमिनोज इ. अनेक रिटेल स्टोअर्सच्या साखळ्या दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या आहेत. या सर्व कारणांमुळे लाखो रोजगार निर्माण होणाऱ्या या क्षेत्रात आवश्यकता आहे ती प्रशिक्षित अशा मनुष्यबळाची. केवळ मोठमोठय़ा शहरातूनच नव्हे तर छोटय़ा शहरांमधूनही आता या उद्योगाला मागणी आहे. म्हणूनच अगदी दहावी ते थेट पदव्युत्तर स्तरापर्यंतच्या तरुणांना या क्षेत्रात विविध स्तरांवर विपुल संधी उपलब्ध आहेत.
रिटेल क्षेत्रामध्ये नोकरी करीत असताना मनुष्यबळाची विभागणी प्रामुख्याने पुढीलप्रमाणे होते :
ऑपरेशन्स- असिस्टंट मॅनेजर्स, मॅनेजर्स, जनरल मॅनेजर्स, व्हाईस प्रेसिडेंट, इ.
सप्लाय चेन मॅनेजर- एक्झिक्युटिव्हज्, मॅनेजर्स, व्हॅल्यू चेन हेड.
र्मचडायझर्स- रिटेल व्यवसायात दोन प्रकारचे र्मचडायझर्स असतात. एक म्हणजे बायर्स र्मचडायझर्स, जे स्टोअर्ससाठी विक्रेत्याची निवड करतात, शोधक व्यवस्थापनाची जबाबदारी यांची असते. दुसरे म्हणजे व्हिज्युअल र्मचडायझर्स, जे संपूर्णत: स्टोअर आणि तेथील वस्तूंचा दर्जा यांची जबाबदारी आपल्या शीरावर घेतात.
तसेच सेल्स एक्झिक्युटिव्हज्, डिपार्टमेंट मॅनेजर, स्टोअर मॅनेजर, एरिया मॅनेजर, ऑपरेशन्स हेड इ. इतर पदेदेखील असतात.
रिटेल व्यवसायात किंवा येथील नोकरीधंद्यात यशस्वी होण्यासाठी उत्तम संभाषणकौशल्य, विक्रीकौशल्य, वस्तूंची प्रदर्शनीय व आकर्षक मांडणी, उत्पादनांविषयीचे ज्ञान, उत्तम सेवा, विविध स्वभावाच्या गिऱ्हाईकांशी तत्परतेने- नम्रतेने वागण्याची कला इ. गुणांची आवश्यकता आहे. ऑनलाईन विक्रीकरिता तंत्रज्ञानाचे पुरेसे ज्ञान, रिटेल व मार्केटिंगमधील ज्ञान असणे आवश्यक आहे. जे आर्थिक बाबींशी आणि स्टॉक तपासून पाहण्याशी संबंधित काम करणारे आहेत त्यांचे अंकगणितीय ज्ञान चांगले असणे आवश्यक आहे. ज्यांना या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा
आहे, अशा तरुणांनी उत्साहीपणा, लवचिकता, ऊर्जास्रोत सोबत घेऊनच काम करण्याची तयारी ठेवायला हवी. ज्यांच्याकडे रिटेल किंवा मार्केटिंग मॅनेजमेंटमधील पदवी आहे असे उमेदवार त्या त्या संस्थेमध्ये उच्च पदापर्यंत नक्कीच पोहोचू शकतात. आजच्या घडीला या क्षेत्रातील पगार हा इतर कुठल्याही क्षेत्राशी बरोबरी करेल असाच आहे, उलटपक्षी थोडासा जास्तच आहे. जर उमेदवार खरोखरच गुणवान असेल तर ३० ते ४० टक्के वार्षिक वाढ होऊ शकते. तेव्हा कष्ट करण्याची तयारी असलेल्या, जिभेवर साखर, डोक्यावर बर्फ व पायाला चक्र असणाऱ्या उमेदवारांनी या क्षेत्रात करिअर करायला काहीच हरकत नाही. रिटेल उद्योग तुम्हाला खुणावतोय, नजर भिडवायला घाबरू नका, आलिंगन द्या, कवेत घ्या, यशस्वी व्हा!
* रिटेल मॅनेजमेंटमधील अभ्यासक्रम देणाऱ्या काही संस्था पुढीलप्रमाणे :
१) जे. जे सोमय्या इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अ‍ॅण्ड रिसर्च, विद्याविहार.
२) सासमिरा, सासमिरा मार्ग, वरळी, मुंबई- ४०० ३०.
३) गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट, विद्यानगरी, कलिना, सांताक्रूझ
(पूर्व), मुंबई- ४०० ०९८.
४) ITM-CDLHP ग्लोबल लिडरशिप सेंटर, कळट कॅम्पस, २५/ २६, इन्स्टिटय़ूशनल एरिया, सेक्टर ४, खारघर (पूर्व), नवी मुंबई- ४१०२१०.
५) रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया, १११/ ११२, एस्कॉर्ट सेंटर, हॉटेल रॉयल मेरिडीयनच्या बाजूला, सहार रोड, अंधेरी (पू.), मुंबई- ४०० ०९९.
६) वेलिंगकर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड रिसर्च, एल. एन. रोड, माटुंगा,
मुंबई- ४०००१९.
७) कर्मा रिटेल अ‍ॅकॅडमी, ३१०, जानकी सेंटर,
वीरा देसाई रोड, अंधेरी, मुंबई.
(www.karmaac-ademy.com) (फोन नं. ६५७७७९३६).
८) एशिया-पॅसिफिक इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, सरिता विहार, नवी दिल्ली - ११००१७. (www.asiapacific.edu).
९) बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी, बिर्ला विद्या निकेतन, पुष्पा विहार, सेक्टर-४, नवी दिल्ली - ११००१७.
१०) इंडियन रिटेल स्कूल, ठ-१०, पश्चिम
विस्तारित-१, नवी दिल्ली - ११००४९. (www.indianretailschool.com). ल्ल
सुहास कदम
suhaskadam11@yahoo.in