Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ मार्च २००९
क्रीडा

एकच ध्येय, मालिका विजय
उद्यापासून भारत-न्यूझीलंड दुसरी कसोटी
नेपियर, २४ मार्च / पीटीआय
न्यूझीलंड भूमीत कसोटी मालिका विजयाची ऐतिहासिक कामगिरी साकारण्याची नामी संधी, जबरदस्त फॉर्मात असलेल्या ‘टीम इंडिया’ला चालून आली आहे. पहिल्या कसोटीत झालेल्या दारुण पराभवामुळे मनोधैर्य खचलेल्या यजमान न्यूझीलंडविरुद्ध गुरुवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीतही विजय संपादन करत तब्बल ४१ वर्षांच्या कालखंडानंतर न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका विजयाचा पराक्रम गाजवण्याचा निर्धार भारतीय संघाने केला आहे.तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर असलेला भारतीय संघ सध्या आत्मविश्वासाने परिपूर्ण असून या ऐतिहासिक कामगिरीचा निर्धार पूर्ण करण्याची खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली आहे. २००१मध्ये बुलावायोला भारतीय संघाने परदेश भूमीत सुरू केलेली कसोटी मालिका विजयाची परंपरा येथेही कायम राहण्याची शक्यता आहे.

हा भारतीय क्रिकेटचा सुवर्णकाळ - सचिन
ऑकलंड, २४ मार्च/पीटीआय

भारतीय क्रिकेटचा सध्या सुवर्णकाळ चालू आहे, असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले आहे. पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सचिन म्हणाला की, गेली २० वर्षे मी भारतीय संघात आहे. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांत भारतीय संघाची जी कामगिरी होत आहे ती पाहता सध्या भारतीय क्रिकेटचा सुवर्णकाळ चालू आहे, असे म्हणण्याशिवाय पर्याय राहत नाही. अशा जबरदस्त संघाचा आम्ही भाग आहोत याचा मला आणि राहुल द्रविडला अभिमान वाटतो आहे.

पाकिस्तानी खेळाडूंना खेळविण्यास संघमालक इच्छुक
कराची, २४ मार्च / वृत्तसंस्था

यंदाची आयपीएल स्पर्धा भारताबाहेर होणार असल्याने पाकिस्तानच्या खेळाडूंशी करार केलेल्या संघ मालकांनी (फ्रॅंचायझी) पाकिस्तानच्या खेळाडूंना खेळविण्यासाठी स्पर्धेच्या संयोजकांशी संपर्क साधला आहे. पाकिस्तानी खेळाडूंच्या निकटच्या सूत्रांनी सांगितले की, सोहेल तन्वीर, उमर गुल, कमरान अकमल आणि मिसबाह उल हक या चौघा खेळाडूंना या वेळच्या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

आयपीएल सुरक्षेसाठी पुरेसा अवधी नाही
इंग्लंड पोलिसांचे स्पष्टीकरण
लंडन, २४ मार्च / पीटीआय
इंडियन प्रीमियर लीगचे आयोजन इंग्लंडमध्ये करण्याचा घाट आयोजकांनी घातला असला तरी तेथील प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांनी या स्पर्धेसाठी कडक सुरक्षाव्यवस्था पुरविण्यासाठी पुरेसा वेळ नसल्याचे कारण पुढे केले आहे. त्यामुळे इंग्लंडमधील आयपीएलच्या आयोजनाच्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले आहे. भारतातील सार्वत्रिक निवडणुकांमुळे इंडियन प्रीमियर लीगला सुरक्षाव्यवस्था पुरविण्यास केंद्र सरकारने असमर्थता दर्शविल्यानंतर ही स्पर्धा परदेशात खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोलकाता नाइट रायडर्स संघातून गांगुलीला डच्चू?
कोलकाता, २४ मार्च / वृत्तसंस्था

इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या स्पर्धेत सौरव गांगुली याचा कोलकाता नाइट रायडर्स संघात समावेश करण्यास संघाचे प्रशिक्षक जॉन बुकॅनन यांनी विरोध दर्शविला असल्याचे समजते.
आयपीएल स्पर्धा दक्षिण आफ्रिका किंवा इंग्लंडमध्ये होणार असल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. तेथील खेळपट्टय़ांचे स्वरुप व हवामान पाहता गांगुली याचा संघात समावेश करणे फायदेशीर ठरणार नाही, असे बुकॅनन यांचे मत असल्याचे कळते. कोलकाता नाइट रायडर्स संघाच्या सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, बुकॅनन गांगुली याच्या फिटनेसवर चांगलेच नाराज आहेत. ट्वेंटी २० स्पर्धाचे वेगवान स्वरुप पाहता गांगुली याचा फिटनेस या स्पर्धेच्या दृष्टीने योग्य नाही, असे त्यांनी संघ व्यवस्थापनाला सांगितले असल्याचे समजते. त्यामुळे यावर्षी कोलकाता नाइट रायडर्सचे कर्णधारपद न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्कुलम, वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल किंवा ऑस्ट्रेलियाचा ब्रॅड होज या तिघांपैकी एकाकडे सोपविण्यात यावे असा मतप्रवाह कोलकाता नाइट रायडर्सच्या व्यवस्थापनात आढळून येतो आहे. बुकॅनन यांनी आमच्या संघाचा कर्णधार अजून निश्चित झालेला नाही असे जाहीरपणे सांगितले आहे. यासंदर्भात गांगुलीला पत्रकारांनी विचारले असता त्याने प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड म्हणते खेळपट्टी ‘बेस्ट’
नेपियर, २४ मार्च/ पीटीआय

येथील दुसऱ्या क्रिकेट कसोटीसाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीबाबत विनाकारण चिंता व्यक्त करण्यात येत असली तरी येथील खेळपट्टीवरील थोडासा खराब गवताचा पट्टा वगळता एकूण खेळपट्टी उत्तम असल्याचे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे. येथील गवताला कुठल्याही प्रकारची किड लागलेली नाही असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. खेळपट्टीवरील हा नवीन पट्टा हा टणक व सपाट असून गेले १० दिवस मेहनत घेऊन ही खेळपट्टी त यार करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच या खेळपट्टीवर पहिल्या एक दिवसीय लढतीत जवळपास ६०० धावा फटकावल्या गेल्या होत्या. त्यामुळे येथे नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारायची की गोलंदाजी याबाबत व्हेटोरी आणि धोनी या दोघांच्याही मनात संभ्रम असेल. येथील कसोटीत विजय मिलविल्यास भारतीय संग २-० अशी विजयी आघाडी घेऊ शकेल आणि १९६७-६८ मध्ये मन्सूर अलीखान पतौडी यांच्यानंतर प्रथमच भारतीय संघ अशी करामत करील. न्यूझीलंडने ही कसोटी जिंकल्यास ते मालिकेत बरोबरी करतील आणि मालिका जिंकण्याची आशाही त्यांना धरता येईल.

मॅक्लिन पार्कच्या खेळपट्टीबाबत मोल्स नाराज
नेपियर, २४ मार्च/ पीटीआय

भारताविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीला येत्या गुरुवारपासून मॅक्लिन पार्क येथे सुरुवात होणार आहे. मात्र भारतीय संघाला दोन वेळा बाद करण्यासाठी येथील खेळपट्टी वेगवान गोलंदाजीला सहाय्य करणारी नसल्याने न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षक अ‍ॅन्डी मोल्स यांनी नाराजीचा सूर लावला आहे. येथील मूळ खेळपट्टी ही दोन ते तीन फूट बाजूला सरकवण्यात आल्याने आता कसोटी सामन्याची खेळपट्टी ही मुळची अर्धी खेळपट्टी व यापूर्वी एकदिवसीय लढतीसाठी वापरण्यात आलेली अर्धी खेळपट्टी अशी असणार आहे. मोल्स यांना मात्र ही खेळपट्टी पसंत नाही. आम्हाला खास न्यूझीलंडची ओळख असणारी म्हणजे पहिले दोन दिवस वेगवान गोलंदाजांना सहाय्य करणारी खेळपट्टी हवी होती. त्यामुळे आमच्या गोलंदाजांची आणि भारतीय फलंदाजांची कसोटी लागली असती असे मोल्स यांनी म्हटले आहे. मात्र जर खेळपट्टी कोरडी असेल तर या खेळपट्टीवर चेंडू बराचसा वळू शकेल आणि आम्हाला नेमकी तीच गोष्ट नको आहे. मोल्स यांचे हे वक्तव्य म्हणजे भारतीयांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे.

अझलन शहा हॉकीत भारताचे नेतृत्व संदीप सिंगकडे
भोपाळ, २४ मार्च / पीटीआय

अनुभवी ड्रॅगफ्लिकर संदीप सिंग याच्याकडे ५ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या अझलन शहा हॉकी स्पर्धेसाठी १८ खेळाडूंच्या भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. अजितपाल सिंग यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने आज या संघाची घोषणा केली. मलेशियात होणाऱ्या या स्पर्धेत न्यूझीलंड, पाकिस्तान, इजिप्त व यजमान मलेशिया या देशांचाही सहभाग असेल. भारतीय संघ - संदीप सिंग (कर्णधार), बलजितसिंग, आद्रियन डिसुझा (दोघेही गोलरक्षक), दिलीप तिर्की, रघुनाथ, गुरबाज सिंग, सरदारसिंग, प्रबोध तिर्की, विक्रम पिल्ले, आय. तिग्नेश, अजितेश रॉय, तुषार खांडेकर, प्रभज्योत सिंग, एच. व्ही. सुनील, भारत चिकारा, जी. एस. चंडी, शिवेंद्रसिंग, अर्जुन हलप्पा. राखीव - भरत छेत्री, व्ही. एस. विनय, बी. एम. अंतिल, हरी प्रसाद, वीरेंद्र लाकरा, सरवनजित सिंग. प्रशिक्षक : हरेंद्रसिंग, तांत्रिक व्यवस्थापक - धनराज पिल्ले.