Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ मार्च २००९

प्रमुख नेत्यांना समतानगरात ‘नो एन्ट्री’
ठाणे/प्रतिनिधी :
लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर अतिशय प्रतिष्ठेच्या बनलेल्या ठाण्यातील समतानगर परिसरातील पोटनिवडणुकीतील मतदानास जेमतेम २४ तासांचा कालावधी शिल्लक असताना, या प्रभागात ठाण्यातील प्रमुख राजकीय नेत्यांना प्रवेश करण्यास पोलिसांनी बंदी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. निवडणूक आचारसंहितेचा आधार घेत ठाणे शहर पोलिसांनी एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड, नरेश म्हस्के यांच्यासारख्या प्रमुख राजकीय नेत्यांना या प्रभागात येण्यास बंदी करणारी नोटीस काढल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

गुढी निघाली सातासमुद्रापार
ठाणे/प्रतिनिधी :
इतरांपेक्षा ‘हम भी कुछ कम नही’ या जिद्दीने मतिमंद मुलांनी तयार केलेल्या गुढय़ा केवळ राज्यातच लोकप्रिय झालेल्या नसून यंदा त्या सातासमुद्रापार गेल्या आहेत. मतिमंद मुलांमधील न्यूनगंड काढून त्यांच्यात आत्मविश्वास वाढविण्यासाठी कार्यरत असलेल्या विश्वास चॅरिटेबल ट्रस्टतर्फे नौपाडय़ात चालविल्या जाणाऱ्या विश्वास मतिमंद मुलांच्या केंद्रात या आकर्षक आणि विविधरंगी गुढय़ा बनविल्या जात आहेत. दीपावलीसाठी इको फ्रेंडली आकाशकंदील, गणेशोत्सवादरम्यान निर्माल्य टाकण्यासाठी कागदी पिशव्या तर भारतीय नववर्ष दिन म्हणजेच पाडव्यासाठी गुढय़ा बनविण्याचे काम ही मुले करतात.

अंबरनाथ येथे ‘जाणता राजा’ महानाटय़ाचे आयोजन
बदलापूर/वार्ताहर :
शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे लिखित जाणता राजा या महानाटय़ाचे प्रयोग अंबरनाथ येथे आयोजित करण्यात आले आहेत. रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ इस्ट चॅरिटेबल ट्रस्ट, दलाल बंधू आणि अ‍ॅडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (आमा) यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ते २१ मे दरम्यान पनवेलकर ग्रीन सिटी या ठिकाणी शहरात प्रथमच ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचा आविष्कार पाहण्याची संधी अंबरनाथवासीयांना मिळणार आहे.

नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल
बदलापूर/वार्ताहर:
श्री हनुमान मारुती देवस्थान आणि नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने यंदाही गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष तुषार आपटे यांनी दिली. स्वागत यात्रेचे यंदाचे सातवे वर्ष आहे. यंदापासून स्वागत यात्रेनिमित्त शहरात तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, २५ मार्च रोजी भजन स्पर्धा, गुरुवार, २६ मार्च रोजी गांधी चौक येथे सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळात राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांचे धर्मवीर संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.

डोंबिवलीत लोढा गृहनिर्माण समूहाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
ठाणे/प्रतिनिधी :
लोढा ग्रुप डोंबिवलीमध्ये सुमारे नऊ हजार एकर जमिनीचा विस्तार हाती घेत आहे. वैद्यकीय सुविधा, विद्यापीठ अशा स्वरूपातील परिपूर्ण शहराची निर्मिती याद्वारे करण्यात येणार आहे. भविष्यात डोंबिवली शहर जवळपास १० लाख कुटुंबांना घरे व दोन लाख रोजगार उपलब्ध करून देणार आहे. पहिला गृहप्रकल्प सुमारे १२५ एकरमध्ये निर्माण होणार असून, याद्वारे सुमारे ९००० कुटुंबांना स्वत:चे स्वप्नाचे घरकुल मिळणार आहे. या उपनगराच्या विकासाद्वारे प्रथमच गोल्फ कोर्स व पाच लाख चौरस मीटर एवढे मोठे शॉपिंग मॉल पुरविण्यात येणार आहे.

डीएमसी कंपनी कामगारांचे साखळी उपोषण सुरू
बदलापूर/वार्ताहर :
गेल्या दोन महिन्यांपासून बेकायदेशीरपणे टाळेबंदी लागू करण्यात आलेल्या अंबरनाथच्या धरमसी मोरारजी कंपनीतील कामगारांनी आजपासून कंपनी व्यवस्थापनाच्या निषेधार्थ साखळी उपोषण सुरू केले आहे. साखळी उपोषण करूनही न्याय न मिळाल्यास १ एप्रिलपासून सर्व कामगार-कर्मचारी बेमुदत उपोषण करणार असून, आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला आहे, अशी माहिती राष्ट्रीय केमिकल कामगार संघ (इंटकप्रणीत) सरचिटणीस अनिल काळे यांनी दिली.२३ जानेवारपासून कंपनीमध्ये लागू करण्यात आलेल्या अन्यायकारक टाळेबंदीमुळे वर्षांनुवर्षे काम करणाऱ्या सुमारे ३०० कामगारांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. कंपनी सुरू करण्यासंदर्भात शासनातर्फे पूर्वी प्रयत्न झाले. मात्र कंपनी व्यवस्थापनाने यासंदर्भात कोणतीही हालचाल केली नाही. गेल्या सुमारे सात ते आठ महिन्यांपासून वेतनदेखील न देता टाळेबंदी लावण्यात आल्याबद्दल कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे. कंपनी सुरू करण्याची व्यवस्थापनाची तयारी नसेल तर कंपनीतील मालमत्ता विकून सर्व कामगार-कर्मचाऱ्यांना त्यांची सर्व प्रकारची कायदेशीर देणी द्यावीत, या मागणीसाठी आजपासून संघटनेच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. यशस्वी तोडगा न निघाल्यास १ एप्रिलनंतर बेमुदत उपोषणाचा निर्धार कामगारांनी व्यक्त केला आहे.

जव्हार अर्बन बँकेवर पुन्हा भगवा
वाडा/वार्ताहर :
रविवारी झालेल्या जव्हार अर्बन बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत १७ पैकी १४ जागा जिंकून शिवसेना-भाजप-कुणबी सेना युतीच्या शिवनेरी पॅनलने काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्या सहकार पॅनलचा धुव्वा उडविला. यापूर्वीही या बँकेवर युतीचेच वर्चस्व होते. या निवडणुकीतही त्यांनी आपले वर्चस्व पुन्हा कायम राखले आहे.ठाणे ग्रामीण जिल्ह्यात जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड आणि पालघर तालुक्यात जव्हार अर्बन बँक अग्रगण्य म्हणून ओळखली जाते. गेल्या दहा वर्षांपासून युतीच्या ताब्यात असलेली ही बँक पुन्हा आपल्याच ताब्यात ठेवण्यात युतीने यश मिळविले. ५० कोटी रुपयांहून अधिक ठेवी असलेल्या या बँकेच्या ठाणे ग्रामीणमध्ये चार शाखा आहेत.

वाडा येथे सराफाच्या पेढीवर भरदिवसा दरोडा
वाडा/वार्ताहर

वाडा बाजारपेठेमध्ये मुख्य रस्त्यालगत असलेल्या पूजा ज्वेलर्समध्ये ग्राहक बनून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी सराफास हत्याराने जखमी करून तीन लाखांचा सोन्याचा ऐवज लुटून नेला. हा प्रकार मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता घडला. वाडा शहरात मोटारसायकल चोरी व इतर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असतानाच आज भरदिवसा पडलेल्या या दरोडय़ाने लोकांमध्ये घबराट पसरली आहे. येथील बाजारपेठेत मुख्य रस्त्यालगत असलेल्या पूजा ज्वेलर्समध्ये दोन अज्ञात इसम ग्राहक बनून आले. त्यांनी प्रथम १५०० रुपयांचे दागिनेही खरेदी केले, नंतर सोन्याच्या साखळ्या खरेदी करण्याचा बहाणा करीत सोन्याच्या साखळ्या असलेला डब्बाच सराफाकडून हिसकावून घेतला. यावेळी भुधराम चौधरी या सराफाने विरोध करताच त्याच्या डोक्यावर लोखंडी सळईने घाव घालून दरोडेखोरांनी मोटारसायकलवरून पोबारा केला. चोरून नेलेल्या डब्यामध्ये १७० ग्रॅम वजनाचा सोन्याचा ऐवज असून त्याची किमत तीन लाखांहून अधिक आहे.
ठाणे ग्रामीण भागात नेहमीच सोन्याच्या दुकानांवर दरोडे पडत असल्याने या दुकानांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे, मात्र या घटनेच्या वेळी पोलीस संरक्षण कुठे होते, हा प्रश्न चर्चिला जात आहे.

नववर्षांच्या स्वागतासाठी संस्कार भारतीच्या महारांगोळ्या..
ठाणे प्रतिनिधी :
येथील संस्कार भारती ठाणे समितीच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल, राम मारुती रोड, नौपाडा येथे ७० बाय ७० फूट महारांगोळी काढण्यात येणार आहे.
बुधवार, २५ मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता रांगोळी काढायला सुरुवात होईल आणि दुसऱ्या दिवशी २६ मार्चच्या रात्री ती पूर्ण होईल. संस्कार भारतीचे ३० रांगोळी चित्रकार ही महारांगोळी साकारणार आहेत. संस्कार भारतीचे रांगोळी विभागप्रमुख रघुवीर देशपांडे यांच्या हस्ते या रांगोळीचे उद्घाटन होईल. त्याचप्रमाणे संस्कार भारती आणि कौपिनेश्वर मंदिर न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने गावदेवी मैदानात १०० बाय १०० फूट आकाराची भव्य रांगोळी काढण्यात येणार आहे. सुमारे ४० कलावंत त्यात सहभागी होत आहेत. त्या रांगोळीचे उद्घाटनही नववर्षांच्या पूर्वसंध्येला म्हणजेच २६ मार्च रोजी होईल.

रिपब्लिकन पक्षाची दोन्ही काँग्रेसकडून उपेक्षा!
ठाणे/प्रतिनिधी :
रिपाइंला दोन्ही काँग्रेस झुलवत असून, पक्षाच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावत असल्याचा जाहीर आरोप रिपब्लिकन कामगार नेते प्रकाश बनसोडे यांनी ठाणे जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीसमोर प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून बोलताना केला. धर्मनिरपेक्ष शक्तींना पाठिंबा देण्याच्या भूमिकेमुळे गेली कित्येक वर्षे रिपाइं काँग्रेस- राष्ट्रवादीच्या मागे ठाम उभी राहिली. पण त्या बदल्यात रिपाइंच्या वाटय़ास निराशाच आली. या निवडणुकीत तर रिपाइंला जागा न सोडण्यासाठी दोन्ही काँग्रेसने ताणून धरले आहे. त्यासाठी या निवडणुकीत जनतेनेही त्यांना ताणून धरायला हवे, असेही बनसोडे यावेळी म्हणाले. यावेळी उत्तर मुंबई सरचिटणीस संपतराव कांबळे आणि रिपाइं युवा नेते रमेश गायकवाड यांनी या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला धडा शिकविण्याची योग्य वेळ असल्याचे सांगून कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्यास लागण्याचे आवाहन केले. या बैठकीस महिला आघाडीच्या रामलू ताई, उषा गायकवाड, प्रमिला कांबळे यांनीही मार्गदर्शन केले.