Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ मार्च २००९
व्यक्तिवेध

मुलांच्या वसतिगृहातील परदेशी विद्यार्थ्यांला ती मुलगी खिडकीतून काहीतरी देत होती. दोन-तीन दिवस हा प्रकार सुरू होता. अमली पदार्थाचे रॅकेट वगैरे आहे की काय, अशी शंका येऊन वसतिगृह प्रमुखाने तिला हटकले नि जाब विचारला. तेव्हा ती उत्तरली, ‘कावीळ झाल्यामुळे त्या मुलाला खोलीबाहेरही पडता येत नाही. तसेच बाहेरील पदार्थ खाण्यास मनाई आहे. त्यामुळे मी त्याला घरून डबा आणून देते.’ शिक्षणासाठी घरापासून हजारो मैल दूर आलेल्या विद्यार्थ्यांचे खरे आयुष्य कसे असते, याचे वास्तव यातून प्रकाशात आले आणि रोवले गेले डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या ‘सिम्बायोसिस’चे बीज! विद्येच्या माहेरघरी येणारे परदेशी विद्यार्थी आणि भारतीय विद्यार्थ्यांमध्ये संवाद-समन्वय आणि सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी १९७१ साली ‘सिम्बायोसिस’ची स्थापना करण्यात आली. वास्तविक,

 

मुजुमदार यांना हे ‘धाडस’ करण्याची काहीच गरज नव्हती. गडहिंग्लजमधून सुरू झालेला त्यांचा प्रवास कोल्हापूरमधील राजाराम कॉलेज ते पुणे विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभाग असा स्थिरावला होता. सूक्ष्मजीवशास्त्र विषयात पीएच.डी. केल्यानंतर फर्गसन महाविद्यालयात २० वर्षे प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून ते कार्यरत होते. मात्र, आजारी मुलाला मदत करणाऱ्या त्या मुलीने मुजुमदार यांच्या कारकीर्दीला कलाटणी दिली. आजमितिस ‘केजी टू पीजी’पर्यंतच्या ३४ संस्थांमधील दोनशेहून अधिक अभ्यासक्रम आणि ऐंशीहून अधिक देशांमधील तीस हजार विद्यार्थी अशी भरारी ‘सिम्बायोसिस’ने घेतली आहे. दूरशिक्षण केंद्राच्या माध्यमातून दोन लाख विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या गंगेत सामावून घेण्यात आले आहे. मुजुमदार यांनी शिक्षणसंस्था सुरू केली त्या काळी अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रम ही चलनी नाणी होती. परंतु सिम्बायोसिस’ने काळाची पावले ओळखून नव्या वाटा शोधल्या. व्यवस्थापनशास्त्र, परराष्ट्र व्यापार-संबंध, आयात-निर्यात, दूरसंचार व्यवस्थापन, संगणक तंत्रज्ञान, माध्यम-जनसंपर्क, मनुष्यबळ विकास, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, अशा अभ्यासक्रमांची आखणी केली. प्रसंगी ‘विद्यापीठाशी संलग्न’ अशा संरक्षित वातावरणातून बाहेर पडून स्वबळावर खासगी अभ्यासक्रम सुरू केले. त्याचबरोबर पदवीधर विद्यार्थ्यांना अर्थार्जनाची संधी मिळवून देणारे भक्कम ‘कॉर्पोरेट’ पाठबळ ‘सिम्बायोसिस’ने प्राप्त केले. २००२ साली अभिमत दर्जा देण्यात आला नि स्थापन झाले ‘सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ’. भारतीय शिक्षणाच्या निर्यातीसाठी जोरदार प्रयत्न करण्यात आल्याने पारंपरिक आशियाई व आफ्रिकी देशांमधील विद्यार्थ्यांबरोबरच आता युरोप-अमेरिकेसारख्या प्रगत देशांमधील विद्यार्थी विद्येच्या माहेरघरात दाखल होऊ लागले आहेत. त्याचप्रमाणे दक्षिण अमेरिकेसारख्या आजपर्यंत शैक्षणिकदृष्टय़ा जोडल्या न गेलेल्या खंडाशीही ‘सिम्बायोसिस’चे नाते निर्माण होत आहे. बंगलोर, हैदराबाद आणि गुजरातपाठोपाठ आता थेट दुबईला झेप घेण्यासाठी ‘सिम्बायोसिस’ने नियोजन सुरू केले आहे. या शैक्षणिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी २००५ साली मुजुमदार यांना ‘पद्मश्री’ने सन्मानित करण्यात आले. ‘सिम्बायोसिस’च्या उत्तुंग इमारतीबाहेरील ‘कॉमन मॅन’चा पुतळा वैशिष्टय़पूर्ण आहे. आज मात्र शिक्षणव्यवस्थेमधील विरोधाभासाचे तो प्रतीक ठरला आहे. व्यावसायिक शिक्षण हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. कितीही गुणवत्ता असो, आर्थिक ऐपत असेल, तरच दर्जेदार शिक्षण घेता येईल, असे वास्तव आहे. रोजगार मिळवून देणारे शिक्षण देण्यात खासगी संस्थांची एकाधिकारशाही होऊन नफेखोरी फोफावली आहे. तिला आळा घालण्यात शासनासह राष्ट्रीय स्तरावरील नियमन संस्थांनाही अपयश आले आहे. अशावेळी मुजुमदार यांना पुण्यभूषण सन्मान जाहीर झाला आहे. तो स्वीकारताना, गुणवत्तापूर्ण शिक्षण आवाक्यात आणून ‘कॉमन मॅन’ला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी दुसरी शैक्षणिक चळवळ उभारावी, अशी अपेक्षा ठेवली तर ती अवाजवी ठरणार नाही.