Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ मार्च २००९

मराठा ‘सरदार’ समोरासमोर; मतदार संभ्रमात
सहकार चळवळीचा एकच वारसा

सोमनाथ सावळे, बुलढाणा, २४ मार्च

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सकृतदर्शनी बहुरंगी लढत होण्याचे चित्र असले तरी ती प्रत्यक्षात दुरंगी, फार तर तिरंगी होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या आजपर्यंतच्या इतिहासात दोन तुल्यबळ मराठा सरदार प्रथमच एकमेकांच्या विरोधात ठाकले आहेत. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यातील हा सत्ता संघर्ष रोमहर्षक व क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा राहणार आहे.

अकोल्यातील समीकरणे बदलणार
क्रांतीकुमार ओढे, अकोला, २४ मार्च

अकोला लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसने माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांना उमेदवारी दिल्यामुळे येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. भारतीय जनता पक्षाचे संजय धोत्रे यांचे या मतदारसंघातील वाढते प्राबल्य पाहता धाबेकरांच्या रुपाने दुसरा मराठा नेता कॉंग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यामुळे, दोन मराठा नेत्यांमधील संघर्ष या मतदारसंघात रंगणार आहे. अकोला लोकसभा मतदारसंघ पुन्हा ताब्यात मिळवण्यासाठी कॉंग्रेसने यावेळी मराठा नेता निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची खेळी खेळली आहे.

सूर्यकांता पाटील यांचे बंजारा मतांसाठी साकडे
यवतमाळ, २४ मार्च / वार्ताहर

यवतमाळ जिल्ह्य़ातील उमरखेड विधानसभा मतदारसंघाचा समावेश परिसीमन आयोगाने मराठवाडय़ातील हिंगोली लोकसभा मतदारसंघात केल्याने बंजारांची गठ्ठा मते आपल्या पदरात पडावी यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्या व केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी पालकमंत्री मनोहर नाईक यांना नुकतेच साकडे घातले. सूर्यकांता पाटील यांनी पुसद येथे मनोहर नाईक यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांच्याशी बराचवेळ चर्चा केली.

मेघे-वाघमारे पुन्हा आमनेसामने!
प्रशांत देशमुख, वर्धा, २४ मार्च

वर्धा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे सुरेश वाघमारे व काँग्रेसचे दत्ता मेघे हे आजी-माजी खासदार दुसऱ्यांदा एकमेकांविरोधात लढत देणार असून या क्षेत्रात हे दोघेही तिसऱ्यांदा रिंगणात उतरले आहेत. १९९८ मध्ये दत्ता मेघे सव्वा तीन लाखांवर मते घेऊन काँग्रेसतर्फे विजयी झाले होते. तर त्यांच्या विरोधात भाजपचे विजय मुडे हे तत्कालिन खासदार पराभूत झाले होते. १९९९ राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर मेघे घडय़ाळ चिन्हावर उभे झाले. काँग्रेसकडून प्रभा राव व भाजपतर्फे सुरेश वाघमारे रिंगणात होते.

सीमावर्ती जिल्ह्य़ातील सुरक्षेबाबत चर्चा
६१ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील; ३००० पोलीस बाहेरून येणार

चंद्रपूर, २४ मार्च/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून जिल्हय़ातील परवानाधारकांकडून चारशे बंदुका जमा करण्यात आल्या आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा ४३६ मतदान केंद्रांची संख्या वाढल्याने व पोलिसांचे संख्याबळ कमी असल्याने जवळपास तीन हजार पोलीस बाहेरून मागविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी प्रदीप काळभोर यांनी दिली.

डॉ. ढोणे घडवणार भूकंप?
निवडणुका आल्या की, राजकीय पक्षांचे नेते, गुडघ्याला बाशिंग बांधून लग्नाला तयार असलेल्या नवरोबासारखे निवडणुकीच्या रिंगणात उतरायला तयार असतात. उमेदवारी मिळवताना ‘आपणच योग्य कसे’ हे पक्षाला पटवून देण्यासाठी त्यांच्याकडे मतदारसंघातील विजयाची समीकरणेही तयार असतात. परंतु उमेदवारी अर्थात एकालाच मिळणार असल्यामुळे इतरांचा हिरमोड होणे साहजिक आहे. काही मंडळी उपेक्षेचे विष पचवण्याऐवजी बंड करण्याचा प्रयन करताना दिसतात. अन्य पक्षांची दारेही उघडी असतातच. किंवा प्रसंगी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरायलाही ही मंडळी मागेपुढे पाहात नाही. कॉंग्रेस, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, या पक्षांकडे उमेदवारांचे भरघोस पीक, तर काही पक्षांकडे उमेदवारांची वानवा, अशीही विचित्र परिस्थिती असते. बहुजन समाज पक्षाने अनेक दिवसांपासून अकोल्यात उमेदवारांचा शोध घेणे सुरु केले आहे. पण यश काही मिळत नाही. या पक्षाचे स्थानिक नेते मुकीम अहमद यांच्या नावाची चर्चा जोर धरत असतानाच, त्यांच्यावर दाखल असलेले गंभीर गुन्हे अडथळा आणत आहेत. त्यामुळे ते काहीसे मागे पडल्यासारखे झाले आहेत. यामुळेच की काय, गेल्या दोन दिवसांपासून डॉ. जगन्नाथ ढोणेंचा बसपामधील प्रवेश आणि लोकसभेची उमेदवारी हे निश्चित झाल्यासारखे असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. तसे झाल्यास निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला ‘राजकीय भूकंप’ बसेल. निवडणुका म्हटल्या की, चर्चा आणि गप्पा आल्याच. या केवळ गप्पा असल्या तर ठीक, नाहीतर राष्ट्रवादी कॉंग्रेसला डॉ. ढोणेंच्या रुपाने वजनदार नेता गमवावा लागेल, यात शंका नाही.

मारहाण करणाऱ्या दोन आरोपींना शिक्षा
चंद्रपूर, २४ मार्च / प्रतिनिधी

क्षुल्लक कारणावरून काठीने मारहाण करणाऱ्या दोन आरोपींना न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयाने दोन वर्षांचा कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. येथील जगन्नाथ बाबा नगरातील रहिवासी तुकाराम अंबादास पेटकर हे १८ नोव्हेंबर २००५ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास रामनगर परिसरातील आपल्या टेलरिंगच्या दुकानात बसले होते. यावेळी आरोपी निरज हेमदास चव्हाणी व प्रशांत भीमसेन आसवाणी हे दोघे तेथे आले. यावेळी निरज चव्हाणी व प्रशांत आसवाणी यांनी दुकानातील पेपर घेऊन जायला निघाले. तेव्हा तुकाराम पेटकर यांनी त्यांना पेपर कुठे नेत आहात, अशी विचारणा केली. तेव्हा या दोन्ही आरोपींनी तुकाराम पेटकर यास लाथाबुक्यांनी मारहाण केली व दुकानाच्या काचा फोडल्या. यात तुकाराम पेटकर गंभीररीत्या जखमी झाले. या घटनेची तक्रार रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. पोलीस उपनिरीक्षक हरिराम बरीया यांनी याप्रकरणाचा अधिक तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने याप्रकरणात ८ साक्षीदारांची साक्ष घेऊन सरकारी व आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपींना शिक्षा सुनावली.

खामगाव लॉयन्स क्लबला प्रांतपालांची भेट
खामगाव, २४ मार्च / वार्ताहर

खामगाव लॉयन्स क्लबला प्रांतपाल डॉ. मनमंथ भातांबरे यांनी नुकतीच भेट दिली. यानिमित्त एक समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रांतपाल डॉ. भातांबरे यांच्यासह लॉयन्स क्लब खामगावचे अध्यक्ष डॉ. संजीव राठोड, सचिव डॉ. परमेश्वर चव्हाण, उपप्रांतपाल डॉ. बावस्कर, रिजन चेअरमन डॉ. केशव मेंढे, झोन चेअरमन दिनेश गांधी, अपर्णा बावस्कर उपस्थित होते. यावेळी शिरजगाव बालवाडीला शिक्षक टेबल दिनेश गांधी यांच्यातर्फे देण्यात आला. तसेच मूकबधिर शाळेला कॉम्प्युटरसाठी ५ हजार रुपये चंद्रशेखर राठी यांच्यातर्फे देण्यात आले. तसेच डॉ. बावस्कर यांनी नवीन सदस्यांना सदस्यत्त्वाची शपथ दिली. यात डॉ. प्रशांत शंखपाल, सूरज अग्रवाल, अजय अग्रवाल, वीरेंद्र जैन, जयेश शहा व निर्मला जैन यांचा समावेश होता. याप्रसंगी उपप्रांतपाल व प्रांतपालांनी खामगावच्या लॉयन्स क्लबच्या सेवा कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे संचालन राजेश पनपालिया यांनी तर आभार सचिव डॉ. परमेश्वर चव्हाण यांनी मानले. या कार्यक्रमासाठी अशोक गोयनका, अशोक केला, तुषार कमानी, अशोक सपकाळ, मोहन पवार, रमेश भुतडा, दिनेश भुतडा, सतीश अग्रवाल, दर्शनलाल टी. वर्मा, अशोक चांडक, डॉ. मेंढे, डॉ. सरोदे, प्रकाश मुंदडा, मनोज बडजाते, देवेंद्र मुनोत, डॉ. के.आर. पवार, गोपाल अग्रवाल, यांच्यासह लॉयन्स सदस्य उपस्थित होते.

गोंदियात एनएसयूआय कार्यक्रमाचा मेळावा
गोंदिया, २४ मार्च / वार्ताहर

शहर एनएसयूआय कार्यकर्त्यांचा मेळावा काँग्रेस भोला भवनात उत्साहात पार पडला. यावेळी एनएसयूआयच्या प्रदेश महासिचव मेघा ठवकर यांचे स्वागत करण्यात आले. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश एनएसयूआयचे अजितसिंग, वर्षां काकडे, शहबाज सिद्दीकी एनएसयूआयचे नागपूर ग्रामीण अध्यक्ष सुमितसिंग, शहर काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीपालसिंग गुलाटी, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष संदीप ठाकूर, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मनीष गुप्ता, रितेश अग्रवाल, देवेंद्र तिवारी, राकेश ठाकूर, नानू मुदलियार, सचिन रहांगडाले उपस्थित होते. महात्मा गांधींच्या तैलचित्रास पुष्पहार घालण्यात आला. यावेळी गोंदिया शहर एनएसयूआयची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली. अजितसिंग, शहबाज सिद्दीकी, संदीप ठाकूर, सुमित सिंगची भाषणे झाली. मेळाव्याचे संचालन आदेश अग्रवाल यांनी केले. आभार आलोक मोहंती यांनी मानले.

नाबार्डच्या नावाखाली फसवले जाण्याची शक्यता
भंडारा, २४ मार्च / वार्ताहर

विविध प्रकल्पांना मंजुरीसाठी मदत करू, अशा आशयाच्या काही जाहिराती काही ठिकाणी झळकल्या आहेत. मात्र, नाबार्डचे दुसरे कोणतेही अधिकारी जिल्ह्य़ात नसल्याने शेतकरी व इतरांनी फसविले जाऊ नये, असे लेखी आवाहन नाबार्डचे सहाय्यक महाप्रबंधक तायडे यांनी केले आहे. काही वर्तमानपत्रात नाबार्डचे कार्यकारी अधिकारी म्हणून जाहिराती दिसत आहेत. विविध प्रकल्पांना मंजुरी देण्याकरिता या जाहिराती असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, जिल्ह्य़ात नाबार्डचे एकच कार्यालय व एकच अधिकारी आहेत. नाबार्डतर्फे प्रकल्प मंजुरीला कोणताही शुल्क आकारला जात नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती व व्यक्तीपासून सावध राहावे, असे लेखी आवाहन नाबार्डचे सहाय्यक महाप्रबंधक एस.एस. तायडे यांनी केले आहे.

शासकीय तंत्रनिकेतनचा सांस्कृतिक महोत्सव
साकोली, २४ मार्च / वार्ताहर

जीवनात पुस्तकं वाचण्यापेक्षा माणसं वाचायला शिका. आपले विचार व्यक्त करायला भाषेचं बंधन असू नये. बोलण्यातला आत्मविश्वास महत्त्वाचा असतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार श्याम पेठकर यांनी केले. शासकीय तंत्रनिकेतनच्या सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य दीपक कुळकर्णी होते. या प्रसंगी प्रा. अ.ज. फुलझेले, प्रा. ज.दे. गोल्हर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सचिन बडोले व मनीषा बन्सोड यांनी केले. आभार योगेश देशमुख यांनी मानले. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात विविध मनोरंजनाचे कार्यक्रम पार पडले.

गोंदियात आरोग्य तपासणी शिबीर
गोंदिया, २४ मार्च / वार्ताहर

येथील एस.एस. गर्ल्स महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.के. बहेकार, सल्लागार चिकित्सक व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अपूर्वा कोलते, प्रा. निशा भुरे, प्रा. भेंडे, डॉ. नासरे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. बहेकार यांनी महिला-पुरुष हे जीवनरूपी रथाचे दोन चाक असून या रथाला चालविण्यासाठी दोन्ही चाकांचे समान महत्त्व असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. भुरे यांनी महिलांनी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असून त्या शिक्षित असणे गरजेचे आहे. कारण शिक्षणाशिवाय त्यांना आपल्या अधिकारांची जाण होणार नसल्याचे मत व्यक्त केले. प्रा. भेंडे यांनी वर्षांचा प्रत्येक दिवस पुरुषांचा असतो. मात्र, आजचा दिवस महिलांचा दिवस असून त्यांचेही काही अस्तित्व व अधिकार आहेत. याचे प्रतीक असल्याचे मत व्यक्त केले. तर डॉ. अपूर्वा कोलते यांनी महिला ही कुटुंबाचा कणा असून तिचे आरोग्य उत्तम राहणे आवश्यक आहे. एवढेच नव्हे तर पुरुषांनीही महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. पश्चात डॉ. कोलते यांनी महाविद्यालयातील समस्त प्राध्यापकांची आरोग्य तपासणी केली. तसेच त्यांच्या समस्यांचे निराकरण करीत उत्तम आरोग्यासाठी सल्ला दिला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. रेखा नागपुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील समस्त प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

तोतया पोलीस उपनिरीक्षक गजाआड
भंडारा, २४ मार्च / वार्ताहर

नावे बदलून फिरणाऱ्या तसेच पोलीस उपनिरीक्षकाच्या वेषात भटकून नोकरीचे आमिष दाखवून उमेदवारांना लुबाडणाऱ्या तोतया पोलीस उपनिरीक्षकाला लाखांदूर पोलिसांनी अटक केली.
जैतपूर बारव्हा येथे मागील आठ दिवसांपासून ४० वर्षीय आरोपी पी.के. गायधने, विलास नारायण गणवीर, राजकुमार मोहनलाल पटले या नावाने पोलीस उपनिरीक्षकाच्या पोषाखाचा वापर करीत पोलीस अधिकारी आहोत अशी बतावणी करीत होता. निवडणुकीनंतर पोलीस भरती होणार असून १ लाख २० हजार रुपये द्या, पाच तरुणांना नोकरी लावून देतो, असे त्याने घरमालक भाकरू पडारे यांना म्हटले. भाकरू पडारेच्या माध्यमातून तरुणांकडून कागदपत्रेही गोळा केलीत. हा तथाकथित पोलीस उपनिरीक्षक फसवणूक करीत आहे, अशी जाणीव शंकर विनोबा कठाणे (३५) या जैतपूर बारव्हा येथे राहणाऱ्या गृहस्थाला झाली. त्याने लेखी तक्रार लाखांदूर पोलीस ठाण्याला केली आणि तोतया पोलीस उपनिरीक्षक चतुर्भुज झाले. त्याचे खरे नाव विलास गणवीर आहे. यापूर्वीही फसवणुकीच्या गुन्ह्य़ात त्याला शिक्षा झाली होती.

तुमसर पंचायत समिती सभापतीवरील अविश्वास बारगळला
तुमसर, २४ मार्च / वार्ताहर

तुमसर पंचायत समिती सभापती पल्लवी कटरे यांच्याविरुद्ध असलेला अविश्वास ठराव आज बारगळला. तुमसर पंचायत समिती सभापती पल्लवी कटरे या सदस्यांना विश्वासात घेत नाहीत आणि कामे स्वत:च्या मर्जीनुसार करतात म्हणून यांच्यावर विश्वास राहिला नाही. पल्लवी कटरे यांनी पंचायत समिती सदस्यांचा अविश्वास गमावला म्हणून जिल्हाधिकाऱ्याकडे सदस्यांनी पत्र दिले होते. त्यानुसार आज दुपारी ९ वाजता अविश्वास ठरावावर निर्णय घेण्यासाठी उपजिल्हाधिकारी ए.के. आझाद यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली. अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी आयोजित सभेला १८ पैकी एकही सदस्य उपस्थित नसल्याने अविश्वास ठराव बारगळल्याचे उपजिल्हाधिकारी आझाद यांनी जाहीर केले. सभागृहाबाहेर भाजप-सेनेचे फक्त ८ सदस्य उपस्थित होते परंतु, त्यांनी सुद्धा सभागृहात प्रवेश केला नाही.

रासायनिक अभियांत्रिकीची राष्ट्रीय परिषद
चिखली, २४ मार्च / वार्ताहर

अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात रासायनिक अभियांत्रिकी (केमिकल इंजिनिअरींग) विभागामार्फत ‘केमकॉम-०९’ ही राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या रासायनिक अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. व्ही.एस. सपकाळ व रत्नागिरी येथील प्राचार्य डॉ. ए.बी. मराठे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. रसायन अभियांत्रिकीतील विविध महत्त्वपूर्ण विषयांवर यावेळी संशोधनात्मक चर्चा करण्यात आली. देशाच्या विविध प्रांतातून सुमारे २०० विद्यार्थ्यांनी या परिषदेत सहभाग नोंदविला. रासायनिक अभियांत्रिकी या विषयाचे राष्ट्रीय महत्त्व व भविष्यातील आव्हाने या विषयांवर डॉ. ए.बी. मराठे यांनी विचार व्यक्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. प्राचार्य डॉ. संतोष आगरकर, विभाग प्रमुख एम.एस. पाटील आदींची पूर्णवेळ उपस्थिती होती.