Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ मार्च २००९
विशेष लेख

माणुसकीची जाणीव ठेवू
अवघे धरू सुपंथ

एचआयव्ही/एड्स म्हटलं की सगळ्यात प्रथम त्या व्यक्तीभोवती संशयाचं धुकं उभं राहतं. एचआयव्ही/एड्स ही नव्या जगाची नवी समस्या आहे. अनेक र्वष या विषयावर विविध पातळ्यांवरून जनजागृती केली जात आहे. या प्रयत्नांना बऱ्याच प्रमाणात यशही येत आहे. पण अजूनही या आजाराबद्दल पुरेशी जागरुकता समाजात रुजलेली नाही. समाजातले वेगवेगळे घटक एखाद्या समान प्रश्नावर काम करत असतात, पण त्यांचा एकमेकांशी फारसा संबंध नसतो. त्यामुळे त्यांच्यात देवाणघेवाण किंवा चर्चा होत नाही. अशा विविध घटकांना एकत्र आणण्यासाठी कार्यशाळा हा उत्तम उपाय ठरतो. अशीच कार्यशाळा एचआयव्ही/एड्सबाबतच्या जनजागृतीसाठीही आवश्यक आहे.

 


मुंबई महापालिका आणि जॉन हॉपकिन्स संस्थेने काही दिवसांपूर्वी अशी कार्यशाळा खास पत्रकारांसाठी आयोजित केली होती. कार्यशाळा जरी पत्रकारांसाठी असली तरी त्या निमित्ताने या विषयावर काम करणारे कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, डॉक्टर, वकील आणि स्वत: एचआयव्ही पॉझिटिव्ह असताना मोठय़ा धीराने आयुष्य जगत, इतरांचेही आयुष्य सुसह्य करणाऱ्या काही व्यक्ती असे समाजातील विविध घटक एकत्र आले व त्यांच्यात या अनुषंगाने चर्चा झाली. या चर्चेतून समाजात आजही अनेक चुकीचे समज असून ते दूर झाले तर वेगळे सकारात्मक दृष्टी देणारे चित्र उभे राहील आणि एचआयव्हीग्रस्त असलेल्यांनाही समाजात उभे राहण्याचे बळ मिळेल, हे दिसून आले.
एचआयव्ही/एड्ससारख्या संवेदनशील विषयावर लोकांचे मन वळविणे, त्यांची भीती दूर करणे हे काम प्रसारमाध्यमे खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात. अशाच प्रकारे पत्रकारांबरोबर शहरी व ग्रामीण भागांत कार्यशाळा घेतल्यावर, तेथील वृत्तपत्रे आणि पत्रकार या प्रश्नावर अधिक जागरुकतेने काम करू लागल्याचा अनुभव येत असल्याचे या कार्यशाळेदरम्यान ‘जॉन हॉपकिन्स’च्या कार्यकर्त्यांनी सांगितले. एचआयव्ही/एड्ससारखा विषय हाताळताना तज्ज्ञापेक्षा संवेदनशील व्यक्तीची गरज अधिक असते व नैतिक मूल्यांचे भान राखले तर ही अपेक्षा पत्रकार नक्कीच पूर्ण करु शकतात. संबंधित विषयाचे विविध पैलू समजून घेण्यासाठी तज्ज्ञांशी संपर्क साधला तर समाजात जागरुकता पसरविण्याचे काम पत्रकार करु शकतो. फक्त त्याआधी ही जागरुकता पत्रकारांनी स्वत: अंगी बाणणे जरुरीचे आहे, अशी अपेक्षा या कार्यशाळेदरम्यान व्यक्त करण्यात आली. पत्रकारांमध्ये समाज परिवर्तन करण्याची मोठी ताकद असते. अनेकदा आम्हाला वृत्तपत्रांतूनच एखाद्या विषयाची माहिती मिळते व त्या माहितीच्या आधारे पुढची पावले उचलली जातात, हे या कार्यशाळेत उपस्थित असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांचे उद्गार बरेच काही सांगून जातात.
प्रसारमाध्यमे, शासन, डॉक्टर, वकील या व्यक्तींनी जबाबदारीने वागले पाहिजे, ही अपेक्षा रास्तच आहे. हे जसे समाजाचे महत्त्वाचे घटक समजले जातात, तसाच या व्यवसायांशी प्रत्यक्ष संबंध नसलेला सर्वसामान्य नागरिकही समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यांनाही काही प्रमाणात अशा प्रकारच्या कार्यशाळेत सहभागी करून घेतले पाहिजे. या कार्यशाळेत काही एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तींनी मोकळेपणाने आपले अनुभव उपस्थितांसमोर मांडले. अ‍ॅपेंडिक्सचे ऑपरेशन करताना रक्त दिल्याने कोणाला एचआयव्हीची बाधा झाली होती, तर कोणाला आपल्या नवऱ्याकडून. आपण एचआयव्ही पॉझिटिव्ह आहोत, हे कळल्यावर त्यांचे आयुष्य उद्ध्वस्तच झाले होते. आता मृत्यूशिवाय दुसरा पर्याय नाही, अशी भावनाही काहींच्या मनात आली होती. थोडेसे सावरल्यानंतर, आपले आयुष्य संपलेले नाही, आपल्यासारख्याच इतर अनेक व्यक्ती आहेत, आपणही अनेक वर्षे जगू शकतो, ही जाणीव या सगळ्यांना ‘पिपल लिव्हींग विथ एचआयव्ही/एड्स’ या संस्थेच्या संपर्कात आल्यावर झाली. घरातील माणसांच्या पाठिंब्याने आज इथपर्यंत आलो आहोत, असे त्यांनी सांगितले. त्यांचे आयुष्य आता अधिक सुंदर झाले आहे.
जे.जे. रुग्णालयाच्या डॉ. अलका देशपांडे या अनेक वर्षे एचआयव्ही/एड्सच्या प्रश्नावर कार्यरत आहेत. त्यांनी या विषयाची व्याप्ती या कार्यशाळेदरम्यान पत्रकारांना सांगितली. १९८१ साली अमेरिकेत प्रथम या एड्सच्या विषाणूचा शोध लागला. समलिंगी पुरुषांमध्ये हा विषाणू आढळला होता. त्यानंतर सात ते आठ महिन्यांनी तो महिलांमध्ये आढळून आला. स्त्रियांमध्येही हा रोग आढळून आल्याने तो संक्रमक आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला होता. कालांतराने तो लहान मुलांमध्ये आढळून आल्यानंतर फक्त लैंगिक संबंधांमुळेच नाही, तर रक्ताच्या संक्रमणाद्वारेही एड्स होऊ शकतो असे आढळून आले. लैंगिक संबंधांमुळे एचआयव्हीची लागण होते, असे आढळून आल्यावर एड्स हा एक कलंक आहे, असे समजले जाऊ लागले. एड्सचा शोध लागल्यावर त्याचे परिमाण कसे बदलत गेले, याबद्दल सांगताना अलका देशपांडे म्हणाल्या की, सुरुवातीला ही एक वैद्यकीय समस्या आहे, असे वाटत होते. त्यानंतर लक्षात आले की, एकापेक्षा अधिक व्यक्तींशी लैंगिक संबंध आल्याने हा रोग होतो. त्यातून एड्स होणे हे त्या व्यक्तीच्या वागणुकीवर आणि मानसिकतेवर अवलंबून आहे. ज्या व्यक्तींचा स्वत:वर ताबा नाही, त्यांना हा रोग होतो, या भावनेतून मग ‘एड्स’ ही सामाजिक समस्या बनली व त्यातून निर्माण झाले नैतिकतेचे प्रश्न. मध्य-पूर्वेतील राष्ट्रांमध्ये बाहेरच्या देशांतून येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तेथे एचआयव्ही चाचणी करून घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे ही समस्या जागतिक बनली.
या आजाराच्या सद्य परिस्थितीबद्दल अलका देशपांडे म्हणाल्या की, अनेक पुरुष लग्नाआधी लैंगिक संबंधांचा अनुभव असावा, या भावनेने कमर्शियल सेक्स वर्कर्सकडे जातात. पहिल्या रात्री गोंधळ उडू नये, अशी त्यांची चुकीची मानसिकता असते. शिवाय सेक्स वर्कर्समुळे एड्स होतो, असे म्हटले जाते. त्यांना दोष दिला जातो. पण तितकेच मोठे प्रमाण स्त्रियांना पुरुषांकडून एड्स होण्याचे आहे. घरापासून दूर राहणारा पुरुष असतो. या पुरुषांची बाहेरच्या स्त्रियांशी संबंध ठेवण्याची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
केवळ चर्चेपुरते मर्यादित न राहता, या कार्यशाळेच्या निमित्ताने एचआयव्ही/एड्सच्या जनजागृतीसाठी कार्य करणाऱ्या काही संस्थांना सहभागी पत्रकारांनी भेटी दिल्या. ‘हमसफर ट्रस्ट’ ही संस्था समलिंगी पुरुष व तृतीय पंथीयांसाठी कार्यरत आहे. वेगवेगळ्या रुग्णालयांबरोबर ही संस्था काम करते. तृतीयपंथीय वा ‘गे’ यांना भारतात फारशी समाजमान्यता नाही. या व्यक्तींना मोकळ्या मनाने स्वीकारण्यासाठी अजूनही खूप मोठय़ा प्रमाणावर जागृतीची आवश्यकता आहे, हे या निमित्ताने प्रकर्षांने जाणवले. समलिंगी संबंध ठेवणाऱ्यांसाठीचा हा एक ‘सपोर्ट ग्रुप’च आहे. ‘हमसफर’मध्ये सध्या २०८ व्यक्ती काम करतात. अशोक रावकवी यांच्या प्रयत्नांतून १९९४ साली ही संस्था स्थापन झाली. मुंबईतील गे व्यक्तींपर्यंत पोहोचण्याच्या इच्छेतून काही सहकाऱ्यांच्या साथीने एक ते दीड वर्षांच्या प्रयत्नांतून या संस्थेने आकार घेतला आणि सांताक्रूझ येथे अशी पहिली संस्था स्थापन झाली. ‘फ्रायडे वर्कशॉप’द्वारे गे व लेस्बियन्सना अभिव्यक्त होण्याचे व्यासपीठ तयार झाले. त्यांच्या मानवी हक्कांवरही या निमित्ताने चर्चा घडत गेली. सहा समलिंगी पुरुषांची एक टीम सध्या आपल्यासारख्यांना सर्वसामान्यांचे जीवन जगता यावे, न्यूनगंड निर्माण होऊ नये यासाठी कार्यरत आहेत. एचआयव्ही/एड्सचा धोका या व्यक्तींनाही मोठय़ा प्रमाणावर असतो. त्यांच्यात याबद्दल जागृती निर्माण करण्याचे काम, हमसफर ही संस्था करते आहे. २००६ साली या संस्थेचा एक नवीन व अतिशय महत्त्वपूर्ण असा उपक्रम कल्याणमध्ये सुरू झाला. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या केंद्राद्वारे लैंगिक आजार, एचआयव्ही चाचणी याबद्दलची माहिती व उपचार दिले जातात.
‘नागरी स्वास्थ प्रबोधिनी’ ही संस्था बारबाला व हॉटेलमध्ये काम करणारी मुले यांच्याबरोबर कार्य करते. डान्सबार बंद झाल्यानंतर बारबालांना कमर्शियल सेक्स वर्कर म्हणून काम करावे लागत आहे. ही संस्था या मुलींना एचआयव्हीबद्दल जागरुक करण्याचे काम करत आहे. कंडोम वापरण्याबद्दल ठाम रहावे, एवढी जागरुकता या मुलींमध्ये आली आहे. अशीच समस्या हॉटेलमध्ये दिवसरात्र राबणाऱ्या मुलांची. त्यांना दुसरं आयुष्यच नसतं. घरापासून दूर राहत असल्याने आपलं असं कोणी नसतं. शिवाय दिवसभर हॉटेलमध्येच असल्याने त्यांच्यात समलिंगी संबंधांचं प्रमाणही आहे. या संस्थेने मध्यंतरी या मुलांची क्रिकेट मॅच आयोजित केली होती. त्याला मुंबईतून आठ हजार मुले आली होती.
आपला रोग बरा होणारा नाही याची सततची जाणीव या व्यक्तींना असते. त्यांना आधार द्यायचा की आणखी दुखवायचं याचा विचार होणं गरजेचं आहे. पटकन काही निष्कर्ष काढण्यापेक्षा संयमाने विचार केला गेला पाहिजे. ही माणसं समाजाचाच एक भाग आहेत. त्यांनासुद्धा जगायची इच्छा आहे, याचा यत्किंचितही विसर पडू देता कामा नये. एड्सग्रस्त हे बेजबाबदार असतात, असा एक दृढ गैरसमज आहे. ‘पिपल लिव्हींग विथ एचआयव्ही/एड्स’ या संस्थेची अत्यंत आत्मविश्वासू अध्यक्ष शबाना हिच्या शब्दात सांगायचे तर, ‘एचआयव्ही/एड्स झालेल्या व्यक्ती बेजबाबदार नाहीत.’ उलट याचा संसर्ग आपल्यापासून इतरांना होऊ शकतो, तो होऊ नये याची पुरेपूर जाणीव एचआयव्हीग्रस्तांना आहे. पॉझिटिव्ह व्यक्ती अनेक वर्षे इतर माणसांप्रमाणेच जगू शकते, प्रश्न आहे तो तिचे जगणे सुसह्य करण्याचा.
नमिता देशपांडे
namiitadeshpande@gmail.com