Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ मार्च २००९
विविध

दिल्लीतील दोन खुनांचा छडा
चार तरुणांना अटक
नवी दिल्ली, २४ मार्च/पीटीआय
टीव्ही पत्रकार सौम्या विश्वनाथन हिच्या खुनाचा छडा लावण्यात तब्बल सहा महिन्यांनंतर यश आले असून, या प्रकरणी चार तरुणांना अटक केल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. गेल्या आठवडय़ात झालेल्या जिगिषा घोष या कॉल सेंटरमधील अधिकाऱ्याच्या खुनातही या चौघांचाच हात असल्याचा संशय आहे. अटक केलेल्या तरुणांची नावे रवि, बलजित, अमित आणि अजय अशी आहेत.

पाकिस्तानचे सरन्यायाधीश इफ्तिकार चौधरी यांचे सर्वोच्च न्यायालयात जंगी स्वागत
इस्लामाबाद, २४ मार्च/पीटीआय

पाकिस्तानचे सरन्यायाधीश इफ्तिकार चौधरी यांचे आज सर्वोच्च न्यायालयात आगमन झाले त्यावेळी वकीलवर्ग व सर्वसामान्य जनतेने त्यांचे जंगी स्वागत केले. मुशर्रफ यांनी पाकिस्तानच्या सरन्यायाधीश पदावरून हकालपट्टी केलेले इफ्तिकार चौधरी यांची जनतेच्या प्रचंड दबावामुळे गेल्या आठवडय़ात त्या पदावर पुनर्नियुक्ती करण्यात आली होती. न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्याची गरज चौधरी यांनी वकिलांशी बोलताना व्यक्त केली.

महाराष्ट्रातील आयएएसच्या उमेदवारांसाठी दिल्लीत ‘करिअर क्वेस्ट’तर्फे मोफत मुलाखत मार्गदर्शन
नवी दिल्ली, २४ मार्च/खास प्रतिनिधी
दिल्लीतील ‘करिअर क्वेस्ट’ या शैक्षणिक संस्थेच्या वतीने आयएएसच्या (भारतीय प्रशासकीय सेवा) लेखी परीक्षेत उत्तीर्ण होऊन अंतिम मुलाखतीला सामोरे जाणाऱ्या महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी येत्या २८ मार्च ते १९ एप्रिल दरम्यान तीन टप्प्यांमध्ये मुलाखत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

लोकजनशक्ती पक्षाच्या बिहार, झारखंडमधील लोकसभा निवडणूक उमेदवारांची यादी जाहीर
पाटणा, २४ मार्च/पीटीआय
बिहारमधील १२ जागांसाठी व झारखंडमध्ये लढवित असलेल्या पाच पैकी तीन जागांसाठी लोकजनशक्ती पार्टीने आपले उमेदवार आज जाहीर केले. रामविलास पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोकजनशक्ती पार्टीने झारखंडमध्ये राष्ट्रीय जनता दलाशी निवडणूक युती केली आहे.हाजीपूर या मतदारसंघातूनच रामविलास पासवान हे पुन्हा लोकसभा निवडणूक लढविणार आहेत.

काश्मीरमधील लष्कर विशेष अधिकार कायद्याचा आढावा लोकसभा निवडणुकीनंतर -ओमर अब्दुल्ला
श्रीनगर, २४ मार्च/पी.टी.आय.

काश्मीर खोऱ्यातील ‘आम्र्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स अ‍ॅक्ट’चा आढावा लोकसभा निवडणुकीनंतर घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज जाहीर केले. या कायद्यामुळे खोऱ्यात गेले काही दिवस असंतोष धुमसत आहे. काश्मीर खोऱ्यात लष्कराला विशेष अधिकार देणारा हा कायदा मागे घ्यावा, अशी मागणी बऱ्याच काळापासून होत आहे. मात्र परिस्थितीत सुधारणा झाली तर या कायद्याचा आढावा घेता येऊ शकेल, असे ओमर अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांच्या अलीकडेच झालेल्या काश्मीर भेटीदरम्यान या विषयावर चर्चा झाली होती. लोकसभा निवडणुकीनंतर या कायद्याचा आढावा घेतला जाऊ शकेल, असे ते म्हणाले. काश्मीर खोऱ्यात पर्यटकांनी मोठय़ा प्रमाणात यावे, असे आवाहनही ओमर अब्दुल्ला यांनी केले. काश्मीरमधील सुरक्षेची स्थिती सुधारली असून अनेक देशांनी आपापल्या नागरिकांनी काश्मीरमध्ये जाण्यासंबंधी दिलेले निर्बंधात्मक सल्ले लवकरच मागे घेतले जातील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

जेड गुडीचा दफनविधी शनिवारी
लंडन, २४ मार्च/पीटीआय

‘बिग ब्रदर’ या मालिकेतील अभिनेत्री जेड गुडी हिचे पार्थिव येत्या शनिवारी दफन करण्यात येईल. मात्र तिचा पती जॅक ट्वीड हा सध्या तुरुंगात असल्याने तो जेड गुडीच्या दफनविधीला उपस्थित राहू शकणार नाही. सव्‍‌र्हायकल कॅन्सर या विकाराने ग्रस्त असलेल्या जेड गुडीचे गेल्या रविवारी इसेक्स येथील निवासस्थानी निधन झाले. यासंदर्भात ‘मिरर’ वृत्तपत्राच्या इंटरनेट आवृत्तीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, जेड गुडीचा दफनविधी या भागातील एका चर्चच्या आवारात होईल. जेड गुडीच्या दफनविधीला तिचे हजारो चाहते उपस्थित राहाण्याची शक्यता आहे. येत्या शनिवारी दुपारी जेड गुडीची अंत्ययात्रा तिच्या घरापासून निघेल. जेड गुडीचा पती जॅक ट्वीड याने मद्यधुंद अवस्थेत एका टॅक्सी चालकाला गेल्या गुरुवारी मारहाण केली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक होती. या गुरुवारी जॅक ट्वीड याला न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. जेड गुडीचा दफनविधी पार पडेपर्यंत शिक्षा सुनावू नका अशी विनंती त्याने न्यायालयाला केली आहे.

भारताचा नेपाळला ५०० मे.वॅ. वीज पुरविण्याचा प्रस्ताव
काठमांडू, २४ मार्च/पी.टी.आय.
वीजटंचाईने जेरीस आलेल्या नेपाळला ५०० मे.वॅ. वीज पुरविण्याचा प्रस्ताव भारताने दिला आहे. नेपाळने यास मान्यता दिली तर दीड वर्षांत वीजपुरवठा सुरू होऊ शकेल, असे भारताने कळविले आहे. नेपाळमध्ये सध्या दिवसाचे तब्बल १६ तास भारनियमन आहे. नेपाळमधील बव्हंशी धरणांची पातळी खाली गेल्याने वीजनिर्मितीमध्ये तब्बल निम्मी घट झाली आहे. या पाश्र्वभूमीवर ५०० मे.वॅ. वीज पुरविण्याचा प्रस्ताव भारताने दिला आहे. ‘पॉवर ट्रेडिंग कॉर्पोरेशन’ने नेपाळच्या जलनियमन खात्याला हा प्रस्ताव दिला आहे. प्रतियुनिट ३ रु. या दराने ही वीज पुरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे नेपाळची वीजेची गरज भागली तर ही वीज परत विकत घेण्याची तयारीही भारताने दर्शविली आहे. नेपाळचे पंतप्रधान प्रचंड या आठवडय़ात नॉर्वे आणि डेन्मार्क या युरोपीय देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. नेपाळमधील भौगोलिक स्थितीचा फायदा उठवून पवनऊर्जा तसेच औष्णिकऊर्जा तयार करण्याच्या दृष्टीने त्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण समजला जात आहे. मात्र अशा मार्गाने वीजनिर्मिती करण्यापेक्षा भारताकडून वीज विकत घेणे खूप फायदेशीर ठरेल, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

काश्मीर खोऱ्यातील चकमक पाचव्या दिवशीही सुरूच
एकूण १६ अतिरेकी ठार
श्रीनगर, २४ मार्च/पी.टी.आय.

काश्मीर खोऱ्यातील कुपवाडा जिल्ह्यातील जंगलात अतिरेक्यांबरोबर सुरू असलेली चकमक आज पाचव्या दिवशीही संपलेली नाही. सुरक्षादलांनी आज आणखी पाच अतिरेक्यांना यमसदनास धाडल्याने ठार झालेल्या अतिरेक्यांची संख्या आता १६ वर पोहोचली आहे. तर लष्कराच्या एका मेजरसह आठ जवान या कारवाईत हुतात्मा झाले आहेत.कुपवाडा जिल्ह्यातील शम्शाबारी रेंजमधील हफ्रादा जंगलात ही चकमक सुरू आहे. शनिवारी झालेल्या तुंबळ गोळीबारात लष्कराचे मेजर मोहीम शर्मा तसेच अन्य चार जवान हुतात्मा झाले होते. पाठोपाठ तंगधर परिसरात एका अतिरेक्याला सुरक्षादलांनी कंठस्नान घातले. सीमेपलीकडून घुसखोरी करणाऱ्या काही अतिरेक्यांना आत आणण्यासाठी अतिरेकी जंगलात गेले असल्याची खबर सुरक्षादलांना मिळाल्यानंतर त्यांनी या जंगलात व्यापक शोधमोहीम हाती घेतली होती. त्या मोहिमेदरम्यानच ही चकमक सुरू झाली आहे.