Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
अग्रलेख

एक डाव धोबीपछाड!

 

कुस्तीतला एक डाव असा आहे, की ज्यात कळायच्या आत भल्याभल्यांना उताणे पाडले जाते. आधी त्याला पाठीवर घेतले जाते आणि उचलून भिरकावून दिले जाते. तो खाली पडला की त्याची पाठ जमिनीला टेकवणे एवढेच काम मग त्या प्रतिस्पध्र्याला उरते..हा डाव एवढय़ा विस्ताराने अशासाठी सांगितला की वाचकांनाही तो कुणी आणि कुणासाठी टाकला आहे हे लक्षात यावे. राजकारणात असे डाव खूपच कमी पाहायला मिळतात. डॉ. मनमोहनसिंग हे आजवरचे सगळ्यांत कमकुवत पंतप्रधान आहेत, असे भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी म्हणाले. यापूर्वी याच अडवाणींनी त्यांना ‘निकम्मा’ (निरुपयोगी) म्हटले होते. डॉ. मनमोहनसिंग यांनी त्या वेळी उत्तर देताना त्यांना आत्मपरीक्षण करायचा सल्ला दिला होता. गेल्या वर्षी विश्वासदर्शक ठरावावर बोलताना डॉ. मनमोहनसिंग यांनी अडवाणींना उद्देशून म्हटले होते, की आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी अडवाणींनी सरकार पाडायचा तीनवेळा प्रयत्न केला. अडवाणी आता आपल्या वैचारिकतेत बदल करतील असे वाटत नाही, पण ज्याच्या सांगण्यावरून ते हा प्रयत्न करत आहेत, त्या ज्योतिषाला तरी त्यांनी किमान बदलून पाहावे. म्हणजे तरी यश येते का, ते पाहू! डॉ. मनमोहनसिंग यांच्या त्या तडाख्यानंतर अडवाणी काही काळ गप्प बसले, पण आता त्यांना निवडणुकीनंतर पंतप्रधानपद मिळवायचे असल्याने त्यांनी डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर पुन्हा तोच आरोप केला आणि डॉ. सिंग यांचे निवासस्थान असणारा ‘७ रेसकोर्स रोड’ हा पत्ता कुणाचेच महत्त्व सांगत नाही, पण ‘१० जनपथ’ या सोनिया गांधींच्या पत्त्याला पाहा, केवढी शान लाभली आहे, अशा अर्थाची टीका केली. सोनिया गांधींचे महत्त्व अडवाणींना सांगायचे नव्हते, तर डॉ. सिंग हे पंतप्रधानपदावर असूनही तिथे नाहीत, ही त्यांच्या कल्पनाशक्तीची भरारी होती. अलीकडच्या काळात डॉ. सिंग यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली आहे आणि मुळातच कमी बोलणाऱ्या, तसेच सभ्यतेत शेवटचा शब्द असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला पुन्हा एकदा डिवचायला काय हरकत आहे, असे वाटून अडवाणींनी डॉ. मनमोहनसिंग हे सर्वात कमकुवत पंतप्रधान असल्याचे म्हटले. अडवाणींनी हा उल्लेख काही पहिल्यांदा केला नव्हता. आता तर निवडणुका आहेत आणि डॉ. सिंग यांनी उत्तर दिले नसते तर त्याचे भलभलते अर्थ काढून परिवारात ढोल पिटले गेले असते. काँग्रेस पक्षाच्या जाहीरनामा प्रकाशन समारंभात डॉ. सिंग यांनी सोनिया गांधींसह उपस्थितांना आपल्या भाषणाने धक्का दिला. ‘मी कमकुवत पंतप्रधान आहे की दणकट, हा माझ्या सरकारच्या कारवाईवरून सिद्ध होणारा विषय आहे. तथापि, अडवाणी ज्या काळात गृहमंत्री होते, त्या काळात गुजरातमध्ये झालेल्या जातीय दंगलींना त्यांना आळा घालता आला नाही. संसदेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला, लाल किल्ल्यावरही दहशतवाद्यांनी हल्ला केला, सरहद्दीवर त्यांच्या सरकारने बारा महिने सैन्य नेऊन ठेवले आणि त्यातून काहीही निष्पन्न न होता त्यांना सैन्य माघारी घ्यावे लागले, कोटय़वधी रुपयांचा त्यात चुराडा झाला. इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण झाले आणि अपहरण करणाऱ्यांना प्रमुख पाहुणे बनवून त्यांना हव्या असणाऱ्या दहशतवाद्यांची भेट देण्यात आली. ते गृहमंत्री असताना हजारोंच्या कत्तलींना गुजरातमध्ये त्यांनी मोकळी वाट करून दिली. असा हा माणूस पंतप्रधान बनायला लायक आहे की नाही, हे या घटनांवरूनच देशाला ठरवावे लागणार आहे. एवढय़ा परखड शब्दात डॉ. सिंग यांनी टीका केली. ती पाहून अडवाणींना आपण कुठून डॉ. सिंग यांच्या वाटेला गेलो, असे झाले असणार. डॉ. सिंग यांनी अडवाणींना टाकलेला हा धोबीपछाड डाव आहे. परवा असाच डाव केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी ‘इंडियन प्रीमियर लीग’च्या समर्थकांना टाकला. ‘आयपीएल’ ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या ठिकाणीच पार पडावे यासाठी धडपड करणारे शरद पवार त्यात आलेच. ‘आयपीएल’साठी प्रयत्न करणारे जे कुणी आहेत ते क्रिकेट नक्कीच खेळत नाहीत, असे सांगून त्यांनी पवारांना सबुरीचा सल्ला दिला होता. अडवाणींना ज्याप्रकारे डॉ. सिंग यांची ही प्रतिक्रिया अनपेक्षित होती, त्याचप्रमाणे पवारांनाही चिदंबरम् आपल्याबद्दल असे काही बोलतील असे वाटले नसेल. निवडणुकांच्या राजकारणात जेव्हा तुम्ही ‘दोन’ द्यायच्या भाषेचा वापर करता, तेव्हा ‘दोन’ घ्यायलाही आपल्या मनाची तयारी असणे आवश्यक असते. अडवाणींच्या पक्षाने वरुण गांधींच्या भाषणावर केलेले शिक्कामोर्तबही त्या पक्षाला महागात पडणार आहे. ‘ये हाथ, हाथ नहीं, फांसी का फंदा है’ यासारखे संवाद ‘शोले’त शोभून दिसले तरी राजकारणात आणि निवडणुकीसारख्या संवेदनशील विषयात नाही. एका विशिष्ट धर्माबद्दल तशी अश्लाघ्य विद्वेषी भाषा वापरणे योग्य नव्हते. वरुण गांधींच्या भाषणाशी आपण फारकत घेत असल्याचे सांगणाऱ्या पक्षाने वरुण गांधींना उमेदवारी न द्यायच्या निवडणूक आयोगाच्या सूचनेवर आपण किती बेदरकार आहोत, हे दाखवून दिले. तुम्ही अमुक तमुक व्यक्तींवर कुठे केलीत कारवाई, असा प्रश्न करुन वरुण गांधींच्या उमेदवारीवर भाजपने शिक्कामोर्तबच केले. यालाच म्हणतात निगरगट्टपणा. वरुण गांधींच्या मुस्लिमद्वेष्टय़ा भाषणावर त्या पक्षात असणाऱ्या मुस्लिम नेत्यांनी लाजेकाजेस्तव असेल किंवा मनापासून असेल, टीका केली. पण काही अपवाद वगळता त्यांच्या पक्षाच्या एकाही हिंदू नेत्याने वरुण गांधींचे हे भाषण भंपकपणाचा नमुना होता, असे म्हटले नाही. ज्यांनी टीका केली त्यांच्या नाकावर टिच्चून वरुण गांधींना उमेदवारी दिली आणि त्याचे समर्थनही केले. अडवाणींनी १९९२ मध्ये बाबरी मशिदीचा विध्वंस घडवला. शिवाय सत्तेवर आल्यानंतरच्या काळात कराचीला दिलेल्या भेटीच्या वेळी पाकिस्तानचे जनक महमद अली जीना यांच्या धर्मनिरपेक्षतेवर स्तुतिसुमने उधळली, ती त्यांना खूपच महागात पडली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्या वेळी त्यांच्याशी धरलेला अबोला अगदी अलीकडे संपला. अडवाणींचे उपपंतप्रधानपद आणि गृहमंत्रिपद आता जाणार की राहणार, अशी परिस्थिती निर्माण झाली. संघाच्या ढुढ्ढाचार्यानी अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या कारभाराबद्दल आणि अडवाणी यांच्या बेफामपणावर जेव्हा जेव्हा टीका केली, तेव्हा तेव्हा त्यांच्या नाकदुऱ्या काढायचा प्रसंग त्यांच्यावर उद्भवला. नागपूरमध्ये संघाचे मुख्यालय असणाऱ्या रेशीमबागेत याच काळात त्यांना येरझाऱ्या घालाव्या लागल्या होत्या. एक-दोनदा तर जॉर्ज फर्नाडिसांना आपले दूत बनवून संघ कार्यालयात धाडावे लागले होते. जॉर्ज फर्नाडिस हे त्यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे निमंत्रक आहेत, पण त्यांना त्यांच्या संयुक्त जनता दलाने लोकसभेसाठी उमेदवारी नाकारल्यावर भाजपच्या एकाही वरिष्ठ नेत्याला आघाडीतल्या आपल्याबरोबरच्या पक्षाचे हे कृत्य अयोग्य आहे, असे वाटले नाही. भाजपच्या सत्तेच्या काळातले लोटांगणाचे दिवस अडवाणींनी आठवून पाहायला हरकत नव्हती. संघ या विषयावरसुद्धा बऱ्याच काळपर्यंत अडवाणींच्या तोंडून शब्द फुटत नव्हता, तो ते जीनांबद्दल काढतील ही शक्यताच नव्हती. मालेगाव बॉम्बस्फोटाबद्दल ज्या हिंदू दहशतवाद्यांच्या नेत्यांना पकडण्यात आले, त्यांच्याविषयी अडवाणी अलीकडेच मध्य प्रदेशात विदिशामध्ये प्रथमच बोलले. बराच काळपर्यंत त्यांनी या विषयावर मिठाची गुळणी धरली होती. त्यामागची नेमकी कारणे काय आहेत, ते त्यांनी आपल्या ‘लोहपुरुष’ किताबाला स्मरून जाहीर करायला हरकत नाही. या गुन्हेगारांचा मालेगाव बॉम्बस्फोटाच्या कटात सहभाग होता, अशी या काळात त्यांची पक्की खात्री बनली होती काय? संघाच्या काही नेत्यांच्या खुनाचा कटही या प्रकरणातल्या साध्वीने रचला होता, असे दहशतवाद प्रतिबंधक पथकाने आरोपपत्रात म्हटल्यावर अडवाणींना अचानकपणे साध्वी प्रज्ञासिंगची बाजू घेऊन बोलावे, असे का वाटले? गुजरात दंगलीनंतर तेव्हाचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना राजधर्म पाळायचा सल्ला दिला तेव्हा त्यांना आपले शब्द गोव्याच्या बैठकीत मागे घ्यायला लावणारे कोण होते आणि त्यानंतर अडवाणींनी गुजरातेत जाऊन मोदींवर स्तुतिसुमने उधळली, ती कुणामुळे, आदी बऱ्याच प्रश्नांची उत्तरे अडवाणींना द्यावी लागणार आहेत. निवडणुकांच्या प्रचारात आता हे सगळे विषय बेताबेताने पुढे येतील. डॉ. सिंग यांनी आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात नसलेला भाग फक्त या निमित्ताने जनतेपुढे ठेवला आहे. आता पुढे नेमके काय घडते ते पाहायला आपण सारेच समर्थ आहोत. अडवाणींची पाठ मातीला लागणार की नाही, हे पुढल्या पावणेदोन महिन्यांत स्पष्ट होईल, तोपर्यंत आपण या डावाच्या कौशल्याचीच चर्चा करत राहावे, हे उत्तम!