Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९

फिरोजशहा मेहता उद्यानाचा फेरफटका एका बाजूला सुरू असतानाच दुसरीकडे डॉ. चंद्रकांत लट्टूसरांसोबत चर्चा सुरू होती. चर्चेचा मुख्य रोख होता तो कोणती झाडे, कोणत्या ठिकाणी लावावीत हा. अनेकांना लोकांना कळत नाही आणि मग रेन ट्रीसारखा मोठा वाढणारा वृक्ष चक्क सोसायटीच्या जवळ अगदी खेटून लावला जातो आणि मग नंतर तो त्याच्या पद्धतीने वाढतो आपल्यालाच त्याच्या वाढीची कल्पना नसते.. पण होते काय की, शेवटी अवाढव्य वाढला म्हणून आपण त्यालाच लाखोली वाहतो. खरे तर आपण चुकलेले असतो, झाड नाही. गणित कुठे चुकते तर कोणती झाडे किती आणि कशी वाढतात हे लक्षात न घेता आपण त्यांची लागवड करतो आणि नंतर पस्तावतो. हँगिंग गार्डनचा फेरफटका यासाठीच महत्त्वाचा होता, कारण
डॉ. लट्टू आणि डॉ. रंजन देसाई झाडांची आणि त्याच्या वसंतातील फुलोऱ्याची माहिती देताना कोणती झाडे कुठे लावणे योग्य आहे, त्याची माहिती देतात. समोर फणसाचे झाड दिसते. अशीच फणसाची झाडे समोरच असलेल्या कमला मेहता उद्यानातही एका बाजूस ओळीने लावलेली पाहाता येतात. रोडसाईड ट्री म्हणून खरे तर फणसाचे झाड हेदेखील चांगले झाड आहे. तसे ते सरळसोटच वाढते शिवाय सदाहरीत वृक्षांमध्ये त्याचा समावेश होतो. लोकांना त्रास किंवा उपद्रव होईल, असेही या झाडामध्ये काही नाही. शिवाय त्याचे लाकूडही घराच्या बांधणीत वापरले जाते. त्याला चांगली किंमतही येते. एकूणच रोडसाईड ट्री म्हणून त्याचा चांगला वापर होऊ शकतो. आपल्याकडे त्याला फारसे प्राधान्य का मिळाले नाही? आणि तो गावापर्यंतच का मर्यादित राहिला? असाही प्रश्न डॉ. लट्टू उपस्थित करतात.
आपण तिथून पुढे सरकतो आणि एका बाजूला कुंपणाला लागून कुंतीची झाडे दिसतात. छोटय़ाशा गल्ल्यांमध्ये कडेला लावण्यासाठी ही झाडे उत्तम पर्याय आहेत. त्याची फुलेही पांढऱ्या रंगाची आणि सुवासिक असतात. त्याचा खाली पडलेला सडा सुंदर दिसतो आणि त्याचा वासही मोहक असतो.. पण कुंतीवरही असाच अन्याय झाला आहे. चांगला पर्याय असतानाही हे झाड फारच कमी ठिकाणी पाहायला मिळते. मुराया एक्झॉटिका आणि मुराया पॅनिक्युलाटा असे त्याचे प्रकार आहे. उन्हाच्या झळा अंगावर
घेत, घाम टिपत आपण पुढे सरकत असतो. त्याचवेळेस वाऱ्याची एक मंद झुळूक अंगावर येते आणि त्याच्यासोबत आणखीही काही अंगावर येवून
पडते. हलक्या असल्याने वाऱ्यासोबत दूर उडून जाणाऱ्या त्या वावळ्याच्या बिया असतात. वजनाने अतिशय हलक्या, वाऱ्याची साधी झुळूकही खूप लांबवर त्याला नेवू शकेल, अशीच त्याची रचनाही असते. या झाडाची पूर्ण पानगळ कधीही होत नाही. पानगळ होत असतानाच नवी पालवी येते. त्यामुळे झाड नेहमीच हिरवे दिसते. शिवाय पानगळ होते, त्याचवेळेस झाडावर लागलेल्या हिरव्या रंगाच्या त्या बियांचे गुच्छही झाडावर असतात. त्यामुळेही झाड हिरवेगार दिसते. ही माहिती घेतल्यानंतर आपण आजूबाजूला पाहू लागतो आणि उद्यानाच्या पलीकडच्या कंपाऊंडमध्येच आपल्याला वावळ्याचे दर्शन होते.
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो तो स्ट्रँगंलर फायकस किंवा फायकस बेंगॉलेन्सिस. त्याला स्ट्रँगलर म्हणजे गळा आवळणारा. बहुतांश ठिकाणी तो माड किंवा ताडाच्या झाडाच्या आजूबाजूला पाहायला मिळतो. फिरोजशहा मेहता उद्यान आणि कमला मेहता उद्यानाकडून खाली जाणाऱ्या रस्त्यावरही तो अनेक ठिकाणी दिसतो. एवढेच काय तर अगदी शहर आणि गावातही अनेक ठिकाणी सहज पाहायला मिळतो. एक झाड मध्यभागी उभे असते. त्यावर आलेल्या पक्ष्याच्या विष्ठेतून आलेल्या बीने त्या झाडावरच किंवा त्याखाली कुठेतरी मूळ धरलेले असते. त्यानंतर धृतराष्ट्राने भीमाला कवेत घेण्याच्या केलेल्या प्रयत्नात पुतळा जसा चक्काचूर झाला, त्याचप्रमाणे ते मूळ झाडही गतप्राण होते.. आणि हा फायकस जोरदार वाढतो. त्यामुळेच त्याला स्ट्रँगलर फायकस म्हणतात. या फिरोजशहा मेहता उद्यानालाच लागून एका पारशी इसमाची मोठी वाडी आहे. या वाडीत अवाढव्य वाढलेले वटवृक्ष त्याच्या भल्यामोठय़ा पारंब्यांसह पाहायला मिळतात. मलबार हिलवरील अशाच एका भल्यामोठय़ा पारंब्या असलेल्या वटवृक्षाने मुंबई विद्यापीठाच्या बहिशाल शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या ‘वृक्षराजी मुंबईची’ या ग्रंथाच्या मुखपृष्ठावर झळकण्याचा मान मिळवला आहे. पण आता आपण तिथे गेलो तर केवळ पारंब्याच पाहायला मिळतात, ज्या सोसायटीच्या आवारात तो आहे, त्यांनी त्याच्या फांद्याच छाटल्या आहेत..
आपण पुढे जातो आणि उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचण्यापूर्वीच एक मोठा वृक्ष दिसतो. हाताच्या पंज्यासारखी रचना असलेली सात पाने हे त्याचे वैशिष्टय़ म्हणून त्याचे नाव सप्तपर्णी. त्याला सातवीण असेही म्हणतात. त्याचे शास्त्रीय नाव अल्स्टोनिया स्कोलॅरिस. १६८५ ते १७६० या कालावधीत एडिन्बर्ग विद्यापीठातील प्रा. अल्स्टोन यांनी त्याच्यावर भरपूर अभ्यास केला. त्यामुळे त्यांचे नाव त्याला देण्यात आले. फळा किंवा पाटीच्या कडांसाठी त्याच्या लाकडाचा वापर केला जात असे. त्यावरून त्याला अभ्यास करणारा तो स्कॉलर यावरून स्कोलॅरिस हे नाव जोडले गेले..
मेहता उद्यानाच्या एका बाजूने आपण पुढे जातो, त्यावेळेस एक आश्चर्य पाहायला मिळते. या उद्यानाचे कुंपण चक्क आत घेऊन एका झाडाचे खोड वाढले आहे. आता हे कुंपण या खोडाच्या आत सामावलेले आहे. झाडे एकूणच आजूबाजूच्या परिस्थितीला कशी सामोरे जात स्वतमध्ये बदल घडवतात, त्याचे हे अप्रतिम उदाहरणच आहे.
याच उद्यानाच्या एका बाजूला चंदनाचे झाडही पाहायला मिळते. सध्या ते तसे लहान आकाराचेच आहे. फुलोरा अगदी अलीकडे येवून गेल्याने आता त्याला लहान आकाराची फळेही लागलेली दिसतात. मात्र आपल्याकडच्या चंदनाच्या खोडाला फारसा वास येत नाही, असा अनुभवही आपल्याला डॉ. रंजन देसाई सांगतात. अधूनमधून एखादा मुचकुंद, कनकचंपा, औदुंबरही नजरेस पडत असतात.. आपण कमला मेहता उद्यानात प्रवेश करतो. समोरच बेहडय़ाचे मोठे झाड नजरेस पडते. त्याचे तेल केशवर्धक मानले जाते. तर आवळा, बेहडा आणि हिरडा या त्रिफळा चुर्णातील तिघांमध्ये त्याचा समावेश होतो. कातडे कमावण्याच्या प्रक्रियेतही त्याचा वापर केला जातो. त्यानंतर मात्र आपण आपल्याकडील दोन आश्चर्ये पाहतो. त्यातील पहिल्याचे नाव एंटेरोलोबीयम स्कायक्लोस्पर्मम त्याला हत्तीकान किंवा हस्तकर्णी असेही म्हणतात. कमला मेहता उद्यानाच्या एका कोपऱ्यात मुंबईतील हे दुर्मिळ झाड उभे आहे. त्याचा आवाकाही मोठा आहे. असे एक झाड राणीच्या बागेत तर आणखी एक जेकेग्रामसमोर आहे. त्याच्या खोडामध्ये सर्वत्र मोठय़ा आकाराची ढोली पाहायला मिळते..
..आता आपण मलबार हिल उतरू लागतो. खालच्या दिशेने उतरताना एका बाजूला वाढलेल्या रानात लालजर्द रंगातील बारकिशी फळे आपले लक्ष वेधून घेतात. त्याचे नाव फायटूलाका असल्याची माहिती सर सांगतात. याचा वापर होमिओपथीच्या औषधांमध्ये केला जातो. दुसऱ्या आश्चर्याचे नाव मायरिओझायलम बाल्समम. याला पायमोज्याचे झाड असेही म्हणतात. या झाडाचा फुलोरा अगदी अलीकडेच येवून गेला. आता पायमोज्याप्रमाणे लागलेली फळे पाहायला मिळतात. या फळांचा आकार पायमोज्याप्रमाणे दिसतो. मुंबईतील हे एकमेव झाड सर्वप्रथम प्रकाशात आणले ते डॉ. शरदिनी डहाणूकर यांनी. त्याला पायमोज्याचे झाड हे नावही त्यांनीच दिले. मलबार हिलचा फेरफटका संपवून आपण मग मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट परिसराकडे जाण्यास निघतो.
विद्यापीठाच्या फोर्ट परिसरात स्टँडर्ड चार्टर्ड बँकेसमोर असलेल्या उत्तर प्रवेशद्वाराशीच उभा आहे, क्रायसोफायलम म्हणजेच स्टार अ‍ॅपल.
अमेरिकन एक्सप्रेसच्या फोर्ट येथील इमारतीजवळही असेच एक मोठे झाड पाहायला मिळते. त्याचे फळ कापल्यानंतर त्यात चांदणीसारखा आकारा पाहायला मिळतो म्हणून त्याला स्टार अ‍ॅपल म्हणतात. खरे बहरलेले सौंेदर्य मात्र विद्यापीठाच्या आवारात मध्यभागी बगिच्यात पाहायला मिळते. त्याचे नाव अ‍ॅमर्स्टशिया त्याला हेवन्स ट्री किंवा मराठीत उर्वशी असेही म्हणतात. १८०१ साली मुंबईत आलेल्या स्पॅनिश मिशनरी लेडी अमर्स्टशिया यांनी हे झाड बोलिव्हियातून येथे आणले. म्हणून त्याला त्यांचेच नाव देण्यात आले. वरून खाली आलेले फुलांचे घोस अशी त्याची मोहक रचना असते. याचा बहर अनुभवणे हा एक अवर्णनीय आनंद सोहळाच असतो.. खरोखरच स्वर्गीचे सौंदर्य भूवरी यावे!
विद्यापीठाच्याच आवारात सिताअशोकही फुललेला आहे. एरवी आसुपालव या सरळसोट वाढलेल्या वृक्षालाच आपण अशोक म्हणतो आणि मोकळे होतो. फुललेला सिताअशोक तर आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, राणीची बाग आणि एलआयसीच्या मुख्यालयाच्या बाहेरही पाहायला मिळतो. तर एका कोपऱ्यात स्टक्र्युलिया फिटिडा म्हणजेच जंगली बदामही फुललेला दिसतो. त्याचा कुबट वास सर्वत्र भरून राहिलेला असतो.. पण फेरफटक्यानंतर लक्षात राहतो तो मात्र स्वर्गीय सौंदर्याचा अनुभव देणारा ऊर्वशी!
हा मुंबईचा फुलोरा पाहायचा असेल तर मुंबई विद्यापीठाच्या बहिशाल शिक्षण विभागातर्फे चालविल्या जाणाऱ्या वृक्षसौंदर्याचा रसास्वाद या अभ्यासक्रमात सहभागी व्हावे लागेल. अधिक माहितीसाठी संपर्क (सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत) ६५९५२७६१ किंवा ६५२९६९६२.
vinayakparab@gmail.com

वसंत येता अंगणी..
वसंत ऋतूची चाहूल लागली आहे.. सारा आसमंत जणू सज्ज झालाय त्या मनोहारी ऋतूच्या स्वागताला..वृक्षवल्ली, तरुवेली, पशुपक्षी सारे या आनंदनिधानात सहभागी होण्यासाठी आतूर झाले आहेत.. वसंत.. मन प्रफुल्लीत करणारा, मनाला सतेज करणारा.. त्याच्या स्वागतासाठी सज्ज झालेली मंडळी नुकतीच पाहायला मिळाली बोरिवली पश्चिम येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानामध्ये.. ही मंडळी म्हणजे तरु-वेलींवर फुललेली विविध रंगी-आकाराची फुले.. या सुमनांनी केलेली विविध रंगांची उधळण मन मोहून तर टाकतेच शिवाय आपल्या आयुष्यालाही एक गहिरा अर्थ देते.. माळीदादांनी नीट निगा राखलेल्या उद्यानातील ही फुले म्हणजे संपन्न कुटुंबात लाडाकोडात वाढलेली खटय़ाळ मुलेच जणू.. पण रानावनात उघडय़ा- वाघडय़ावर उमलणाऱ्या, भटक्यांचा मार्ग सुशोभित करणाऱ्या रानफुलांकडे देखील आपण तितकेच गहिरेपणाने पाहायला हवे.. त्यांच्या रंगांमध्ये चिंब व्हायला हवे.. असे करेल तोच खरा निसर्गप्रेमी.. छाया : समीर परांजपे