Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९

काँग्रेसमधील बंडोबा आक्रमक झाले !
रोहिदास पाटील समर्थकांकडून विलासरावांच्या पुतळ्याचे दहन ’ अंतुले व पुंगलिया यांना वाढता विरोध

मुंबई, २५ मार्च / खास प्रतिनिधी

धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आल्याने आमदार रोहिदास पाटील यांच्या समर्थकांनी आज धुळ्यात काँग्रेस पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी करीत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे दहन केले. दुसरीकडे केंद्रीय अल्पसंख्याक खात्याचे मंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्या विरोधात अलिबागचे आमदार मधुकर ठाकूर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

वरुण गांधी ‘ऑन डिमांड’
मुंबई, २५ मार्च/प्रतिनिधी

‘हिंदूंच्या विरोधात ज्या मुस्लिमाचा हात उठेल तो हात कापून टाकू’ असे वादग्रस्त विधान करणाऱ्या वरुण गांधी यांच्यावर कारवाई व्हायला हवी, असे एनडीएच्या घटक पक्षांमधील सगळ्यांचेच म्हणणे असताना व पंतप्रधानपदाचे दावेदार असलेल्या लालकृष्ण अडवाणी यांनीही वरुणच्या विधानाची पाठराखण करण्याची हिंमत दाखविलेली नसताना महाराष्ट्रातील अनेक भाजप उमेदवार मात्र वरुण गांधी यांनी त्यांच्या प्रचाराला यावे यासाठी प्रदेश कार्यालयाकडे संपर्क साधत आहेत.

उद्धव यांच्या निर्णयामुळे डावखरेंचा डाव फसला !
ठाणे, २५ मार्च/प्रतिनिधी

पुढील काही महिन्यांत होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिल्या जात असलेल्या ठाणे जिल्ह्यातील लोकसभेच्या चारही जागांचे निकाल काय लागतील, हे छातीठोकपणे आज कुणीच सांगू शकत नाही एवढी चुरस या निवडणुकीत आतापासून निर्माण झाली आहे. वरील पाश्र्वभूमीवर ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निश्चित करीत असताना ऐनवेळी शिवसेनेने विद्यमान खासदार आनंद परांजपे यांना कल्याणची सुभेदारी आणि विजय चौगुले यांना ठाण्याची उमेदवारी दिली. शिवसेना नेतृत्वाने घेतलेले हे देखील नेकेपणाने आजमितीस सांगता येत नाही. अर्थात या दोन निर्णयामुळेच कोणालाही ‘वॉकओव्हर’ नाही हे स्पष्ट झाले आहे.

विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्यावर विलासराव-अशोक चव्हाण यांच्यात एकमत
मुंबई, २५ मार्च/ खास प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती केल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस पुरती जखडली गेली असून शरद पवार यांनी रामदास आठवले यांची उमेदवारी कौशल्याने काँग्रेसच्या गळ्यात मारली असली तरी शिर्डी मतदार संघातील काँग्रेस पदाधिकारी आठवले यांना निवडून आणण्याची जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाहीत.

मुलांचा जाहीरनामा
सतीश टोणगे
कळंब, २५ मार्च

लहान मुले काही मतदार नाहीत. मग निवडणुकांशी त्यांचा काय संबंध? म्हणूनच पक्षोपपक्षांच्या जाहीरनाम्यांमध्ये, वचननाम्यांमध्ये त्यांच्या प्रश्नांची उपेक्षाच होते. ‘बालहक्क अभियान’ संघटनेने मात्र अलीकडेच एक जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, मुलांच्या हक्कासाठी विचार करूनच मतदान करा असे आवाहन त्यात करण्यात आले आहे. निवडणुका आणि जाहीरनामे यांचा निकटचा संबंध. स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजवर झालेल्या निवडणुकांमध्ये नाना आश्वासने, वचने दिली गेली.

सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक म्हणतात.. काहीही करा, मात्र पाणी द्या!
मुंबई, २५ मार्च / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु होताच उपनगरात पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे. आतापासूनच मतदार उमेदवारांना याबाबतीत प्रश्न विचारत आहेत. याचे पडसाद आज महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. निवडणुकीच्या काळात पाणी टंचाईची तक्रार येऊ देऊ नका, असे आदेश स्थायी समिती अध्यक्षांनी प्रशासनाला दिले तर सत्ताधारी शिवसेना-भाजप मुंबईकरांना पुरसे पाणी देण्यास अपयशी ठरली असून मुंबईकरांचे कोटय़वधी रुपये अनावश्यक योजनांवर खर्च करण्यात येत आहेत, असा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभात्याग केला.

काँग्रेसला लागेल आधाराची गरज - पवार
नवी दिल्ली, २५ मार्च/पी.टी.आय.

निवडणुकीनंतर संसदेत बहुमत प्राप्त करण्यासाठी काँग्रेसला डावे किंवा स्थानिक पक्षांचा आधार घ्यावा लागेल, असे मत केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. डाव्या पक्षांच्या मदतीशिवाय चार वर्षे स्थिर सत्ता राबविणे अशक्य असल्याचे विसरता कामा नये, असेही पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले.

मावळच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत पेच !
मुंबई, २५ मार्च / खास प्रतिनिधी

मावळ मतदारसंघातील उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसपुढे पेच निर्माण झाला आहे. आझम पानसरे यांना उमेदवारी द्यावी म्हणून पक्षातील मुस्लिम नेते आक्रमक झाले आहेत. तर पक्षाने पनवेलचे नगराध्यक्ष प्रशांत ठाकूर यांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला असला तरी ते काँग्रेस सोडण्यास राजी नसल्याचे समजते.

मनमोहन हे कमजोर पंतप्रधान नाहीत-राहुल गांधी
नवी दिल्ली, २५ मार्च/पी.टी.आय.

काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात पुढील पंतप्रधान म्हणून प्रतिबिंबित केलेले मनमोहनसिंग हे आजपर्यंतचे कमकुवत पंतप्रधान असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते व पंतप्रधानपदाचे दावेदार लालकृष्ण अडवाणी यांच्या सदर वक्तव्यावर काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी प्रचंड टीका केली आहे. मनमोहनसिंग हे निश्चितच कमकुवत पंतप्रधान नाहीत, कारण कंदाहार विमान अपहरण प्रकरणी इतर नेते जसे दहशतवाद्यांसमोर झुकले तर ते काही झुकलेले नाहीत असा शालजोडीतला प्रहार राहुल गांधी यांनी केला आहे. मनमोहन यांनी मागील पाच वर्षांंमध्ये खूप काही मिळविले आहे. देशाच्या विकासाचा दर वाढवून त्यांनी देश वेगवान ठेवला आहे. मुंबई हल्ल्यानंतर त्यांनीच पाकिस्तानला नमते घेण्यास भाग पाडले आहे. अमेरिकेसोबत नागरी अणुऊर्जा करार करून त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरही देशाची प्रतिमा उज्ज्वल केली आहे. हे पाठच्या कोणत्याही सरकारला जमले होते काय?, असा सवालही राहुल गांधी यांनी केला आहे. काही वेळा टीका करणे खूप सोपे असते, पण शांत राहून अनेक गोष्टी करून दाखविणे खूप अवघड असते. आपल्या मते ते मुळीच कमजोर नाहीत, माझा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे, असेही ते अखेरीस म्हणाले.

राग आणि वैमनस्याचे पुरस्कर्ते होऊ नका, राहुलचा वरुणला सल्ला..
पाँडिचेरी, २५ मार्च/वृत्तसंस्था

सोनिया गांधी आणि प्रियांका यांच्यानंतर आता राहुल गांधी यांनीही वरुण गांधी यांच्या निवडणूक प्रचार सभेतील वक्तव्यांबाबत नाराजी व्यक्त केली असून जनतेमध्ये राग आणि विद्वेश पसरविण्याचे धनी होऊ नका असा सल्ला दिला आहे. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रथमच प्रसारमाध्यमांसमोर बोलताना राहुल गांधी यांनी वरुण यांनी केलेली वक्तव्ये पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसला, असे म्हटले आहे. वरुण स्वत: तसा नाही. विद्वेष आणि तिरस्काराचे राजकारण करणे त्याला मुळात आवडत नाही. असे असूनही तो असे का बोलला हाच प्रश्न पडतो, असेही राहुल गांधी म्हणाले. विद्वेष आणि राग तुम्हाला आंधळे बनवतो असे लहानपणापासून आम्ही शिकत आलेले आहोत. वरुणही तेच शिकला आहे. पण अर्थात तो जे बोलला ते त्याचे विचार आहेत. अर्थात ते बरोबर नाहीत. आपण स्वत: लिट्टेचे पुरस्कर्ते नाहीत. कारण याच संघटनेने माझ्या वडिलांना ठार मारले आहे. पण श्रीलंकेत तामीळ रहिवाशांचे हित जपले गेले पाहिजे असे मात्र आपणास आवर्जून वाटते, असेही ते म्हणाले.

टी. चंद्रशेखर गुंटूरमधून
मुंबई, २५ मार्च / खास प्रतिनिधी

सनदी सेवेचा राजीनामा देऊन राजकारणात सक्रिय झालेले टी. चंद्रशेखर हे प्रजाराज्यम पक्षाच्या वतीने आंध्र प्रदेशमधील गुंटूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविणार आहेत. चिरंजीवी यांच्या प्रजाराज्यम पक्षाला आंध्र प्रदेशमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेस व तेलगू देशमसमोर या पक्षाने आव्हान उभे केले आहे. टी. चंद्रशेखर हे गुंटूरमधून आपले नशीब आजमिवणार आहेत. टी. चंद्रशेखर हे चिरंजिवी यांचे निकटवर्तीय मानले जातात. गेले तीन महिने निवडणूक लढण्याच्या दृष्टीने चंद्रशेखर यांनी तयारी केली आहे. प्रजाराज्यम, काँग्रेस व तेलगू देशम अशा तिरंगी लढतीत चंद्रशेखर यांना विजयाची खात्री आहे.

मुरलीमनोहर जोशी ‘करोडपती’ उमेदवार
वाराणसी, २६ मार्च / पी.टी.आय.

भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी ‘करोडपती’ उमेदवार आहेत. डॉ. जोशी यांनी उमेदवारी अर्जासोबत संपत्तीचे विवरण सादर करताना त्यांची संपत्ती ५ कोटी ४५ लाख रुपयांची असल्याचे शपथपत्र दिले आहे. ही संपत्ती त्यांच्या आणि पत्नीच्या नावे असून यात रोख, कर्जरोखे, घर आणि फ्लॅटचा समावेश आहे. डॉ. जोशी यांनी शपथेवर दिलेल्या माहितीनुसार ५० हजार रुपये रोख, बँक, वित्तीय संस्था आणि गैर बँकिंग संस्थांमधील १.६६ कोटी रुपयांच्या ठेवींचाही याच समावेश आहे. डॉ. मुरली मनोहर जोशी उच्च विद्याविभूषित असून त्यांनी १९५८ साली अलाहाबाद विद्यापीठातून डी. फिल. केल्यानंतर व्याख्याताची नोकरी पत्करली. जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा बालपणापासून संबंध आहे. त्यांच्या विरुद्ध रायबरेली कोर्टात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी १९९२ साली फौजदारी खटला प्रलंबित आहे, अशी माहिती त्यांनी शपथपत्रात दिली आहे. डॉ. जोशी यांच्याजवळ खाजगी मालकीचे ३.७५ लाख रुपयांचे दागिने तर पत्नीजवळ ५.१० लाख रुपयांचे दागिने आहेत. अलाहाबादेतील त्यांच्या मालकीच्या फ्लॅटची किंमत २ कोटी २६ लाख तर पत्नीच्या नावे गाझियाबादेत असलेल्या फ्लॅटची किंमत ३८ लाख रुपये असून त्यांच्यापाशी दोन कार आणि एक जीप आहे.

भाजप-बसपा कार्यकर्त्यांत टीव्ही शोमध्ये हाणामारी
लखनौ, २५ मार्च/पी.टी.आय.

एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या निवडणूकविषयक ‘लाईव्ह शो’ दरम्यान भाजप आणि बसप यांच्या समर्थकांमध्ये काल हाणामारी होऊन त्याची परिणती हा कार्यक्रम उधळण्यात झाली. या प्रकारात पाचजण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. स्टार न्यूजतर्फे ‘कौन बनेगा प्रधानमंत्री’ या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण काल रात्री येथील राममनोहर लोहिया पार्कवर सुरू होते. त्यात सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. महापौर दिनेश शर्मा (भाजप) तसेच सपाचे नेते ओमप्रकाश सिंह आणि कॉँग्रेसचे प्रवक्ते अखिलेश प्रताप सिंह हे या कार्यक्रमास उपस्थित होते. चर्चा सुरू होताच भाजप, आणि बसप या पक्षांच्या समर्थकांमध्ये हाणामारी सुरू झाली. हे कार्यकर्ते लाठय़ाकाठय़ांसह ‘तयारीनिशी’ आले होते, असे ‘स्टार न्यूज’चे पंकज झा यांनी पी. टी. आय. ला सांगितले. याप्रकरणी योग्य त्या कारवाईसाठी आपल्या वाहिनीतर्फे या घटनेच्या चित्रीकरणाची सीडी निवडणूक आयोगास सादर करण्यात येईल, असे ते म्हणाले.

लालूप्रसाद आणि मुलायम यांच्यात हातमिळवणीची शक्यता-अमरसिंह
नवी दिल्ली, २५ मार्च/पी.टी.आय.

उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये काँग्रेसला बराच त्रास दिल्यानंतर समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंह यादव आणि राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्यामध्ये हातमिळवणी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जागा लढविण्याबाबत व काही एकमेकांच्या पक्षांना सोडण्याबाबत त्यांच्यात करार होण्याची शक्यताही जमेस धरली जात आहे. लालू व मुलायम एकत्र येतीलच. पण बरोबर रामविलास पासवान आल्यास ते आणखी सोन्याहून पिवळे होईल, अशी प्रतिक्रिया सपाचे सरचिटणीस अमरसिंह यांनी व्यक्त केले. बिहार या लालूप्रसाद यांच्या राज्यात काँग्रेस पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली आहे त्यातील बऱ्याच जणांबाबत लालू हे नाराज आहेत. बुधवारी सकाळी याच संदर्भात त्यांचे सपाचे नेते मुलायमसिंह यांच्यासोबत दूरध्वनीवरून संभाषण झाले. त्यानंतर अमरसिंह यांनी हे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात त्याला मोठे वजन प्राप्त होत आहे.