Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
लोकमानस

स्कॉलरशिपच्या बुद्धिमत्ता चाचणी प्रश्नपत्रिकेतही गोंधळ

 

‘शिष्यवृत्ती परीक्षेत चुकीचे प्रश्न’ हे दिलीप दळवी यांचे पत्र (४ मार्च) वाचले. त्यांचे म्हणणे योग्य आहे. गणित व भाषा प्रश्नपत्रिकेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चुका आहेतच; शिवाय बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक २१ मध्येही चूक आहे. तुटक रेषांनी घडी घातलेली षट्कोनी आकृती चार भागात दुमडून ठराविक ठिकाणी कापल्यास व नंतर संपूर्ण उलगडल्यास ती कशी दिसेल, हा प्रश्न होता आणि चार पर्यायी उत्तरांमधून अचूक पर्यायी उत्तर क्रमांक निवडायचा होता. उत्तर क्रमांक ३ व ४ दोन्ही सारखेच दिसत असल्यामुळे दोन्ही पर्याय अचूक वाटतात. त्यामुळे नक्की कोणता अचूक उत्तर पर्याय आहे, हे ठरवताना विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला.
विद्यार्थ्यांनी प्रश्न क्रमांक २१चे उत्तर पर्याय क्रमांक ३ किंवा ४ लिहिले असेल तर त्या विद्यार्थ्यांना त्या प्रश्नाचे दोन गुण मिळण्यास हरकत नाही. परीक्षा मंडळाने याचा योग्य विचार करून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे.
मंदार राजेंद्र घोगळे (विद्यार्थी), लोअर परेल, मुंबई

मॅरेथॉन विजेत्यांबाबत आयोजकांचा निरुत्साह
आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित स्टँडर्ड २००९ची मॅरेथॉन स्पर्धा मुंबईत १८ जानेवारी रोजी दिमाखात पार पडली. त्यामध्ये वरिष्ठ नागरिकांसाठीचा वयोगट ६५ वर्षांवरील होता, पण त्या स्पर्धेचे आयोजन स्पृहणीय वाटले नाही. या गटामध्ये मी अर्ध मॅरेथॉन (२१ कि.मी.) साठी नेहमीप्रमाणे उत्साहाने भाग घेतला. धावण्याचा मनसोक्त आनंद लुटला. २१ कि.मी.चा पल्ला २ तास ४ मि. ५९ से. मध्ये पार केली. पण स्पर्धा जिंकल्यावर कोणीही आयोजक पुढे सरसावला नाही! स्पर्धकांना व्यासपीठावर जाऊन विचारावे लागले की स्पर्धेचा विजेता कोण?
आयोजकांचा हा निरुत्साह पाहून स्पर्धक निराश होऊन निघून गेले. आयोजकांनी तब्बल चार आठवडय़ानंतर स्पर्धेचा निकाल पत्राद्वारे कळविला. त्यात मी पहिल्या क्रमांकाने स्पर्धा जिंकल्याचे घोषित करण्यात आले होते. त्यानंतर स्पर्धेनंतर चौथ्या आठवडय़ात माझे सुवर्ण पदक, मेरिट सर्टिफिकेट आणि पारितोषिक कुरिअरने घरपोच पाठविण्यात आले.
मात्र तोपर्यंत विजयाचा आनंद पार मावळून गेला होता. आयोजकांनी सुवर्णपदाकाच्या सन्मानाची चेष्टा केली. वरिष्ठ नागरिकाला असे दुखविणे अक्षम्यच म्हणावे लागेल. मला हे सुवर्ण पदक सहज परत करता आले असते, परंतु मी तसे केले नाही.
६६व्या वर्षी अर्ध मॅरेथॉन पहिल्या क्रमांकाने, कमी वेळेत पार केली, याचा आनंद गगनाला भिडणारा होता. माझे सर्व स्तरांवरील तरुण, वृद्ध, बालकांकडून खूप कौतुक झाले. सुवर्णपदकाने माझे जीवन सुवर्णमय, सफल झाले. एक नवीन अध्याय माझ्या जीवनात सुवर्णाक्षरात लिहिला गेला. अशा या सुवर्णपदकाचा सन्मान करणे योग्य नाही का?
महादेव समजिसकर, दहिसर, मुंबई

संगणकीकरणाने मतदार ‘बदलले’
नायगाव (दादर) परिसरात ६०-७० वर्षांपासून राहणाऱ्या आमच्या कुटुंबाने लोकसभेच्या किमान १०-११ निवडणुकांमध्ये मतदान केले आहे. मात्र आज आम्हाला आमचे हक्क-कर्तव्य बजावण्यासाठी नको त्या अर्जविनंत्यांच्या चक्रात अडकावे लागले आहे, याला कारण आधुनिकीकरण!
काही वर्षांपूर्वी निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्रे तयार करून घेतली होती. त्यावर मतदारांची छायाचित्रेही होती. मात्र विज्ञानयुगात आयोगाकडील संगणकांमधून मतदार ओळखपत्रांचा ‘डेटा’ ‘करप्ट’ झाला. परिणामी २००४ साली आम्हाला ओळखपत्रे दिलेली असूनही २००७ मध्ये पुन्हा नव्याने ओळखपत्रे देण्यात आली. परंतु माझ्या मुलाचे ओळखपत्र बदलले गेले नाही. यामुळे मी, पत्नी व सून यांची ओळखपत्रे क्रमाने व मुलाचे वेगळ्याच क्रमांकाचे झाले.
यासाठी मी वडाळा, सहकार नगर येथील संबंधित निवडणूक आयोग कर्मचाऱ्यास भेटलो असता त्याने सांगितले की, आमच्या संगणकावरील रेकॉर्ड नाहिसे झाल्याने व आता प्रत्येक मतदाराचे प्रत्येकी दोन फोटो आयोगाला हवे असल्याने दिलेले तीन फॉर्म भरून, त्यावर दोन फोटो लावून व त्यातील उजव्या फोटोवर सही करून तसेच हे अर्ज ‘अ‍ॅटेस्ट’ करून आमच्याकडे द्यावेत. यात पुन्हा गोंधळ असा की सुनेचा अर्ज भरण्यासाठी फॉर्म मिळाला नाही. याचे कारण तिचा रेकॉर्ड शिल्लक राहिला आहे. याउप्पर तक्रार करायची असल्यास मंत्रालयातील निवडणूक आयुक्तांकडे तक्रार करावी, अशीही सूचना आहे.
या सगळ्या गोंधळामुळे आमच्या चौघांमध्ये तीन सिरियलची ओळखपत्रे आहेत. शिवाय आमचा पिन कोड ४०००१४ असा असूनही फॉर्मवर तो ४०००१२ असा दिला आहे. २००७ मध्ये तो ४०००१५ असा छापला होता. या साऱ्या पाश्र्वभूमीवर काही मूलभूत मुद्दे मनात उभे राहिले-
१) संगणकावरील रेकॉर्ड नाहीसे कसे होते?
२) रेकॉर्डचा रोज ‘बॅकअप’ का घेतला जात नाही?
३) संगणकावरील व्हायरससाठी योग्य ती उपाययोजना का केली जात नाही?
४) मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी व्यापक प्रयत्न होत असल्याची दवंडी पिटली जात असताना मतदारनोंदणीच्या प्रवेशद्वारावरच एवढे सव्यापसव्य करावे लागते, ही जबाबदारी कोणाची?
सु. ल. अभ्यंकर, दादर, मुंबई

गुढीपाडव्याची देणगी ‘कडुनिंब पंचांग गोळी’
गेल्या काही वर्षांपासून गुढीपाडव्यानिमित्त भव्य स्वागतयात्रांचे आयोजन केले जात आहे. संस्कृतीसंवर्धनाच्या दृष्टीने हा चांगला प्रयत्न आहे. यालाच जोड म्हणून आणखी एक गोष्ट करता येईल. ‘कडुनिंब पंचांग गोळी’चे सेवन करण्याच्या घरगुती प्रथेला सार्वजनिक कार्यक्रमांतही स्थान देता येईल.
या गोळीच्या सेवनामागची मूळ संकल्पना अशी आहे की, चैत्रापासून वातावरणात उष्णता वाढू लागते. अशा हवामानात विषाणूंचा उपद्रव होतो. त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी ‘कडुनिंब पंचांग गोळी’चा उपाय करतात. कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे (लाल तुरा असलेली) चूर्ण करून त्यात हिंग, मीठ, मिरे, ओवा, गूळ मिसळून त्याची चिंचेबरोबर गोळी करावी व ती नववर्षदिनी अन्य काहीही खाण्यापूर्वी सेवन करावी, हे परंपरेने सांगितले आहे. या गोळीच्या औषधी उपयोगास मसूरच्या ‘अन्न सुरक्षा प्रयोगशाळे’नेही मान्यता दिलीआहे. भारतात सहज व विपुल प्रमाणात आढळणाऱ्या या वनस्पतीबाबत दृष्टिकोन तयार करण्याचे काम या निमित्ताने करता येईल.
स. भि. काळे, गोरेगाव, मुंबई