Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९

कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी-जनसुराज्य शक्ती आघाडीच्या उमेदवांराना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार बुधवारी कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित नेत्यांनी एकतेचा नारा दिला.

मंडलिक व महाडिक यांच्यापैकी लढणार एकच
कोल्हापूर, २५ मार्च / विशेष प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या दगाबाजीचा वचपा काढायचा असेल तर मंडलिक आणि महाडिक अशा दोघांनी स्वतंत्र लढून उपयोग होणार नाही. त्यासाठी कोणीतरी एकाने लढले तर कोल्हापूरच्या राजकारणाचा चेहरा बदलू शकतो या मानसिकतेवर बुधवारी मंडलिक आणि महाडिक हे दोघे आले आहेत. तथापि चर्चेच्या तीन फेऱ्यानंतरही अद्याप कोणी लढायचे आणि कोणी थांबायचे याचा निर्णय होऊ शकला नाही. यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होण्यासाठी आणखी किमान चोवीस तासांचा अवधी लागणार आहे.

मंडलिक यांनी जिल्ह्य़ाचे नेतृत्व करण्यासाठी पुन्हा यावे- मुश्रीफ
कोल्हापूर २५ मार्च / प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जिल्ह्य़ाचे नेतृत्व करण्यासाठी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी वेगळा विचार न करता पुन्हा यावे. त्यांच्यासाठी जागा अबाधित आहे, धनंजय महाडिक यांचे भवितव्य राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच फुलणार असल्यामुळे त्यांनीही वेगळा विचार न करता पुन्हा आमच्यात यावे असे आवाहन आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना राज्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अधिकृतपणे घोषित झाल्यानंतर धैर्यप्रसाद मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा हा पहिलाच मेळावा संपन्न झाला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लेमनराव निकम हे होते.

साखर र्निबधांमुळे ऊस उत्पादकांच्या खिशाला कात्री
राजेंद्र जोशी, कोल्हापूर, २५ मार्च

लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मतदारराजाचा रोष टाळण्यासाठी केंद्र शासनाने साखरेच्या साठय़ावर र्निबध आणले आहेत. यामुळे साखरेच्या बाजारातील तेजीचा लाभ उठवित यंदाच्या हंगामात उसाला चांगला दर मिळेल अशा अपेक्षेत असलेल्या ऊस उत्पादकांना एक मोठा झटका बसणार असून अंतिम बिलाअखेरीस त्याचा दराचा अंदाज टनाला ३०० रुपयाने चुकेल असे प्राथमिक चित्र आहे. निवडणुका तोंडावर आल्या की सत्ताधाऱ्यांना महागाईचा रोष पदरात घ्यावा लागतो. आपल्याकडे ही महागाई मोजण्यासाठी साखरेचा दर ही सर्वसाधारण संकल्पना आहे.

सोलापूरला कर्नाटक सीमेवर १२ पोलीस तपासणी केंद्रे उभारणार
सोलापूर, २५ मार्च/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुका खुल्या व निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी सोलापूर जिल्ह्य़ात कर्नाटक सीमेवर बारा ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात येत आहेत. यात परप्रांतातून अवैध दारु, शस्त्रास्त्रे येऊ नयेत म्हणून खास खबरदारी घेण्यात येणार आहे. दरम्यान, निवडणूक प्रचारासाठी शासकीय मालमत्तेचा वापर झाल्यास संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्याला जबाबदार धरुन कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी दिला आहे.

आराखडय़ातील १७४ भूखंडांवरील आरक्षणे उठवली ऐनवेळच्या ठरावांनी
गतवेळच्या सांगली महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची प्रकरणे

सांगली, २५ मार्च / प्रतिनिधी

सांगली महापालिकेतील गत काँग्रेस सत्ताधाऱ्यांनी विकास आराखडय़ातील तब्बल १७४ भूखंडांवरील आरक्षणे ऐनवेळच्या ठरावात एकाच सभेत उठवल्याचे प्रकरण उघडकीस आले असून हे सर्व भूखंड शाळा, क्रीडांगणे व बगीचा आदींसाठी राखीव होते. ही आरक्षणे उठविण्यासाठी कोटय़वधी रुपयांचे ‘डिलिंग’ झाल्याचेही बोलले जात आहे. महापालिकेची सत्ता काँग्रेसकडे असताना भूखंड घोटाळा, बीओटी घोटाळा अशी अनेक वादग्रस्त प्रकरणे उघडकीस आली होती.

आत्याचा खून करणाऱ्या भाच्यास जन्मठेपेची शिक्षा
माळशिरस, २५ मार्च/ वार्ताहर

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने बालविधवा आत्याचा खून केल्या प्रकरणी दोषी ठरलेल्या संतोष गायकवाड या भाच्यास येथील अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एन. दिक्कतवार यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कारुंडे (ता. माळशिरस) येथील संतोष मारुती गायकवाड (वय ३४) याने आपली बालविधवा आत्या शेवंता जनार्धन गायकवाड (वय ७२) यांना दि. १२ ऑक्टोबर ०७ रोजी सायंकाळी दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र त्यांनी नकार दिल्याने संतोषने शेवंताबाईंना आदळून आपटून खाली पाडून, पोटावर बसून धारदार डागणीने डोक्यावर कपाळावर मारहाण केली. या मारहाणीत त्या जागीच ठार झाल्या. नातेपुते पोलीस ठाण्याचे तत्कालीन उपनिरीक्षक याकूब पिंपरी यांनी आरोपीस तत्काळ अटक करून, दोषारोप पत्र दाखल केले होते. सरकारच्या वतीने ९ साक्षीदार तपासले. त्यामध्ये राधाबाई गायकवाड व डॉ. हेमंत दीक्षित यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. पुराव्यात दोषी ठरलेल्या संतोष गायकवाड यास न्या. दिक्कतवार यांनी जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे अ‍ॅड. एस. व्ही. बर्गे तर आरोपीतर्फे अ‍ॅड. एस. बी. पाटील यांनी काम पाहिले.

पत्नीच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्यास पाच वर्षे कैद
इस्लामपूर, २५ मार्च / वार्ताहर

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या गवळेवाडी (ता. शिराळा) येथील सुनील शिवाजी शिंदे (वय २५) याला येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश डी. पी. खोत यांनी पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. सुनील याचा गवळेवाडीतीलच मामाची मुलगी अर्चना हिच्याशी मे २००६ मध्ये विवाह झाला होता. या विवाहानंतर हे दोघेही मुंबईला राहू लागले. सुनील हा अर्चनावर उगीचच संशय घेत होता. त्यातूनच या दोघांत वादही होत होते. दि. ५ मार्च २००७ रोजी मतदान करण्यासाठी म्हणून हे दोघेही गावी आले. मात्र सुनीलने पत्नीवर संशय घेऊन तिला मारहाण केली.

स्वामी समर्थाचा प्रकटदिन उत्सवसोहळा येत्या शनिवारी
अक्कलकोट, २५ मार्च/वार्ताहर

विश्वगुरू श्री दत्तात्रय अवतारी श्री स्वामी समर्थाचा प्रकटदिन उत्सवसोहळा चैत्रशुद्ध द्वितीया शनिवार दि. २८ मार्च रोजी भव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. श्री स्वामी समर्थ दत्ताचे अवतार मानले जातात. एका पौराणिक संदर्भानुसार, बहुधान्य संवत्सरे शके १०७१ चैत्रशुद्ध द्वितीयेला अश्विनी नक्षत्रावर गुरुवारी दुपारी महाभारतातील प्रसिद्ध हस्तिनापुराजवळील छेडी खेडेग्रामी धरणी दुभंगून स्वामी समर्थ प्रकटले, तो दिवस स्वामींचा प्रकट दिन मानला जातो. अद्भुत पद्धतीने प्रकटल्यानंतर स्वामी समर्थानी भारतभर भ्रमण करून प्राचीन प्रज्ञापुरी म्हणजेच अक्कलकोटनगरीत प्राचीन वटवृक्षाखाली चिरंतन निवास केला. त्यांच्या कृपेची आणि अस्तित्वाची अनुभूती भक्तजनांना आजही होते. वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थान हेच दत्त अवतारी स्वामी समर्थाचे मूळपीठ आहे. स्वामी समर्थाचा प्रकटदिन, उत्सव, पूजा, अभिषेक, नामसंकीर्तन आणि पारायणाने मोठय़ा भक्तिभावाने साजरा होणार आहे. हा सोहळा भव्य प्रमाणात साजरा व्हावा यासाठी देवस्थान अध्यक्ष बाळासाहेब इंगळे, सचिव सुभाष शिंदे, विश्वस्त विलास फुटाणे, आत्माराम घाटगे, महेश इंगळे, दयानंद हिरेमठ, सौ. ऊर्मिला सरदेशमुख आदी कार्यरत आहेत.

अनैतिक संबंधाच्या कारणावरून सांगोल्याजवळ शेतकऱ्याचा खून
सोलापूर, २५ मार्च/प्रतिनिधी

अनैतिक संबंध व शेतजमीन खरेदीच्या कारणावरून एका शेतकऱ्याचा तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून केल्याप्रकरणी प्रेयसी व तिच्या आई-बापासह सहाजणांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सांगोला तालुक्यातील घेरडीनजीक गेंड वस्तीजवळ बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. सदाशिव नामदेव गेंड (वय ४०, रा. गेंड वस्ती, सांगोला) असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याची प्रेयसी सखूबाई राजाराम माने, तिची आई भामाबाई माने, बाप राजाराम माने, तसेच पोपट माने, भारत माने व शिवा माने यांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाली आहेत. यापैकी एकालाही अटक झाली नाही. याबाबत मयत सदाशिव याची पत्नी कल्पना गेंड हिने दिलेल्या फिर्यादीनुसार मयत सदाशिव याचे सखूबाईबरोबर अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध होते. तसेच त्याने सखूबाईची आई भामाबाई हिच्या मालकीची शेतजमीन अलीकडेच खरेदी केली होती. परंतु त्यानंतर त्यांच्यात बिनसले होते.

तबलावादन परीक्षेत ऋत्विक भांबुरे प्रथम
सोलापूर, २५ मार्च/प्रतिनिधी

येथील सिद्धेश्वर प्राथमिक शाळेतील विद्यार्थी ऋत्विक गिरीश भांबुरे याने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या तबलावादन प्राथमिक परीक्षेत प्रथम क्रमांक पटकाविला. ऋत्विक भांबुरे यास विजय लिमकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल शिक्षण समितीचे अध्यक्ष आर. आर. अगाई, अप्पासाहेब वाकळे, वि. म. बुऱ्हाणपुरे, मुख्याध्यापिका बिराजदार यांनी त्यांचे अभिनंदन केले.

वेडाच्या भरात विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
गडिहग्लज, २५ मार्च / वार्ताहर

वेडाच्या भरामध्ये अत्याळ (ता. गडिहग्लज) येथील विवाहितेने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. स्ांगीता अमर घोरपडे (वय ३१) असे तिचे नाव आहे. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, की मयत सौ.संगीता ही मनोरुग्ण होती. काल रात्री जेवून घरातील सर्वजण झोपी गेल्यानंतर वेडाच्या भरात मध्यरात्री ती घरातून निघून गेली. स्वत:च्या माळरान नावाच्या शेतात असणाऱ्या विहिरीत उडी टाकून तिने आत्महत्या केली. हा प्रकार आज सकाळी लक्षात आला. मयताचा पती अमर धोंडिबा घोरपडे याने याबाबत गडिहग्लज पोलिसांत फिर्याद दिली. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल हरिभाऊ कांबळे करत आहेत.

उदयनराजेंच्या मातु:श्रींचे स्वामी समर्थाना साकडे
अक्कलकोट, २५ मार्च/वार्ताहर

सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विजयासाठी त्यांच्या मातोश्री कल्पनाराजे यांनी स्वामी समर्थाच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना केली. अक्कलकोट संस्थानची स्थापना उदयनराजे भोसले यांच्या पूर्वजांनी केली होती. स्वामी समर्थाच्या कृपेने अक्कलकोट राजघराण्याला वैभव प्राप्त झाले होते. त्या पाश्र्वभूमीवर छत्रपती शिवाजीमहाराजांचे १३ वे वंशज उदयनराजे भोसले यांच्या विजयासाठी साकडे घालण्यात आले आहे. यावेळी राजमातांचा सत्कार उपनगराध्यक्ष तथा वटवृक्ष देवस्थानचे विश्वस्त देवस्थानचे विश्वस्त महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आला.

‘कृष्णा’च्या जलसिंचन सेवकांना १५ टक्के पगारवाढ
कराड, २५ मार्च/वार्ताहर

शेतकऱ्यांच्या कष्टाला त्याचे दाम मिळवून देण्यासाठी कृष्णा साखर कारखान्याने १७ पाणीपुरवठा योजनांद्वारे राज्यात सर्वाधिक क्षेत्र स्वकर्तृत्वावर ओलिताखाली आणल्याचे समाधान ‘कृष्णा’ कारखान्याचे ज्येष्ठ संचालक मदनराव मोहिते यांनी व्यक्त केले. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या जलसिंचन विभागाच्या सेवकांना १५ टक्के वेतनवाढ दिल्याबद्दल या कर्मचाऱ्यांच्या वतीने संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, उपाध्यक्ष दयानंद पाटील, सिंचन विभागाचे व्यवस्थापक एस. के. भोईटे यांच्यासह संचालक मंडळाची उपस्थिती होती. मदनराव मोहिते म्हणाले की, पाणीपुरवठा योजना या खऱ्या अर्थाने कारखान्याच्या आधारस्तंभ असल्याने या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करून कारखान्याच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे. कारखान्यास जास्तीत जास्त ऊस उपलब्ध होण्यासाठी शेतकी व सिंचन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्यातून काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सुचविले.

धनादेश न वटल्याने थकबाकीदार महिलेस दंड व शिक्षा
कराड, २५ मार्च/वार्ताहर

कर्जाच्या वसुलीपोटी बँकेस दिलेले धनादेश न वटता परत आल्याप्रकरणी न्यायालयाने थकबाकीदार महिलेस दोषी ठरवून, तीन महिन्यांचा कारावास व धनादेशाची रक्कम दंडासहित भरणा करण्याचे आदेश दिले आहेत. कराड अर्बन को-ऑप. बँकेच्या कर्वे रोड पुणे शाखेच्या थकबाकीदार सौ. मनीषा प्रल्हाद काशिद यांनी कर्जाच्या वसुलीपोटी बँकेस दिलेले पाच लाख व आठ लाख रुपयांचे धनादेश न वटल्याने बँकेने सौ. काशिद यांच्याविरुद्ध पुणे येथील प्रथम वर्ग न्यायालयात निगोशिएबल एन्सट्युमेट अ‍ॅक्ट १३८ नुसार फिर्याद दाखल केली होती. यावर न्या. एन. ए. पठाण यांनी काशिद यांना दोषी ठरवून, साडेसात लाख व बारा लाख रुपये इतकी रक्कम दंडासहित बँकेत एक महिन्यात भरणा करावी तसेच प्रत्येकी तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. या खटल्यात बँकेच्या वतीने अ‍ॅड. के. एस. पाटील यांनी काम पाहिले.

विद्यार्थ्यांसाठी सोलापुरात दोन दिवस करियर मार्गदर्शन
सोलापूर, २५ मार्च/प्रतिनिधी

दहावी-बारावी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी सोलापुरात सेंट जोसेफ कान्व्हेंट शाळा माजी विद्यार्थी संघटनेतर्फे दि. २८ व २९ मार्च रोजी करियर मार्गदर्शनपर प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. नाशिकच्या कम्युनिटी अवरनेस डेव्हलपमेंट ग्रुप या संस्थेने विकसित केलेले हे प्रदर्शन सर्वासाठी खुले राहणार आहे. रेल्वे लाईन्समधील सेंट जोसेफ शाळेच्या सभागृहात चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन दि. २८ रोजी सकाळी ९.३० वाजता फादर जेम्स ल्युक यांच्या हस्ते होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष गिरीश स्वामी यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत सांगितली. प्रदर्शनाच्या ठिकाणी सायंकाळी ६.३० वाजता प्रफुल्ल चिकेरुर यांचे ‘जागतिक मंदी व करियरचे नियोजन’ या विषयावर दृकश्राव्य, सचित्र व्याख्यान होणार आहे.