Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९

मुंडे यांची कोंडी!
मुंबई, २५ मार्च/ प्रतिनिधी
भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांना ईशान्य मुंबई मतदारसंघाचे तिकीट नाकारून प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी व त्यांच्या ‘परिवाराने’ पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांच्यावर कुरघोडी केल्याचे चित्र वरकरणी दिसत असले तरी दिल्लीतील भाजपच्या एका बडय़ा नेत्याने महाजन यांच्यावर सूड उगवल्याचे बोलले जात आहे. लालकृष्ण अडवाणी यांना ईशान्य मुंबईतील उमेदवार निवडीचे सर्वाधिकार दिले असताना त्यांनी गडकरी यांच्या पारडय़ात वजन टाकल्याने राष्ट्रीय राजकारणात आपला दबदबा निर्माण करण्यात गोपीनाथ मुंडे हे अजून यशस्वी झाले नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. देशभरातील डझनभर भाजप नेत्यांच्या मुलाबाळांना पक्षाने उमेदवारीची खिरापत वाटली असताना प्रमोद महाजन यांच्या कन्येला डावलून दिल्लीतील नेत्यांनी पक्षपात केल्याची तक्रार भाजपचे काही कार्यकर्ते करीत आहेत.

आठवलेंची पवारांना सोडचिठ्ठी
शिर्डीतील उमेदवारीसाठी काँग्रेसशी युती
नवी दिल्ली, २५ मार्च/खास प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सोळा वर्षे साथ निभावल्यानंतर त्यांच्यापासून ‘विभक्त’ होत ज्येष्ठ नेते व खासदार रामदास आठवले यांच्या रिपाइंने लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी आज काँग्रेससोबत युती केली. आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत आठवले यांनी हा निर्णय घेतला. आठवले काँग्रेसच्या कोटय़ातून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. मात्र, उस्मानाबादमधून लोकसभेची निवडणूक लढण्याचा इरादा माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांना सोडून द्यावा लागणार आहे. उस्मानाबाद मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार असून आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कोणतीही अदलाबदल होणार नाही, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रात्री स्पष्ट केले.

मी आजारी असल्याचा प्रचार खोटा - जॉर्ज
मुजफ्फरपूर, २५ मार्च/पी.टी.आय.

मी आजारी असल्याचा पक्षाच्या काही नेत्यांकडून केला जाणारा प्रचार खोटा व दिशाभूल करणारा असून त्यामागे मला निवडणुकीतून डावलण्याचा या नेत्यांचा डाव आहे, असा आरोप लोकसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आलेले संयुक्त जनता दलाचे बंडखोर नेते जॉर्ज फर्नाडिस यांनी आज एका भरगच्च पत्रकार परिषदेत बोलताना केला.
‘‘तुमच्यासमोर मी धडधाकटपणे बसलो असून माझी प्रकृती चांगली आहे. मुजफ्फरपूर या माझ्या पारंपरिक मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी जनतेचे मत जाणून घेण्यासाठी मी येथे आलो आहे. मतदारसंघातील लोकांना भेटल्यानंतर मी माझा निर्णय जाहीर करणार आहे,’’ असे माजी संरक्षणमंत्री व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे माजी निमंत्रक असलेल्या फर्नाडिस यांनी सांगितले.
कॉँग्रेसच्या सांगण्यावरून तुम्हाला तिकीट नाकारण्यात आले हे खरे काय, या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘तसे असूही शकेल. कारण कॉँग्रेसच्या विरोधात माझा संघर्ष अजूनही चालूच राहणार आहे.’’
संयुक्त जनता दलाच्या उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढविणार काय या प्रश्नावर ते म्हणाले की, माझ्या हातांनी जो पक्ष मी वाढविला त्याला मी विरोध करणार नाही. पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर फर्नाडिस यांचे काल रात्री प्रथमच येथे आगमन झाले त्या वेळी समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.
जॉर्ज यांची दिशाभूल - नितीश
दरम्यान, जॉर्ज फर्नाडिस यांची पक्षाच्या काही नेत्यांकडून दिशाभूल केली जात असल्याची टीका बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली आहे. नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, जॉर्ज जे बोलत आहेत ते त्यांचे शब्द नाहीत. त्यांच्या बाजूला कोण बसले आहे हे तुम्हाला माहित आहे. तो गणेश यादव असून आमच्या पक्षाचा सभासददेखील नाही. गणेश यादव हा राष्ट्रीय जनता दलाचा असून गेल्या विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाच्या उमेदवाराने त्याचा पराभव केला आहे.

मोठय़ा हल्ल्यांची ‘लष्कर’ची धमकी
श्रीनगर, २५ मार्च/पी.टी.आय.

मागील पाच दिवस काश्मीरमधील कुपवाडा येथील जंगलात चालू असलेल्या चकमकीची जबाबदारी ‘लष्कर-ए-तय्यबा’ या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेने स्वीकारली असून काश्मीरच्या स्वातंत्र्ययुध्दासाठी असे आणखी हल्ले भविष्यात करण्याची धमकीही या संघटनेने दिली आहे. काश्मीर स्वतंत्र करण्यासाठी तय्यब्बाचे सदस्य असे हल्ले करून बलिदान स्वीकारायला तयार आहेत. काश्मीरमध्ये जिहाद संपलेला नाही, तो चालूच राहील. हा हल्ला नवी दिल्लीचे डोळे उघडणारा ठरेल, अशा शब्दांत लष्करचा प्रवक्ता अब्दुल्ला गझनवी याने आपले फुत्कार टाकले आहेत. या चकमकीत एका मेजरसह आठ जवान शहीद झाले असून तय्यब्बाचे १७ अतिरेकी ठार झाले आहेत. कुपवाडा येथील चौकीबाल जंगलात भारतीय सैन्याने जेव्हा आपल्या हालचाली वाढल्या तेव्हाच लष्कर-ए-तय्यब्बाच्या सदस्यांना त्यांच्या हेतूचा अंदाज आला. २० मार्चपासूनच हे युध्द सुरू झाले होते. तय्यब्बाच्या सदस्यांनी त्यानंतर भारतीय सैन्याला नामोहरम करण्यात यश मिळविले, अशीही दर्पोक्ती गझनवीने केली आहे. या चकमकीत ठार झालेले सर्व दहशतवादी हे तय्यब्बाचे सदस्य आहेत हे त्यांच्याकडे सापडलेल्या शस्त्रास्त्रे आणि इतर साहित्यावरून स्पष्ट होत आहे. जे टी-शर्ट सापडले आहेत त्यावर जिहाद हेच माझ्या आयुष्याचे इतिकर्तव्य असून शहादत हेच खरे जीवन आहे,असे संदेश त्यावर लिहिले असल्याचे आढळून आले आहे. पाकिस्तानी लष्करातील मंडळींनीच त्यांना प्रशिक्षण दिले असल्याचे उघड होत असून त्यांच्याकडील शस्त्रास्त्रेही अत्यंत आधुनिक होती. आता हे जंगल शांत असून कालच्या संध्याकाळपासून तेथे गोळीबाराच्या फैरी ऐकू आलेल्या नाहीत. दरम्यान, शहीद जवानांच्या अंत्यसंस्काराला हजारो काश्मिरी नागरिक उपस्थित होते.

सीईटी आता १२ मे रोजी होणार
मुंबई, २५ मार्च / प्रतिनिधी

अभियांत्रिकी, आरोग्यविज्ञान व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांसाठी एकत्रितपणे घेण्यात येणाऱ्या ‘सामाईक प्रवेश परीक्षे’च्या (सीईटी) वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. नव्या वेळापत्रकानुसार ही सीईटी आता १२ मे रोजी होईल. जुन्या वेळापत्रकानुसार सीईटी ७ मे रोजी होणार होती. लोकसभा निवडणुकीमुळे कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यातील सीईटी ३० एप्रिल ऐवजी ७ मे रोजी घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. महाराष्ट्र व कर्नाटकाच्या सीमाभागात राहात असलेले विद्यार्थी दोन्हीही राज्यातील सीईटी परीक्षांना बसतात. सीमाभागातील विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याच्या उद्देशाने वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने महाराष्ट्रातील सीईटीची तारीख पुढे ढकलली आहे. परीक्षांच्या वेळांमध्ये मात्र कोणताच बदल करण्यात आला नसल्याचे संचालनालयाचे संचालक डॉ. वासुदेव तायडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

वरुण गांधींची याचिका फेटाळली
अलाहाबाद, २५ मार्च/पीटीआय

मुस्लिम समाजाविरोधात भडक वक्तव्ये केल्याप्रकरणी आपल्याविरोधात नोंदविण्यात आलेला एफआयआर रद्द करावा यासाठी भाजपचे लोकसभा निवडणूक उमेदवार वरुण गांधी यांनी केलेली याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. या प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात वरुण गांधी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. इम्तियाझ मूर्तजा व न्या. एस. सी. निगम यांच्या खंडपीठाने आज वरुण गांधी यांची याचिका फेटाळून लावली. एका समुदायाविरोधात भडक वक्तव्ये केल्याप्रकरणी वरुण गांधी यांच्याविरोधात पिलभीत येथील बारखेडा पोलीस ठाण्यामध्ये १७ मार्च रोजी एफआयआर नोंदविण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीला तीन वर्षांचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा सुनावल्या जाऊ शकतात.

महिला अधिकाऱ्यास दिलेली धमकी मुलायमना महागात पडणार
नवी दिल्ली, २५ मार्च / पीटीआय

मुस्लिमविरोधी विधानाबद्दल वरुण गांधी यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी देऊ नये या सल्ल्याने वादात सापडलेला निवडणूक आयोग समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांना नोटीस बजावण्याची शक्यता आहे. शस्त्रास्त्र परवाना रद्द केल्याने एका महिला निवडणूक अधिकाऱ्यास धमकावल्याबद्दल मुलायमसिंग यांना नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे. मुलायम मैनपुरी येथून निवडणूक लढवत असून तेथे एका सभेत जिल्हा दंडाधिकारी मिनीस्थी दिलीप यांच्याविरुद्ध त्यांनी वादग्रस्त विधान केले होते. याबाबतचा अहवाल व सीडी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी आयोगास पाठविली आहे. या सभेत जिल्हा दंडाधिकाऱ्याविरुद्ध आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगून मुलायम म्हणाले होते की, जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे संतुलन ढळल्याने त्यांना सामान्य नागरिक व गुन्हेगारातील फरक समजेनासा झाला आहे. त्यांनी आपले डोके तपासून घ्यावे व आठवडय़ात आपली कामकाजाची पद्धत सुधारावी असा सल्लाही त्यांनी दिला होता.

 


प्रत्येक शुक्रवारी