Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९

मुलाचा मृत्यू, दुसरा अत्यवस्थ
हिवरी गावाला तापाचा विळखा
सोयगाव, २५ मार्च/वार्ताहर
तालुक्यातील सावळतबारा भागातील हिवरी गावात तापाच्या साथीने थैमान घातले आहे. एका बालकाचा मृत्यू झाला. अत्यवस्थ असलेल्या शाळकरी मुलावर औरंगाबाद येथे उपचार चालू आहेत. गावातील अर्धी कुटुंबे अंथरुणाला खिळली असून अनेकांची प्रकृती गंभीर आहे.गावातील रुग्णांच्या संख्येत तीन दिवसांपासून वाढ होत आहे. सागर किरण निकम (वय १७) याला औरंगाबादच्या धूत रुग्णालयात व आदित्य सुधाकर देशमुख (वय ५) याला संजीवन रुग्णालयात दाखल केले. आदित्यचे आज पहाटे निधन झाले.

उमेदवारीचा पेच
लातूर, २५ मार्च/वार्ताहर

लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानास आता एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. तथापि काँग्रेस व भारतीय जनता पक्ष, या दोन्ही पक्षांनी उमेदवारांची नावे अद्यापि जाहीर केली नाहीत. समोरचा पक्ष कोणता उमेदवार देतो यावर दुसऱ्या पक्षाचा उमेदवार ठरणार असल्यामुळे खेळी अगोदर कोण खेळणार, याकडे निरीक्षकांचे लक्ष आहे. राखीव झाल्यामुळे लातूर मतदारसंघाकडे फारसे लक्ष दिले जाणार नाही अशी चर्चा प्रारंभी होती.

सांस्कृतिक सभागृहांचा एककलमी कार्यक्रम
वसंत मुंडे
बीड, २५ मार्च

चार रस्त्यांच्या कामाचा अपवाद वगळता खासदार जयसिंग गायकवाड यांनी सांस्कृतिक सभागृह बांधण्याचाच एककलमी कार्यक्रम गेल्या पाच वर्षांत राबविला. कामासाठी शिफारस करायची नाही आणि काम निकृष्ट झाले तर कार्वाचा बडगा! यामुळे गावाला सभागृह मिळाले पण पक्षासाठी काम करणारा कार्यकर्ता उपाशी राहिला. परिणामी त्यांच्या उमेदवारीची एकाही कार्यकर्त्यांने मागणी केली नाही. भारतीय जनता पक्षाकडून दोन वेळा आणि मागच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेत बीड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी श्री. गायकवाड यांना मिळाली.

हरवलेली गावं!
परवा गावी जाऊन आलो. आता गावात तसं पहिल्यासारखं काही राहिलेलं नाही. जिवातली माणसं गेली. आता दिसणारी पोरंसोरं तोंडं बघत ओळखायची. बापाचं नाव विचारण्याऐवजी आता त्याला त्याच्या आजोबाचं नाव विचारलं, तरच ओळख पटायची. कारण शिक्षणासाठी आणि पुढं नोकरीनिमित्त मी हे गाव सोडलं होतं. तीस-चाळीस वर्षांनंतर मी या गावात निवृत्त होऊन आलो होतो. चार-पाच किलोमीटरवर कळंब हे तालुक्याचं गाव म्हणून मी तालुक्यालाच घर बांधलं होतं. चार-दोन दिवसाला माझ्या या गावी येत होतो. आजही आलो होतो.

काँग्रेसजनांनी जाब विचारला!
काँग्रेसला सोबत घेऊनच नवी समीकरणे - वरपूडकर
परभणी, २५ मार्च/वार्ताहर
‘जिल्हा परिषदेसह नगरपालिकेच्याही सत्ताकारणात काँग्रेसला दूर ठेवल्यानंतर आणि राजकारणात सातत्याने सापत्न वागणूक दिल्यानंतर आजच तुम्हाला आघाडीचा धर्म कसा आठवला?’ काँग्रेसच्या स्थानिक नेत्यासह कार्यकर्त्यांनीही आज असा सवाल करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश वरपूडकर यांना सुनावले. थेट काँग्रेसच्या कार्यालयात कार्यकर्त्यांच्या या संतप्त भावना ऐकून घेतल्यानंतर श्री. वरपूडकर यांनी ‘झाले गेले विसरून आता पुन्हा नव्याने कामाला लागू’ असा पवित्रा घेत आगामी काळात नगरपालिकेसह जिल्हा परिषदेतही काँग्रेसला सोबत घेऊनच राजकारण केले जाईल असा शब्द दिला.

शांतिगिरीमहाराज बुधवारी अर्ज भरणार
औरंगाबाद मतदारसंघातूनच लढण्याचा निर्णय
औरंगाबाद, २५ मार्च/प्रतिनिधी
लोकसभेच्या निवडणुकीसाठी वेरुळच्या संत जनार्दनस्वामी मठाचे शांतीगिरी महाराज मौनगिरी येत्या बुधवारी (दि. १ एप्रिल) औरंगाबाद मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नाशिक आणि जळगाव येथूनही ते अर्ज दाखल करणार असले तरी ते लढतील फक्त औरंगाबाद मतदारसंघातूनच, असे मठाचे उपाध्यक्ष दादासाहेब अधाने यांनी आज सांगितले.

अब्दुल साजेद पुन्हा सभापतिपदाच्या आखाडय़ात!
सर्वाना डावलून स्थायी समितीत दाखल
औरंगाबाद, २५ मार्च/ प्रतिनिधी
गेल्या दोन वर्षांपासून स्थायी समितीचे सदस्य आणि मावळत्या वर्षांत सभापती असलेले काँग्रेसचे अब्दुल साजेद हे काँग्रेसच्या सर्वाना डावलून पुन्हा एकदा स्थायी समितीच्या आखाडय़ात दाखल झाले आहे. गेल्या वर्षी त्यांनी चमत्कार घडवित युतीचे संजय जोशी यांचा सभापतिपदाच्या निवडणुकीत पराभव केला होता. याची पुनरावृत्ती करण्यासाठीच ते पुन्हा या सभागृहात दाखल झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. ३१ मार्चला स्थायी समितीचे ८ सदस्य निवृत्त होत असून त्यांच्या जागेवर नवीन आठ सदस्यांची निवड करण्यासाठी आयोगाच्या विशेष परवानगीने सभागृहाची विशेष सभा बोलाविण्यात आले होती.

महानगरपालिकेला सक्षम आयएएस अधिकारी नियुक्त करावा
आमदार दर्डा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
औरंगाबाद, २५ मार्च/खास प्रतिनिधी
सध्या औरंगाबाद महानगरपालिका आयुक्तविना पोरकी झाली आहे. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेच्या आयुक्तपदी सक्षम आय.ए.एस. अधिकारी तातडीने नियुक्त करावा व ठप्प झालेल्या विकास कामांना गती द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे आमदार राजेंद्र दर्डा यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

उस्मानाबादचे नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांचे पद कायम
मुख्यमंत्र्यांचा आदेश रद्दबातल
औरंगाबाद, २५ मार्च/खास प्रतिनिधी
नगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण केल्याने मुख्यमंत्र्यांनी उस्मानाबादचे नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांना पदावरून हटविण्याचा आदेश दिला होता. तो मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र बोर्डे यांनी आज रद्दबातल ठरविला. या निर्णयामुळे बंडगर यांचे पद कायम राहिले आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत.

तीन उमेदवारांचे परभणीत अर्ज
परभणी, २५ मार्च/वार्ताहर

लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी प्रमुख उमेदवारांनी दाखविली असून शिवसेनेचे गणेश दुधगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश वरपूडकर हे दोन्ही उमेदवार मोठय़ा शक्तिप्रदर्शनानिशी अर्ज भरण्याच्या आखणीला लागले आहेत. दुधगावकर यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी (दि. ३०)ा दाखल होईल, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजू कापसे यांनी दिली. सर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाले असले तरी अद्यापि उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीत. अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार मुहुर्ताचे शोध घेत आहेत. दुसरीकडे मोठय़ा शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करून जनमानसावर प्रभाव निर्माण करण्याचाही उमेदवारांचा प्रयत्न आहे.राष्ट्रीय समाज पक्षाचे बबन मुळे यांनी काल अर्ज दाखल केला. आज दोन उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. अपक्ष उमेदवार पांडुरंग सीताराम घाडगे (परभणी), लक्ष्मण एकनाथ शिंदे (पूर्णा) या दोन उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले.

बनावट नोटाप्रकरणी आणखी एक अटकेत
मानवत, २५ मार्च/वार्ताहर

तालुक्यातील करंजी येथील हजार रुपयांच्या बनावट नोटांच्या गुन्ह्य़ात वालूर येथील व्यापारी प्रभाकर जनार्दन फरकांडे (४०) यास पोलिसांनी आज अटक केली. मुख्य आरोपी दशरथ सखाराम कांबळे आणि अशोक उत्तम कलाल यांनी ३० हजार रुपयांच्या बदल्यात एक लाख रुपयांच्या नोटा देण्याचे आमिष दाखवून फरकांडे याच्याकडून ६५ हजार घेतले. या पैशातूनच छायाप्रती काढण्याचे छोटे रंगीत यंत्र खरेदी करून बनावट नोटा तयार करावे, असा कट या दोघांनी रचला. मूळ नोटांच्या बदल्यात त्या झेरॉक्स नोटा देण्याचा व्यवहार ठरला. दरम्यान दशरथ कांबळे व अशोक कलाल यांनी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात ठाण्याजवळील कळवा येथून हे यंत्र व मुंबईहून झेरॉक्सचा कागद खरेदी केली. घटनेच्या दिवसापर्यंत म्हणजे ८ मार्चपर्यंत या दोघांनी नोटा झेरॉक्स करण्याचा प्रयत्न केला. परंतु चलनी नोटांतील तांत्रिक बाबी आरोपी पूर्ण करू शकत नव्हते व आपला प्रयत्न फसला असून बनावट नोटा तयार करण्याचे संपूर्ण साहित्य व कागद त्यांनी करंजीच्या खाणीत जाळण्याचा प्रयत्न केला.तपासात आजपर्यंत दशरथ कांबळे, अनंता कांबळे, अशोक कलाल आणि आज अटक करण्यात आलेला प्रभाकर फरकांडे यांना अटक करण्यात आली आहे.

मृतांची संख्या सहा
वसमत, २५ मार्च/वार्ताहर

शहरातील शुक्रवार पेठेतील लग्नमांडवास आग लागून झालेल्या अपघातात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेडच्या गुरू गोविंदसिंग रुग्णालयात आज सकाळी सय्यद इब्राम स. करीम (वय ५) याचा मृत्यू झाला. गंभीर भाजलेली तीन मुले व तीन महिला यांच्यावर उपचार चालू आहेत.

गोपीनाथ मुंडे मंगळवारी अर्ज दाखल करणार
बीड, २५ मार्च/वार्ताहर

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे येत्या मंगळवारी (दि. ३१) उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष आर. टी. देशमुख यांनी आज दिली. श्री. मुंडे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्वतयारीसाठी भा. ज. प.च्या नेत्यांची बैठक झाली. श्री. देशमुख म्हणाले की, अवकाळी पाऊस यावा त्या पद्धतीने निवडणुका आल्या की, पश्चिम महाराष्ट्रातील नेते जिल्ह्य़ात येतात. जनतेला आता हे कळून चुकले आहे. त्यामुळे श्री. मुंडे यांच्यावर २३ एप्रिलला मतांचा पाऊस पडेल. मुंडेंना चित करू म्हणणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना जमिनीवर लोळवल्याशिवाय राहणार नाही. श्री. मुंडे यांचा अर्ज दाखल करताना राज्यातील पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोटरसायकल चोरणाऱ्या टोळीतील तिघांना अटक
लातूर, २५ मार्च/वार्ताहर

मोटरसायकली चोरणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून पाच मोटरसायकली जप्त केल्या. वाहनचोरीला आळा घालण्यासाठी केलेल्या पथकाच्या गस्तीत सुनील चंद्रकांत जाधव (वय २५, बोडका) संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले तेव्हा त्याच्या जवळची मोटरसायकल चोरीची असल्याचे आढळून आले. त्याने दिलेल्या माहितीनुसार संजय अभिमन्यू हुलगुंडे (वय २८, खाडगाव), भाऊराव लिंबाजी चव्हाण (वय २३, चिकलठाणा) यांनाही अटक करण्यात आली.

बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे ७० प्रवासी बचावले!
अंबाजोगाई, २५ मार्च/वार्ताहर

अंबाजोगाई-येल्डा एस. टी. बसला (क्रमांक एमएच २० डी २७६७) काल रात्री बुट्टेनाथ घाटात अपघात झाला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सत्तर प्रवाशांचे प्राण वाचले.
अंबाजोगाईहून येल्डय़ाकडे निघालेल्या या बसला काल रात्री ८ वाजता बुट्टेनाथ घाटात अपघात झाला. बसचालक गोपाळ कदम यांच्या प्रसंगावधानामुळे गाडीतील सुमारे सत्तर प्रवाशांचे प्राण वाचले. यामुळे प्रवाशांनी चालक कदम यांचे आभार मानले. बुट्टेनाथ या घाटात अरुंद रस्त्यामुळे यापूर्वीही अनेकदा अपघात झाले आहेत. येल्डा गावचे सरपंच राजेश देवकते यांनी बुट्टेनाथ घाटातील रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी केली आहे. एस. टी. महामंडळाचे अंबाजोगाई आगार उत्पन्नात बीड जिल्ह्य़ामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या आगारातून दररोज ५६ बसगाडय़ा प्रवाशांची वाहतूक करतात. त्यापैकी जादा गाडय़ा तीन, निमआराम दोन आणि नव्या कोऱ्या फक्त आठच गाडय़ा आगाराकडे आहेत. तब्बल ४८ या गाडय़ा खटारा या प्रकारात मोडतात. तसेच अंबाजोगाई बस स्थानक हे असुविधेचे माहेरघर बनले आहे. नादुरुस्त आणि जुन्या गाडय़ांतून प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.

आगीत सात लाखांचे नुकसान
नांदेड, २५ मार्च/वार्ताहर

नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथे बसस्थानकालगतचे पाच दुकाने व दोन घरांना मध्यरात्री आग लागून सात लाख रुपयांचे नुकसान झाले. घुंगराळा येथील औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या सायकलच्या दुकानाला प्रथम आग लागली. त्यानंतर त्यालगत असलेली चार दुकाने आगीने वेढली गेली. वाहनांच्या सुट्टय़ा भागांचे, टायरचे दुकान, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. यात शेख लाल नबीसाब व प्रयागबाई यांच्या जनावरांचा गोठाही जळून खाक झाला. रात्री एक वाजता आग लागल्यानंतर ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तहसील-दारांनी टँकर तेथे मागवले व ही आग विझली. आग कशामुळे लागली हे मात्र स्पष्ट झाले नाही.

मोलकरणींचा गांधी भवनासमोर ठिय्या
औरंगाबाद, २५ मार्च/ प्रतिनिधी

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याबरोबरच विविध मागण्यांसाठी मोलकरणी व घरेलू कामगार संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार होते. मात्र निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे करून जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारल्यामुळे मोलकरणींनी समर्थनगरातील गांधी भवनासमोरच ठिय्या आंदोलन केले. स्वस्त धान्य दुकानावर धान्याचे दर स्पष्ट शब्दात लिहिण्यात येत नाहीत. त्यामुळे शासकीय दरापेक्षा जास्त दराने विक्री करण्यात येते. शिधापत्रिका नसणाऱ्यांनाही सर्रासपणे धान्य विक्री होत असते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न करताच दुकानांचे वितरण करण्यात येत आहे, यांसह विविध मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वी वेळोवेळी निवेदने देण्यात आली होती. मात्र त्याचा काहीएक परिणाम न झाल्याने आज (२५ मार्च) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी यास परवानगी नाकारल्याने आंदोलनाचे स्थळ बदलण्यात आल्याचे संघटनेचे नेते अ‍ॅड्. सुभाष गायकवाड यांनी सांगितले.

शहीददिनानिमित्त भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांना आंदरांजली
औरंगाबाद, २५ मार्च/खास प्रतिनिधी

शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांचा शहीददिन ऑल इंडिया स्टुंडट्स फेडरेशनतर्फे (ए. आय. एस. एफ.) साजरा करण्यात आला. शहिदांना फाशी दिल्याचे दृश्य पैठणगेट येथे उभारण्यात आले होते. ‘द लिजेंड ऑफ भगतसिंग’ आणि ‘रंग दे बसंती’ या समूहातील निवडक संवाद आणि गाणी या वेळी वाजविण्यात आली होती. या देखाव्याला शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. या जिवंत देखाव्यात देवीदास राधळे (भगतसिंग), अनिल मुधोडकर (राजगुरु), दीपक जावळे (सुखदेव), अमोल दंडिले (डॉक्टर), संदीप शेंडगे (वकील), प्रशांत पुन्नवरकर (जल्लाद), अमोल काटे (पोलीस) या कार्यकर्त्यांनी भूमिका केली होती. या कार्यक्रमाची सुरुवात भाकपचे शहर सचिव कॉ. अश्फाक सलामी यांनी शहिदांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केली. या वेळी अभय टाकसाळ, मधुकर खिल्लारे, वसुधा कल्याणकर, अमरजीत बाहेती आणि मानसी बाहेती आदी उपस्थित होते.

दोन गटांत मारामारी; परस्परांविरुद्ध तक्रार दाखल
मानवत, २५ मार्च/वार्ताहर

तालुक्यातील खजुरा व कोथाळा येथील दोन गटांमध्ये जुन्या वादातून कोल्हापाटीवर सोमवारी जोरदार मारामारी झाली.राजुरा येथील मुंजा शेळके यांच्या बहिणीचा कोथळा येथील अंकुश रेडे यांच्याशी विवाह झाला. तीन वर्षांपूर्वी असेच भांडण झाले. तेव्हा अंकुश रेडेविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या जुन्या भांडणाची न्यायालयीन तारीख आटोपून बाबासाहेब शेळके व त्यांचा पुतण्या लक्ष्मण शेळके गावाकडे परत जात होते. कोल्हा पाटीवर येताच अंकुश रेडे, पुरभाजी रेडे, संतोष रेडे व इतर दोन जणांनी फिर्यादी बाबासाहेब शेळके व त्यांच्या पुतण्यास कुऱ्हाडीने व लाठीकाठीने मारहाण केली. बाळासाहेब शेळके यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. अंकुश रेडे यांनी बाळासाहेब शेळके, मुंजा शेळके (राजुरा) व अकबर खाँ लालखाँ (शेवडी) यांनी कोर्टात चालू असलेल्या प्रकरणात तडजोड का करत नाही म्हणून रस्त्यात अडवून चाकूने पोटात व मानेवर हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार दिली. परस्पराच्या विरोधात तक्रार दाखल केल्याने दोघांच्या विरोधात गुन्ह्य़ाची नोंद झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक पी. जी. खुसर तपास करीत आहेत.

चौतीस गावांना टँकरने पाणीपुरवठा
परतूर, २५ मार्च/ वार्ताहर
परतूर उपविभागातील परतूरसह मंठा, अंबड व घनसावंगी या चारही तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून एकूण ३४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय कार्यालयातून देण्यात आली. उपविभागातील चारही तालुक्यांत मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक तीव्रतेने पाणीटंचाई जाणवत आहे. पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. पाणीटंचाई निवारणार्थ परतूर तालुक्यातील सिंगोना, वलखेड, ब्राह्मणवाडी व पांडेपोखरी या चार गावांना, मंठा शहरात तीन तर पांगरी (गोसावी) येथे एक असे एकूण चार, अंबड तालुक्यातील वडीकाळ्या, कुकुडगाव व भिवंडी बोडखा या तीन तर घनसावंगी तालुक्यात सर्वाधिक २३ गावांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान पुढील दोन महिन्यांत पाणी प्रश्न आणखी उग्ररुप धारण करण्याची शक्याता आहे

नांदेडमध्ये पाच अर्ज
नांदेड, २५ मार्च/ वार्ताहर
लोकसभेच्या नांदेड मतदारसंघात आज तिसऱ्या दिवशी स्वतंत्र भारत पक्षाचे गुणवंत पाटील हंगरगेकर यांच्यासह पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले. राष्ट्रीय लोकदलाचे विष्णू मारुती जाधव, राष्ट्रीय समाज पक्षाच्या रमा भगीरथ तिवारी, निवृत्ती विठ्ठलराव बोरगावकर (अपक्ष), गौतम मारुती काळे (अपक्ष) व गुणवंत माधवराव पाटील यांनी आज अर्ज दाखल केले. या पाचही उमेदवारांनी प्रत्येक एक अर्ज दाखल केल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. आज तिसऱ्या दिवशी एकवीस उमेदवारांनी पन्नास अर्ज घेतले. आतापर्यंत नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

हिंगोलीत पंचेचाळीस निवडणूक अर्जाची विक्री
हिंगोली, २५ मार्च/ वार्ताहर

लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज एकूण २५ इच्छुकांनी ४५ अर्ज घेतले. वसंत किशन पाईकराव यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. आचारसंहितेच्या भंगाचे आजपर्यंत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बनावट मतदानाला आळा घालण्यासाठी यंदाच्या निवडणुकीत मतदानकेंद्रावर मतदान प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रतिनिधी त्याच मतदान केंद्र परिसरातील असणे बंधनकारक ठरविण्यात आले आहे. दरम्यान आचारसंहितेच्या कारणावरून माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षणसेवकांसह अन्य पदे भरण्यासाठी दि. २९ मार्चला होणारी लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे अतिरिक्त आदिवासी विकास आयुक्त जी. पी. गरड यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. दरम्यान, मतदारसंघात गावोगावी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदान कसे करावे याची प्रात्यक्षिके दाखविली जात आहेत.

उदयनराजेंच्या मातु:श्रींचे तुळजाभवानीस साकडे
तुळजापूर, २५ मार्च/ वार्ताहर

‘छत्रपती शिवरायांच्या वंशातील वारसांना सक्रिय राजकारणात वावरण्यास, नेतृत्व करण्याबरोबरच जनसेवेची संधी उदयनराजेंना शरद पवार यांनी उपलब्ध करून दिली. आमचे कुलदैवत तुळजामाता असल्याने उदयनराजे यांच्याकडून प्रामाणिकपणे जनसेवा घडो तसेच शरदराव पवार यांना पंतप्रधानपदाची संधी मिळो यासाठी साकडे घालण्यासाठी उदयनराजेंची उमेदवारी निश्चित होताच श्रीतुळजामातेकडे धाव घेतली आणि दर्शनास आले,’ असे उदयनराजेंच्या मातु:श्री कल्पनाताई भोसले यांनी पत्रकारांना सांगितले. लोकसभेच्या निवडणुकीसाठी सातारा येथून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उदयनराजे निवडणूक लढविणार आहेत. त्यांच्या मातु:श्री काल सकाळी तुळजापूर येथे आल्या होत्या.