Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

मुंडे यांची कोंडी!
मुंबई, २५ मार्च/ प्रतिनिधी

 

भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांना ईशान्य मुंबई मतदारसंघाचे तिकीट नाकारून प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी व त्यांच्या ‘परिवाराने’ पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांच्यावर कुरघोडी केल्याचे चित्र वरकरणी दिसत असले तरी दिल्लीतील भाजपच्या एका बडय़ा नेत्याने महाजन यांच्यावर सूड उगवल्याचे बोलले जात आहे. लालकृष्ण अडवाणी यांना ईशान्य मुंबईतील उमेदवार निवडीचे सर्वाधिकार दिले असताना त्यांनी गडकरी यांच्या पारडय़ात वजन टाकल्याने राष्ट्रीय राजकारणात आपला दबदबा निर्माण करण्यात गोपीनाथ मुंडे हे अजून यशस्वी झाले नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. देशभरातील डझनभर भाजप नेत्यांच्या मुलाबाळांना पक्षाने उमेदवारीची खिरापत वाटली असताना प्रमोद महाजन यांच्या कन्येला डावलून दिल्लीतील नेत्यांनी पक्षपात केल्याची तक्रार भाजपचे काही कार्यकर्ते करीत आहेत.
प्रमोद महाजन हयात असताना त्यांची दहशत वाटेल एवढा पक्षात दरारा होता. त्यामुळे महाजन जर आज हयात असते तर पूनमकरिता आपला मतदारसंघ सोडायला अनेक विद्यमान खासदारांनी तयारी दाखवली असती. शिवसेनेनेही दक्षिण मुंबईकरिता ताणून धरले नसते. मात्र आता चित्र पार बदलले आहे. दक्षिण मुंबई आणि कल्याण हे मतदारसंघ शिवसेनेने भाजपला न सोडून भाजपमधील मुंडे विरुद्ध गडकरी संघर्ष चिघळविण्यास हातभारच लावला आहे. महाजन यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना सापत्न वागणूक दिली जात असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. रेखा महाजन यांना अगोदर राज्यसभा नाकारून आणि आता पूनम महाजन यांच्याकरिता ईशान्य मुंबईसारखा सोपा मतदारसंघ नाकारून पक्षाने महाजन कुटुंबियांवर अन्याय केला आहे.
मागील लोकसभा निवडणुकीची सूत्रे प्रमोद महाजन यांनी आपल्या हातात घेतली होती. तोपर्यंत महाजन म्हणजे विजय असे समीकरण झाले होते. परंतु लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ‘फील गुड’चा फुगा फुटला. महाजन यांना घेरण्याकरिता त्यांच्या अनेक विरोधकांनी तयारी सुरू केली. महाराष्ट्रात एकनाथ खडसे यांना प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करण्याकरिता महाजन-मुंडे यांचे प्रयत्न सुरू असताना तत्कालीन पक्षाध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी नितीन गडकरी यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करून महाजन यांना धक्का दिला होता. नागपूर येथे महाजन यांनी अडवाणी यांच्या विरोधात केलेली टिप्पणी हाही चर्चेचा विषय झाला होता. त्यामुळे महाजन यांच्या पश्चातही महाराष्ट्रात नितीन गडकरी यांना स्वातंत्र्य देण्यात आले. ‘महाजन जर आज हयात असते तर भाजपमध्ये राहिले नसते’, असे विधान राज्यातील एका नेत्याने काही महिन्यांपूर्वी केले होते. त्यामुळे महाजन यांच्यावर दिल्लीतील एका मोठय़ा नेत्याची खप्पामर्जी होती. त्यातूनच त्यांच्या वारसाला उमेदवारी नाकारली गेल्याचे बोलले जात आहे. महाजन यांच्या विश्वासातील अनेकांना बदलून गडकरी यांनी आपले समर्थक नियुक्त केले. बाळ आपटे, राम नाईक यांच्यापासून रघुनाथ कुलकर्णी, मधू चव्हाण असे अनेकजण महाजन-मुंडे यांच्या एकाधिकारशाहीच्या विरोधात आता उघडपणे उभे ठाकले असून त्यांचे नेतृत्व गडकरी यांच्याकडे आहे. मुंडे यांचे आणखी एक विरोधक विनोद तावडे यांच्याकडे पक्षाच्या निवडणूक व्यवस्थापन आणि प्रचार याचे निमंत्रकपद सोपवले आहे. महाजन यांच्या हत्येनंतर दिल्लीत सरचिटणीसपदी गेलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्याकडे महाराष्ट्राचे प्रभारीपद सोपवले गेले नाही. राजस्थानमधील निवडणुकीची जबाबदारी मुंडे यांच्याकडे सोपवली गेली. परंतु तेथे भाजप पराभूत झाली. मुंडे यांना अजून दिल्लीत बस्तान बसवता आलेले नाही आणि त्यांच्या विरोधकांना दिल्लीतील बडय़ा नेत्याचा आशीर्वाद असल्याने महाजन यांचा राजकीय वारसाला सध्या तरी भवितव्य नाही.