Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

आठवलेंची पवारांना सोडचिठ्ठी
शिर्डीतील उमेदवारीसाठी काँग्रेसशी युती
नवी दिल्ली, २५ मार्च/खास प्रतिनिधी

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सोळा वर्षे साथ निभावल्यानंतर त्यांच्यापासून ‘विभक्त’ होत ज्येष्ठ नेते व खासदार रामदास आठवले यांच्या रिपाइंने लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी आज काँग्रेससोबत युती केली. आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत आठवले यांनी हा निर्णय घेतला. आठवले काँग्रेसच्या कोटय़ातून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. मात्र, उस्मानाबादमधून लोकसभेची निवडणूक लढण्याचा इरादा माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांना सोडून द्यावा लागणार आहे. उस्मानाबाद मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार असून आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कोणतीही अदलाबदल होणार नाही, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रात्री स्पष्ट केले.
दरम्यान, उत्तर-पश्चिम मुंबईची जागा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांना देण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्र आहे. या जागेसाठी संजय निरूपम, कृपाशंकर आणि गुरुदास कामत यांची नावे चर्चेत होती. गुरुदास कामत यांनी आपण लोकसभा लढविणार नसल्याचे आजच स्पष्ट केले. संजय निरुपम ‘दोपहर का सामना’ दैनिकाचे जेव्हा कार्यकारी संपादक होते तेव्हा त्यांनी केलेल्या मुस्लिमविरोधी लिखाणावर येथील मुस्लिम बांधव आजही नाराज असून काही उर्दू वर्तमानपत्रांनी निरुपम यांच्याविरुद्ध त्यासंदर्भात मोहीमदेखील उघडली आहे. निरुपमचा पत्ता यामुळेच कट झाला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, सोलापूर, लातूर, जालना, शिर्डी, औरंगाबाद, सांगली, उत्तर मुंबई, वायव्य मुंबई आणि पालघर या ९ मतदारसंघांसाठी उमेदवार निवडीची चर्चा पूर्ण झाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र, उत्तर मुंबई आणि सांगली या मतदारसंघांमध्ये कोणाला उमेदवारी द्यायची यावरून श्रेष्ठींच्या मनात संभ्रम कायम आहे. सांगलीमध्ये खासदार प्रतीक पाटील आणि विश्वजीत कदम, उत्तर मुंबईत पीयू मेहता, सचिन सावंत आणि खासदार गोिवदा यांच्यात उमेदवारी मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्यासोबतच्या सोळा वर्षांंच्या संबंधांना विराम देत आज रामदास आठवले यांनी काँग्रेससोबत लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुकांसाठी युती करण्याचा लेखी प्रस्ताव सोनिया गांधी यांना दिला. अँटनी, अहमद पटेल, मुख्यमंत्री चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, कन्हैयालाल गिडवाणी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आठवले आणि राज्य मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या कोटय़ातून गृहनिर्माण राज्यमंत्री झालेले त्यांचे सहकारी प्रीतमकुमार शेगावकर यांनी सोनियांना काँग्रेसची साथ निभावण्याची ग्वाही दिली. राष्ट्रवादीच्या कोटय़ात आठवलेंसाठी जागा नसल्यामुळे त्यांना काँग्रेसशी युती करण्याचा निर्णय घ्यावा लागला. काँग्रेस-रिपाइं(आ) युतीला राष्ट्रवादीची संमती असल्याचे शेगावकर यांनी सांगितले.