Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

मुंबईकर अद्याप टाटांच्या विजेच्या प्रतीक्षेत!
मुंबई, २५ मार्च / प्रतिनिधी

 

मुंबई शहर अथवा उपनगरातील जो ग्राहक विजेच्या पुरवठय़ाची मागणी करील त्या प्रत्येक ग्राहकाला विजेचा पुरवठा करण्याचा टाटा वीज कंपनीला अधिकार आहे, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने देऊन जवळपास नऊ महिने लोटले असले तरी अद्यापही मुंबईकर टाटा वीज कंपनीकडून विजेचा पुरवठा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. टाटा कंपनीकडून पुरवठय़ासंदर्भात कोणतीही पावले उचलण्यात आल्याचे संकेत मिळालेले नसल्याने मुंबईकरांना त्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याची चर्चा आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बेस्ट आणि रिलायन्ससह मुंबईत अथवा उपनगरांत विजेचा पुरवठा करण्याची परवानगी टाटा कंपनीला दिली त्यानुसार टाटा कंपनी किरकोळ ग्राहकांनाही विजेचा पुरवठा करू शकणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या धर्तीवर राज्य विद्युत नियामक आयोगानेही (एमईआरसी) ऑगस्ट २००८ मध्ये टाटा कंपनीला विशिष्ट परवाना अटींवर सर्व प्रकारच्या ग्राहकांना पुरवठा करण्याची मुभा दिली आहे.
त्यानंतर टाटा कंपनीने २००८ अखेपर्यंत स्वत:ची वितरण प्रणाली तयार करून त्यामार्फत पुरवठा करण्याचे सूतोवाच केले होते. मात्र आता २००९ या वर्षांचे तीन महिने संपत असतानाही वितरणाबाबत टाटा कंपनीकडून कोणतीही हालचाल झालेली नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने टाटाला मान्यता देताना पर्याय ठेवला आहे की, टाटाकडे वितरण प्रणाली नसल्यास कंपनी ग्राहकांना विजेचा पुरवठा करण्यास रिलायन्स कंपनीच्या वितरण प्रणालीचा वापर करू शकते.
सर्वोच्च न्यायालय आणि एमईआरसी यांच्याकडून मंजुरी मिळाली असतानाही मुंबईतील ग्राहकांना टाटा कंपनीच्या प्रणालीतून विजेचा पुरवठा मिळण्यास सुरुवात झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. बेस्ट, रिलायन्स आणि टाट कंपनीने २००९-१० या वर्षांसाठी एमईआरसीकडे अनुक्रमे ५२ टक्के, पाच टक्के आणि १८ टक्के दरवाढीचा प्रस्ताव सादर केलेला आहे. महावितरणने २० टक्के दरवाढ प्रस्तावित केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र केवळ मुंबईसाठीच समर्पित असलेली वीजनिर्मितीच ही दरवाढ कमी करू शकते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.