Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

बोगस मतदानामुळे गाजली ठाणे महापालिका पोटनिवडणूक!
आज मतमोजणी
ठाणे, २५ मार्च /प्रतिनिधी

 

ठाणे महापालिकेच्या प्रभाग २९ (समतानगर-लोकमान्यनगर) मध्ये आज झालेल्या चुरशीच्या पोटनिवडणुकीत ५२.४ टक्के मतदान झाले. अनेक ठिकाणी बोगस मतदानाचे प्रयत्न झाले असून सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. उद्या मतमोजणी होणार आहे. राष्ट्रवादीशी न जमल्याने शिवसेनेत जाताना प्रताप सरनाईक यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने आज या प्रभागात पोटनिवडणूक झाली. सरनाईक आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यामधील संघर्षांमुळे या पोटनिवडणुकीलाही मोठय़ा निवडणुकीचे स्वरूप आले होते. या दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने वर्तकनगर परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
सेना-भाजप युतीच्या परिषा सरनाईक आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे राजन धुमाळ यांच्यात सरळ लढत असून, तीन हजार ११७ पुरुष, तर दोन हजार ७२६ महिला अशा पाच हजार ८४३ म्हणजेच ५२.४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतदानादरम्यान संपूर्ण प्रभागात तणावाचे वातावरण होते. अनेक ठिकाणी दोन्ही बाजूने बोगस मतदानाचे प्रयत्न करण्यात आले होते, मात्र बोगस मतदानाची शक्यता लक्षात घेऊन दोन्ही पक्षांनी विशेष पथके प्रथमच तैनात केली होती. प्रताप सरनाईक यांनी बोगस मतदानाचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना पकडून पोलिसांच्या हवाली केले. या कथित मतदारांकडे रेशनकार्ड, बँक ऑफ महाराष्ट्र व सेंट्रल बँकेचे पासबुक होते. मात्र हे सर्व पुरावे बनावट असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला. एवढेच नव्हे तर पकडण्यात आलेल्या लोकांनीही आपण सायन कोळीवाडा येथील असल्याचे सांगितल्याचा दावा त्यांनी केला, तर बोगस मतदानावर राष्ट्रवादीचा विश्वासच नसून विरोधकांचाच प्रयत्न आम्ही हाणून पाडला, असे आव्हाड यांनी सांगितले. बोगस मतदानाचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.