Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

..मनीषचे व्यर्थ न हो बलिदान!
विकास नाईक
मुंबई, २५ मार्च

 

आमचा मनीष गेला.. शहीद झाला.. परंतु असे कितीतरी मनीष आहेत ज्यांना माझी गरज आहे.. त्यांनाही देशासाठी, समाजासाठी काहीतरी करायची इच्छा आहे, उर्मी आहे; परंतु त्यांना मार्ग सापडत नाही. अशांसाठी उर्वरित जीवन व्यतीत करायचं आहे.. शहीद ले. कर्नल मनीष कदम फाऊंडेशनचे अध्यक्ष शशिकांत कदम सांगत होते.
गेल्या वर्षी १६ मार्चला आमचा मनीष अवघ्या ३७ व्या वर्षी शहीद झाला.. मनीषला जाहीर झालेले मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्याचा सोहळा उद्या राष्ट्रपतींच्या हस्ते पार पडणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला गेलेले शशिकांत कदम बोलता बोलता गहिवरून आले. मुंबईसारख्या शहरात वाढलेला एकुलता एक मुलगा सैनिकी आयुष्याकडे का वळला? यावर कदम म्हणाले, घरामध्ये सैनिकी वातावरण नव्हते. परंतु सिंधुदुर्गातील ‘सरंबळ’ हे आमचे गाव कारणीभूत असेल. आमचे गाव फार पूर्वीपासून warriors village म्हणजेच योद्धांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. घरटी एक तरी आजी-माजी सैनिक आहेच. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात आमच्या गावातील तरुण सैनिक म्हणून मर्दमुकी गाजवली आहे. पार इंग्लंड, जर्मनी, इटली इथपर्यंत त्यांनी धडक दिली होती. माझे पणजोबा सावंतवाडी संस्थानात पोलिस पाटील होते त्यांनी पहिल्या महायुद्धात रिक्रुटिंग ऑफिसर म्हणून आमच्या गावातील जवळपास ५० तरुणांना सैन्यात दाखल करून घेतले होते. आजही आमच्या गावात त्या शहीदांची स्मृती म्हणून ब्रिटिशकालीन ‘रणस्तंभ’ आहे. कदाचित तीच बीजं आमच्या मनीषमध्ये उतरली असतील. अंधेरीच्या बर्फीवाला हायस्कूलमधून दहावी केल्यानंतर तो एनडीएमध्ये दाखल झाला. त्यानंतर डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अकॅडमीतून बाहेर पडल्यावर अवघ्या एकवीसाव्या वर्षी मनीष सेकंड लेफ्टनंट म्हणून भारतीय सैन्यदलात रुजू झाला. इतक्या लहान वयात सेकंड लेफ्टनंट म्हणून रुजू झालेला अधिकारी निवृत्त होताना लेफ्टनंट जनरल पदापर्यंत पोहोचू शकतो.. पण ते कदाचित नियतीला मान्य नव्हते.
मनीषची निर्णयक्षमता, शौर्य, समयसूचकता या जोरावर डेहराडून येथील विलिंग्टन स्टाफ कॉलेजमध्ये त्याला पुढील शिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. याच कॉलेजमधून जनरल माणेकशॉसारखे अधिकारी शिकले होते. मनीषच्या या गुणांचे वर्णन करत पंजाब रेजिमेंटचे वरिष्ठ सहकारी कर्नल राजीव गोडिहोक यांनी पत्रामध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. १६ मार्च या दिवशी काश्मीरमधील बारामुल्ला या जिल्ह्यातील चल्लुरा या गावात मनीष कदम गस्त घालीत होते. त्यांना या गावामध्ये काही अतिरेकी लपले असल्याची खबर मिळाली होती. गावकऱ्यांना ओलिस ठेवून दहशतवादी पळून जाण्याचा प्रयत्न करणार हे लक्षात येताच मनीष यांनी दहशतवाद्यांचा माग काढत त्यांच्यावर हल्ला चढवला. काहींना त्यांनी कंठस्नानही घातले. याच हल्ल्यात लागलेल्या एका गोळीमुळे मनीष शहीद झाले. या संपूर्ण ऑपरेशनमध्ये मनीष यांनी दाखविलेल्य़ा चातुर्यामुळे एकाही नागरिकाचा बळी गेला नाही. उलटपक्षी गेली अनेक वर्षे भारत सरकार लष्कर ए तय्यबचा कमांडर असलेल्या ज्या हाफीज हाझमा याच्या शोधात होते, तो मनीष यांच्यासोबत झालेल्या चकमकीत ठार झाला.
एकुलता एक कर्ता-सवरता मुलगा गमावूनदेखील धीरोदात्तपणे आलेल्या प्रसंगाला सामोरे जात शशिकांत कदम यांनी मनीषच्या नावे Services Prepatory Institute ची स्थापना केली आहे. सिंधुदुर्ग जिल्यातील ओरोस या गावी ही अकादमी स्थापन करण्यामागे उद्दिष्ट काय यावर कदम म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे वीरांचे आहेत. अशा प्रकारची अ‍ॅकॅडमी महाराष्ट्रात फक्त औरंगाबाद येथे आहे. गेल्या कित्येक वर्षांच्या पाहणीवरून असे लक्षात आले की, कोकणातील तरुण एनडीएच्या लेखी परीक्षेत सहज उत्तीर्ण होतात, परंतु तोंडी परीक्षेमध्ये मागे पडतात. आजही सुमारे १२-१३ हजार अधिकाऱ्यांच्या जागा सैन्यदलात रिकाम्या आहेत. अशा अकादमीमधून निवड चाचणीची पूर्वतयारी करून घेण्यात येईल व अशी संस्था सिंधुदुर्ग जिल्यात सुरू केली तर येथील तरुणांना त्याचा नक्की फायदा होईल. तसेच या जिल्याची भौगोलिक परिस्थितीसुद्धा सैनिकांना प्रशिक्षण देण्यास अतिशय अनुकूल आहे. परंतु यासाठी आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे यावर शशिकांत कदम म्हणाले. आमची स्वत:ची तीन एकर जमीन यासाठी वापरणार तसेच ही संपूर्ण अकादमी लोकांच्या सहभागावर उभी राहणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाला माझ्या पत्नीचा पूर्ण पाठिंबा आहेच तर आमची सून डॉ. स्मिता मनीष कदम यांचीही सक्रिय मदत आहे.
शशिकांत कदम म्हणाले, आम्हाला चार वर्षांचा नातू आहे. परंतु आमच्या सूनेने स्वत: दु:ख मागे सारून ती पुन्हा एकदा लष्करामध्ये दाखल झाली. यावर डॉ. स्मिता कदम म्हणाल्या, माझे वडीलदेखील लष्करात कर्नल होते व त्यांचाही सेवेत असतानाच मृत्यू आला. मीदेखील लष्करात डॉक्टर म्हणून काम करीत होते. परंतु काही वर्षांपूर्वी ती सेवा थांबवली. पण आता मात्र आता पुन्हा एकदा लष्करात दाखल झाले आहे. महाराष्ट्रातून अधिकाधिक तरुण सैन्यदलामध्ये अधिकारी म्हणून पाठवायचे.. देश टिकला तरच महाराष्ट्र टिकेल.. हे लेफ्टनंट कर्नल मनीषचे स्वप्न होते. तरुणांनी मोठय़ा प्रमाणावर लष्करात दाखल होणे हीच ‘मेरा घर मेरी इज्जत’ असे घोषवाक्य असणाऱ्या चौबीस पंजाब रेजिमेंट च्या ले. कर्नल मनीष कदम यांना खरी आदरांजली असेल! अधिक माहितीसाठी संपर्क : ९४२२४३४८९३- ९४२२३७४२०५.