Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

‘गुन्हेगारी पाश्र्वभूमीचा उमेदवार नको’
‘नो क्रिमिनल्स’ मोहिमेचा प्रारंभ
मुंबई, २५ मार्च/प्रतिनिधी

 

राजकारणात गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेले उमेदवार नको, अशा उमेदवारांना मतदारांनी मत देऊ नये, असे आवाहन ‘नो क्रिमिनल्स’ मोहिमेचा प्रारंभ मुंबईतील रवींद्र नाटय़मंदिरच्या प्रांगणात करताना अनेक मान्यवरांनी केले. रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. बिमल जालन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या पब्लिक इंटरेस्ट फाउण्डेशन तसेच इतर सामाजिक संस्थांच्या वतीने ही मोहिम राबविण्यात येणार आहे. पत्रकार सुचेता दलाल, अर्थतज्ज्ञ अजित रानडे, नोकरी डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव बिकचंदानी, सामाजिक कार्यकर्त्यां डॉल्फी डिसोजा, भाजपच्या प्रवक्ता शायनी एन. सी., ‘मास्टेक कंपनीचे संस्थापक आशंक देसाई, एबीएन-अ‍ॅम्रो बँकेच्या भारतातील प्रमुख मीरा सन्याल, लोकसत्ता संस्थेचे महाराष्ट्र प्रमुख सुरेंद्र श्रीवास्तव, ‘जागो रे’ कॅम्पेनच्या रिशी अग्रवाल, ‘अम्मी’ संस्थेचे प्रमुख शरद कुमार, लिज इंडिया मोहिमेच्या अग्रणी कार्यकर्त्यां आभा सेन यांच्यासह अनेक वक्त्यांनी या मोहिमेचे जोरदार समर्थन केले.
राजकारणात चांगली माणसे यायला हवीत. राजकारणात प्रवेश करणाऱ्यांना शैक्षणिक अर्हंता असायलाच हवी , असे मत मीरा सन्याल यांनी व्यक्त केले तर लोकसत्ता मोहिमेचे सुरेंद्र श्रीवास्तव यांनी राजकारणात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांचा प्रभाव वाढत चालला असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. चांगली माणसे राजकारणात आली, तरच देशातील परिस्थिती बदलू शकेल, असे त्यांनी सांगितले.
बिहारमध्ये नितिशकुमार यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात एकही गुन्हेगारी प्रवृत्तीचा मंत्री असणार नाही असे दिलेले वचन त्यांनी पाळले, याकडे अर्थतज्ज्ञ अजित रानडे यांनी लक्ष वेधले. शायना एन. सी. यांनी तरुणांची राजकारणातील भूमिका यापुढे महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगितले. ‘कालनिर्णय’चे जयराज साळगावकर यांनी साधी मतदार नोंदणीदेखील किती कठीण करून ठेवली आहे, याची उदाहरणे दिली. राजाभैय्यासारखा गुन्हेगार तुरुंगातून तीन वेळा निवडून जातो हे मोठे दुर्दैव असल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकसभेतील ५४३ खासदारांपैकी १२८ जणांवर विविध गुन्ह्यांची नोंद आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांना येत्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करू नका, अशी मागणीही उपस्थित वक्त्यांनी केली. ‘नो क्रिमिनल्स’ ही मोहीम केवळ मुंबईसारख्या शहरी भागापुरती मर्यादित न ठेवता देशाच्या सर्व भागात, ग्रामीण भागापर्यंतही पोचवण्याची गरज असल्याचे मत आजच्या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आले. गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या उमेदवाराला यापुढे मतदान न करण्याची शपथ उपस्थित मतदारांनी याप्रसंगी घेतली.