Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

निवडणुकानंतर लगेचच म्हाडाच्या घरांसाठी सोडत
सोडतीची जबाबदारी व्हिजेटीआय, आयआयटीवर
मुंबई, २५ मार्च / प्रतिनिधी

 

मुंबईतील म्हाडाच्या ३,८६३ घरांसाठी ३० एप्रिलला निवडणुका संपल्यानंतर लगेचच सोडत काढण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. सध्या आचारसंहिता लागू असल्यामुळे त्याबाबत घोषणा करण्यावर बंदी असल्याचे सांगण्यात आले. निवडणुकांमुळे म्हाडाची सोडत लांबणीवर पडणार असल्याचा दावा त्यामुळे फोल ठरणार आहे. व्हिजेटीआय व आयआयटी या मान्यताप्राप्त संस्थांनी मंजूर केलेल्या सॉफ्टवेअरचा सोडतीसाठी वापर करण्यात आला असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.
घरांसाठी सोडत जाहीर झाल्यानंतर म्हाडाच्या पातळीवर भ्रष्टाचार होतो असा आतापर्यंतचा अनुभव आहे. मात्र सोडतीनंतरही म्हाडा कर्मचाऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध येऊ नये, अशी खबरदारी घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सोडतीत यशस्वी झालेल्या अर्जदारांना इमारतीत विशिष्ट मजला हवा असतो. त्यासाठी पैशाची मागणी केली जाते. त्याला आळा घालण्यासाठी सोडतीत यशस्वी झालेल्या पात्र अर्जदाराला त्याच्या फ्लॅट क्रमांकासह ऑफर लेटर पाठविण्यात येणार आहे. या पत्रासह त्याने अर्जासोबत दाखल करावयाच्या कागदपत्रांची यादीही दिली जाणार आहे. ही कागदपत्रे स्वीकारण्याची जबाबदारी बँकेवरच सोपविण्यात येणार असून बँकेने त्या प्रत्येकाला टोकन द्यायचे आणि ४८ तासांत त्यांच्या कागदपत्रांची छाननी होऊन अर्जदाराला तो पात्र आहे किंवा नाही याची माहिती मिळणार आहे. अर्जदारांची पात्रता म्हाडामध्ये तैनात करण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांमार्फत निश्चित केली जाणार आहे.