Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

मुंबई विद्यापीठाच्या कार्यपद्धतीवर अधिसभा सदस्यांची झोड
उच्चपदस्थांना झुकते माफ देऊन पीएच.डी. बहाल
मुंबई, २५ मार्च / पतिनिधी

 

खासदार मनोहर जोशी, विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक विलास शिंदे यांच्यासारख्या उच्चपदस्थांनी मुंबई विद्यापीठात पीएच.डी.साठी नोंदणी केली आहे. या उच्चपदस्थांना मुंबई विद्यापीठाने झुकते माफ दिले असून अनेक ठिकाणी नियमांचेही उल्लंघन केले असल्याचा जोरदार आरोप आज अधिसभा सदस्यांनी केला.
एका राजकीय नेत्याने (मनोहर जोशी यांचे नाव न घेता) पीएच.डी.साठी अर्ज केल्यानंतर त्यांची नावनोंदणी करून घेण्यासाठी विद्यापीठाने लगेचच तातडीची बैठक बोलविली होती. जोशी यांना पीएच.डी. देण्यामध्ये प्रा. व्यंकटेशकुमार यांनी स्वारस्य दाखविल्याचा आरोप मधू परांजपे यांनी केला. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक शिंदे यांनी विद्यापीठातीलच एका प्राध्यापकाकडे पीएच.डी.साठी नावनोंदणी केली आहे. हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा किंवा पी.एच.डीची नोंदणी रद्द करावी. फारतर इतर विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. करावी. मुंबई विद्यापीठात महत्त्वाच्या अधिकारपदावर कार्यरत असताना त्यांनी स्वत:च्याच हाताखाली काम करीत असलेल्या व्यक्तीकडे पीएच.डी. करणे नियमबाह्य असल्याचा मुद्दा किशोर ठेकेदत्त व कोमलसिंग राजपुत यांनी मांडला. तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता संदीप सहारे यांनीही अशाच पद्धतीने पीएच.डी.साठी नावनोंदणी केल्याचेही राजपूत व ठेकेदत्त यांनी निदर्शनास आणून दिले. एका पीएच.डी. मार्गदर्शकाने चक्क दहा विद्यार्थ्यांची नावनोंदणी आठवडाभरात केल्याचे ठेकेदत्त यांनी पुराव्यासहित उघड करून दाखविले.
सखोल संशोधन करणाऱ्या व्यक्तीला त्याने सादर केलेल्या प्रबंधांच्या आधारे पीएच.डी. देण्याची तरतूद असतानाही विद्यापीठ उच्चपदस्थांना झुकते माफ देत आहे. याउलट सर्वसामान्य व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दुजाभाव दिला जात असल्याचा आरोप बाळासाहेब साळवे यांनी केला. परंतु, कुलगुरू डॉ. विजय खोले व प्र-कुलगुरू डॉ. अ. दा. सावंत यांनी सदस्यांचे हे आक्षेप फेटाळून लावले. पीएच.डी.साठी नियमानुसारच नावनोंदणी करण्यात येते. यात कुणालाही झुकते माफ देण्यात येत नाही, असे स्पष्टीकरण कुलगुरू व प्र-कुलगुरूंनी दिले.
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार असल्यामुळे अधिसभा बैठक थोडक्यात आटपेल असा अंदाज होता. परंतु, आक्रमक झालेल्या सदस्यांनी सकाळपासूनच झोड उठविण्यास सुरूवात केली. त्यामुळे रात्री अकरा वाजेपर्यंत ही बैठक लांबली. विद्यापीठातील डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय केंद्राचे संचालक सुरेंद्र जोंधळे यांनी कंटाळून राजीनामा दिल्याची बातमी आज ‘लोकसत्ता’ने पसिद्ध केली होती. या बातमीचा उल्लेख करीत बाळासाहेब साळवे यांनी विद्यापीठावर झोड उठविली. प्रकाश दरेकर यांनी ‘लोकसत्ता’ची प्रत सभागृहात सादर केली. गेल्या अधिसभेच्या कामकाजाच्या इतिवृत्तात अनेक त्रुटी राहिल्याने सदस्यांनी जवळपास तीन तास प्रशासनाला धारेवर धरले. मुंबईत अतिरेकी हल्ला झाला असतानाही नगरपालांच्या नेतृत्त्वाखाली काही प्राचार्य परदेशी दौऱ्यावर गेल्याने सदस्यांनी संताप व्यक्त केला. परदेशात गेलेल्या प्राचार्याची नावे जाहीर करा आम्हाला त्यांचा निषेध करायचा आहे, अशीही आक्रमक मागणी सदस्यांनी केली. पराग वेदक, दिलीप करंडे व प्रकाश दरेकर यांनी हा मुद्दा जोरदार लावून धरला. विद्यापीठात मराठीची हेळसांड केली जाते. जागतिक मराठी दिन मोठय़ा उत्साहात साजरा केला जात नसल्याचा आक्षेप दरेकर, वेदक, करंडे व वैभव नरवडे यांनी घेतला. बीएमएमचे मराठीकरण करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकारांनी पाठपुरावा करूनही विद्यापीठ त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला.