Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
प्रादेशिक

मुंबईकर अद्याप टाटांच्या विजेच्या प्रतीक्षेत!
मुंबई, २५ मार्च / प्रतिनिधी

मुंबई शहर अथवा उपनगरातील जो ग्राहक विजेच्या पुरवठय़ाची मागणी करील त्या प्रत्येक ग्राहकाला विजेचा पुरवठा करण्याचा टाटा वीज कंपनीला अधिकार आहे, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने देऊन जवळपास नऊ महिने लोटले असले तरी अद्यापही मुंबईकर टाटा वीज कंपनीकडून विजेचा पुरवठा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. टाटा कंपनीकडून पुरवठय़ासंदर्भात कोणतीही पावले उचलण्यात आल्याचे संकेत मिळालेले नसल्याने मुंबईकरांना त्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याची चर्चा आहे.

बोगस मतदानामुळे गाजली ठाणे महापालिका पोटनिवडणूक!
आज मतमोजणी

ठाणे, २५ मार्च /प्रतिनिधी

ठाणे महापालिकेच्या प्रभाग २९ (समतानगर-लोकमान्यनगर) मध्ये आज झालेल्या चुरशीच्या पोटनिवडणुकीत ५२.४ टक्के मतदान झाले. अनेक ठिकाणी बोगस मतदानाचे प्रयत्न झाले असून सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. उद्या मतमोजणी होणार आहे. राष्ट्रवादीशी न जमल्याने शिवसेनेत जाताना प्रताप सरनाईक यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने आज या प्रभागात पोटनिवडणूक झाली.

..मनीषचे व्यर्थ न हो बलिदान!
विकास नाईक
मुंबई, २५ मार्च

आमचा मनीष गेला.. शहीद झाला.. परंतु असे कितीतरी मनीष आहेत ज्यांना माझी गरज आहे.. त्यांनाही देशासाठी, समाजासाठी काहीतरी करायची इच्छा आहे, उर्मी आहे; परंतु त्यांना मार्ग सापडत नाही. अशांसाठी उर्वरित जीवन व्यतीत करायचं आहे.. शहीद ले. कर्नल मनीष कदम फाऊंडेशनचे अध्यक्ष शशिकांत कदम सांगत होते. गेल्या वर्षी १६ मार्चला आमचा मनीष अवघ्या ३७ व्या वर्षी शहीद झाला.. मनीषला जाहीर झालेले मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्याचा सोहळा उद्या राष्ट्रपतींच्या हस्ते पार पडणार आहे.

‘गुन्हेगारी पाश्र्वभूमीचा उमेदवार नको’
‘नो क्रिमिनल्स’ मोहिमेचा प्रारंभ
मुंबई, २५ मार्च/प्रतिनिधी
राजकारणात गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेले उमेदवार नको, अशा उमेदवारांना मतदारांनी मत देऊ नये, असे आवाहन ‘नो क्रिमिनल्स’ मोहिमेचा प्रारंभ मुंबईतील रवींद्र नाटय़मंदिरच्या प्रांगणात करताना अनेक मान्यवरांनी केले. रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. बिमल जालन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या पब्लिक इंटरेस्ट फाउण्डेशन तसेच इतर सामाजिक संस्थांच्या वतीने ही मोहिम राबविण्यात येणार आहे.

निवडणुकानंतर लगेचच म्हाडाच्या घरांसाठी सोडत
सोडतीची जबाबदारी व्हिजेटीआय, आयआयटीवर
मुंबई, २५ मार्च / प्रतिनिधी
मुंबईतील म्हाडाच्या ३,८६३ घरांसाठी ३० एप्रिलला निवडणुका संपल्यानंतर लगेचच सोडत काढण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. सध्या आचारसंहिता लागू असल्यामुळे त्याबाबत घोषणा करण्यावर बंदी असल्याचे सांगण्यात आले. निवडणुकांमुळे म्हाडाची सोडत लांबणीवर पडणार असल्याचा दावा त्यामुळे फोल ठरणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या कार्यपद्धतीवर अधिसभा सदस्यांची झोड
उच्चपदस्थांना झुकते माफ देऊन पीएच.डी. बहाल
मुंबई, २५ मार्च / पतिनिधी
खासदार मनोहर जोशी, विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक विलास शिंदे यांच्यासारख्या उच्चपदस्थांनी मुंबई विद्यापीठात पीएच.डी.साठी नोंदणी केली आहे. या उच्चपदस्थांना मुंबई विद्यापीठाने झुकते माफ दिले असून अनेक ठिकाणी नियमांचेही उल्लंघन केले असल्याचा जोरदार आरोप आज अधिसभा सदस्यांनी केला. एका राजकीय नेत्याने (मनोहर जोशी यांचे नाव न घेता) पीएच.डी.साठी अर्ज केल्यानंतर त्यांची नावनोंदणी करून घेण्यासाठी विद्यापीठाने लगेचच तातडीची बैठक बोलविली होती.

‘लॅक्मे फॅशन वीक’ उद्यापासून
मुंबई, २५ मार्च/प्रतिनिधी

बार्बीचा रॅम्प वॉक, २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांसाठी निओमी कॅम्पबेलचा रॅम्प वॉक या खास आकर्षणांसह ‘लॅक्मे फॅशन वीक’ २७ मार्चपासून सांताक्रूझ येथील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये सुरू होत आहे. आठ तरुण व होतकरु डिझायनर्स आणि तब्बल ४८ मोठे डिझायनर्स यांचा या फॅशन वीकमध्ये सहभागी असणार आहेत. बार्बीला यंदा पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने या ‘स्लिम अ‍ॅण्ड ट्रीम’ बाहुल्यांच्या कॅट वॉकने या वीकची सुरुवात करण्यात येणार आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रतिक्रिया सर्व थरांतून उमटल्या. त्याला फॅशन जगत तरी कसे अपवाद ठरेल! ‘माय मुंबई’ (Mai Mumbai) या फॅशन शोमध्ये देश परदेशातील फॅशन डिझायनर्स एकत्र येणार आहेत. या शोमध्ये केवळ मॉडेल्सच नव्हे तर बॉलीवूड तारे-तारका, खेळाडू व सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक व्यक्ती देखील सहभागी होणार आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीची मॉडेल निओमी कॅम्पबेल ‘फॅशन फॉर रीलिफ’ या शोमध्ये रॅम्प वॉक करणार आहे तर अमेरिकेतील हॉटेल व्यावसायिक विक्रम चटवाल ‘माय मुंबई’ हा शो सादर करणार आहे. तिस्ता सेटलवाड यांच्या ‘सिटीझन फॉर जस्टिस अ‍ॅण्ड पीस’ संस्थेला विक्रम चटवालवालच्या हॉटेलकडून नेहमी अनुदान मिळते. निओमी कॅम्पबेलचा ‘फॅशन फॉर रीलिफ’ हा चॅरिटी शो २००५ पासून सुरु झाला. त्यावेळी अमेरिकेतील ‘कतरिना’ या वादळात बळी पडलेल्यांना तिने मदत केली होती. ‘लॅक्मे ग्रॅण्ड फिनाले’मध्ये फॅशन डिझायनर अनामिका खन्ना हिचे पुनरागमन हा कुतुहलाचा विषय आहे. जॉन अब्राहम, मुग्धा गोडसे आणि अरबाज खान रॅम्प वॉक करणार आहेत.

मुलूंड पूर्वेचा स्कायवॉक रद्द होणार?
मुंबई, २५ मार्च / प्रतिनिधी

मुलुंड पूर्व येथे अनावश्यक असतानाही उभारण्यात येणारा स्कायवॉक स्थानिकांचा प्रचंड विरोध लक्षात घेऊन रद्द करण्याचा विचार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सुरू असल्याचे आमदार चरणजितसिंग सप्रा यांनी म्हटले आहे. एमएमआरडीए अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेच्या हवाल्याने त्यांनी ही माहिती दिली. मुलुंड स्कायवॉकचे काम सुरू झाल्यापासून नागरिकांकडून त्याला प्रचंड विरोध होत आहे. स्थानिकांचे मन वळविण्यासाठी एमएमआरडीएने आतापर्यंत केलेले सर्व प्रयत्न फोल ठरले आहेत. स्कायवॉक-विरोधात काही दिवसांपूर्वी मुलुंडमध्ये व्यापारी व नागरिकांनी बंदही पाळला होता. स्थानिकांच्या प्रखर भावना लक्षात घेऊन राजकीय पक्षांनीही स्कायवॉकविरुद्ध भूमिका घेतली आहे. त्यामुळे मुलुंड पूर्व येथे स्कायवॉक रद्द करण्याचा विचार एमएमआरडीएकडून सुरू आहे. पुन्हा एकदा स्कायवॉकबाबत सर्वेक्षण करून याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे सप्रा यांनी नमूद केले. याबाबत एमएमआरडीएचे अधिकारी अनंत पहल यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी बैठकीत असल्याचे सांगून काहीही बोलण्यास नकार दिला.

एकतर्फी प्रेमप्रकरणातून तरुणीवर हल्ला
मुंबई, २५ मार्च / प्रतिनिधी

अंधेरी पूर्व येथील रामकृष्ण मंदिर रोडवरील आनंद प्रकाश सुयोग सोसायटीत राहणाऱ्या प्रीती शेखर अंचन या २२ वर्षांंच्या तरुणीवर एकतर्फी प्रेमातून आज सकाळी खुनी हल्ला करण्यात आला. तिची प्रकृती गंभीर असून तिला होली स्पिरीट इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस विजय चव्हाण (२५) या तरुणाचा शोध घेत आहेत. चव्हाण याचे मोबाईल विक्रीचे दुकान असून प्रीती त्याच्याकडे कामाला होती. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता. मात्र या प्रेमास प्रीतीने विरोध करून नोकरी सोडून दिली होती. त्याचा राग आल्याने चव्हाण याने आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास ती घराबाहेर पडताच तिच्या गळा तसेच पोटावर वार केले आणि तो पळून गेला.

अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने होणार
मुंबई, २५ मार्च / प्रतिनिधी

मुंबईतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करण्याचा तत्त्वत: निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शिक्षण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत आज शिक्षण विभागाची बैठक घेण्यात आली. त्यावेळी अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी निश्चित धोरण आखण्याचा निर्णय झाला. या धोरणावर पुढील आठवडय़ात शिक्कामोर्तब होईल. त्यानुसार निवडणूक आयोगाच्या परवानगीने निवडणुका पार पडल्यानंतर अथवा निवडणुकांच्या अगोदर हा निर्णय जाहीर केला जाईल, असे विखे-पाटील यांनी सांगितले. अकरावीचे ऑनलाईन प्रवेश मुंबई महानगर क्षेत्राच्या अंतर्गत असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणार आहेत. या क्षेत्रातील अकरावीच्या प्रवेशासाठी ७०:३० जिल्हा कोटा लागू करण्याचा निर्णयही यापूर्वीच झाला आहे. अकरावीसाठी गेल्यावर्षी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. परंतु, त्या प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणावर सुधारणा करून यंदा नवीन धोरण आखण्यात आल्याचे विखे-पाटील म्हणाले.

स्थानिक तपास अधिकाऱ्यांना हजेरीचे आदेश
विश्राम पाटील खून खटला
मुंबई, २५ मार्च / प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातील विश्राम पाटील खून खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाने स्थानिक तपास अधिकाऱ्यांना उद्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे बंधू जी. एन. पाटील यांना आरोपी करावे, अशी याचिका विश्राम पाटील यांच्या पत्नी रजनी यांनी केली आहे. विश्राम पाटील आणि जी. एन. पाटील हे काँग्रेसचे स्थानिक नेते होते आणि राजकीय वैमनस्यातून जी. एन. पाटील यांनी विश्राम यांना संपविण्याचा कट रचला, असे रजनी पाटील यांचे म्हणणे आहे. सीबीआयने चार जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. मात्र जी. एन. पाटील यांच्याविरुद्ध पुरावा नसल्याचे सीबीआयने म्हटले आहे.या प्रकरणाबाबत जी. एन. पाटील यांची चौकशी करण्यात आली परंतु त्यांना आरोपी करण्यात आले नाही. स्थानिक तपास अधिकाऱ्यांनी सीबीआयपूर्वी चौकशी केली त्यांच्या केस डायरीत असे नमूद करण्यात आले आहे की, जी. एन. पाटील यांनी या खटल्यातील आरोपी राजू माळी याला खुनाच्या दिवशी पाचारण केले होते. या सर्व वादावर प्रकाशझोत टाकण्यासाठी मुख्य न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांनी स्थानिक तपास अधिकाऱ्यांना उद्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

गुमानमल लोढा यांचे निधन
मुंबई, २५ मार्च / प्रतिनिधी

माजी खासदार आणि गुवाहाटी उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती गुमानमल लोढा यांचे अहमदाबाद येथे गेल्या रविवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
राजस्थान प्रदेश जनसंघाचे १९६९ ते ७१ या काळात अध्यक्ष असलेले गुमानमल लोढा राजस्थानच्या पाली लोकसभा मतदारसंघातून तीनदा विजयी झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी गुजरात, राजस्थान आणि मुंबईचे अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांची शोकसभा शनिवार २८ मार्च रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत भारतीय विद्या भवन, चौपाटी येथे आयोजिण्यात आल्याचे त्यांचे ज्येष्ठ पुत्र व मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आमदार मंगलप्रसाद लोढा यांनी सांगितले.