Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

स्कायवॉकसाठी कोटीच्या कोटी उड्डाणे
शशिकांत कोठेकर

स्कायवॉकच्या नावाखाली कोटींच्या कोटी रूपयांची उड्डाणे करण्याचा सपाटा सध्या सुरू आहे. एक

 

कि.मी. लांबीचा रस्ता करायला जेवढा खर्च येतो, त्याच्या दुप्पटीपेक्षा जास्त खर्च तेवढाच स्कायवॉक बांधण्यासाठी येत आहे. मुंबईतील स्कायवॉकसाठी नुकत्याच निविदा मंजूर झाल्या. सर्वात जास्तीची निविदा पी. बी. ए. कंन्स्ट्रक्शनतर्फे भरण्यात आली. माहिम पूर्व येथे १८ कोटी ७१ लाख (१०३० मीटर), व माहिम पश्चिम येथे दोन हजार १७५ मीटर लांबीचा ३९ कोटी ४८ लाख रूपये खर्चून एमएमआरडीए स्कायवॉक बांधणार आहे. पी. बी. इन्फ्रा कंपनी अंबरनाथ पूर्वेला सहा कोटी ५८ लाख रूपये खर्च करून ३६० मीटर लांबीचा स्कायवॉक बांधणार आहे. तर हीच कंपनी अंबरनाथ पश्चिमेला ३५० मीटर लांबीचा सहा कोटी ३२ लाखाचा स्कायवॉक उभारणार आहे. याच कंपनीला विक्रोळी पूर्व येथे १८ कोटी ६४ लाख रूपयांचा स्कायवॉक बांधण्याचे काम मिळाले आहे.
विक्रोळी पश्चिम येथेही स्कायवॉक बांधण्यात येणार असून तो एलबीएस रोडपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव आहे. या स्कायवॉकसाठी सात कोटी ९७ लाख रूपये खर्च येणार आहे. दास ऑफ शोर कंपनीला हे काम मिळाले आहे. याच कंपनीला घाटकोपर पूर्व येथील दोन टप्प्यातील स्कायवॉकचे काम मिळाले आहे. १३ कोटी १७ लाख रूपयांचे हे काम आहे. तर घाटकोपर येथील तिसऱ्या टप्प्यातील स्कायवॉकचे काम मधानी कंपनीला मिळाले असून ते काम सात कोटी १७ लाख रूपयांचे आहे. विविध कंपन्यांना मिळालेली ही कोटय़वधी रूपयांची कामे पाहिली तर, स्कायवॉकसाठी किती खर्च होत आहे हे लक्षात येते. मुंबई आणि परिसरातील स्कायवॉकच्या बांधकामासाठी एमएमआरडीए एक हजार कोटी खर्च करणार आहे.
मुंबईत काही ठिकाणी स्कायवॉकची खरोखर गरज आहे. मात्र नक्की कोणत्या ठिकाणी त्याची आवश्यकता आहे याबाबतचे सर्वेक्षण योग्य प्रकारे झालेले नाही. कुर्ला व दादर ही मुंबईतील महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत. कुर्ला व दादर येथील स्कायवॉक सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
दादरला पूर्व आणि पश्चिमेला स्कायवॉक बांधल्यास रस्त्यावरील गर्दी आणि फेरीवाले यांच्यापासून सुटकेचा निश्वास सोडता येईल. दादर पूर्वेला एशियाड बस स्थानकापर्यंत आणि दादर पश्चिमेला पोर्तुगीज चर्चपर्यंत किंवा एस. के. बोले मार्गावरून थेट सिध्दिविनायक मंदिरापर्यंत स्कायवॉक बांधल्यास शेकडो भाविकांना, तसेच जेष्ठ नागरिकांना त्याचा फायदा होऊ शकतो. एमएमआरडीएने या प्रस्तावाचा विचार केला होता. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. दादर रेल्वे स्थानक ते सिध्दिविनायक मंदिर असा स्कायवॉक झाल्यास त्याचा फटका रेल्वे स्थानक परिसरातील दुकानदारांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातील व्यापारी भयभीत झाले आहेत. दुकानदारांबरोबर टॅक्सीचालकांनाही याचा फटका बसू शकतो. त्यामुळे या स्कायवॉकला दादर परिसरातील दुकानदार कडाडून विरोध करीत आहेत. व्यापाऱ्यांच्या विरोधाला
आता राजकीय रंग चढला आहे. दादर रेल्वे स्थानक ते प्लाझा, शिवाजी पार्क, पोर्तूगीज चर्च अशा तीन स्कायवॉकची गरज आहे. तेथील नागरिकांचीही या तीन स्कायवॉसची मागणी केली आहे. मात्र राजकीय विरोधामुळे येथील रहिवाशी जाहिरपणे वक्तव्य करीत नाहीत. एमएमआरडीएनेही या वादात न पडता तूर्तास दादर पूर्व येथील स्कायवॉकसाठी प्राधान्य दिले आहे.