Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

जर्मनीचे ‘दूरदर्शन’ भारतात
प्रतिनिधी

भारतीयांकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे जो कर घेण्यात येतो त्यापैकी काही भाग

 

प्रसारभारतीकडेही वर्ग केला जातो. त्यातूनच दूरदर्शन आणि आकाशवाणी यांचे व्यवस्थापन करण्यात येते. त्याचप्रमाणे जर्मन नगारिकांकडून घेतल्या जाणाऱ्या करातील काही भाग हा डी-डब्ल्यू या वाहिनीच्या प्रसारणासाठी दिला जातो. सुमारे ६६ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या पब्लिक ब्रॉडकास्टिंग सव्‍‌र्हिसने जवळजवळ संपूर्ण जग व्यापले आहे. आता भारत आणि आशिया खंडात या सव्‍‌र्हिसची डी-डब्ल्यू-टीव्ही एशिया प्लस ही वृत्तवाहिनी सुरू करण्यात आली आहे. या वाहिनीवर १८ तास इंग्रजी भाषेतील तर उर्वरित सहा तास जर्मन भाषेतून कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना डीडब्ल्यू-टीव्ही एशिया प्लस या वाहिनीचे भारतातील प्रतिनिधी सुदीप मल्होत्रा म्हणाले की, युरोपीय देश आणि आशिया खंडातील प्रेक्षकांमध्ये एक दुवा निर्माण करण्यासाठी या वाहिनीचे भारतात प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून युरोपातील कला, फॅशन, लाइफस्टाइल, संस्कृती आणि त्याचप्रमाणे जगभरातील घडामोडी आशियातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. ही वाहिनी जगभरात दिसत असून त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क (फ्री टू एअर) ग्राहकाकडून घेण्यात येत नाही.
या वाहिनीमध्ये ग्राहकाला भाषेसाठी पर्याय उपलब्ध असतील का, या प्रश्नावर मल्होत्रा म्हणाले की, वृत्तवाहिनी असल्यामुळे भाषिक पर्याय देण्यात आलेले नाहीत. जगभरात काय चालले आहे, याविषयी सर्व माहिती डीडब्ल्यू टीव्ही एशिया प्लस या वाहिनीवर उपलब्ध होणार आहे. या वाहिनीवर जाहिराती नसतात. जाहिराती घ्यायच्या नाहीत, असे त्यांचे धोरण नाही. पण ते स्वत: जाहिराती घेण्यासाठी जात नाहीत. जर्मनीतील नागरिकांनी भरलेल्या कराच्या रकमेतूनच या वाहिनीचे व्यवस्थापन करण्यात येते. त्याचप्रमाणे या वाहिनेने तयार केलेले काही कार्यक्रम दुसऱ्या वाहिन्यांना विकण्यात येतात. फार पूर्वी दूरदर्शनवर ‘टेलि-मॅचेस’ नावाचा कार्यक्रम प्रसारित करण्यात येत असे. त्याची निर्मिती याच वाहिनीतर्फे करण्यात आली होती.
परदेशी वाहिनी भारतात येण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. बीबीसी, सीएनएन, डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफिक, ट्रॅव्हल अ‍ॅण्ड लिव्हिंग इत्यादी वाहिन्यांना भारतात चांगलाच प्रेक्षकवर्ग लाभला आहे. यापैकी प्रत्येक वाहिनी विशिष्ट विषयाशी निगडित आहे. डीडब्ल्यू एशिया प्लस या वाहिनीवर मात्र युरोपातील बातम्यांप्रमाणेच, इतरही घडामोडींची दखल घेण्यात येणार आहे. या वाहिनीवरील ‘युरोमॅक्स’ या कार्यक्रमातून तेथील लाइफस्टाइलविषयी माहिती देण्यात येणार आहे, तर ‘ड्राईव्ह इट’मधून जर्मनी आणि इतर युरोपिय देशांतील ऑटोमोबाइल इंडस्ट्रीवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जागतिकीकरणाचे धोके आणि संधी याबाबत ‘ग्लोबल ३०००’ या कार्यक्रमातून विश्लेषण करण्यात येईल आणि ‘इन फोकस’मधून इतरही अनेक विषयांवरील माहितीपट दाखविण्यात येणार आहेत. सर्व प्रमुख डीटीएच सेवांवरून ही वाहिनी दाखविण्यात येणार आहे.