Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

कांदिवलीत ‘लक्ष्मी-छाया’ची पुनरावृत्ती होण्याची भीती
खास प्रतिनिधी

रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर हल्ला केला की सर्व डॉक्टर एकत्र येतात आणि सरकारवर दबाव टाकून अशा घटनांसंदर्भात अध्यादेश काढायला भाग पाडतात. हीच डॉक्टर मंडळी अनेक

 

ठिकाणी नर्सिग होम सुरू करतात आणि पालिकेचे कायदे धाब्यावर बसवून नर्सिग होममध्ये आपल्याला हवे तसे अंतर्गत रचनात्मक बदल करून संपूर्ण इमारतच धोकादायक बनवतात. मात्र या संदर्भात कोणीही आवाज उठविण्यासाठी कोणी पुढे येत नाही. याउपर ही डॉक्टर मंडळी आपले ‘वजन’ वापरून बेकायदेशीर बांधकामाला बडय़ा नेत्यांचा आशीर्वाद मिळवतात. या प्रकारामुळे इमारतीमधील रहिवाशांचा जीव टांगणीला लागतो. कांदिवली (प.) येथील चारकोप या ठिकाणी एका डॉक्टरने आपल्या रुग्णालयात असेच बेकायदेशीर अंतर्गत बदल केल्यामुळे बोरिवली येथील लक्ष्मी-छाया इमारतीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इमारतीतील रहिवाशी भयभीत झाले आहेत.
या विरोधात इमरतीतील रहिवाशांनी कांदिवली पालिका कार्यालयामधील सहाय्यक पालिका आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यापासून ते थेट पालिका आयुक्त डॉ. जयराज फाटक यांच्यापर्यंत सर्वाकडे तक्रारी केल्या. मात्र यापूर्वी अशा प्रकारांमुळे घडलेल्या दुर्घटनांपासून धडा न घेता संवेदनाहीन अधिकारी न्यायालयाच्या स्थगिती आदेशाकडे बोट दाखवून कारवाईस टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे येथील रहिवासी जीव मुठीत धरून तेथे राहात आहेत. कांदिवली पश्चिम येथील चारकोप विभागात चारकोप श्रेणिक सहकारी सोसायटीमध्ये तळमजला व पहिल्या मजल्यावर एका डॉक्टरने नर्सिग होम सुरू केले आहे. या डॉक्टरने पालिकेची कोणतीही परवानगी न घेता तळमजल्यावरून पहिल्यामजल्यावर जाण्यासाठी इमारतीची तोडफोड करून बांधकाम करण्यास सुरुवात केली. याबाबत इमारतीतील रहिवाशांनी सातत्याने तक्रार केल्यानंतर पालिकेने २० डिसेंबर रोजी काम थांबविण्याची नोटीस बजावली. यानंतरही अनधिकृत काम सुरू राहिल्यामुळे रहिवाशांनी पुन्हा पालिका अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यानंतर नर्सिग होमच्या चालकांनी न्यायालयातून स्थगिती आदेश मिळवला. यात न्यायालयाने स्टेटस-को-मेंटेन करण्यास पालिकेला सांगितले असून त्यानंतरही या डॉक्टरांनी तळजल्यापासून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी आतून जीना उभारण्याचे काम सुरूच ठेवले आहे. पालिका व पोलीस कोणतीच कारवाई करीत नाहीत व केवळ न्यायालयाचा स्थगिती आदेश दाखवून गप्प बसत आहेत. यामुळे अखेर रहिवाशांनी मनसेचे शाखा अध्यक्ष संजय कवटकर व उपविभाग अध्यक्ष दीपक देसाई यांच्याकडे धाव घेतली. संजय कवटकर यांनी पालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन न्यायालयाची स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी पाठपुरावा केला. तसेच संबंधित डॉक्टरविरुद्ध फौजदारी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची कांदिवली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे मागणी केली आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळेच चारकोप येथे ‘लक्ष्मी-छाया’ सारखी दुर्घटना घडण्याची भीती असून याप्रकरणी तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कवटकर यांनी पालिका आयुक्त डॉ. जयराज फाटक यांना २० जानेवारी रोजी पत्र पाठवून केली आहे. मात्र याप्रकरणी आजपर्यंत कोणताही कारवाई करण्यात आलेली नाही. या संदर्भात तातडीने कारवाई करण्यात आली नाही तर आयुक्तांच्या दालनाबाहेर उपोषणास बसण्याचा इशारा कवटकर आणि इमारतीतील रहिवाशांनी दिला आहे. ‘लक्ष्मी-छाया’ दुर्घटनेनंतर मुंबईतील प्रत्येक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे आदेश राज्य शासनाने पालिका आयुक्तांना दिले होते. हे सारे धाब्यावर बसवून कांदिवलीत अनधिकृत बांधकाम सुरू आहे. न्यायालयाची स्थगिती उठविण्यासाठी कोणते प्रयत्न केले, तसेच स्थगिती असतानाही अंतर्गत जीना उभारण्याचे काम सुरू होते, त्यावेळी पालिका अधिकारी गप्प का बसले, असा प्रश्न मनसेकडून उपस्थित करण्यात आला आहे. उद्या ही इमारत कोसळली तर डॉ. जयराज फाटक व कांदिवलीचे उपायुक्त त्याची जबाबदारी स्वीकारणार आहेत का, असा सवालही मनसे व इमारतीतील रहिवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, यासंदर्भात शिवम नर्सिग होमचे मालक डॉ. पठारिया यांच्याकडे विचारणा केली असता जिन्याच्या बांधकामासाठी आपण पालिका व म्हाडाकडे परवानगी मागितली आहे. मात्र ती अद्यापि मिळाली नसल्याचे त्यांनी मान्य केले. तसेच न्यायालयाच्या स्थगिती आदेशानंतर आपण कोणतेही बांधकाम केलेले नाही, असे ते म्हणाले. त्यांच्या म्हणण्यानुसार सदर इमारतीत राहणारे कोणीही मुळ रहिवाशी नाहीत. सदर इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र (ओ.सी.) नाही. तसेच आपण बांधत असलेल्या जिन्यामुळे इमारतीस कोणताही धोका नाही, असे डॉ. पठारिया यांचे म्हणणे आहे. तसेच याबाबतचे प्रकरण न्यायालयात असल्यामुळे आपण काही बोलू शकत नाही, असे ते म्हणाले. मात्र अनधिकृत बांधकाम प्रकरणी पालिकेची नोटीस आल्याचे त्यांनी मान्य केले.