Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

मुंबईच्या लाइफलाइनमधील ठळक मृत्यूरेषा
दररोज ७५ लाखांहून अधिक मुंबईकर उपनगरी रेल्वेने प्रवास करतात. त्यापैकी फारच थोडय़ांना आरामदायी प्रवासाचे भाग्य लाभते. बहुतेकांना चौथ्या सीटसाठी जीवघेणी घडपड करावी लागते.

 

अनेकांसाठी लोकलमध्ये शिरकाव करणे; हेच एक मोठे दिव्य असते. त्यामुळे दरवाजात लोंबकळत प्रवास करण्याखेरीज पर्याय नसतो. मुंबईकरांचा लोकल प्रवास सुकर अधिक सुकर करण्यासाठी एमयूटीपी प्रकल्पांर्गत अनेक रेल्वे योजना हाती घेण्यात आल्या आहेत. या प्रकल्पाची आधीची मुदत कधीच संपुष्टात आली. तसेच त्याची वाढीव मुदतसुद्धा पुढील वर्षी संपेल. तरीदेखील मुंबईकरांचा प्रवास सुकर होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. लोकल प्रवास दिवसेंदिवस अधिकच बेभरवशाचा होत चालला आहे. सुरक्षा आणि सुरक्षिततेकडे करण्यात येणाऱय अक्षम्य दूर्लक्षामुळे सकाळी कामावर जाणारी व्यक्ती रात्री सुखरुप परण्याची शाश्वती घरच्यांना नसते.
मुंबईत दरवर्षी तीन हजारांहून अधिक लोक रेल्वे अपघातांत मरण पावतात. जखमी होणाऱ्यांची संख्याही नऊ हजारांच्या घरात आहे. म्हणजेच दररोज सरासरी ९ व्यक्ती रेल्वे अपघातांत मरण पावतात, तर २५ व्यक्ती जखमी होतात. गतवर्षी पाकधार्जिण्या दहशतवाद्यांनी सीएसटीसह मुंबईतील अन्य ठिकाणी केलेल्या दहशतवादी हल्ल्यांत सुमारे १८५ लोक मारले गेले होते. या हल्ल्याचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन करता येणार नाही. मात्र त्यातुलनेत मुंबईतील रेल्वे अपघातांत मरणाऱ्यांची संख्या कित्येक पटीने अधिक असल्याच्या गोष्टीकडे दूर्लक्ष करून चालणार नाही. या गोष्टीकडे आपण कधी गांभीर्याने लक्ष देणार? २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यांसाठी दहशतवादी जबाबदार होते. मात्र दरवर्षी रेल्वे अपघातांत कायमस्वरुपी जायबंदी होणाऱ्यांवर ओढावलेल्या परिस्थितीसाठी कोणालाच जबाबदार धरणार नाही का? किंवा रेल्वेमार्गात तडफडत प्राण सोडणाऱ्यांच्या जीवाचे काहीच मोल नाही का?
रेल्वे अपघातांतील जखमींना वेळेत उपचार मिळत नाहीत. हेदेखील रेल्वे अपघातांतील मृतांचा आकडा वाढण्यामागील एक प्रमुख कारण आहे. मुंबईत १०० हून अधिक रेल्वे स्थानके आहेत. दररोज हजारो प्रवासी प्रत्येक स्थानकातून अप-डाऊन करतात. मात्र अनेक स्थानकांत प्रथमोपचार पेटय़ांची व्यवस्था नाही. अनेक ठिकाणी त्या असल्या तरी, त्यांच्यातील आवश्यक वस्तू गायब असतात. वेळेला स्ट्रेचर आणि रुग्णवाहिका मिळत नाहीत. परिणामी टॅक्सींतून जखमींना रुग्णालयांत हलवावे लागते. या साऱ्यामुळे अपघातांत जखमी झालेल्यांना वाचविण्याच्या कामी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकणारा १५-२० मिनिटांचा वेळ फुकट जातो. तो काही मिनिटांचा विलंब अनेकांच्या जिवावर बेततो आणि ढिसाळ व्यवस्थेचे ते बळी ठरतात. रेल्वे अपघातांची संख्या कमी होण्यासाठी तसेच अशा अपघातांतील जखमींना तात्काळ उपचार मिळण्यासाठी उच्च न्यायालयाने २००४ मध्ये मध्य व पश्चिम रेल्वेला अनेक सुधारणा सुचविल्या होत्या. मात्र दोन्ही रेल्वेंनी त्याकडे दूर्लक्ष केल्याने परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. लोहमार्ग पोलीस व रेल्वे प्रशासन यांच्यामध्ये जखमींना रुग्णालयात हलविण्यापासून अनेक गोष्टींबाबत वादांग उभे राहिले आहे. या साऱ्याचा फटका मुंबईकरांनी कधीपर्यंत सोसायचा? हा प्रश्न अनुत्तरित आहे. kkorde@gmail.com