Leading International Marathi News Daily
गुरुवार, २६ मार्च २००९

स्कायवॉकसाठी कोटीच्या कोटी उड्डाणे
शशिकांत कोठेकर

स्कायवॉकच्या नावाखाली कोटींच्या कोटी रूपयांची उड्डाणे करण्याचा सपाटा सध्या सुरू आहे. एक कि.मी. लांबीचा रस्ता करायला जेवढा खर्च येतो, त्याच्या दुप्पटीपेक्षा जास्त खर्च तेवढाच स्कायवॉक बांधण्यासाठी येत आहे. मुंबईतील स्कायवॉकसाठी नुकत्याच निविदा मंजूर झाल्या. सर्वात जास्तीची निविदा पी. बी. ए. कंन्स्ट्रक्शनतर्फे भरण्यात आली. माहिम पूर्व येथे १८ कोटी ७१ लाख (१०३० मीटर), व माहिम पश्चिम येथे दोन हजार १७५ मीटर लांबीचा ३९ कोटी ४८ लाख रूपये खर्चून एमएमआरडीए स्कायवॉक बांधणार आहे.

जर्मनीचे ‘दूरदर्शन’ भारतात
प्रतिनिधी

भारतीयांकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे जो कर घेण्यात येतो त्यापैकी काही भाग प्रसारभारतीकडेही वर्ग केला जातो. त्यातूनच दूरदर्शन आणि आकाशवाणी यांचे व्यवस्थापन करण्यात येते. त्याचप्रमाणे जर्मन नगारिकांकडून घेतल्या जाणाऱ्या करातील काही भाग हा डी-डब्ल्यू या वाहिनीच्या प्रसारणासाठी दिला जातो. सुमारे ६६ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या पब्लिक ब्रॉडकास्टिंग सव्‍‌र्हिसने जवळजवळ संपूर्ण जग व्यापले आहे.

कांदिवलीत ‘लक्ष्मी-छाया’ची पुनरावृत्ती होण्याची भीती
खास प्रतिनिधी

रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर हल्ला केला की सर्व डॉक्टर एकत्र येतात आणि सरकारवर दबाव टाकून अशा घटनांसंदर्भात अध्यादेश काढायला भाग पाडतात. हीच डॉक्टर मंडळी अनेक ठिकाणी नर्सिग होम सुरू करतात आणि पालिकेचे कायदे धाब्यावर बसवून नर्सिग होममध्ये आपल्याला हवे तसे अंतर्गत रचनात्मक बदल करून संपूर्ण इमारतच धोकादायक बनवतात. मात्र या संदर्भात कोणीही आवाज उठविण्यासाठी कोणी पुढे येत नाही. याउपर ही डॉक्टर मंडळी आपले ‘वजन’ वापरून बेकायदेशीर बांधकामाला बडय़ा नेत्यांचा आशीर्वाद मिळवतात.

मुंबईच्या लाइफलाइनमधील ठळक मृत्यूरेषा
दररोज ७५ लाखांहून अधिक मुंबईकर उपनगरी रेल्वेने प्रवास करतात. त्यापैकी फारच थोडय़ांना आरामदायी प्रवासाचे भाग्य लाभते. बहुतेकांना चौथ्या सीटसाठी जीवघेणी घडपड करावी लागते. अनेकांसाठी लोकलमध्ये शिरकाव करणे; हेच एक मोठे दिव्य असते. त्यामुळे दरवाजात लोंबकळत प्रवास करण्याखेरीज पर्याय नसतो. मुंबईकरांचा लोकल प्रवास सुकर अधिक सुकर करण्यासाठी एमयूटीपी प्रकल्पांर्गत अनेक रेल्वे योजना हाती घेण्यात आल्या आहेत. या प्रकल्पाची आधीची मुदत कधीच संपुष्टात आली.

उद्या रंगणार ‘चैत्रचाहूल’
प्रतिनिधी

चैत्र शुद्ध प्रतिपदेला हिंदू नववर्षांची सुरुवात होते. गुढी-तोरणे उभारून घरोघरी हा उत्सव साजरा होतो. मात्र यात ‘३१ डिसेंबर’ अथवा ‘न्यू इयर’चा बेहोष आणि उघडानागडा जल्लोष नसतो. आपल्या संस्कृतीचे, बदलत्या ऋतूचे, निसर्गाचे भान आणून देणारा तो एक सहज आणि संयत सोहळा असतो. याच परंपरेशी नाते सांगणारा एक उपक्रम गेली तीन वर्षे रंगतदारपणे साजरा होतोय. नवीन वर्षांच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी रसिकांना आणि कलाकारांना एकत्र आणणारा आणि महत्त्वाचे म्हणजे समाजासाठी काम करणाऱ्यांना कृतज्ञतेचा नमस्कार करणारा हा कार्यक्रम आहे ‘चैत्रचाहूल’. गुढीपाडव्याच्या दिवशीच होणाऱ्या या कार्यक्रमात गेली तीन वर्षे ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे, नृत्यतपस्वी गुरू पार्वतीकुमार आणि ज्येष्ठ अभिनेते राजा मयेकर यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. यंदा भ्रमणमंडळ प्रस्तुत चैत्रचाहूलमध्ये अभिवादन करण्यात येणार आहे मराठी रंगभूमीवरील एक मानदंड समजले जाणारे ज्येष्ठ रंगकर्मी प्राध्यापक मधुकर अर्थात मामा तोरडमल यांना. नाटककार, दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता आदी अनेक नात्यांनी मामा तोरडमल रसिकांना परिचित आहेत. विशेष म्हणजे त्यांनी जगप्रसिद्ध असलेल्या अ‍ॅगाथा ख्रिस्तीच्या भयकथांच्या तब्बल ३९ खंडांचा मराठीत अनुवाद केला आहे. त्यांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. मुंबईवर २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांशी धाडसाने दोन हात करणाऱ्या जवानांइतकीच मोलाची कामगिरी आणि तीसुद्धा हातात शस्त्र न घेता केली ती अग्निशमनदलाने. या अग्निशमनदलाचे प्रमुख प्रताप शिरगोप्पीकर यांनाही या कार्यक्रमात आवर्जून सन्मानित करण्यात येणार आहे. यंदाच्या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना ‘प्रवास’ ही आहे. अनेक कलावंत कार्यक्रम ही संकल्पना आपापल्या आविष्कारांद्वारे खुलविणार आहेत. या सगळ्या सृजनसोहळ्याचे कला दिग्दर्शन गोपी कुकडे यांनी केले आहे तर नेपथ्य अजित दांडेकर यांचे असणार आहे. शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना असून मंगेश कुलकर्णी यांनी सृजनसंस्कार केले आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी, शुक्रवार, २७ मार्च रोजी सायं ४.३० वाजता यशवंत नाटय़मंदिर, माटुंगा येथे हा कार्यक्रम होणार आहे. ‘एस.ओ.टी.सी.’ने त्याचे प्रायोजकत्व स्वीकारले असून उपस्थित रसिकांमधून सोडत काढून पाच भाग्यवान रसिकांना प्रवासोपयोगी आकर्षक भेट दिली जाणार आहे. या कार्यक्रमाचे संयोजक विनोद आणि महेंद्र पवार यांचा या कार्यक्रमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यावसायिक नसतो. संस्कृतीसंवर्धन ही या कार्यक्रमाची मुख्य प्रेरणा आहे. साहित्याचा अधिकाधिक प्रसार व्हावा आणि अधिकाधिक पुस्तके रसिकांनी खरेदी करावीत या हेतून २०० रुपयांची पुस्तके खरेदी करणाऱ्यांना विनामूल्य या निमंत्रणपत्रिका मिळणार आहेत. आयडियल पुस्तक त्रिवेणी, दादर व मॅजेस्टिक बुक डेपो, शिवाजी मंदिर येथे २४ मार्चपासून या निमंत्रणपत्रिका उपलब्ध आहेत.

‘रिबोट’ला बागूल शब्द पुरस्कार
प्रतिनिधी

लेखक जी. के. ऐनापुरे यांच्या रिबोट या कादंबरीची शब्द प्रकाशनतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘बाबुराव बागूल शब्द पुरस्कारासाठी’ निवड करण्यात आली आहे. ‘शब्द द बुक गॅलरी’ तर्फे देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे १० हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्हे असे स्वरुप आहे. बाबुराव बागूल यांच्या प्रथम स्मृतीदिनी म्हणजे येत्या २६ मार्च रोजी ललित कला भवन, कामगार कल्याण मंडळ, सदानंद ढवण मैदानासमोर, नायगांव, दादर (पूर्व) येथे आयोजित सोहळ्यात हिंदी साहित्यातील ज्येष्ठ लेखक उदय प्रकाश यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. साहित्यिक दिगंबर पाध्ये या समारंभाच्या अध्यक्षपदी असतील. २००७-२००८ मध्ये प्रकाशित साहित्याचा विचार केल्यानंतर निमंत्रक येशू पाटील, रंगनाथ पठारे, हरिश्चंद्र थोरात व रेखा इनामदार-साने यांच्या निवड समितीने ते निश्चित केले.